Quick Reads

सिनेमा मरते दम तक: काळाच्या पोटात गुडूप झालेल्या खजिन्याची दुखरी नस

अभिरुचीसंपन्न होत असताना आपण दांभिक तर होत चाललो नाही ना, यावर विचार करायला ही मालिका भाग पाडते.

Credit : Indie Journal

ऐंशी-नव्वदच्या दशकात मुख्य प्रवाहातील चित्रपटांसोबत वेगळ्या प्रकारच्या चित्रपटांची एक लाट आली होती. बी आणि सी ग्रेडचे चित्रपट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटांची मुख्य प्रवाहाने कधी दखल घेतली नाही. मात्र प्रत्यक्षात या चित्रपटांनी तिकीटबारीवरचे सगळे विक्रम मोडीत काढले. साडेआठ ते नऊ लाखांत तयार होणारे हे चित्रपट पस्तीस लाखांच्या आसपास गल्ला जमवत होते. अनेक कुटुंबांना पोसत असतानाच भारतीय प्रेक्षकांना नेत्रसुख मिळवून देत होते. त्यांची डोकं बाजूला ठेवून फक्त मनोरंजनासाठी चित्रपट पाहण्याची आस पूर्ण करत होते. याच चित्रपटांच्या व्यवसायाचा, त्यांच्या उदय आणि अस्ताच्या प्रवासाचा वेध घेणारी एक रंजक मालिका नुकतीच प्राईम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मने 'सिनेमा मरते दम तक' या नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे.

'उड़ान' या गाजलेल्या चित्रपटात एका पौगंडावस्थेतील मुलाचं भावविश्व साकारताना कथेच्या अनुषंगाने कांती शाह याच्या ज्या 'अंगूर' या चित्रपटाचा उल्लेख येतो, त्यातील एका दृश्याने या मालिकेची सुरुवात होते. 'गुंडा', 'लोहा', 'जानी दुश्मन', 'मैं हूँ कुँवारी दुल्हन', 'साधु बना शैतान', 'पुलिस लॉकअप', 'देती रहूँगी दुवाएँ', 'एक एक का काट के रख दूँगी गला', 'रात के अँधेरे में', 'जंगल ब्यूटी' अशी चित्रविचित्र नावं असलेल्या या चित्रपटांच्या दुनियेतील चार दिग्दर्शक किशन शाह, दिलीप गुलाटी, विनोद तलवार आणि जे नीलम यांच्या मुलाखती या मालिकेत आहेत. या चार दिग्दर्शकांना नवीन चित्रपट बनवण्यासाठी बजेट दिलं गेलेलं आहे आणि या नवीन प्रोजेक्ट्सवर काम करताना पटकथेपासून चित्रपट प्रदर्शित होण्यापर्यंतचा सुंदर प्रवास या मालिकेत दाखवला आहे. रामसे ब्रदर्सच्या भुताखेतांच्या चित्रपटांचा उल्लेखही या मालिकेत येतो. या चित्रपटांत काम केलेल्या रझा मुराद, हरीश पटेल, अमित पचौरी, सपना सप्पू, राखी सावंत यांच्या मुलाखती येतात. त्या अनुषंगाने त्यांचा जीवनप्रवासही येतो. शेवटच्या भागात तर 'चेरी ऑन द केक' म्हणता येईल, अशी या चार दिग्दर्शकांसोबत अर्जुन कपूरने होस्ट केलेली राऊंड टेबल चर्चाही आहे.

