Americas

पेटलेलं कॅलिफोर्निया

२०१८ हे वर्ष कॅलिफोर्नियाच्या इतिहासातलं सर्वात विनाशकारी वर्ष ठरलं आहे.

Credit : BBC News

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात उन्हाळ्यात जंगलांना पेटणारे वणवे हा सतत घडणार प्रकार आहे. दरवर्षी तिथल्या लोकांना या नैसर्गिक आपत्तीला आणि परिणामी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या आर्थिक नुकसनाला सामोरं जावं लागतं. २०१८ हे वर्ष मात्र कॅलिफोर्नियाच्या इतिहासातलं सर्वात विनाशकारी वर्ष ठरलं आहे. जून महिन्यापासून सुरू झालेल्या या अग्नितांडवामुळे आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणावर वित्तहानी व जीवितहानी झाली असून, ३ लाख लोकांना विस्थापित झाले आहेत. हॉलिवूड कलाकार किम कार्देशीयन वेस्ट, अलिसा मिलानो, लेडी गागा, कॅटलिन जेनर यांचाही विस्थापितांमध्ये समावेश आहे. त्याचबरोबर राज्यभरात शेकडो लोक बेपत्ता आहेत  महिन्याभरापासून या परिसरात पाऊस झालेला नसून हवेचा वेग जास्त आहे. यामुळे झाडांच्या सुकलेल्या पानांनी अधिक वेगानं आग पकडली आणि ही परिस्थिती जास्त गंभीर झाली. शासनानं या आगीस नैसर्गिक आपतकालिन परिस्थिती म्हणून जाहीर केलं आहे. सरकारी अकड्यांनुसार यावर्षी कॅलिफोर्नियात ७,०४८ ठिकाणी लागलेल्या आगीमुळे १,६२७,६५२ एकर इतकं क्षेत्र प्रभावित झालं आहे. 

यावर्षी जून ते ऑगस्ट या काळात  कॅलिफोर्नियाच्या उत्तर भागात मोठ्या प्रमाणात जंगलांना आग लागण्यास सुरवात झाली. ४ ऑगस्टला या समस्येला राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यात आलं. नोव्हेंबर महिन्यात वण्व्यांची आणखी एक लाट पसरली. यात ५९ लोकांचा मृत्य झाला तर दहा हजारांवर घरं भस्म झाली. कॅलिफोर्नियाच्या इतिहासातला हा सर्वात भीषण वणवा ठरला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या कॅलिफोर्नियाचा "वाइल्डफायर सीझन" उन्हाळ्यात सुरू होतो आणि शरद ऋतू पर्यंत चालतो. यावर्षी मात्र हा सर्व प्रकार वर्षभर चालू राहण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. कमी प्रमाणात पडलेला पाऊस, कमी आर्द्रता, उबदार सांता ऍना वारा आणि कोरडी जमीन यामुळे प्रामुख्यानं वणव्यासाठी पोषक असं वातावरण कॅलिफोर्नियात निर्माण झालं आहे. 

२०१८ चा हा हंगाम इतका विनाशकारी होण्यामागे विविध कारणांना जबाबदार धरलं जात आहे. यातूनच अनेक ठिकाणी वाद व्हायला सुद्धा सुरवात झालेली पाहायला मिळते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट करून या आगीसाठी वणाखात्याचं अपुरं नियोजन कारणीभूत असल्याचं म्हटलं.

 

 

यावर अमेरिकेचे गृहसचिव रायन झिंके यांनी 'ही वेळ एकमेकांकडे बोट दाखवण्याची नसून समस्येवर तोडगा काढण्याची आहे' असं मत व्यक्त केलं. तर, कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर जेरी ब्राऊन यांनी लोकांचं राहणीमान, जागतिक तापमानवाढ आणि दुष्काळ ही या समस्येमागची मुख्य कारणं असल्याचं स्पष्ट केलं. 

