Quick Reads

उलटतपास: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संघामध्ये खरंच मैत्रीपूर्ण संबंध होते का?

'द प्रिंट' या वेबसाईटने प्रकाशित केलेल्या दाव्यांची उलटतपासणी

Credit : द कॅराव्हॅन

१५ एप्रिल २०२० रोजी अरुण आनंद ह्या आर.एस.एस. संबंधित व्यक्तीने आंबेडकर जयंतीनिमित्ताने ‘द प्रिंट’ ह्या वेबपोर्टलवर ‘Ambedkar's links with RSS & how their ideologies were similar’ ह्या विषयावर साडेसहा मिनिटांचा व्हिडियो प्रसारित केला. त्यामध्ये त्यांनी अनेक दावे केले. प्रत्येक दाव्याला ऐतिहासक पुरावें आहेत असेही ते म्हणतात. त्यांचे बहुतेक दावे निराधार आहेत असे त्यांचा व्हिडीओ पाहतांनाच स्पष्टपणे दिसत होते. तसेच, ज्यांना आंबेडकरी चळवळीचा थोडाबहुत इतिहास माहिती आहे, त्या लोकांना अरुण आनंद यांनी केलेले दावे हास्यास्पद आहेत, असे लगेच जाणवले असेल. 

 

 

२१ एप्रिल २०२० च्या रात्रीपर्यंत अरुण आनंद यांच्या 'द प्रिंट'च्या संकेत स्थळावरील व्हिडीओला २१,२६३ लोकांनी पहिले असे दिसत आहे. ज्यांचा थोडाफार यासंबंधी अभ्यास आहे,  त्यांना व्हिडीओतील दाव्यांची अनैतीहासिकता कळली असेल. पण जी लोक पहिल्यांदा पाहत असतील, ज्यांना काहीच माहिती नसेल, अशा लोकांच्या डोक्यात खोटी आणि अनैतिहासिक माहिती उतरवण्यात अरुण आनंद यशस्वी झाले आहेत असेच म्हणावे लागते. सदरील माहिती बुद्धिभेद करणारी आहे. महाराष्ट्र शासनातर्फे डॉ. आंबेडकरांच्या साहित्याचे प्रकाशित करण्यामध्ये महत्वाची भूमिका असलेले अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी काही मुद्द्यांना घेवून अरुण आनंद यांची पोलखोल केली आहे. त्यांचा लेखही 'द प्रिंट'ने छापला आहे. मात्र त्यामध्ये काही मुद्द्यांची चर्चा नरकेंनी केलेली नाही. अरुण आनंद यांनी केलेले दावे कसे फोल, बनावट, अनैतिहासिक आणि राजकीय प्रपोगंडाचे भाग आहेत, त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण आणि मोडतोड होते म्हणूनच एक इतिहासाचा विद्यार्थी म्हणून  सविस्तर लेखनप्रपंच करत आहे. 

 

१९३५ मध्ये काय स्थिती होती? 

अरुण आनंद म्हणतात की, ‘१९३५ पासून आंबेडकर आणि आर.एस.एस.च्या संबंधांची सुरुवात झाली.’ परंतु, त्यांच्या म्हणण्याला कसला आधार आहे असे काहीच पुरावे दिलेले नाहीत. १९३५ हे साल आंबेडकरांच्या चळवळीच्या नितीत्ताने आणि आंबेडकरांच्या व्यक्तिगत आयुष्याच्या निमित्ताने हे खूपच महत्वाचे असल्यामुळे या सालाविषयी विपुल लेखन झालेले आहे. चांगदेव खैरमोडे यांनी एक स्वतंत्र खंडच या सालातील घडामोडींवर काढलेला आहे. पण त्यातही कुठेच आंबेडकर आणि आर. एस. एस. यांच्या संबंधाविषयी एक ओळही उपलब्ध नाही. 

१९३५ मध्ये आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केल्यामुळे संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात खूप मोठी वैचारिक घुसळण झाली. शीख, मुस्लीम, बौद्ध, आर्य समाज आणि ख्रिस्ती अशा सगळ्या मंडळींनी आंबेडकरांना आपापल्या धर्मात येण्याचे निमंत्रण दिली. हिंदुत्ववादी मंडळीनी कधी शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी तर कधी मसुरकर महाराज अशा वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून आंबेडकरांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला पण, ज्यावेळी त्यांना अपयश आले त्यावेळी त्यांनी आंबेडकरांना एकटे पाडण्यासाठी डिसेंबर १९३५ मध्ये इतर अस्पृश्य नेत्यांना सोबत घेवून ‘धर्मांतरविरोधी परिषद’ एम.सी.राजा यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे हिंदू महासभेच्या अधिवेशनाच्या वेळी भरविण्याचे ठरविले होते. परंतु परिषदेची तारीख राजा यांना सोईस्कर होत नसल्यामुळे परिषद भरविण्याचे तहकूब झाले. 

