India
सामाजिक सलोख्याची साक्ष देणारा शाह शरीफ दर्गा
शाहशरीफ दर्गा महाराष्ट्राच्या हिंदु-मुस्लिम एकात्मतेचं प्रतिक राहिला आहे.
अहिल्यानगर (आधीचं अहमदनगर) सैन्य छावणीच्या सीमेपासून काही अंतरावर असलेला शाह शरीफ दर्गा ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी पुत्रप्राप्तीसाठी या दर्ग्याच्या बाबांकडं नवस केल्याचं म्हटलं जातं. तेव्हापासूनच हा दर्गा महाराष्ट्राच्या हिंदु-मुस्लिम एकात्मतेचं प्रतिक राहिला आहे. आजही सर्व धर्मीय नागरिक इथं दर्शनासाठी येतात.
"आमच्या इथं अनेक हिंदू धर्मीय माणसं राहतात. त्यांच्या लग्न पत्रिकेत आमची नावं असायची आणि आमच्या लग्नपत्रिकेत त्यांची नावं असायची, इतकं सगळं चांगलं होतं. मात्र तेच लोक आता कट्टर झाले आहेत, जे गेल्या १०० वर्षांपासून आमच्य सोबत होते. याचं कारण म्हणजे तुम्ही (भाजप) लोकांमध्ये ती कट्टरता भरली," शाह शरीफ दर्ग्यासमोर बसलेले महावितरण हे निवृत्त कर्मचारी मोहम्मद हानिफ समाजात वाढत्या द्वेषाबद्दल बोलताना म्हणतात.
दर्गा अहिल्यानगर शहरातून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या दर्गा दायरा या गावात आहे. 'दायरा' या शब्दाचा अर्थ परिसर होतो, त्यामुळं या दर्ग्यावरूनच या गावाला नाव मिळाल्याचं दिसतं. खिज़ा जाहगिरदार या दर्ग्याची देखरेख करतात. एक प्रकारे त्यांचं कुटुंब या दर्ग्याचे मौलवी आहेत. ते या दर्ग्याचा इतिहास सांगतात.
शाहशरीफ दर्गा
"शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले. अजंठामध्ये त्यांची गादी होती, तेव्हा त्यांच्या गादीला वारस नव्हता. त्यानंतर त्यांनी अनेक मंदिरांना आणि सुफी संतांना भेट देऊन पुत्रप्राप्तीसाठी नवस केला. मात्र त्यांना मुलगा होत नव्हता. त्यांना कळालं की या ठिकाणी शाहशरीफ म्हणून एक सुफी संत आहेत. त्यावेळी शाह शरीफ बाबा जिवंत होते," दर्ग्यात बसलेले जाहगिरदार माहिती देतात.
"मालोजी राजांनी इथं येऊन बाबांचा आशिर्वाद घेतला आणि पुत्रप्राप्तीसाठी नवस केला. त्यांना पुत्र प्राप्ती झाली तर नवस फेडण्यासाठी म्हणून त्यांच्या मुलाला शाह शरीफांचं नाव देणार, मालोजी राजे म्हणाले होते. ही १५१६ सालची घटना आहे. त्यानंतर १६१७ मध्ये मालोजी राजांना दोन मुलं झाली. नवसात म्हटल्याप्रमाणे त्यांनी एका मुलाला शाह तर दुसऱ्या मुलाला शरीफ असं नाव दिलं," जाहगिरदार पुढं सांगतात.
खिज़ा जाहगिरदार
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक काही तासांवर आली आहे. निवडणुकीसाठी गेल्या महिनाभरात चाललेल्या प्रचारात अनेक घोषणा, आश्वासनं, भावनिक आव्हानं आणि भाषणं केली जात आहेत. यात भाजपनं उत्तरप्रदेशमधून 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'एक है तो सेफ है' यासारख्या घोषणा महाराष्ट्रात आणून धार्मिक धृवीकरणाचा प्रयत्न केला आहे.
मात्र 'अशाप्रकारच्या प्रचारामुळं देशाचं सामाजिक स्वास्थ्य बिघडतं आहे, यातून धर्माधर्मामध्ये द्वेष पसरत आहे', असं जाहगिरदार यांना वाटतं. "शिवाजी महाराजांनी त्यांचं राज्य स्थापन करताना अठरापगड जातींना सोबत घेतलं, जर त्यांना मुस्लिमांचा एवढा राग असता तर त्यांनी रायगडच्या किल्ल्यावर मशीद बांधली नसती. त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सेनापती होते, त्यांचे अंगरक्षक मुस्लिम होते," सध्याचे राजकारणी फक्त त्यांची खुर्ची वाचवण्यासाठी हा द्वेष पसरवत असल्याचं सध्या महाराष्ट्रात वापरात असलेल्या घोषणांबद्दल विचारलं असता जाहिरदार सांगतात.
