India

सेंटिनली आदिवासिंचा एकांताचा हक्क

अमेरिकी धर्मप्रसारकाच्या हत्येने अनेक प्रश्न समोर आले आहेत

Credit : NDTV.com

भारताच्या अंदमान आणि निकोबार येथील उत्तर सेंटिनेल बेटावरील आदिवासी जमातीच्या लोकांनी १६ नोव्हेंबर रोजी एका अमेरिकी नागरिकाची हत्या केल्याची माहिती समोर आली होती. जोन अॅलेन चाऊ (वय २७) असं या अमेरिकी नागरिकाचं नाव आहे. ख्रिश्चन धर्माच्या प्रचारासाठी हा नागरिक तिथे गेला होता. चाऊ याने यापूर्वी अंदमान आणि निकोबारला पाच वेळा भेट दिली होती. सेंटिनेल येथील आदिवासींना भेटण्याची इच्छा मनाशी बाळगून चाऊने १४ नोव्हेंबरला या बेटावर जाण्याचा प्रयत्न केला होता. पण, तो अपयशी ठरला. १६ नोव्हेंबर रोजी त्यानं पूर्ण तयारीसह दुसरा प्रयत्न केला. तो यशस्वी सुद्धा झाला मात्र त्या बदल्यात त्याला आपला जीव गमवावा लागला. या बेटावरील आदिवासींनी त्याला बाणांनी मारून समुद्र किनाऱ्यावर दफन केल्याचं सांगितलं जातंय. 

अमेरिकी वकिलांनी मात्र त्याची हत्या झाली नसून तो केवळ बेपत्ता असल्याचं म्हटलं आहे. चाऊने  सेंटिनेल बेटावर जाण्याची परवानगी घेतली नव्हती. स्थानिक मासेमाराला २५,००० रुपये देऊन तो तिथं गेला होता. या अमेरिकी नागरिकाला या बेटावर घेऊन जाणाऱ्या मच्छिमारासह एकूण सात जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलं आहे.  अंदमान निकोबार बेटावरील आदिवासी आणि इतर नागरिकांमधील संघर्षाची ही पहिली घटना नाही. १९९८ मध्ये पहिल्यांदा हे लोक हातात बाण न घेता आपल्या भौगोलिक हद्दीच्या बाहेर वावरताना दिसून आले. २००६ मध्ये चुकून आदिवासींच्या बेटाकडे गेलेल्या नावेतील सर्व मच्छीमारांना आदिवासींनी मारून टाकलं होतं. या मच्छीमारांचे मृतदेह परत आणण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले. पण ते शक्य झालं नाही. काही वर्षांपूर्वी ब्रिटनच्या 'ऑब्झर्व्हर' या वृत्तपत्रानं काही लोक जारवा महिलांना बिस्कीट आणि नाण्यांच्या बदल्यात नग्नावस्थेत विदेशी पर्यटकांसमोर नृत्य करायला प्रवृत्त करत असलेले दोन व्हिडिओ प्रसिद्ध केले. या सर्व प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेऊन या जमातींचं अशा प्रकारचं शोषण रोखण्यासाठी २०१२मध्ये एक कायदा बनवला गेला आणि त्याअंतर्गत आदिवासींच्या परिसरात जावून त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ काढणाऱ्याला तीन वर्ष कारावासाची शिक्षा निश्चित करण्यात आली. 

आदिवासी राहत असलेल्या  परिसराच्या मधून जाणारा 'अंदमान ट्रंक रोड' हा देखील त्यांचे दैनंदिन जीवन अवघड करणारा घटक ठरला. या रोडवरून सैन्याच्या गाड्यांसोबतच पर्यटकांच्या गाड्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर जायच्या. विचित्र वाटत असणारी ही लोक पर्यटकांसाठी मनोरंजनाचं साधन होऊन बसली. धोका वाटला की आदिवासी त्या गाड्यांच्या दिशेनं बाण मारत. पर्यटकांचं आदिवासींना चिडवणं आणि नग्नावस्थेत फिरणाऱ्या जारवा महिलांबरोबर केलं जाणारं गैरवर्तन लक्षात घेऊन २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं पर्यटकांच्या 'अंदमान ट्रंक रोड'वरून प्रवास करण्यावर बंदी घातली.

२०१६ मध्ये जारवा जमातीतील पाच महिन्याच्या एका बाळाची हत्या करून त्याला पुरून टाकल्याचं समोर होतं. विशेष म्हणजे ही हत्या त्याच जमातीच्या लोकांनी केल्याचं नंतर स्पष्ट झालं. जारवा जमातीतील लोक काळ्या वर्णाचे आहेत. थोड्या उजळ रंगाचं बाळ जन्माला आलं तर त्याला अपवित्र समजून समाजाची शुद्धता जपण्यासाठी त्याला मारून टाकलं जातं. याच प्रकारची ती घटना होती. या जमातीतील महिलांवर जबरदस्ती केल्याचेही प्रकार उघड झाले आहेत. त्यातूनच त्यांना अशी वेगळ्या वर्णाची मुलं होतात. आणि परंपरेचा भाग म्हणून त्यांची हत्या केली जाते. या हत्येनंतर दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. ज्यामध्ये एक त्या बाळाचा संशयित पिता  सुद्धा होता. २०१७ मध्ये देखील या आदिवासी महिलांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आला. हा व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात आली. 