 

 

ही मालिका पाहण्याची बरीच कारणं आहेत. 'गुंडा'च्या संवादांनी इंटरनेटवर गेल्या काही वर्षांपासून 'कल्ट फिल्म' म्हणून पुन्हा नव्याने धुमाकूळ घातलेला असताना ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणं, हा एक सुंदर योगायोगच म्हणता येईल. दिग्दर्शकांची, कलाकारांची भरभराट करणारे हे चित्रपट कसे सुरु झाले, कसे बहरले, त्यात कोणकोणत्या नवीन गोष्टी येत गेल्या आणि त्या नावीन्यामुळे मिळणाऱ्या पैशाच्या हव्यासानेच या चित्रपटांचा ऱ्हास कसा होत गेला, हे या मालिकेच्या माध्यमातून पाहताना आपण जणू एका युगाचीच कहाणी चित्रपटाच्या कथेसारखी कॉन्फ्लिक्ट्स, कथेतले नायक-खलनायक आणि दुःखद क्लायमॅक्स अशा स्वरूपात पाहतोय की काय, असं वाटत राहतं. विशेषतः या चार दिग्दर्शकांच्या चित्रपट निर्मितीची प्रक्रिया पाहणं, हा फार सुखद अनुभव आहे. एका बाजूला मनासारख्या सगळ्या गोष्टी जुळून येईपर्यंत वाट पाहणारे दिग्दर्शक असताना, काही दिवसांत चित्रपटाचं शूट आटोपून तो रिलीज करून, तिकीटबारीवर त्या चित्रपटातून सगळ्यांना बक्कळ पैसे मिळवून देऊन स्वतःचं स्वप्न साकार करणारे आणि त्यायोगे कमी बजेटमध्ये चित्रपट बनवता येतो, हे सिद्ध करून दाखवणारे हे चार दिग्दर्शकही आहेत. मध्येच लैंगिक भावना उद्दीपित करणारे 'बीट्स' कसे जोडले जाऊ लागले, त्यामुळे चित्रपट कशी गर्दी खेचू लागले आणि त्यातूनच पुढे हा उद्योग कसा रसातळाला गेला, हे ऐकणं रंजक आहे.

या चित्रपटांत काम करण्यासाठी अनेकदा मुख्य धारेतले कलाकारही सहज तयार होत, त्याचं कारण होतं लगेच हातात मिळणारे पैसे. वेगवेगळ्या गिमिक्स वापरून चित्रपट वितरकांनी कसा आणखी पैसा कमावला, सेन्सॉरच्या कात्रीतून सुटण्यासाठी काय शकली लढवल्या, त्या अनुषंगाने येणारी पहलाज निहलानी यांची मुलाखत, शिवाय विजय आनंद यांच्या असफल प्रयत्नांबद्दलचं भाष्य, हे सगळं एवढ्या विस्तारित स्वरूपात या मालिकेत येतं, की येणाऱ्या पिढ्यांसाठी ही मालिका म्हणजे चित्रपटांच्या इतिहासातल्या एका कुणीही न दखल न घेतलेल्या मळक्या पानाची दास्तान ठरावी.

 

एरव्ही बॉलीवूडने या चित्रपटांची नेहमी थट्टाच केली आहे.

 

नाही म्हणायला अशीम अहलुवालिया या दिग्दर्शकाचा, नवाझुद्दीन सिद्दीकीची मुख्य भूमिका असलेला 'मिस लव्हली' नावाचा एक चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता, ज्यात ऐंशीच्या दशकात हॉरर चित्रपट बनवणाऱ्या दोन भावांची कथा होती. एरव्ही बॉलीवूडने या चित्रपटांची नेहमी थट्टाच केली आहे. या चित्रपटांचे संदर्भ नेहमी लपूनछपून पूर्ण करायच्या फॅंटसीजच्या अंगानेच मुख्य प्रवाहातील चित्रपटांत वापरले गेले आहेत. उदाहरणच द्यायचं झालं, तर 'रॉकस्टार'मध्ये जॉर्डन हीरसोबत 'जंगली जवानी' पाहायला जातो, त्याचं देता येईल. मुख्य प्रवाहाने या चित्रपटांची कधी दखल घेतली नाहीच, मात्र पैसे कमावून, आपापल्या कुटुंबांना पोसूनही हे 'त्या' प्रकारचे चित्रपट करणारे दिग्दर्शक बरं का, हा या चित्रपटाशी संबंधित लोकांकडे पाहण्याचा इतर तथाकथित अभिरुचीसंपन्न लोकांचा दृष्टिकोन नेहमी राहिला, ही दुखरी नस या चारही दिग्दर्शकांच्या बोलण्यातून सतत जाणवत राहते. आपल्या समाजाची दांभिकताही अशा प्रकारे ही मालिका सहज दाखवून देते.