मालोजी राजेंनी शाह शरीफ बाबांना पुढं तीन गावांची जाहगिरदारी दिली, असंही ते म्हणाले. यात दर्गा दायरा, पाथर्डीतील एक गाव आणि श्रीरामपुरात एक गाव देण्यात आलं होतं. खुद्द शिवाजी महाराजांनीदेखील या दर्ग्यात येऊन दर्शन घेतलं होतं, त्यानंतर संभाजी महाराजांनीही इथं येऊन पुत्रप्राप्तीसाठी नवस केला होता, असंही ते सांगतात.
"आजही शिवाजी महाराजांचे वंशज किंवा त्यांचे प्रतिनिधी या दर्ग्याला भेट देऊन चादर आणि फुलं चढवत असतात. हे भोसले घराण्याचं कुलदैवतच आहे," संभाजीराजे छत्रपतींचा दर्ग्यात दर्शन घेतानाचा फोटो दाखवताना जाहगिरदार सांगतात.
संभाजीराजे छत्रपती दर्ग्यात दर्शन घेताना
भाजपकडून या प्रकारच्या घोषणा किंवा प्रचार होण्याची ही पहिली वेळ नाही. त्यामुळं शिवाजी महाराजांच्या काळात जेवढा जातीयवाद नव्हता, तेवढा जातीयवाद सध्या असल्याचं दर्ग्यात दर्शनासाठी आलेले सय्यद हसन मिया सांगतात.
"मुळात ही कट्टरता आजही महाराष्ट्रात नाही, मात्र हा जातीवाद केल्याशिवाय तुम्ही सत्तेत राहू शकत नाही, जोपर्यंत आपण दोघं भांडतोय, तोपर्यंत त्यांना सत्तेची खुर्ची मिळणार आहे, ज्या दिवशी हे भांडणं बंद होईल, त्यांना सत्ता मिळणार नाही, हे ते जाणतात. त्यामुळं ते आपल्याला लढवतात," मिया पुढं सांगतात.
देशात विकास, गरीबी, महागाई आणि बेरोजगारी सारख्या गोष्टींवर चर्चा होणं अपेक्षित असताना या प्रकारची चर्चा होत असल्याबद्दल मिया दुःख व्यक्त करतात. त्यांच्यासोबत असणाऱ्या मोहम्मद हानिफ यांनी तर ते यावेळी नोटाला मतदान करणार असल्याचं स्पष्ट केलं.
मोहम्मद हानिफ
"आज कोणताही नेता त्या लायकीचा नाही. आजचे राजकारणी स्वतःसोबत सुरक्षारक्षक घेऊन फिरतात, आधीच्या राजकारण्यांना इतके सुरक्षारक्षक घेऊन फिरण्याची गरज नव्हती. तुम्हाला इतके सुरक्षारक्षक घेऊन फिरावं लागतं कारणं तुम्ही खोटे आहात, तुम्ही बंडल लोकं आहात, तुम्ही समाजात द्वेष पसरवता, त्यामुळं तुम्हाला भीती आहे, म्हणून तुम्हाला सुरक्षारक्षकांची गरज पडते," हानिफ थोडे भावनिक होत बोलतात. आजच्या राजकारण्यांनी राजकारणाची भाषा बदलली असल्याचंही ते सांगतात.
"आम्ही तसं तर कोणाच्या विरोधात नाही, मात्र भाजपच्या विरोधात नक्की आहोत. कारण भाजपची विचारसरणी मुस्लिम विरोधी आहे, ते सत्तेत आले तरी सांभाळावं लागतं, कारण आपण लोकशाहीत राहतो. भाजपमुळं समाजात जातीवाद वाढला आहे. तुम्ही जर चांगली धोरणं आणली असती तर तुम्हाला या सारख्या घोषणा द्यायची गरज पडली नसती. काँग्रेसदेखील चुका करायची, पण त्यांनी कधी अशा घोषणा दिल्या नाहीत," हानिफ पुढं सांगतात.
पुढं खिज़ा जाहगिरदारांनी या दर्ग्याशी निगडीत काही दंतकथा सांगितल्या. त्यातील एक दंतकथा म्हणजे भारतातील बाकी सर्व घराणी संपतील, मात्र मराठ्यांचं घराणं शेवटपर्यंत कायम राहील, असा आशिर्वाद शाहशरीफ बाबांनी मराठ्यांना आशिर्वाद दिला होता, असं जाहगिरदार सांगतात. शिवाय हा दर्गादेखील मालोजी राजेंनी बांधून दिला आहे. त्यामुळं हा दर्गा इतर दर्ग्यांपेक्षा वेगळा असल्याचं जाहगिरदार सांगतात. इतर दर्ग्यांच्या कळसावर अर्धा चंद्र असतो, मात्र या दर्ग्यावरच्या कळसावर सुर्य असल्याचं ते लक्षात आणून देतात.
दर्ग्यावरच्या कळसावरील सुर्य
मात्र हिंदू मुस्लिमांमध्ये द्वेष पसरवणाऱ्या लोकांनी इतिहासातून बाबांची नोंद काढून टाकली आहे आणि या दर्गा दायरा गावात हिंदू मुस्लिम आणि इतर धर्मीय लोकं शांततेनं राहत असून या दर्ग्यावर हिंदू मुस्लिम, मारवाडी आणि इतर अनेक समाजाचे लोक दर्शनासाठी येत असल्याचं जाहगिरदार सांगतात.
