Quick Reads

'तोडी मिल फँटसी': मेंदूला झिंग आणणारं कॉकटेल

अशी काय भलती जादू आहे या नाटकात?

Credit : Indie Journal

 

थिएटर फ्लेमिंगो निर्मित 'तोडी मिल फँटसी' काल दुसर्‍यांदा पाहिलं. याला रुढार्थाने नाटक म्हणता येणार नाही. प्रयोग म्हणता येईल. एक वेगळं काॅकटेल म्हणता येईल. मात्र मराठी रंगभूमीच्या इतिहासात वहिवाट मोडून नवीन आणि कालसुसंगत काहीतरी सादर करण्याची परंपरा ज्या नाटकांनी आजवर शाबूत ठेवली आहे, त्यांच्या यादीत या प्रयोगाला स्थान द्यावेच लागेल. या नाटकाचे प्रयोग सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहेत. ते जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, तरच नव्या लेखक - दिग्दर्शकांच्या फळीला असे चौकटीत न बसणारे प्रयोग करण्याचा हुरूप येईल. एक गोष्ट नक्की. काही वर्षांनी म्हणजेच कदाचित दोनतीन पिढ्यांनंतर हे नाटक 'कल्ट क्लासिक' म्हणून गाजेल आणि याचे नव्याने प्रयोग होत राहतील. कलाकारांचा संच कदाचित बदललेला असेल. प्रयोगातले राजकीय आणि सामाजिक संदर्भ बदललेले असतील. प्रयोगाच्या इतर बाबी सांभाळणाऱ्या व्यक्ती बदललेल्या असतील. पण या नाटकाला अमरत्व मात्र मिळेल.

अशी काय भलती जादू आहे या नाटकात? सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नाटक नावाशी प्रामाणिक राहत एक फँटसी प्रेक्षकांसमोर साकारतं. डिज्नीच्या फँटसी विश्वात जसं सगळं रंगीबेरंगी, चमकदार असतं, त्याचप्रमाणे इथे रंगमंचाच्या मर्यादा न जुमानणारा एक अप्रतिम दृश्यानुभव आपल्याला अनुभवायला मिळतो. प्रकाश, ध्वनी, संगीत, नेपथ्य, सादरीकरण, कथा, त्यातील नाट्य या सगळ्यांतून जे अजब संयुग तयार झालं आहे, तो 'याचि देही, याचि डोळा' पिऊन घ्यावा, असा प्रकार आहे.

 

 हे नाटक नावाशी प्रामाणिक राहत एक फँटसी प्रेक्षकांसमोर साकारतं.

 

जिजामाता नगरमध्ये राहणारे तीन मित्र - अम्या माने, शिरीष केशव कोचरेकर ऊर्फ शिर्‍या आणि घनश्याम दिगंबर पावशे ऊर्फ घंट्या यांची ही कथा. जिजामाता नगरच्या झोपडपट्‌टीसमोर उंच किंग्जटन टॉवर उभा आहे. एका रात्री चित्रपटक्षेत्रात काम करणारी एक उच्चभ्रू तरुणी ईशा 'तोडी मिल सोशल' या रेस्टोबारमध्ये उशिरापर्यंत थांबते. तिथे साफसफाईचे काम करणारा घंट्या पावशे तिची उलटी साफ करतो. त्यानंतर ते दोघे गप्पांमध्ये रंगतात आणि घंट्या ईशासोबत स्वप्नरंजन करू लागतो. ईशा रात्रभर तिथेच थांबते का, ती घंट्याच्या फ्लर्टिंगला उत्तर देते का, हे नाटकातच पाहणं योग्य ठरेल.