धर्मांतर विरोधी परिषद झाली नसली तरी डिसेंबर १९३५ मध्ये हिंदू महासभेचे अखिल भारतीय अधिवेशन मात्र पार पडले. हे अधिवेशन आंबेडकरांच्या धर्मांतराच्या चळवळीला विरोध करण्यासाठी आयोजित केले होते. म्हणून त्यात अधिवेशनात अस्पृश्यता निवारणावर विशेष चर्चा करण्यात आली. अधिवेशनात आंबेडकरांच्या राजकीय नेतृत्वाला शह देण्यासाठी धर्मांतर विरोधी भूमिका असलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये जगजीवनराम, रसिकलाल बिस्वास, बंगालचे नामशुद्र नेते जे.एम.मंडल, यु.पीचे चर्मकार नेते डॉ.धर्मप्रकाश, पुण्याचे चर्मकार नेते पा.ना.राजभोज, मद्रासचे अस्पृश्य नेते एम.सी.राजा, बाळू पालवणकर (माजी क्रिकेटपटू) आणि चर्मकार नेते, मध्य प्रांत आणि बेरार मधील अस्पृश्य नेते किसन फागुजी बनसोडे, पुण्याचे खांडेकर इत्यादींचा त्या अधिवेशनात सहभाग होता.       

अधिवेशनात प्रतिनिधींची संख्या ७४२ होती. त्यांत मुंबई, गुजरात, बडोदे, राजपुताना, मध्य हिंदुस्थान, वायव्य सरहदप्रांत, पंजाब, संयुक्त प्रांत, बिहार, बंगाल, ब्रह्मदेश, मद्रास, म्हैसूर, निजामाचे राज्य, मध्यप्रांत वऱ्हाड, कर्नाटक, गोमंतक इत्यादी प्रांतातले प्रतिनिधी आले होते. दक्षिण आफ्रिकेतून एक आणि जपानमधूनही एक प्रतिनिधी आले होते. त्यांत दिल्लीचे लाला नारायण दत्त, स्वामी चिदानंद, पं.रामनाथ कालिया, कानपूरचे एल.जी.टंडन, बलवंतराय कपूर, म.गो.श्रीप्रसाद, अजमेरचे चांदकरण सारडा, लाहोरचे भाई परमानंद, प्रो.धर्मचंद, पं.नानकचंद, मोंगीरचे रा.ब.दिलीप नारायणसिंह, नागपूरचे मुंजे, श्री.माधव चिटनवीस, डॉ. हेडगेवार, कलकत्याचे बाबू पद्मराज जैन, प्रयागचे पं.कृष्णकांत मालवीय, पं.राधाकांत मालवीय, डॉ.राधाकुमूद मुखर्जी, श्री.सक्सेना, पाटण्याचे श्री.जगजीवनराम, काशीचे कन्हैयालाल मिश्र, इत्यादी सवर्ण हिंदूंचा समावेश होता.

 

केशव बळीराम हेडगेवार

 

आंबेडकरांच्या धर्मांतर चळवळ निष्प्रभ व्हावी म्हणून या अधिवेशनात तीस ठरावांपैकी तीन ठराव अस्पृश्यांच्या प्रश्नांवर मांडले गेले. त्यामध्ये अस्पृश्यता निवारण (ठराव क्र. १४), अस्पृश्य समाजाच्या गाऱ्हाण्याबद्दल चौकशीमंडळ’ (ठराव क्र. १५) आणि ‘अस्पृश्योद्धारक मंडळ’  (ठराव क्र. १६) इत्यादींचा समावेश होतो. प्रत्येक ठरावाच्यावेळी काही भाषणे झाली. त्या भाषणांमध्ये हिंदू महासभेची ‘अस्पृश्य प्रश्न’ या बदलची गोंधळाची स्थिती स्पष्टपणे दिसून येते. आर.एस.एस.चे हेडगेवार ह्या अधिवेशनाला हिंदू महासभेचे नेते म्हणूनच उपस्थित होते. तसेच, शेवटच्या घटकेपर्यंत ते हिंदू महासभेचे पदाधिकारी होते. मग, असा प्रश्न निर्माण होतो की, कोणत्या स्थितीत आणि कशामुळे आंबेडकर आणि आर.एस.एस यांच्या संबंधाची सुरुवात झाली असे अरुण आनंद म्हणतात? आंबेडकरांना विरोध करण्यासाठी हिंदू महासभेचे अधिवेशन पुण्यात भरते. त्यामध्ये आंबेडकर सोडून देशभरातील अस्पृश्य समाजाच्या नेत्यांना आमंत्रित केले जाते आणि हेगडेवार हिंदू महासभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते असे ऐतिहासिक वास्तव असतांना कुठल्या घटीतांची चर्चा अरुण आनंद करीत आहेत. 

