India

कृतीशील पत्रकारिता

कुलदीप नय्यर, १९२३-२०१८

Credit : Deccan Herald

ज्येष्ठ पत्रकार, लेखक, मानवाधिकार कार्यकर्ते कुलदीप नय्यर यांचे बुधवारी रात्री दिल्लीत ९५व्या वर्षी निधन झाले. कुलदीप नय्यर यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२३ मध्ये पाकिस्तानच्या सियालकोट भागात झाला होता. नय्यर यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात एका उर्दू वर्तमानपत्रा पासून झाली. पत्रकारितेतला आणीबाणीविरोधातील  लढाईचा चेहरा अशी ओळख नय्यर यांची माध्यमांच्या दुनियेत होती. आणीबाणी काळात सरकारी विरोधी लेखनासाठी नय्यर यांना अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली तुरुंगात टाकण्यात आले होते.


नय्यर यांना २०१५ मध्ये रामनाथ गोएंका जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कुलदीप नय्यर यांच्या नावे देखील पत्रकारितेचा एक प्रतिष्ठित पुरस्कार दिला जातो.  देशातील विविध वृत्तपत्रांसाठी त्यांनी स्तंभलेखन केले. 'द स्टेट्समन' (दिल्ली) आणि 'द इंडियन एक्सप्रेस' सारख्या नामवंत वृत्तपत्रांचे संपादकपद भूषविलेल्या नय्यर यांनी डेक्कन हेराल्ड (बेंगलोर), द डेली स्टार, द संडे गार्डीयन, द न्यूज, द स्टेट्समन, द एक्सप्रेस ट्रिब्यून पाकिस्तान, डॉन पाकिस्तान, प्रभासाक्षी यांच्यासह ८० पेक्षा अधिक वृत्तपत्रांसाठी जवळपास १४ भाषांमध्ये लेख लिहलेत. नय्यर यांची इंडिया आफ्टर नेहरु, इमर्जन्सी रिटोल्ड, बिटवीन द लाइन्स, स्कूप : द डे लुक्स ओल्ड, इंडिया पाकिस्तान रिलेशनशिप अशी १५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.


पत्रकरितेव्यतिरिक्त राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये देखील नय्यर यांचा सक्रिय सहभाग होता. १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्रात गेलेल्या भारताच्या प्रतिनिधीमंडळाचे ते सदस्य होते. १९९० मध्ये ब्रिटनमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्रात गेलेल्या भारताच्या प्रतिनिधीमंडळाचे ते सदस्य होते. ऑगस्ट १९९७ मध्ये राज्यसभेत खासदार म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला.

मानवाधिकार आणि शांततेसाठी काम करणारे कार्यकर्ते म्हणून कुलदीप यांची ओळख होती. २००० पासून दरवर्षी ते भारत आणि पाकिस्तानच्या शांतता कार्यकर्त्यांसह स्वातंत्र्यदिनी अमृतसर जवळ अटारी-वाघा सीमेवर मेणबत्ती लावून शांततेचा संदेश देत असत. नय्यर भारत पाकिस्तान संबध सुधारण्यासाठी कायम प्रयत्नशील होते. नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यादीनानंतर 'द डेली स्टार' साठी लिहलेल्या लेखात ते म्हणतात की, ''पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत-पाकिस्तान संबंधांना लक्षात घेऊन ते सुधारण्यासाठी पुढाकार घ्यावा”. कुलदीप नय्यर यांनी शिक्षा पूर्ण केल्यानंतर सुद्धा सुटका न झालेल्या पाकिस्तानातील भारतीय कैदी आणि भारतातील पाकिस्तानी कैद्यांना मुक्त करण्यासाठी काम केले.


डाव्या विचारांच्या बाजूने झुकलेल्या नय्यर यांच्यावर अनेकवेळा मूलतत्त्ववादी विचारांकडून ‘देशविरोधी’ विचारांचे  समर्थन करण्याचे आरोप होत गेले. फेब्रुवारी २०१० मध्ये पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'च्या एका लेखात त्यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी भारतीय दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या केल्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर नय्यर यांनी 'इंडिया : द क्रिटिकल इयर्स' या पुस्तकातून जवाहरलाल नेहरू, डॅनियल स्मिथ यांच्यासह अनेक व्यक्तींबद्दल अतिशय नाजूक आणि गुप्त माहिती उघड केल्याबद्दल नाराजी ओढवून घेतली. आपल्या सडेतोड टिकांसाठी ओळखले जाणारे नय्यर 'बियोंड द लाईन्स' या आपल्या आत्मचरित्रात शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांबद्दल मत मांडताना लिहतात ''अनेक वर्षांपासून मला असे जाणवले आहे की, आयएएस आणि आयपीएस म्हणून काम करणाऱ्या लोकांमध्ये एक सरंजामशाहीची भावना निर्माण झालेली आहे. जी भारतीयांच्या गरजा भागविण्यासाठी योग्य नाही. या लोकांचा सुरुवातीचा आदर्शवाद काही वर्षांच्या सेवेमध्ये कमी होतो आणि ते हळूहळू केवळ एक वस्तू म्हणून वावरतात."


कुलदीप नय्यर यांच्या जाण्याने पत्रकारितेतील एक निर्भीड चेहरा हरवल्याची प्रतिक्रिया संपूर्ण देशभरातून व्यक्त केली जात आहे. ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी नय्यर यांच्या जाण्याबद्दल शोक व्यक्त केला.  भारतातील संयुक्त राष्ट्रांच्या दूतावसाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून कुलदीप नय्यर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.