दुसरीकडे, या भीषण आगीसाठी कॅलिफोर्नियातील साउथर्न कॅलिफोर्निया एडिसन आणि पॅसिफिक गॅस अँड इलेक्ट्रिक (PG&E) या विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना सुद्धा जबाबदार धरलं जात आहे. बऱ्याच ठिकाणी आगीची ठिणगी विद्युत तारांमुळे पडल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. विद्युत तारांच्या आसपासच्या झाडांची कटाई न केल्यानं  फांद्यांचा विद्युत तारांना स्पर्श होऊन १२ ठिकाणी आग लागण्यास सुरवात झाली आणि त्यातून १८ लोकांना आपला जीव गमवावा लागला असे आरोप या कंपन्यांवर केले जात आहेत. दोन्हींचा उगम तपासणीखाली आहे. याबाबतीत प्रशासनाकडून तपास केला जात आहे. उत्तर कॅलिफोर्नियात ज्यांनी आगीमध्ये आपली घरं गमावली अशा लोकांनी PG&E कंपनीविरोधात कायदेशीर तक्रार नोंदवली आहे. एनपीआरच्या वृत्तानुसार  मागील वर्षी देखील या कंपन्यांविरोधात ५० लोकांनी आपली तक्रार दाखल केली होती. 

'द इंडिपेंडन्ट'च्या वृत्तानुसार हवामान बदलाच्या परिणामस्वरूपात जंगलांना लागणाऱ्या आगीच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक इंधन जाळणं आणि जागतिक तापमान वाढीशी संबंधित वातावरणीय परिस्थिती यामुळे ही समस्या अधिक गंभीर होत जाणार असल्याची चिन्हं आहेत. कॅलिफोर्नियात लागणाऱ्या आगी आणि तापमान वाढ या गोष्टी परस्परावलंबी आहेत. आगींमुळे मोठ्या हरितगृह वायू उत्सर्जित होतात त्यामुळे ओझोन थरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्याचबरोबर वातावरणात राखेचं प्रमाण वाढल्यानं त्याचा परिणाम पर्जन्यमानावर सुद्धा झालेला दिसून येतो. कमी पावसामुळे कॅलिफोर्नियावर दुष्काळाचं सावट आहे. पाऊस नसल्यामुळे आद्रता कमी होऊन जमीन व हवा कोरडी पडते आणि हेच वातावरण पुन्हा एकदा आगींसाठी पोषक ठरतं. पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं  कॅलिफोर्नियातील लागवडीखालील क्षेत्रात झपाट्यानं घट होत आहे. २०१४च्या दुष्काळात तिथल्या जलव्यवस्थापन विभागानं शेतीसाठीचं पाणीवाटपात ५०% टक्क्यांपर्यंत कपात केल्याचं देखील उदाहरण आहे. 

आगीमुळे होणाऱ्या नुकसनाला बांधकाम क्षेत्राचा विस्तार सुध्दा तितकाच कारणीभूत ठरतो. १९९० पासून कॅलिफोर्नियात घरांच्या बांधकामात ४० टाक्यांनी वाढ झाली आहे काही ठिकाणी हे प्रमाण ८०% इतकं आहे. जंगलांनजीकच्या क्षेत्रावर बांधकाम केल्यानं ही घरं आगीच्या विळख्यात सापकडण्याची शक्यता जास्त असते. ज्यामुळे वित्तहानी आणि जीवितहानी होण्याचं प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललंय. 

वणव्यामुळे वतावरणातल्या उष्णतेचं प्रमाण अचानक वाढतं ज्याचा परिणाम इतरही गोष्टींवर होतो. वन्यप्राणी, वनस्पती आणि पिकं अशा सर्वच घटकांवर त्याचा परिणाम होतो. उष्णतेची ही लाट अनेक त्याचबरोबर आरोग्यविषयक समस्यांना चालना देते. २००६ साली कॅलिफोर्नियात आलेल्या उष्णतेच्या लाटेत १४७ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. धूर आणि राखेमुळे होणारं वायुप्रदूषण सुद्धा दुर्लक्षित करून चालणार आहे. कॅलिफोर्नियातील नागरिकांमध्ये कॅन्सर आणि श्वसनाच्या आजारांचं प्रमाण सुद्धा आश्चर्यकारकरित्या वाढत आहे. कालिफोर्नियाची अर्थव्यवस्थासुद्धा या आपत्तीचा बळी ठरतेय. दरवर्षी आगीमुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी आणि जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी सरकारी खजिन्यातला मोठा निधी खर्ची घातला जातो. जंगलांना लागणाऱ्या आगी ही नैसर्गिक आपत्ती असली तरी त्यासाठी कारणीभूत असणाऱ्या मानवनिर्मित  कारणांना आळा घातल्यास परिस्थिती सुधारू शकते.