हे बोलत असताना सध्याच्या राजकारणावर त्यांनी चिंता व्यक्त केली, "हे हिंदू मुस्लिमांचं राजकारण करणाऱ्या राजकारण्यांचे मुलं शिकलेली आहेत. ते कधी तुम्हाला दंग्यांमध्ये दिसणार नाहीत. त्यांचं हिंदू प्रेम फक्त भाषणापुरत मर्यादीत आहे. हे लोक आता शिवाजी महाराजांचं नाव घेऊन बटेंगे तो कटेंगे करत आहेत. शिवाजी महाराजांना आपण सर्व आदर्श मानतो, त्यांच्या नावावरून असं करणं योग्य नाही."
ही चर्चा सुरू असताना अहिल्यानगरमधील व्यावसायिक सुनील गांधी या दर्ग्यात दर्शनासाठी आले. गांधी गेल्या ५० वर्षांपासून या दर्ग्यात दर्शनासाठी येत आहेत. सध्या वाढत्या वयोमानामुळं त्यांना सातत्यानं दर्ग्यात दर्शनाला येता येत नसलं तरी एके काळी ते दररोज इथं दर्शनासाठी येत होते, असं ते सांगतात.
"हे सध्याचं राजकारण चुकीचं आहे, फक्त सत्तेसाठी आणि पैशांसाठी वाटेल तो प्रचार केला जात आहे," सध्या सुरू असलेला प्रचार आणि भाजपकडून वापरल्या जाणाऱ्या घोषणांबद्दल बोलताना गांधी सांगतात.
'महाराष्ट्रातील राजकारण्यांना फक्त सत्ता हवी आहे, त्यांना विकासकामं करण्यात काहीही रस नाही, त्यामुळं निवडणुकीच्या काळात याप्रकारचा प्रचार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे,' असंही ते म्हणाले.
या घोषणा आधी उत्तर प्रदेशच्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी वापरण्यात आल्या होत्या. काही महिन्यांपुर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं प्रचंड वाईट कामगिरी केली, असं म्हणता येईल. त्यानंतर हरवलेलं मैदान परत मिळवण्यासाठी भाजपनं पुन्हा हिंदू मुस्लिम धृवीकरणाचा मुद्दा समोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आणल्या. तेव्हापासून महायुती सरकारकडून या घोषणेचा वापर केला जात आहे.
शेख शकील अब्दुल रहमान
शेख शकील अब्दुल रहमान एक पेंटर आहेत, लोकाच्या घरांचं रंगकाम करून ते त्यांची उपजिविका भागवतात. त्यांना लहानपणी पोलिओ झाला होता, त्यामुळं ते उजवा पाय आणि हातानं अपंग आहेत. तरीही ते घरांच्या पेंटींगचं काम करत असतात. महिन्याला किमान ८ ते १० हजार रुपये कमाई ते करतात. या उत्पन्नात काटकसरीनं संसार करावा लागतो असं ते सांगतात.
ते फार कठोर राजकीय भूमिका घेत नाहीत. तरीही त्यांना सध्या महागाईचा प्रश्न सतावत असल्याचं ते मान्य करतात. सध्याच्या राजकारणात महागाई, विकास कामं, शिक्षण रोजगार आणि यासारख्या विषयांवर चर्चा होणं अपेक्षित असताना ती होत नसल्याबद्दल त्यांना वाईट वाटतं, असं रहमान सांगतात.
शेख बसिरत अली आलमचं वय सध्या २४ वर्ष आहे. १२वी पर्यंत शिक्षण त्यानं घेतलं आहे आणि तो सध्या एका कंपनीत वेल्डिंगच काम करतो. लोकसभेत मतदान करताना त्याच्यासमोर भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस हा एकच मुद्दा होता, असं तो सांगतो. त्यामागचं कारण विचारलं असता, भाजपकडून केला जाणारा जातीयवादाचं कारण तो देतो. यावेळीदेखील मतदानाला जाताना त्याच्या मनात ही एकच गोष्ट असणार असल्याचं तो मान्य करतो. विकासाची चिंता त्याच्या बोलण्यात दिसत नाही.
मात्र "आपण सर्वांना एकत्र राहायचं आहे, त्यामुळं अशाप्रकारचा प्रचार चांगला नाही," आलम सांगतो.
राजकारण्यांनी गरीबी हटवण्यावर काम केलं पाहिजे, असं मिया सांगतात. "देशात एकता आणि शांतता राखून ठेवण्यासाठी भारतीय घटनेनं निवडणुका कशा घ्याव्यात याबद्दल माहिती दिली आहे. मात्र तशा निवडणुका घेतल्या जात नाहीत, तुम्ही तुमच्या कामाचा स्तर इतका चांगला करा की तुम्हाला प्रचाराचीदेखील गरज पडणार नाही. तुम्ही लोकांना पैसे देऊन, भीती दाखवून, धमक्या देऊन लोकांची मतं मिळवण्याचा प्रयत्न करत आहात," सध्याच्या प्रचारावर बोलताना मिया म्हणाले.