पुढे, १९३७ मध्ये हिंदू महासभा स्वतंत्र पक्ष म्हणून जाहीर झाल्यावर कॉंग्रेसमधील मंडळीनी त्यासोबतचे संबंध तोडून टाकले. जगजीवनराम, पी.बाळू यांच्यासारखी मंडळी कॉंग्रेससोबत जोडली गेली तर एम.सी.राजा, पा.ना.राजभोज, जे.एम.मंडल अशी मंडळी आंबेडकरांसोबत काम करू लागली. कृष्णराव गांगुर्डे, खांडेकर इत्यादी मंडळी हिंदू महासभेसोबत काम करू लागली. पण, अशा लोकांचाही आर.एस.एस.शी संबंध नव्हता कारण, ही सगळी मंडळी मुंजे आणि सावरकर यांच्यामुळे हिंदू महासभेत होती. हेडगेवारांच्या मृत्युनंतर संघ आणि सभा यांचा संबंध जवळजवळ संपलाच होता. त्यामुळेच काहींनी संघ सोडून १९४२ साली हिंदू महासभेचे छत्रछायेखाली आणि सावरकरांच्या नेतृत्वाखाली ‘हिंदूराष्ट्र दला’ची स्थापना केली.  

पाकीस्तानच्या निमित्ताने मुस्लीम प्रश्न, स्वयं-निर्णयाचा अधिकार आणि हिंदुत्वाची चर्चा करतांना आंबेडकर लिहितात की, “हिंदु राज्याची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरली तर या देशावर कोसळलेली ती महाभयानक आपत्ती असेल. समर्थक हिंदू त्याबद्दल काहीही म्हणोत, पण हिंदुत्व हे स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे शत्रू आहे. हिंदुत्व हे लोकशाहीविरोधी आहे. म्हणून कोणतीही किंमत द्यावी लागली तरी आपण हिंदुराज्य घडू देता कामा नये.” वरील सगळ्या चर्चेतून असेच स्पष्ट होते की, १९३५ च्या काळात आंबेडकरांचे आर.एस.एस.शी कोणत्याही प्रकारचे संबंध नव्हते. तसेच, पुढील काळात हिंदू राष्ट्राची चर्चा करणाऱ्या लोकांशीही त्यांचे कुठल्याही प्रकारची वैचारिक साम्यता आणि संबंध नव्हते असे दिसते. त्यामुळे १९३५ पासून आंबेडकर आणि आर.एस.एस. यांच्या संबंधांची सुरुवात झाली असे म्हणणे निराधार आहे. 

 

१९३९ मध्ये संघाच्या कॅम्पला आंबेडकरांनी भेट दिली का? 

अरुण आनंद म्हणतात की, ‘१९३९ मध्ये आंबेडकरांनी संघाच्या कॅम्पला भेट दिली. कॅम्पात ५२५ पैकी १२५ स्वयंसेवक हे अस्पृश्य जातींमधील होते. त्यांच्यामध्ये अस्पृश्यता पाळली जात नव्हती. ते एकत्र राहत होते आणि एकत्र जेवत होते. ह्या गोष्टीने डॉ.आंबेडकर हे प्रभावित झाले.’ २०१७ मध्ये आर.एस.एस.चे विचारक राकेश सिन्हा यांनी ‘Will Aiyar and the Congress come clean on Ambedkar’ ह्या शीर्षकाचा लेख लिहिला होता. त्यामध्ये १९३८ मध्ये आंबेडकरांनी पुण्यात आर.एस.एस.च्या कॅम्पला भेट दिली होती असे म्हणतात. अरुण आनंद आणि राकेश सिन्हा यांचे वर्ष जुळत नाही. तसेच दोन्हींच्या माहितीचा आधार काय आहे? हा महत्वाचा प्रश्न आहे. आर.एस.एस.च्या प्रचारकी पुस्तकांमध्ये असले उल्लेख आढळतात. पण त्यांना काहीच ऐतिहासिक महत्त्व नाही, कारण, ती इतिहासाची मोडतोड आणि सांस्कृतिक राजकारणाची जोडाजोड करण्याची प्रक्रिया आहे. 

१९३९च्या काळात असल्या भेटीची कुठलीच नोंद आंबेडकरांच्या वृत्तपत्रांमध्ये नाहीये. आंबेडकरांच्या समग्र साहित्यामध्ये नाहीये. तसेच, चांगदेव खैरमोडे आणि बी.सी.कांबळे यांनी लिहिलेल्या बहुखंडी लेखनप्रकल्पात कुठेच आढळत नाही. मग, आंबेडकर आर.एस.एस. कॅम्पला भेटून प्रभावित झाले, हे म्हणणे कसे खरे मानायचे? आंबेडकरांचे वृत्तपत्र चाळली तर स्पष्टपणे दिसते की, आंबेडकरांच्या भेटींचे वर्णने, भाषणांचे वृत्तांकने सातत्याने छापून येत होती. अरुण आनंद सांगतात त्या भेटीविषयी आंबेडकरांच्या वृत्तपत्रात छापून आलेले दिसत नाही. तसेच आंबेडकरांनी सुद्धा लिहून ठेवलेले नाही. आंबेडकरांच्या चरित्राचा अभ्यास केल्यावर एवढे खात्रीने म्हणता येते की, जर त्यांना आर.एस.एस.च्या कॅम्पने प्रभावित केले असते, तर त्यांनी निश्चितच तसे लिहून ठेवले असते. 