दुसरीकडे हे तिघे मित्र सुलभ शौचालयाच्या गच्चीवर बसून दारू पीत असताना शिर्‍याला एका बिझनेस स्टार्टअपची कल्पना सुचते - एमएसटीटी अर्थात मुंबई स्लम ट्रेझर्स टुरिझमची. किंग्जटन टाॅवरच्या गच्चीवर आपले आलिशान ऑफिस असेल. परदेशी पर्यटकांना तिकीट काढून आपण किंग्जटन टॉवरच्या टाॅप फ्लोअरवरून टाकलेल्या रोपवेतून मुंबईतल्या गल्लीबोळातल्या झोपडपट्‌ट्यांची सफर घडवून आणू, असे हे तिघेही ठरवतात आणि करोडपती झाल्याची स्वप्नं पाहू लागतात. बिझनेस स्टार्टअपची ही संकल्पना तडीस नेण्यासाठी ते शिवाजी मंदिरमध्ये नोकरी करणाऱ्या केशव कोचरेकरांना अर्थात शिर्‍याच्या बाबांना भेटतात. ते खासदार निर्मला गावडेसमोर हा प्रस्ताव मांडण्याचं आश्वासन देतात. निर्मला त्यांची जुनी वर्गमैत्रीण आहे. किंग्जटन टाॅवर उभा करण्यासाठी तिथे राहणाऱ्या रामटेकडीच्या झोपडपट्‌टीवासियांना हटविण्यासाठी कोचरेकरांनी निर्मलाला मदत केलेली आहे आणि त्याबदल्यात भविष्यात कोणतीही मदत करण्याचं आश्वासन तिने त्यांना दिलेलं आहे. या स्टार्टअपचं पुढे काय होतं, हेही गुलदस्त्यातच ठेवणं योग्य राहील.

 

 

घंट्या पावशेचा बाप फार वर्षांपूर्वी खूप पैसे कमावण्याच्या आमिषाने दुबईला निघून गेला होता. तिथे फसवणूक झाल्यावर तो कसाबसा परततो. मात्र तिथून बक्कळ पैसे कमावून जर तो परत आला असता, तर काय चित्र असते, याचीही एक फँटसी या प्रयोगात येते. स्कायवॉकवर झोपलेल्या शिर्‍याला पोलीस उचलून नेतात, तेव्हा अम्याच्या विनंतीनंतरही घंट्या त्याला सोडवायला जात नाही. कट टू प्रेझेंट टाईम. घंट्या आणि शिर्‍यामध्ये वितुष्ट आलेलं आहे. घंट्या जिजामाता नगरची झोपडपट्‌टी जमीनदोस्त करून दुसरा किंग्जटन टाॅवर उभारण्याच्या तयारीत आहे. शिर्‍या झोपडपट्‌टीवासियांच्या बाजूने आहे. त्यांचं पुनर्वसन करून त्यांना 'उभी झोपडपट्टी' बांधून देण्याचं आश्वासन त्याने दिलं आहे. एका क्षणी ते भेटतात, तेव्हा त्यांच्यात एक डील होतं. हा नाटकाचा उत्कर्षबिंदू तर आहेच, मात्र एका नव्या विध्वंसाची सुरुवातही आहे. हीसुद्धा अर्थातच एक फँटसी आहे.

इतका मोठा प्रसंगांचा, कथेचा आवाका असणारा हा प्रयोग वास्तव आणि कल्पिताची इतकी बेमालूम सरमिसळ करतो की प्रेक्षक म्हणून आपण सुन्न होऊन जातो. हा प्रयोग पाहताना बऱ्याच गोष्टी आठवत राहतात. शिर्‍या किंग्जटन टॉवरवर दगड फेकून मारतो आणि मर्सिडीजची काच फोडतो, तेव्हा हटकून नागराज मंजुळेच्या 'फँड्री' चित्रपटात शेवटी जब्याने भिरकावलेला दगड आठवतो. तिथे जातविग्रह आहे, इथे वर्गविग्रह. शिर्‍या आणि घंटयाच्या डीलच्या प्रसंगात प्रशांत दळवींच्या 'चाहूल' या आयकाॅनिक नाटकाची आठवण डोकावून जाते. बदलणाऱ्या युगातल्या नैतिक-अनैतिकतेच्या धूसर होणाऱ्या संकल्पनांची ती फक्त चाहूल होती, इथे मात्र शेवटच्या प्रसंगात त्याचं टकमक टोक आपल्याला स्पष्ट दिसतं आणि विध्वंसापासून आपण फार दूर नाही, या जाणिवेने थरकाप उडतो.

 

तिथे जातविग्रह आहे, इथे वर्गविग्रह.

