Americas
अमेरिकन पत्रकारावर व्हेनेझुएलन सरकारकडून कारवाई
ताब्यात घेतल्यानंतर १२ तासांनी सुटका
अमेरिकन मुक्तपत्रकार कोडी वेडल आणि त्याचा स्थानिक सहकारी कार्लोस कमाचो यांना गुरुवारी राजधानी कॅराकसमधल्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. सकाळी ८ च्या दरम्यान व्हेनेझुएलन गुप्तचर संस्थेनं ताब्यात घेऊन त्यांच्याकडून लॅपटॉप, फोन व पासपोर्ट जप्त करण्यात आले.
कोडी वेडल हे गेल्या ५ वर्षांपासून व्हेनेझुएलामध्ये राहत असून विविध माध्यमसंस्थांसाठी ते काम करतात. ‘वेडल यांनी मादुरो सरकारविरूद्ध वेळोवेळी भूमिका घेतल्यामुळे त्यांना ताब्यात घेतलं गेलं’, असा दावा त्यांची आई शेरी वेडल यांनी Local10 ह्या माध्यामाशी बोलताना केला आहे. मादुरो सरकारचे जुलूम आम्ही सहन करणार नाही, असाही निग्रह शेरी वेडल यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
हा सर्व प्रकार गंभीर असला तरी याला अधिक तीव्र भासवण्याचा प्रयत्न अमेरिकन आणि युरोपातली माध्यमं करत आहेत, कारण व्हेनेझुएलन अधिकारी वेडल यांना गुप्तचर संस्थेने ताब्यात घेण्यामागे त्यांच्याविरोधात असलेल्या ३६ गुन्ह्यांचा दाखला देत आहेत तर अमेरिकन माध्यमं हेरगिरीच्या आरोपाखाली त्यांना अटक केली असं म्हणत आहेत. गुप्तचर संस्थेनं केलेल्या चौकशीनंतर वेडल यांची सुटका झाली. सुटकेनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, "त्यांना फक्त माझी माहिती हवी होती, मला विरोधी पक्षातले कोण नेते ओळखतात तसंच मी सैन्यातल्या अधिकाऱ्यांशी कशा प्रकारे संवाद साधले आहेत हे त्यांना माहीत करून घायचं होतं."
व्हेनेझुएलामध्ये चालू असलेलं आर्थिक - राजकीय संकट हे अधिकच चिघळत असल्याचं चित्र दिसत आहे. सर्व बलाढ्य पाश्चिमात्य राष्ट्रांनी व्हेनेझुएलावर टाकलेला बहिष्कार आणि अमेरिकेनं या देशाच्या सार्वभौमत्वालाच आव्हान देऊन जाहीर केलेला राष्ट्रपती यामुळे व्हेनेझुएलाची कोंडी झाली आहे. अमेरिकेला कोणत्याही स्थितीत युआन गायादोंना सत्तेत आणायचं आहे, म्हणूनच त्यांना व्हेनेझुएलाचं राष्ट्रपती म्हणून अमेरिकेनं घोषित केलं, मात्र व्हेनेझुएलन नागरिकांनी गायादो यांना अद्याप तरी मान्यता दिलेली नाही. यामुळेच अमेरिकन आणि युरोपीय माध्यमं जगासमोर व्हेनेझुएलाचं वेगळंच चित्र तयार करत आहेत, असं म्हणता येऊ शकतं. अमेरिकन राजसत्ता व माध्यमं या संधीचा वापर करुन व्हेनेझुएलाबदद्ल आणखी अपप्रचार करतील, याबाबत दुमत नाही.