‘परमपूजनीय डॉ. हेडगेवार पत्ररूप व्यक्तिदर्शन’, ‘पत्ररूप श्रीगुरुजी’ आणि ‘समग्र गुरुजी – खंड ८ पत्रसंवाद’ ही महत्वाची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. हेडगेवार आणि गोळवलकर ही दोन्ही संघाला घडवणारी, दिशा देणारी आणि मार्गदर्शन करणारी मंडळी होती. त्यांच्या पत्रसंग्रहात १९३९ च्या जवळपास एकही पत्र आंबेडकरांना उद्देशून लिहिलेले दिसत नाही. तसेच, कुठल्याही पत्रांमध्ये आंबेडकरांविषयी चर्चा नाही. दोन्हींच्या पत्रांमध्ये खूप वेगवेगळ्या बाबींची चर्चा झालेली दिसते. झालेल्या कॅम्पांची माहिती तसेच, येवू घातलेल्या कॅम्पांची माहिती हेडगेवार व गोलवळकरांच्या पत्रांमधून मिळते. त्यामुळेच असा प्रश्न उत्पन्न होतो की,  १९३९ साली आंबेडकरांनी आर. एस. एस. कॅम्पला भेट दिली होती तर मग त्याची अस्सल आणि विश्वसनीय माहिती का उपलब्ध होत नाही? 

महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी चळवळीचा इतिहास लिहिण्याचे महत्वाचे काम करणाऱ्या शंकर रामचंद्र दातेंनी त्यांच्या ‘महाराष्ट्रातील हिंदू महासभेच्या कार्याचा इतिहास’ ह्या ग्रंथात आंबेडकरांच्या आर.एस.एस.कॅम्प भेटीविषयी काहीच लिहिलेले नाही. १९३९ मध्ये हेडगेवार जीवंत असल्यामुळे ते हिंदू महासभेचे नेते होते. त्यामुळे दातेंनी त्यांच्या पुस्तकात आर.एस.एस., हेडगेवार आणि त्यांची कार्यपद्धती याविषयी खूपसारे लिहिले आहे. पण त्या सर्व लिखाणात आंबेडकर आणि आर.एस.एस. असा उल्लेख कुठेच नाही. महाराष्ट्र हिंदू महासभेचे केंद्र पुणे शहर होते. तसेच, शंकर दाते हे महाराष्ट्र हिंदू महासभेचे महत्त्वाचे नेते सुद्धा होते. ५२५ पैकी १२५ अस्पृश्य असलेला आर.एस.एस.चा कॅम्प झाला आणि त्यात आंबेडकर उपस्थित होते. एवढेच नव्हे तर त्यामुळे आंबेडकर प्रभावित झाले असे म्हटले जाते. तर मग ह्या घटनेविषयी दातेंनी त्यांच्या पुस्तकात नक्कीच लिहिले असते असे प्रामाणिकपणे वाटते. कारण, हिंदू महासभेच्या कार्याचा इतिहास लिहितांना त्यांनी हिंदुत्व चळवळीतील वैगुण्याविषयी सुद्धा लिहिले आहे. 

कृष्णराव गांगुर्डे हे सावरकरांच्या प्रेरणेतून हिंदू महासभेत दाखल झाले होते. गांगुर्डे स्वत: अस्पृश्य समाजातील होते. पूर्वी त्यांनी काळाराम सत्याग्रहात सहभाग घेतला होता. विश्वास गांगुर्डे यांनी कृष्णराव गांगुर्डेची चरित्रात्मक कादंबरी लिहिली आहे. सदरील पुस्तक ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे.  कारण कृष्णराव गांगुर्डे आंबेडकरांच्या धर्मांतराविरोधी भूमिका घेणारे हिंदुत्ववादी महार गृहस्थ होते. पुढील काळात ते हिंदू महासभेचे उपाध्यक्षही झाले. 

१९३९ साली पुण्यात हिंदू युवक परिषदेचे अधिवेशन भरले होते. त्याचे अध्यक्ष म्हणून डॉ.हेडगेवार यांची निवड झाली होती. या अधिवेशनात हजारो तरुण जमले होते. त्यात कृष्णरावही सामील झाले होते. तसेच, याच काळात कृष्णराव गांगुर्डे आर.एस.एस. मध्ये जावू लागले असेही उल्लेख कृष्णराव गांगुर्डेच्या चरित्रात्मक कादंबरीत आहेत. पण, कुठेही १९३९ मध्ये आर.एस.एस. कॅम्पात आंबेडकर आले होते. त्या कॅम्पात ५२५ पैकी १२५ अस्पृश्य होते आणि आर.एस.एस.चे पाहून आंबेडकर प्रभावित झाले होते असे काहीही लिहिलेले नाही. वरील सगळ्या गोष्टींच्या आधारे असे म्हणावेसे वाटते की, तत्कालीन ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये सदरील भेटीचा कुठेही उल्लेख नाही. अरुण आनंद आणि आर.एस.एस.ने त्यांच्या माहितीच्या आधार सार्वजनिक करून त्याची ऐतिहासिक अस्सलता आणि विश्वसनीयता सिद्ध करायला हवी. नाहीतर आर.एस.एस.ने आपल्या राजकीय प्रचारासाठी अशी अनैतिहासिक कपोलकल्पना जन्मला घातली आहे असे म्हणावे लागते. 

