Quick Reads

'तूजी औकात काये': संवेदनशील कवितांचा देखणा रंगमंचीय आविष्कार

नाट्य समीक्षण

Credit : Indie Journal

 

वेदिका कुमारस्वामी यांच्या कविता काही वर्षांपूर्वी फेसबुकवर वाचत होतो. त्या खूप आवडल्या होत्या. नंतर त्यांचा 'गावनवरी' हा कवितासंग्रह आला. काळाच्या ओघात मागच्या काही वर्षांत हे सारं विस्मरणात गेलं. त्यानंतर अलीकडे साधारण महिन्याभरापूर्वी एका मित्राने 'तूजी औकात काये' या कार्यक्रमाबद्दलची पोस्ट टाकली आणि सुदैवाने त्याचा मुंबईतील प्रयोग पाहण्याची संधी मिळाली.

देवदासी प्रथेबद्दलचं हे भाष्य म्हणजे निव्वळ एक अनुभवकथन नाही. त्या केवळ कविताही नाहीत. एकच सलग दीर्घकविता असल्यासारख्या या फाॅर्ममधून एका वेदनेचा हुंकार आपली कथा सांगतो. वेदिकाच्या जन्माच्या वेळी जेव्हा आजी म्हणते की सटीने तुझं नशीब लिहिलंच नाही, तिथून या प्रवासाला सुरुवात होते. हेगडे, सदाशिवप्पा यांच्यापासून तो कुमारस्वामीपर्यंत येऊन थांबतो. वेदिकाला मुक्त करणारा कुमारस्वामी तिच्या आत्मशोधाच्या प्रवासात तिचा आधार होतो. 

सारभात खातानाच मनातनं

मी मला वाढलं त्यांच्या ताटात

या ओळींतून जणू वेदिकाचा शोध समर्पणापर्यंत पोहोचल्यासारखा वाटतो. स्वत:ला शोधताना ती शक्तीपीठांच्या दर्शनाला निघते आणि शांत शांत होत जाते. चौर्‍याऐंशी लक्ष योनींमधून जन्माला आलेल्या जिवांना प्रश्न करते. आपल्या अस्तित्त्वाचा अर्थ शोधायला भाग पाडते. शिवाशिवायही शक्ती होतीच, असं म्हणताना सतीच्या आत्मदहनानंतरचा शिवाचा विलाप ती अमान्य करत नाही.

सोशल मंच आणि 'टायनी टेल्स' या ट्रॅव्हलिंग थिएटर कंपनीने या कवितांना एका आकृतिबंधात बांधून एक अतिशय देखणा आणि तगडा प्रयोग सादर केला आहे. प्रतिक्षा खासनिस आणि निकिता ठुबे यांनी केलेलं या कवितांचं नाट्यरुपांतरण आणि दिग्दर्शन लाजवाब आहे. कवितेसारख्या मुक्त फाॅरमॅटचं रुपांतर अशा गोळीबंद प्रयोगात झाल्यावर त्या कवितांनी अलंकार ल्यायले आहेत, असा भास होतो. त्यांचं रासवट, रांगडं रूप अधिक झळाळून उठतं. मंचाचा अवकाश उजळून टाकतानाच प्रेक्षक म्हणून आपल्याला स्वत:मध्ये डोकावून पाहायला भाग पाडतं. अवघ्या सव्वा तासाची ही मंत्रमुग्ध करणारी संगीतिका संपते, तेव्हा एक आयुष्यभराचा स्पॅन जगून घेतल्याचा समृध्द अनुभव पदरी पडतो.

 

प्रतिक्षा खासनिस आणि निकिता ठुबे या दोघींचं सादरीकरण निव्वळ अप्रतिम. 