अंदमान हा एकूण ५७२ बेटांचा समूह असला तरी त्यातील फक्त ३६ बेटांवरच बाहेरचे लोक जाऊ शकतात. तर निकोबार बेटावर पर्यटकांना जाण्यास बंदी आहे. १९५६ मध्ये भारत सरकारनं या बेटांवर वास्तव्यास असणाऱ्या जारवा या मुख्य आदिवासी जमतीसह सेंटिनल, ग्रेट(महान) अंदमानी, ओन्ग, सौपेंज यांसारख्या पाच जमातींना भारतातील मूळ आदिम जमातींचा दर्जा दिला. बाहेरील कुठल्याही व्यक्तींबरोबर संपर्क प्रस्थापित होऊ न देण्यासाठी या जमाती प्रसिद्ध आहेत. 

आफ्रिकेतून या बेटांवर स्थलांतरित झालेली ही लोक इथे ५०,००० हजार वर्षांपासून राहतात. काही संशोधकांनुसार तर जारवा ही जमात सध्या अस्तित्वात असणारी जगातील सर्वात प्राचीन जमात आहे. उंचीला कमी आणि रंगाने काळे असलेले हे लोक अजूनही शिकार करून जगतात. या लोकांची वनस्पती आणि प्राण्यांबद्दलची जाण आश्चर्यकारक आहे. त्यांची  रोगप्रतिकार क्षमता प्रचंड आहे. या जमातींचे स्त्री-पुरुष नग्न राहतात. परंतु आपल्या लैंगिक अवयवांना झाकण्यासाठी कापड, दगड आणि शिपल्यांपासून बनवलेल्या आभूषणांचा वापर करतात. १९९० पर्यंत असे लोक अस्तित्वात असल्याचं सुद्धा माहिती नव्हतं. चिंतेची बाब म्हणजे या जमातीची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. आत्ता त्यांची संख्या २५० ते ४०० च्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. आदीवासी जमाती वास्तव्यास असणाऱ्या बेटांवर फक्त संशोधकांना अभ्यासासाठी जाण्याची मुभा दिली जाते. त्यासाठी सुद्धा पूर्वपरवानगी घेणं आवश्यक असतं. 

अंदमान-निकोबार बेटं भारतात असली तरी ती भारतापेक्षा इंडोनेशियाला अधिक जवळ आहेत. इंडोनेशियापासून या बेटांचं अंतर फक्त १५० किमी आहे. तर भारतापासून ते ८०० किमी आहे. भारतात या आदिवासी जमातींच्या संस्कृतीचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करण्याच्या हेतूनं त्यांना विशेष दर्जा दिला गेला आहे. स्थानिक पोलिसांना सुद्धा त्यांच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करण्याची परवानगी नाही. त्यांना जमेल तितका खासगीपणा बहाल केला जातो. काही काळापूर्वी  ब्रिटनच्या 'सर्वाईवल इंटरनॅशनल' नावाच्या मानवाधिकार संघटनेनं अंदमान-निकोबार बेटांवर पर्यटन बहिष्काराची एक मोहीम सुद्धा सुरू केली होती.  या संघटनेच्या म्हणण्यानुसार या बेटांवर 'जारवा' जमातीच्या लोकांचा 'ह्युमन सफारी' म्हणून वापर केला जातो. त्यांना पर्यटकांकडून प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांप्रमाणे वागवलं जातं. अशा प्रकारचं पर्यटन मानवी स्वभावाला काळिमा फसणारं आहे. आणि म्हणून या संघटनेनं जगभरातील पर्यटकांना आदिवासींच्या परिसरात न जाण्याचं आणि या बेटांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं होतं. 

काही काळ सेंटिनेली जमातीसोबत राहून आलेले मानववंशशास्त्रज्ज्ञ टी. एन. पंडित बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगतात की, "सेंटिनल ही जमात बाहेरच्या जगाच्या संपर्कात नाही. बाहेरच्या लोकांच्या संपर्कात येणं हे त्यांच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं. सर्व जगापासून अलिप्त राहण्याची त्यांची इच्छा असेल तर आपण त्याचा सन्मान करायला हवा." जारवा आणि इतर आदिवासींना जसं मुख्य प्रवाहासोबत जोडण्याचा प्रयत्न करणं त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतं तसंच त्यांना अलिप्त सोडून देणंही त्यांच्यासाठी धोक्याचं आहे असं मानलं जातं. त्यांची कमी होत जाणारी संख्या आणि त्यांच्या आरोग्याचे व जीवनाचे प्रश्न उभे राहत असतील तर त्यांच्या जीवनशैलीत हस्तक्षेप केल्याशिवाय तसं करणं शक्य नाही.