 

गांधीहत्या, संघबंदी आणि आंबेडकर!

१९४८ मध्ये गांधीजींची हत्या नथुराम गोडसे नामक हिंदुत्ववाद्याने केली. त्यामुळे देशभरातील हिंदुत्ववादी संस्था आणि संघटनांच्या लोकांना सरकारने ताब्यात घेतले. त्याचवेळी सरकारने संघावर बंदी सुद्धा घातली. संघावर बंदी आल्याचे वृत्त समजताच गोळवलकरांनी संघ विसर्जित केल्याची घोषणा केली. १९४६ पासूनच संविधान सभेचे काम चालू होते. आंबेडकर संविधान सभेत महत्त्वाची भूमिका निभावत होते. अरुण आनंद म्हणतात की, ‘१९४९ साली आंबेडकरांनी संघावरील बंदी उठवण्यात यावी यासाठी प्रयत्न केले.’  पण, ऐतिहासिक वास्तव काही वेगळेच आहे. जर आंबेडकरांनी संघावरील बंदी उठवण्यास मदत केली असती तर तत्कालीन सरसंघचालक गोळ्वलकर आणि आंबेडकर यांचा पत्रव्यवहार निश्चितपणे झाला असता. किंबहुना, आंबेडकरांच्या साहित्यात त्याचा उल्लेख झाला असता पण  तसा संदर्भ आपणास कुठेच मिळत नाही. 

१९४८ मध्ये गांधींची हत्या झाल्यावर देशभरातील हिंदुत्ववादी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांची नजर होती, काहींना ताब्यात घेतले होते अशी चर्चा आपण वर केली आहे. अशावेळी आंबेडकर दिल्लीतील हिंदू महासभेच्या ना.भ.खरे यांना जावून भेटले होते अशी नोंद खरेंच्या चरित्रकारांनी आणि त्यांनी स्वत: त्यांच्या आत्मचरित्रात केली आहे. संघावरील बंदी उठवावी अशी कोणतीही मागणी आंबेडकरांनी केलेली नाही. आंबेडकर चरित्र –खंड ९ मध्ये चांगदेव खैरमोडे यांनी आंबेडकर आणि खरे भेटीची नोंद घेतली आहे. त्यातही कुठेच आंबेडकरांनी संघावरील बंदी उठवावी अशी मागणी केली आहे असे कुठेच म्हटलेले नाही. 

 

ना.भ खरे

 

खरे आणि आंबेडकर हे १९४२ सालापासून ब्रिटीश प्रशासनात मंत्री होते. दोन्ही कॉंग्रेस विरोधी, दोन्ही महाराष्ट्राचे होते आणि गांधींचे टीकाकार होते म्हणून एकमेकांचे मित्र होते. त्या मित्रत्वामुळे आंबेडकर खरेंना भेटले असेच म्हणावे वाटते. दोघांची मैत्री असली तरी दोन्हींच्या राजकीय आणि वैचारिक दृष्टीकोनात मुलभूत फरक होता. कारण, खरे हे हिंदू महासभेचे नेते होते आणि आंबेडकर हे हिंदू महासभेचे कठोर टीकाकार होते. आंबेडकरांनी वेळोवेळी हिंदू महासभेवर टीका केलेली आहे असे समग्र आंबेडकर साहित्य वाचतांना, चाळतांना सहजपणे दिसते. 

गांधी-आंबेडकरांमध्ये वैचारिक मतभेद होते. त्या मतभेदांचा फायदा घेत अरुण आनंद आंबेडकरांना संघसमर्थक ठरवू पाहत आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये गांधींची चिकित्सा केली जाते. त्याचा फायदा अरुण आनंद आणि त्यांच्या वैचारिक कंपूला घ्यायचा आहे म्हणूनच ते आंबेडकरांनी संघबंदी उठवावी असे मागणी केली असे निख्खळ खोटे पसरवत आहेत. १९४९ मध्ये बंदी जाहीर केल्यामुळे गोळवलकरांनी जरी संघ बरखास्त केला असे असले तरी अनेक पातळींवर संघावरील बंदी उठवावी यासाठी ते प्रयत्न करत होते. कामात अडथळे आणणे, अर्ज-पत्र आणि विनंत्या करणे अशा सगळ्याच माध्यमातून बंदी उठविण्यासाठी ते प्रयत्न करत होते. याचाच भाग म्हणून ४ जानेवारी १९४९ मध्ये संविधान सभेच्या कामाजात गोंधळ आणि अडथळा निर्माण करण्यासाठी आर.एस.एस.ची मंडळी घटना सभेत घुसली होती. 

ज्यावेळी सरकार बंदी उठवत नाहीत असे दिसले त्यावेळी सरकारसाठी कामे करू, सरकारने ठरवून दिलेल्या आराखड्यात संघटना चालवू अशा अनेक गोष्टी संघचालकांनी मान्य करायला सुरुवात केली. त्यावेळी कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत नेहरू आणि सरदार पटेल यांच्यासारखे वेगवेगळी वैचारिक निष्ठा बाळगणारे पण, तरीही गांधींच्या मार्गदर्शनाखाली काम करणारी मंडळी होती. देश स्वतंत्र झाल्यावर वेगवेगळ्या भागांमध्ये १९४८ -१९४९ साली वेगवेगळ्या पक्षांची स्थापना झाली. त्यामध्ये कम्युनिझम आणि समाजवादाला प्राधान्य देणारी मंडळी होती. 