 

ईशाच्या आणि घंट्याच्या कथेत येणारा, ॲडम आणि ईव्हचा संदर्भ तर खासच. तिथून अगदी मार्व्हलच्या विश्वापर्यंत हा प्रवास अनेक गोष्टींना कवेत घेत जातो. प्रयोगाचा आकृतिबंध फ्लुइड आहे, ही आणखी एक जमेची बाजू. अर्थात केंद्रभागी असलेली कथा बदलत नसली, तरी हे मुंबईवरचं, इथल्या वर्गविग्रहावरचं भाष्य असल्याने प्रत्येक प्रयोगात बदलणाऱ्या राजकीय आणि सामाजिक संदर्भांनुसार काही नवीन संवाद येतात. विशेषतः ते ठिगळ लावल्या‌सारखे न वाटता उलटा मूळ कथावस्तूला अधिक रंजक बनवनात. त्यामुळे प्रत्येक प्रयोगाव काहीतरी नवं पाहायला मिळू शकतं.

ही संगीतिका आहे का? रुढार्थाने नाही. फार वर्षांपूर्वी शेक्सपिअरच्या 'अ मिडसमर नाईट्स ड्रीम'चं रत्नाकर मतकरींनी केलेलं रूपांतर 'जादू तेरी नजर' पाहिलं होतं. त्यातही गाणी होती, जी कथावस्तूला पुढे नेत होती. अगदी अलीकडच्या प्राजक्त देशमुख यांच्या गाजलेल्या 'देवबाभळी'मध्येही गाण्यांची आणि संगीताची महत्त्वाची भूमिका होती. 'तोडी मिल फँटसी'मधली रॅप साँग्ज उत्तम जमली आहेत. ती कथेला पूरक तर ठरतातच, मात्र त्याच्याही दोन पावलं पुढे जाऊन संपूर्ण प्रयोगात प्राण फुंकतात. अगस्ती परब आणि कपिल रेडेकर यांच्या 'देसी रिफ' या बँडचं त्यासाठी विशेष कौतुक. एका प्रसंगानंतर या बँडचे गिटारिस्ट एक गिटारचा पीस वाजवतात, तो तर लाजवाब.

 

 

केतन दुदवडकर यांचं नेपथ्य विशेष दाद देण्याजोगं आहे. 'तोडी मिल सोशल' या रेस्टोबारच्या वॉशरुमचा अतिशय दिखणा सेट त्यांनी साकारला आहे. बाजूच्या खिडक्यांची रंगीत काचांची तावदानं या फँटसीला चार चाँद लावतात. वॉशरुमच्या दारांचा पात्रांच्या प्रवेशासाठी जो कल्पक वापर केला आहे, तोही दाद देण्याजोगा. 

यातल्या मधल्या दारावर मिलच्या धुरांड्याचं चित्र आहे. ही कलाकुसर सर जे जे स्कूल आॅफ अप्लाइट आर्ट्सच्या 'Creativo - 7' नावाच्या मिनिएचर आर्टिस्ट ग्रुपने केली आहे. वर मागच्या बाजूला 'फँटसी नाईट' ही अक्षरं सतत चमकताना दिसतात. प्रयोगाचा बराचसा भाग गच्चीवर घडतो, तेव्हा याच वाॅशरुमच्या वरचा भाग गच्ची एस्टॅब्लिश करण्यासाठी सुयोग्यरीत्या वापरला आहे. फँटसीचा आभास निर्माण करण्यासाठी छताकडच्या भागातून धूर सोडला आहे, हेही उल्लेखनीय. 'पँडोराज बाॅक्स' उघडल्यासारखा एक मस्त फील त्यामुळे येतो.

शुभांगी सूर्यवंशी आणि पारिजा शिंदे यांचं कॉस्च्युम डिझाईन देखणं आहे. प्रत्येक फँटसीतल्या प्रत्येक प्रसंगात पात्रांचे कपडे विशेष लक्ष वेधून घेतात. बिझनेस स्टार्टअपच्या कल्पनेनंतर घंट्या, अम्या आणि शिऱ्या स्वप्नं रंगवू लागतात, तेव्हा त्यांच्या अंगावर ब्लेझर्स असतात. कपड्यांसाठी वापरलेले ब्राईट रंग फँटसीचा अनुभव अधिक गडद करतात. राहुल जोगळेकर आणि सचिन दुनाखे यांची प्रकाशयोजना या फँटसीला रंगभूमीची चौकट मोडून परीकथेच्या जगात नेते.

 

नाटकात शिव्या आहेत आणि सुदैवाने त्या सेन्साॅर केलेल्या नाहीत.

