Quick Reads
'हेल्लारो' : गरब्यातून साकारलेलं व्यवस्थेविरुद्धचं तांडव
'हेल्लारो' या गुजराती शब्दाला इंग्रजी प्रतिशब्द या चित्रपटाच्या विकीपीडिया पेजमध्ये 'Outburst' असा आहे.
६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावलेला अभिषेक शाह लिखित आणि दिग्दर्शित 'हेल्लारो' हा गुजराती चित्रपट 'मिर्च मसाला'ची पुसटशी आठवण करून देतो, पण तेवढंच. दिग्दर्शकाचा हा पहिला चित्रपट आहे, यावर विश्वास ठेवणं कठीण जावं, इतकी ही कलाकृती सुंदर झाली आहे. १९७५ सालच्या आणीबाणीच्या काळात कच्छच्या रणात घडणारी ही गोष्ट. ती लोककथेवर आधारित असल्याचे शेवटी म्हटले असले, तरी ज्या ताकदीने अंधश्रद्धांचा, जुलमी पुरुषसत्ताक व्यवस्थेचा, जातीय उतरंडीचा पर्दाफाश करते, त्यासाठी ती सांगणं, अनुभवणं महत्त्वाचं ठरतं.
कच्छच्या रणातल्या छोट्याशा खेड्यात वर्षानुवर्षे पावसाचा थेंब नाही. पाऊस पडावा म्हणून गावातील पुरुष देवीसमोर गरबा सादर करतात. गावातल्या स्त्रियांना मात्र गरबानृत्याची परवानगी नाही. स्त्रियांनी गरबानृत्य करणं म्हणजे पाप, देवीचा कोप ओढवून घेणं, अशी गावकऱ्यांची ठाम समजूत आहे. स्त्रिया दूरवरून फक्त उन्हातान्हातून पाणी भरायला जातात, तेव्हाच एकमेकांशी मोकळेपणाने बोलतात. तोच काय तो त्यांचा विरंगुळा. अशात गावातल्या एका सैन्यातल्या जवानाची पत्नी म्हणून मंझरी त्या गावात येते आणि गावातल्या जाचक नीतिनियमांविरुध्द, रूढी-परंपरांविरुध्द आवाज उठवण्याचं धाडस दाखवते. एके दिवशी सर्व बायका पाणी भरायला जात असताना वाटेत त्यांना एक पुरुष बेशुद्धावस्थेत दिसतो. मंझरी त्याला पाणी पाजते आणि तो उठून आपल्या गळ्यातला ढोल बडवू लागतो. त्या ढोलाचा ताल पकडून सर्व बायका फेर धरून गरबा नाचू लागतात आणि रोजच्या जगण्यातले काही क्षण वेचत मनमोकळा श्वास घेऊ लागतात. त्यांच्या गरब्याचं पुढे काय होतं, तोही पुरुषसत्ताक व्यवस्थेत पिचला जातो की जुन्या परंपरांना मोडीत काढत एक नवी वहिवाट तयार करतो, हे चित्रपटातच पाहणं योग्य.
'हेल्लारो' या गुजराती शब्दाला इंग्रजी प्रतिशब्द या चित्रपटाच्या विकीपीडिया पेजमध्ये 'Outburst' असा आहे. म्हणजेच क्रोधाची अभिव्यक्ती. इथे परंपरांचं जोखड वाहून थकलेल्या स्त्रियांच्या मनातला क्रोध त्यांच्या गरब्याच्या रूपाने अभिव्यक्त होतो. मुलजी ढोल बडवत असतो, तेव्हाही तो आपल्याच भूतकाळाबद्दल, एकूण समाजाबद्दल असलेला रागच व्यक्त करत असतो. इथला गरबा 'लगान'मधल्या 'घनन घनन'ची आठवण करून देतो, पण त्याचबरोबर त्याला स्थलकालाचे असंख्य संदर्भही जोडलेले आहेत. स्त्रियांसाठी तो गरबा फक्त एक नृत्यप्रकार न राहता त्यांच्या स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून येतो.
जातिव्यवस्था, पुरुषसत्ताक समाज या सर्वांमध्ये ज्या दुर्बल घटकांचा बळी जातो, त्यात पुरुषही येतात, तेव्हा स्त्रियांचीही अशा पुरुषांना साथ मिळत जाते. समानतेवर आधारित समाजाचं स्वप्न साकारणं मग तितकंसं कठीण राहत नाही. गावच्या न्यायव्यवस्थेला घाबरणाऱ्या मुलजीच्या पाठी मग गावातल्या सगळ्या स्त्रिया पाय रोवून खंबीरपणे उभ्या राहतात. अन्याय होतो, तेव्हा शोषक आणि शोषित एवढाच भेद असतो. स्वातंत्र्याची आस लागते, तेव्हा सर्वांनाच ते तितक्याच असोशीने हवेहवेसे वाटते. त्यासाठी प्रयत्न करताना मग आपल्यावर अन्याय करणाऱ्या गावातल्या पुरुषांप्रमाणेच हाही एक पुरुष आहे, हे पाहिलं जात नाही. त्याने पदरात टाकलेले काही भरभरून जगता येण्याचे क्षण मोलाचे ठरतात. अशा पुरुषाच्या बाजूने लढताना स्त्रिया स्वतःच्या प्राणांचीही पर्वा करत नाहीत. इतकं सगळं हा चित्रपट सांगू पाहतो आणि केवळ दोन तासांत ते सांगण्यात यशस्वीही होतो.
श्रद्धा डांगर, जयेश मोरे या दोघांचाही अभिनय उत्तम आहे. सर्व सहकलाकारांचीही त्यांना मोलाची साथ मिळाली आहे. मेहुल सुरती यांचं पारंपरिक गुजराती बाजाचं संगीत हा या चित्रपटाचा यूएसपी आहे. सौम्या जोशी यांनी लिहिलेल्या गीतांचे शब्द चित्रपटाची वीररसाची शैली शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत. समीर तन्ना आणि अर्श तन्ना यांनी कोरिओग्राफ केलेली गरबानृत्यं नेत्रसुखद आहेत. त्रिभुवन बाबू यांच्या कॅमेऱ्यातून साकारलेला हा रंगांचा महोत्सव चित्रपट संपला, तरी काळजावर एक न पुसणारा ठसा उमटवून जातो.
जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही माणसाची संस्कृती समजून घ्यायची, तर त्याचं जेवण, कपडे, दागदागिने, त्याच्या समाजातल्या रुढीपरंपरा, त्याच्या देवाच्या अस्तित्त्वाबद्दलच्या समजुती हे सगळं समजून घ्यावं लागतं. मग माणूस समजणं कठीण राहत नाही. भाषेचाही अडसर उरत नाही. पण माणसाच्या अंतर्मनात डोकावून पाहायचं, तर मात्र त्याच्या त्वचेच्या बाह्य आवरणाखाली भळभळणाऱ्या दुःखांच्या जखमा पाहाव्या लागतात. पिरीयड ड्रमा असलेला हा चित्रपट अशाच एका दुःखाचा तुकडा आपल्यासमोर ठेवत गुजराती संस्कृतीशी आपली ओळख करून देतो. या चित्रपटातील एका दृश्यात मंझरी एका पोटुशा बाईला म्हणते, "तुझ्या पोटातल्या बाळाने माझ्या मनातलं ओळखलं, म्हणजे ती मुलगीच असणार." त्याप्रमाणेच हा चित्रपट चिरंतन मानवी मूल्यांशी आपली नाळ अगदी सहजपणे जोडून टाकतो.