उत्तरप्रदेश कॉंग्रेसमध्ये नेहरूंना विरोध करत समाजवादी मंडळी आचार्य कृपलानींनी ‘कृषक मजदूर प्रजा पार्टी’ची स्थापना केली. लोहिया, जयप्रकाश यांचा कॉंग्रेस समाजवादी गट स्वतंत्र होवून ‘समाजवादी पार्टी’ बनला. पंजाबमध्ये १९४८ साली जुन्या गदर आणि कीर्ती किसान पार्टीच्या मंडळीनी ‘लाल कम्युनिस्ट पार्टी हिंद युनिअन’ची स्थापना केली. महाराष्ट्रात कॉंग्रेसमधून बहुजन समाजवादी मंडळी बाहेर पडून त्यांनी ‘शेतकरी कामगार पक्ष’ स्थापन केला. जुन्या अनुशिलन समिती, युगांतर आणि नौजवान सभेच्या क्रांतिकारकांनी ‘क्रांतीकारी समाजवादी पार्टी’ची स्थापना केली. देशभरात अशा वेगवेगळ्या पार्ट्या स्थापन झाल्या होत्या. काही नव्याने स्थापन होत होत्या. त्यापैकी बहुतेकांची वैचारिक बांधिलकी कम्युनिझमशी होती. तसेच, १९४६ पासूनच बंगालमध्ये तेभागा आणि आंध्रात तेलंगानामध्ये कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली सशस्त्र लढा चालू झालेला होता.

वरील सर्व स्थिती नेहरूंच्या केंद्रीय सत्तेला प्रश्नांकित करणारी होती. तसेच देशात कम्युनिस्ट क्रांतीची शक्यता वाढवणारी होती. ह्या स्थितीचा फायदा घेवून गोळवलकरांनी नेहरू आणि पटेलांना पत्र लिहिले. २४ सप्टेंबर १९४८ ला गोळवलकरांनी नेहरूंना पत्र लिहिले आहे. त्यात ते म्हणतात की, ‘ह्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विसर्जित झाल्यामुळे बुद्धिमान तरुण झपाट्याने कम्युनिझमच्या जाळ्यात अडकत आहेत. ब्रह्मदेश, इंडोचायना, जावा आणि अन्य निकटवर्ती राष्ट्रांत ज्या आंतककारी घटना घडत आहेत. त्यावरून प्रस्तावित संकटाच्या स्वरुपाची कल्पना आपणास येऊ शकते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रूपाने असलेला एक प्रभावी अडसर सध्या उरला नाही...त्यांनी केलेल्या प्रगतीची वार्ता भयसूचक आहे. आपण या समस्येचा शांतपणे विचार कराल आणि आपल्या सांस्कृतिक पद्धतीने सन्मानपूर्वक काम करीत संघ कम्युनिस्टांच्या आतंकाशी लढा देण्याच्या बाबतीत शासनाला सहाय्य करण्याचे कार्य करू शकेल असे वातावरण निर्माण करण्यास मदत कराल., असा माझा विश्वास आहे. संघावर ठेवलेले आरोप सरळ सरळ मागे घेण्याने आणि उदारपणे त्यावरील प्रतिबंध उठविण्याने वांछित वातावरण चांगल्या रीतीने निर्माण होवू शकते.’  

२५ संप्टेंबर १९४८ रोजी गोळवलकरांनी सरदार पटेलांना पत्र लिहिले आहे. त्यात ते लिहितात की, ‘दक्षिणेकडून आणि उत्तरप्रदेशातून जो वृत्तांत आला आहे त्यावरून असे दिसते की, संघावर बंदी आल्यापासून तरुण वर्ग, विशेषत: विद्यार्थी कम्युनिझमकडे अधिकाधिक झुकत आहेत. त्यांचा प्रचार वाढता आहे. विपत्तीचा संकेत मी आपल्याला सांगावा असे नाही. पण, निर्दोष निष्कलंक स्वरुपात जर संघाला पुन्हा काम करू दिले तर संघ ह्या परदेशी (इझम) ‘वादा’पासून तरुणांना वाचवू शकेल असा आत्मविश्वास वाटत असूनही, आज मला आळशासारखे बसून राहावे लागत आहे...शासकीय शक्तीसह तुम्ही आणि सुसंघटीत सांस्कृतिक शक्तीसह आम्ही असे जर आपण एकत्र आलो तर लवकरच हा अभिशाप निर्मूल करू शकू७.’  अशा प्रकारचा पत्रव्यवहार गोळवलकरांनी सुरु केला. संघाचे घोषित तत्वज्ञान आणि प्रत्यक्ष आचार यांत मोठा फरक असतो असे सरकारचे म्हणणे होते. पण, त्याकाळी देशभरातील विरोधी पक्षांच्या वाढत्या प्रभावामुळे सरकारने संघावरील बंदी उठवली. आज नेहरूंच्या नावाने गरळ ओकणाऱ्या मंडळींना हे माहिती नाही की, नेहरूंनीच संघावरील बंदी उठवली होती. तेंव्हा विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला कोंडीत पकडले नसते आणि कम्युनिस्टांचा वाढता धोका नेहरूंना वाटला नसता तर संघावरील बंदी उठणे अत्यंत कठीणच होते. 

