India

माहुलमध्ये स्थानिक कंपनीतून गॅस गळती होत असल्याचा आरोप, चेंबूर, पवई, गोवंडी परिसरात केमिकलचा दुर्गंधीने भीतीचे वातावरण

चेंबुर, घाटकोपर, कांजुरमार्ग, पवई, विक्रोळी आणि गोवंडी ह्या भागात उग्र वास येत असल्याचे सोशल मीडियावर सांगितले जात आहे.

Credit : The Asian Age

मुंबई: चेंबुर येथील माहुलगावच्या स्थानिकांना करोनासोबतच भयंकर अशा विषारी रासायनिक दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने मात्र नेहमीसारखी बघाची भूमिका घेतल्याने स्थानिक हतबल झाले आहेत. नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत.

एजीस लोजिस्टिक लिमिटेड ही द्रवित पेट्रोलियम  गॅस (Liquefied petroleum gas / LPG) चे उत्पादन करते. या कंपनीची एक शाखा सीलॉर्ड कंटेनर चेंबुर येथील रास माहुल आणि आंबापाडा गावात व दुसरी गावापासून ३ कि.मी. अंतरावर आहे. कंपनी सुरू होऊन दहा वर्षे झाली आहेत. तेव्हा पासून दोन्हीं गावांचे अंदाजे पाच हजार नागरिक रासायनिक दुर्गंधी ने त्रस्त आहेत, असा स्थानिकांचा दावा आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे (NGT) दाद मागितली होती आणि लवादाने कंपनीला दंड ही ठोठावला होता. महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाने कंपनीला बंद करण्याचा आदेश दिला होता मात्र त्याचे पुढे काहीही झाले नाही.

कॉरोनाच्या पार्श्वभूमीवर दुर्गंधीने नागरीक अधिकच त्रस्त झाले आहेत. नागरीकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाला ई-मेल द्वारे आपली कैफियत मांडली आहे. परंतु कोणीही नागरिकांची तक्रार गांभीर्याने घेत असल्याचे दिसत नाही.

इंडी जर्नलशी बोलताना तिथले एक नागरिक म्हणाले,"आम्ही श्वसनाच्या आजाराने ग्रासले आहोत. रसायनांच्या उग्र वासाने उलटी मळमळ हा त्रास नेहमीचचा झाला आहे. जवळपास ३१ मे पासुन  गावात उग्र वास येऊ लागला होता. पण त्या वासाचे प्रमाण ४ जुन रोजी खुप वाढले, जसे काही वायुगळती झाली इतका वास येऊ लागला होता. म्हणुन आम्ही रात्री त्यांना काम बंद करण्यास सांगितले पण ते काही ऐकले नाही." 

ते पुढे म्हणाले, "संपूर्ण जग लाॅकडाउन आहे, मुंबई- महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात ही समस्या आमच्यापुढे आहे. आम्हाला श्वास घ्यायलाही कधी-कधी खुप त्रास होतो. कंपन्यांमुळे येथील हवेत खुप प्रदुषण झाले आहे. कित्येक जणांना ह्रदय विकारचे झटके येत आहेत. आमच्या गावात मागील एका आठवड्यात चार मृत्यु झाले. म्हणुन आम्ही गावकऱ्यांनी लाॅकडाऊनचे निबऺंध कडक केलेत. सकाळी ७-९ या वेळेतच गावकरी जीवनावश्यक गोष्टी घेण्यासाठी घराबाहेर पडु शकतात. पण ह्या कंपनीत रसायने, गॅस आणि वायु घेउन येणाऱ्या कंटेनरची ये-जा सतत चालुच असते. ग्रामपंचायतने शनिवारी रात्री आंबापाडा स्थानिक पोलिस स्थानकात तक्रार केली. 

"आम्ही एमपीसीबीलाही काॅल केला होता पण काही प्रतिक्रिया नाही मिळाली.नंतर गावकातील काही लोकांनी आदित्य ठाकरेंच्या आॅफिसला संपर्क साधला मग नंतर क्षेत्रीय अधिकारी अनंत नाना हर्षवर्धन ह्यांच्याशी संपर्क झाला, तरीही काही प्रतिक्रिया नाही आली. आरसीएफ पोलिस स्टेशन मध्ये ही आम्ही माहिती दिलीआणि कंपनीत काम चालुच होती. 

"चार तारखेला दुर्गंधीची तीव्रता खुप वाढल्याने आम्ही महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष सुधिर श्रीवास्तव ह्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी सांगितले की मी माझ्या टीमला पाठवतो, पण ती दुसऱ्या दिवशी दुपारी तीनच्या सुमारास आली. पण त्याआधीच कंपनीला कळाले होते म्हणुन त्यांनी काम बंद केले. आणि मग टीम जेव्हा आली तेव्हा काम बंद असल्याने वासाचे प्रमान कमी झाले होते त्यामुळे त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही.

आता गावात पोटदुखीचा आणि डोकेदुखीचा त्रासही भरपुर जणांना सुरु झाला आहे. तसेच त्वचेचे आजारही आहेत," असे काही गावकऱ्यांनी इंडी जर्नलला सांगितले.

 

चेंबुर, घाटकोपर, कांजुरमार्ग, विक्रोळी, पवई आणि गोवंडी ह्या भागातही केमिकलच्या वासाने भीती

 

 

मुंबईतील चेंबुर, घाटकोपर, कांजुरमार्ग, पवई, विक्रोळी आणि गोवंडी ह्या भागात केमिकलचा उग्र वास येत असल्याचे स्थानिकांकडून सोशल मीडियावर सांगितले जात आहे. फेसबुकवर चेंबुर नावाच्या फेसबुक पेजवर ७ तारखेला रात्री उशिरा एक पोस्ट शेअर केली गेली. त्याला प्रतिसादही आला. तिथे काही स्थानिकांनी आमच्या इथेही वास येत आहे असे सांगितले.

ट्विटरवरून या प्रकाराबाबत नागरिकांनी प्रश्न विचारले असता या ट्वीटना उत्तर देत बीएमसीने म्हटले की "कृपया घाबरू नका. परिस्थिती हाताळण्यासाठी १३ अग्निशामक यंत्रणा खबरदारी म्हणून सक्रिय करण्यात आली आहेत. कोणालाही वासामुळे त्रास होत असेल तर आपल्या तोंडावर ओले टॉवेल किंवा कपडा ठेवा आणि नाक पांघरून घ्या."

त्यासोबतच, "वासाच्या उगमस्थानाबद्दल कोणतेही पुरावे अथवा माहिती मिळाली नाही आहे. घाबरून जाऊ नका. आम्ही तुम्हाला वेळोवेळी सगळी माहिती देऊ," असेही बीएमसीने म्हटले आहे.