 

प्रतिक्षा खासनिस आणि निकिता ठुबे या दोघींचं सादरीकरण निव्वळ अप्रतिम. त्याला तोडीस तोड साथ मिळाली आहे कल्पेश समेळ यांची आणि अधूनमधून स्वप्निल भावे आणि दीप डबरे या दोघांचीही. स्वप्निल आणि दीप यांच्या साजेशा संगीत दिग्दर्शनाशिवाय हा प्रयोग अपुराच. कल्पेश, स्वप्निल अणि दीप यांच्या वाद्यांनी प्रयोगात बहार आणली आहे. या पाचही कलाकारांच्या एनर्जीला मनापासून दाद द्यावीशी वाटते. कार्यक्रमाचं सुंदर पोस्टरही कल्पेश यांनीच डिझाईन केलं आहे. प्रयोगात येणारी गाणी हा एका वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकतो, इतकी सुंदर आहेत. नलेश पाटील यांची 'कुणी पुसल्या हिरव्या जागा' ही कविता यापूर्वी जितेंद्र घाटगे यांच्या 'जीवाश्म' या लघुपटात ऐकली होती. ती इथेही ऐकायला मिळणं, हा एक सुखद धक्का होता. देवदासींच्या गाण्यांचे शब्द आणि भाषा परकी असली, तरी संगीत ताल धरायला लावत होतं.

 

 

ओंकार हजारे यांची प्रकाशयोजना सादरीकरणाला एक सुंदर संस्मरणीय फील देते. एखाद्या मंदिराचा वाटेल असा केवळ एक खांब आणि पायर्‍यांसारखी बैठक, एवढ्याच मर्यादित साधनांसह केलेला हा प्रयोग मिनिमलिस्टिक नेपथ्याचेही नवे मापदंड प्रस्थापित करतो. मयुर देशमुख यांची निर्मिती असलेल्या या प्रयोगाचं निर्मिती व्यवस्थापन अभिनव जेऊरकर यांचं आहे. शरयू तायडे यांच्या कल्पक वेशभूषेचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल. लाल आणि पांढर्‍या रंगाचा सूचक वापर कवितांच्या आणि एकूणच प्रयोगाच्या विषयाला साजेसा आहे.

 

या प्रयोगाचं तिकीट वहीत आठवण म्हणून मोरपिसासारखं जपून ठेवावं इतकं सुंदर आहे.

 

विशेष उल्लेख करावा वाटतो, तो प्रतिक पंचफुला यांनी डिझाईन केलेल्या तिकीटाचा. या प्रयोगाचं तिकीट वहीत आठवण म्हणून मोरपिसासारखं जपून ठेवावं इतकं सुंदर आहे. एका बाजूला वेदिका कुमारस्वामी यांच्या कवितेतील ओळी आणि त्याच्या मागच्या बाजूला नाटकाची, कलाकारांची आणि इतर तंत्रज्ञांची माहिती ही कल्पनाच भन्नाट आहे. त्याशिवाय आणखी एक आवडलेली गोष्ट म्हणजे मंचाच्या मागच्या बाजूस काळ्या पडद्यावर इंग्रजी सबटायटल्सही दिसत होती, जेणेकरून हा प्रयोग अमराठी प्रेक्षकांपर्यंतही पोहोचेल. मराठी कविता भाषेच्या कक्षा ओलांडून इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतलेले हे विशेष प्रयत्न जास्त भावले. 'गावनवरी' हा कवितासंग्रह आकारास येण्यात कविता महाजन यांची महत्त्वाची भूमिका होती. हा प्रयोग पाहायला त्या आता हयात नाहीत, हे खूप मोठं दुर्दैव.

मराठी रंगभूमीवर चौकट मोडणारे अभिनव प्रयोग अलीकडे होत आहेत, याचंच 'तूजी औकात काये' हे एक उत्तम उदाहरण आहे. काही मोजके कलाकार जेव्हा असा काही वेगळा प्रयोग करतात, तेव्हा तो स्वत: पाहणं आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं, ही प्रेक्षक म्हणून आपली जबाबदारी असते. त्यासाठीच हा लेखप्रपंच.