अशा सर्व चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की, आंबेडकरांनी संघबंदी उठवण्याची मागणी कधीही केली नव्हती. संघबंदी उठण्याला तत्कालीन राजकीय परिस्थिती कारणीभूत होती. 

 

१९५२ पहिली सार्वजनिक निवडणूक, जनसंघ आणि आंबेडकर 

संसदीय लोकशाहीमध्ये पूर्ण सत्ता कधीही सरकारच्या ताब्यात जावू नये म्हणूनच प्रभावी विरोधी पक्ष संसदेत असावा, असे आंबेडकरांचे म्हणणे होते. १९५२ मध्ये देशात पहिल्यांदा सार्वजनिक निवडणूक होणार होती. आंबेडकर हे कॉंग्रेस कट्टर विरोध होते. संसदेत विरोधी गट प्रबळ राहावा म्हणून त्यांच्या शेड्युल कास्ट फेडरेशनने देशभरात समाजवादी पक्षासोबत आघाडी केली. महाराष्ट्रात काही जागांच्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षासोबतसुद्धा आघाडी केली होती. अरुण आनंद म्हणतात की, ‘पहिल्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये शेड्युल कास्ट फेडरेशन आणि जन संघाची निवडणूकपूर्व आघाडी झाली होती.’ ही अरुण आनंद यांची माहिती पूर्णपणे खोटी आहे. याला दोन करणे आहेत. कारण १.६ ऑक्टोबर १९५१ मध्ये प्रकाशित केलेल्या जाहीरनाम्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘शेड्युल कास्ट फेडरेशन कोणत्याही प्रकारची आघाडी हिंदू महासभा किंवा आर.एस.एस. सारख्या प्रतिक्रियावादी पक्षांसोबत करणार नाही. कारण २. जन संघाची निवडणुकीत कोणासोबतच आघाडी नव्हती.

 

शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची नागपूर सभा. (१९४२)

 

भंडारा पोटनिवडणूक, आंबेडकर आणि दत्तोपंत ठेंगडी संबंध खरंच आहे काय? 

१९५२ च्या पहिल्या सार्वजनिक निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला होता. त्यामुळेच त्यांनी १९५४ मधील भंडारा पोटनिवडणूक लढविण्याचे ठरविले. या निवडणुकीच्या संबंधी अरुण आनंद म्हणतात की, ‘या निवडणुकीच्या काळात दत्तोपंत ठेंगडी आंबेडकरांचे पोलिंग अजेंट होते तसेच शेड्युल कास्ट फेडरेशनचे सरचिटणीस सुद्धा होते.’ 

‘शेड्युल कास्ट फेडरेशन स्थापनेचा इतिहास आणि कानपूर अधिवेशनाचा अहवाल’ या प्रदीप गायकवाड संपादित पुस्तकात शेड्युल कास्ट फेडरेशनची घटना दिलेली आहे. त्यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘१८ वर्षावरील प्रत्येक अनुसूचित जाती सदस्याला त्याने प्रतिज्ञा केली व ४ आणे देऊन अर्ज केला तर फेडरेशनचा प्राथमिक सभासद बनता येईल.’ ह्याचा अर्थ गैर- शेड्युल कास्ट व्यक्तीला पक्षाचे सभासद बनता येत नव्हते. मग, दत्तोपंत ठेंगडी सरचिटणीस कसे झाले? हा प्रश्नच आहे. 

१९४२ मध्ये ज्यावेळी शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना झाली. तेव्हा एन. शिवराज हे पक्षाचे अध्यक्ष झाले तर पां.ना.राजभोज हे सरचिटणीस बनले. शिवराज आणि राजभोज ही दोन्ही मंडळी १९५४ पर्यंत शेड्युल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष आणि सरचिटणीस होते. १९५४ मध्ये आंबेडकरांशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे त्यांनी पक्षाच्या पदांचे राजीनामे दिले. त्यानंतर आंबेडकर हे पक्षाचे अध्यक्ष आणि राजाभाऊ खोब्रागडे हे सरचिटणीस बनले. ‘महाराष्ट्राचे शिल्पकार बै.राजाभाऊ खोब्रागडे’ ह्या खोब्रागडेंच्या चरित्रात भंडारा निवडणुकीची चर्चा आलेली आहे पण, त्यात कोठेही दत्तोपंत ठेंगडी यांचा उल्लेख नाही. ‘पोस्टमार्टम ऑफ आर.पी.आय.’  लेखक भीमराव एस.गजभिये आणि ‘आमचे बाबासाहेब’ संपादक राजेंद्र भोसले या ग्रंथांमध्ये १९४२ ते १९५४ पर्यंत पां.ना.राजभोज हेच कसे शेड्युल कास्ट फेडरेशनचे सरचिटणीस होते याची माहिती मिळते. मराठीमध्ये आंबेडकरी चळवळीच्या इतिहासावर मोठ्या प्रमाणात लिखाण झालेले आहे. तसेच, आंबेडकरांच्या सोबत असणाऱ्या पहिल्या पिढीतील अनेकांनी आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहे. तरीही, अरुण आनंद आणि हिंदुत्ववादी परिवार जाणीवपूर्वक नवीन पुढीचा बुद्धीभेद करीत आहेत. तसेच इतिहासाची मोडतोड आणि विकृतीकरण करत आहे.  

