India
विराज जगतापच्या हत्येनंतर टिक-टॉकमुळे सामाजिक तणाव, समंजस राजकीय भूमिकेनं नियंत्रण
दोन्ही समाजाच्या राजकीय व सामाजिक नेतृत्वानं जवाबदारीनं भूमिका घेतल्याचं दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड: पुण्याजवळच्या पिंपळे सौदागर भागात रविवारी रात्री झालेल्या जातीय हत्याकांडाबाबत कारवाई जलदगतीने होण्यासाठी राजकीय दबाव प्रभावी ठरत असतानाच टिक-टॉक नामक व्हिडियो ऍप आणि इतर समाजमाध्यमातील आततायी वर्तणुकीनं मराठा आणि दलित समाजात तणाव निर्माण झाला होता. अशात दोन्ही समाजाच्या राजकीय व सामाजिक नेतृत्वानं जवाबदारीनं भूमिका घेतल्यानं तो काहीसा कमी करण्यात यश आल्याचं दिसत आहे.
विराज जगताप या पिंपरी-चिंचवड जवळच्या पिंपळे सौदागरमध्ये राहणाऱ्या २० वर्षीय दलित तरुणावर ७ जुन रोजी हल्ला करण्यात आला. त्याच्या मोटारसायकलला टेम्पोने धडकुन खाली पडून त्याच्या डोक्यात धातूच्या राॅडने आणि दगड घालुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला गेला. ८ जूनला दुपारी ३ च्या सुमारास आदित्य बिरला हाॅस्पिटलमध्ये ह्या तरुणाने जिव सोडला. पोलिसांकडे या गुन्ह्याची प्रिव्हेन्शन ऑफ अट्रोसिटीझ ऍक्ट अंतर्गत नोंद केली आहे.
विराज जगताप हा काटे कुटुंबातील एका तरुणीशी प्रेम करत होता आणि हे संबंध काटे कुटुंबाला मान्य नव्हते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीचे शिक्षणही बंद केले होते तरीपण त्यांच्यातील संबंध संपले नाही म्हणुन तिच्या वडिलांनी आणि नातलगांनी मिळून त्याचा खुन केला असा आरोप आहे.
या कृत्यानंतर सोशल मीडियावर अनेक तरुणांनी मतं मांडायला सुरुवात केली आणि #Virajjagtap कित्येक दिवस टिक-टाॅकवर ट्रेंडिगमध्ये असणाऱ्या या हॅशटॅगने ७३ लाख व्ह्यूज मिळविले आहेत. तर #Justiceforviraj ह्या हॅशटॅगने ६६ लाख व्ह्यूज मिळवले. यामध्ये प्रचंड प्रमाणात मराठा आणि दलित समाजाला उद्देशून, विराजची मैत्रीण असलेल्या मुलीकडे रोख धरून अपमानास्पद आणि अश्लील प्रक्षोभक व्हिडियो बनवून टाकले जाऊ लागले, ज्यात अनेक व्हिडियोंमध्ये धमकीची भाषा तर काहींमध्ये विराजच्या मैत्रिणीचा फोटो फिरवला जात होता.
समंजस राजकीय भूमिकेनं नियंत्रण
याबाबत हस्तक्षेप करून वातावरण चिघळू नये यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडियो मेसेजद्वारे आव्हान केलं. "विराज जगताप यःची प्रेमप्रकरणात हत्या करण्यात आली आहे. याला जातियतेचा वास आहे याबद्दल दुमत नाही. परंतु सोशल मिडियावर जे सुरु हे पूर्णतः चुकिचे आहे. बाबासाहेबांनी महिलांचा आदर केला पाहिजे हा आदेश आपल्यांना दिला आहे तो आपण पुर्णपणे पाळला पाहिजे. म्हणुन सोशल मीडियावर जे वाईटरित्या लिहितात आहेत, खोडसरपणे लिहित आहेत त्या सर्वांना माझे आव्हान आहे, हे सर्व थांबवावं आणि परिस्थिती अजून बिघडणार नाही याची काळजी घ्यावी," असं ते त्यांच्या व्हिडियो संदेशात म्हणाले.
दुसरीकडे या वाढत्या जातीय तणावाच्या विरोधात मराठा सेवक समितीनेही १६ जून रोजी एक पत्रक काढले आहे.
"मराठा समाजातील मुली-महिलांबाबत समाज माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओज टाकणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. काही समाजकंटकांकडून मराठा-दलित समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामध्ये काहीजण लोकगीतं किंवा संवादांचा वापर करून तेढ निर्माण करत आहेत. तरी अशा व्यक्तींवर कारवाई व्हावी व मराठा समाजातील तरुणांनी कायदा हातात न घेता कायदेशीर मार्गानं प्रतिक्रिया द्यावी," असं आव्हान या पत्रकात केलं आहे.
प्रख्यात लेखिका व विचारवंत, प्रज्ञा दया पवार, यांनीही सोशल मीडियावर सुरु असलेल्या वादावर भूमिका मांडली आहे.
त्या लिहितात, "गेल्या चार पाच दिवसात महाराष्ट्राच्या प्रगतीशील समजल्या गेलेल्या परंपरेला काळिमा फासणाऱ्या दोन घटना घडल्या. या दोन्ही अमानुष, माणुसकीला कलंक लावणार्या घटनांचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. या दोन्ही निर्घृण हत्यांना जबाबदार असलेल्या गुन्हेगारांना कायद्यानुसार कठोर शासन झालेच पाहिजे, अशी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे मागणी करीत आहोत."
"सोशल मिडियावरील दोन्ही समाजाच्या प्रतिक्रिया अत्यंत प्रक्षुब्ध व स्फोटक असल्याचे दिसून येते. त्या अधिक प्रक्षुब्ध करून राज्यात फार मोठ्या प्रमाणावर सामाजिक-राजकिय अस्थिरता निर्माण करण्याचा काही समाज विरोधक हितसंबंधी शक्ति प्रयत्न करीत आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत यश येणार नाही आणि राज्यात अस्थिरता निर्माण होणार नाही, हे पाहणे आवश्यक आहे." अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली.
हे प्रकरण आता जातीय वाद निर्माण करु लागले असं लक्षात येताच, पोलिस उपयुक्त परिमंडळ-२ पिंपरी-चिंचवड यांनी एक पत्रकदेखील काढले आहे, ज्यात म्हटलं आहे की, "विराज जगताप प्रकरणात काही व्यक्तींनी समाजात धार्मिक तेढ-तणाव निर्माण होतील अशा प्रतिक्रिय/फोटो /व्हिडिओ/संदेश प्रसारीत केले होते. तसेच फिर्यादी महिलेचे फोटो सोशल मिडिया वर टाकुनी त्यांची बदनामी करण्याचा गुन्हा केला आहे. त्यांचाही पोलिस प्रशासन शोध घेत आहेत."
पोलिसांनी आव्हान केले आहे की "कोणीही समाजात तणाव-धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये, कसलेही फोटो/ व्हिडिओ संदेश शेअर करु नयेत. आमचं या सर्व गोष्टिंवर बारकाईनं लक्ष आहे. अशी वर्तणूक दिसुन आल्यास व्यक्ती व ग्रुप सदस्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल."
विराज जगतापच्या हत्येनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर अशा अनेक नेत्यांनी विराजच्या घरच्यांची भेट घेतली आहे.