 

 

आणखी एक बाब पाहण्यासारखी आहे. किशन शाह, विनोद तलवार आणि दिलीप गुलाटी या तीन पुरुषांसोबत जसपाल नीलम अर्थात जे नीलम, ही एकटी बाई या क्षेत्रात दिग्दर्शक म्हणून वावरते आहे. या तिघांना त्यांच्या पत्नीचा पाठिंबा तरी आहे. जे नीलमची मात्र व्यथाच निराळी. आपण दिग्दर्शन करायला कधी या क्षेत्रात आलोच नव्हतो, आता आई, बहीण म्हणून अनेकजण हाक मारतात, पण मुलगी म्हणून हक्काने पाठीवर हात ठेवणारं मोठं कुणीच नाही, ही खंत ती बोलून दाखवते, तेव्हा नकळत आपल्याही गळ्यात आवंढा दाटून येतो. किशन शाह आणि कांती शाह या दोन भावांमधलं शीतयुद्ध सहज कळतं, मात्र एका क्षणी दोघांमधलं माणूसपण एकत्र होऊन वाहू लागतं. सतत दारू पीत असतो, म्हणून मुलं शिव्या देतात, हे सांगताना किशन शाहला अश्रू आवरत नाहीत. आपण खूप खंबीर आहोत, हे सतत भासवणारा कांती शाह एका ठिकाणी 'आपण एकटे आहोत, पैसे खूप आहेत, पण बोलायला सोबत कुणी नाही' हे सांगताना हळवा होतो. मालिकेत सपनाच्या आयुष्याचीही कहाणी ओघाने येते. आपण माणसांना, कदाचित या दिग्दर्शकांना, कलाकारांनाही आंबटशौकीन, बेशरम वगैरे लेबल्स लावून मोकळे झालेलो असू. मात्र माणूस म्हणून त्यांचीही दुःखं आपण समजून घेतली पाहिजेत, हे या मुलाखती जाणवून देतात.

मालिकेतल्या दोन्ही गाण्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. 'सुडो सैया' हे शीर्षकगीत अफलातून आहे. विशेषतः 'थर्माकोल की वादियों में, ज्यूस की छीटें' हे शब्द चपखल बसले आहेत. 'ये चांदनी' हे संथ गाणं वेड लावणारं आहे.

अभिरुचीसंपन्न होत असताना आपण दांभिक तर होत चाललो नाही ना, यावर विचार करायला ही मालिका भाग पाडते. चित्रपटांच्या या प्रवाहाने स्वतःच्या कर्माची फळं भोगलेली असली, तरी कुठेतरी प्रेक्षकांनी, चित्रपटक्षेत्रातील इतर लोकांनीच त्यांच्यावर अन्याय केल्याची खंत सतत जाणवते. आपली अभिरुची म्हणजे उच्च आणि पॉर्न वगैरे गोष्टी आवाक्यात नसण्याच्या काळात समाजातल्या एका वर्गाची वासना काही तासांसाठी का होईना, शमवणारे, त्यांना शांत करणारे हे चित्रपट म्हणजे बी आणि सी ग्रेडचे, ही वर्गवारी नक्की समाज म्हणून आपल्याबद्दल काय सांगू पाहतेय? आणि हे जे सांगणं आहे, ते कुठलाही आडपडदा न ठेवता ऐकण्याची आपली तयारी आहे का? असेल तर त्यावर विचार व्हायला हवा, तो कृतीत उतरायला हवा. नाहीतर येणारे नवे प्रवाह आपल्यालाही कधीतरी काळाच्या पोटात गडप करणार आहेत, ही खूणगाठ मनाशी पक्की बांधायला हवी.