 

सुजय जाधव यांचं लेखन आणि विनायक कोळवणकर यांचं दिग्दर्शन यांमुळे हे नाटक मनात घर करून बसतं. समाजातल्या 'आपण आणि ते' या भेदावर भाष्य करणाऱ्या असंख्य कलाकृती आजवर सादर झाल्या आहेत. 'तोडी मिल फँटसी'चं वेगळेपण हे की हे भाष्य करताना ते कुठेही रटाळ होत नाही, उपदेशपर होत नाही, तरीही हलक्याफुलक्या शब्दांत वर्मी घाव घालतं. ईशा घंट्याच्या कथेत स्वत:च्या कंटेटसाठी स्टोरी शोधते आहे. घंटया तिच्यासोबत राहण्याची स्वप्न रंगवतो आहे. इंटेलेक्चुअल उलट्यांवरचं, मेथड अ‍ॅक्टिंगवरचं या नाटकात‌लं भाष्य डोळ्यांत अंजन घालून जातं. मात्र कडू औषध चाॅकलेटच्या रॅपरमध्ये गुंडाळून द्यावं, तसं या नाटकाचं लेखन आहे. 'सिंह कधी सरपटत नाय आणि वाॅल्वरिनला कधी खरचटत नाय' असे अनेक खुमासदार संवाद नाटकाची गंमत शेवटपर्यंत टिकवून ठेवतात. नाटकात शिव्या आहेत आणि सुदैवाने त्या सेन्साॅर केलेल्या नाहीत, त्यामुळे नाटकाचं राॅ स्वरूप टिकून राहतं. दिग्दर्शनातले बारकावे लक्षवेधी आहेत. केशव कोचरेकर शिवाजी मंदिरला या तिघांना भेटतात, तेव्हा स्टेजच्या पायर्‍यांचा कल्पक वापर केला आहे. ईशासोबत बोलताना घंट्या तिला बसायला टेबल बनवून देतो आणि स्वतः मात्र खाली गोधडीवर बसतो, या छोट्या प्रसंगातून त्या दोघांच्या परिस्थितीतला फरक अगदी सहजपणे अधोरेखित होतो.

श्रीनाथ म्हात्रेने सूत्रधार आणि अन्या माने दिलखुलास रंगवला आहे. जयदीप मराठेचा शिरीष कोचरेकर अफलातून. शुभंकर एकबोटेचा घंट्या पावशे लाजवाब. सूरज कोकरेने रंगवलेल्या सर्वच भूमिका एकापेक्षा एक सुंदर. मात्र केशव कोचरेकरचा विशेष उल्लेख करावा लागेल. आकांक्षा गाडेची ईशा काही मोजक्या प्रसंगांतही छान जमून आली आहे. प्रमिती नरकेने साकारलेली ईशाची भूमिकाही पाहण्याचा योग आला होता. दोघीही ही भूमिका उत्तम वठवतात. या सर्व कलाकारांची एनर्जी दाद देण्याजोगी आहे.

 

 

'बादशापीर' हा उल्लेख प्रयोगात वारंवार येतो. भारतातून दक्षिण आफ्रिकेत गेलेल्या स्थलांतरित कामगारांपैकी ते एक होते, जे पुढे मेडिटेशन करू लागले. एकच काम बापजाद्यांनी केलं म्हणून आपणही कुणाच्यातरी हाताखावी राबून करावं आणि मरून जावं, या समजुतीला आव्हान देणारा 'तोडी मिल फँटसी' हा एक अफलातून प्रयोग आहे. जयंत पवारांच्या 'अधांतर' नाटकाशी फार जवळचं नातं सांगणारा हा प्रयोग केवळ गिरणी कामगारांच्या तिसर्‍या पिढीच्या स्वप्नांबद्दलच बोलत नाही, तर विकासाच्या वाटेने जाताना आपण नक्की या वाटेवर काय पेरून ठेवलं आहे, हे तपासायला भाग पाडतो. या प्रयोगाला अंकुश चौधरीसारख्या ख्यातनाम मराठी अभिनेत्याचं पाठबळ लाभतं आहे, ही विशेष उल्लेखनीय आणि कौतुकास्पद गोष्ट आहे. आपल्याला माणूस म्हणून स्वत:कडे पाहण्याची नवीन दृष्टी देणारा, आपल्या नैतिक-अनैतिकतेच्या व्याख्या नव्याने तपासून पाहायला लावणारा प्रयोग आहे आणि त्यामुळे तो न चुकता पाहायलाच हवा.