 

आंबेडकरांच्या बौद्धिक अपहरणाचा हेतू!

आंबेडकर जयंतीनिमित्ताने आपला राजकीय प्रपोगंडा पसरवण्यासाठी हा व्हीडीओ तयार केला आहे असे स्पष्टपणे दिसते. असेच, प्रयत्न आंबेडकरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने संघपरिवाराने आणि हिंदुत्ववादी मंडळीनी केले होते. त्यावेळी इतिहासकारांनी आणि आंबेडकरवादी विद्वानांनी त्यांचा छुपा राजकीय अजेंडा जनतेसमोर उघडा पाडला होता. अरुण आनंद अनेकदा घटीत (Facts) जास्त महत्वाचे आहे असे म्हणतात. पण वास्तवात त्यांनी ऐतिहासिक घटनांची मोडतोड केली आहे. तसेच ते काल्पनिक घटना इतिहास म्हणून रंगवत आहेत. हा सगळा बुद्धिभेदाचा, इतिहासाच्या विकृतीकरणाचा आणि बाबासाहेबांच्या अपहरणाचा मुद्दा आहे.

अरुण आनंद म्हणतात की, 'आंबेडकर आणि आर.एस.एस. यांच्या विचारांमध्ये साम्यता आहे आणि आज, आर.एस.एस. त्यांच्याच विचारांचा वारसा चालवत आहे. आर.एस.एस.ही हिंदुत्ववादी संघटना आहे आणि भारतात हिंदूराष्ट्र स्थापन करण्याचे स्वप्न त्यांनी उरी बाळगले आहे. पाकिस्तान वरील ग्रंथात बाबासाहेबांनी हिंदू राज्य हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेला धोका असे म्हटले होते हे आपण वर पहिलेच आहे. आंबेडकरांनी आंतरजातीय विवाहांसोबत आंतरधर्मीय विवाहांचे सुद्धा समर्थन केले आहे. आंतरधर्मीय विवाहाच्या समर्थनार्थ बहिष्कृत भारतात आंबेडकरांनी १ जुलै १९२७ (हिंदु मुसलमानांच्या ऐक्याचा उपाय) आणि १२ ऑगस्ट १९२७ (ढोंगीपणा,माथेफिरूपणा व गैर मुत्सद्दीपणा) असे दोन अग्रलेख लिहिले आहेत. स्वतःला आंबेडकरांची वारसधार म्हणून घेणारी हिंदुत्ववादी मंडळी आणि संघपरिवार मात्र आंतरधर्मीयविवाहांना ‘लव जिहाद’ चे नाव देऊन विरोध करतात. 

जातीनिर्मुलन आणि भारताचे सामाजिक-आर्थिक लोकशाहीकरण ह्या दोन मुद्द्यांची चर्चा आंबेडकर सातत्याने करत होते. पण, आजही आपल्या देशात जातीनिर्मुलन झालेले नाही किंबहुना देशात दिवसेंदिवस दलित अत्याचारांमध्ये वाढच होत आहे. त्यासंबंधी कधीही संघ परिवाराने आणि हिंदुत्ववादी मंडळीनी जनआंदोलन किंवा धरणे आंदोलन केलेले दिसत नाही. काही दलित अन्याय आणि अत्याचारामध्ये तर हिंदुत्ववादी मंडळीच सहभागी होते. उदा. रोहित वेमुला आणि उना प्रकरण. संविधानसभेला घटना सपुर्त करतांनाच आंबेडकरांनी राजकीय लोकशाहीच्या मर्यादा सांगितल्या होत्या. संसदीय लोकशाही टिकवायची असेल तर सामाजिक-आर्थिक लोकशाहीकरण झाले पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. आज आपल्या देशात आर्थिक- सामाजिक विषमता झपाट्याने वाढतांना दिसत आहे. तरीही, आर.एस.एस. आंबेडकरांचा वैचारीस वारसा चालवत आहे असे म्हणत बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न अरुण आनंद करत आहेत. 

देशभरातील दलित तरुणांमध्ये सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीमुळे संघ परिवार, हिंदुत्ववादी मंडळी आणि सरकार विरोधी असंतोष वाढत आहे. तो सगळा असंतोष शांत करून दलितांना, आंबेडकरी चळवळीतील तरुणांना हिंदुत्ववादी चळवळीचे फुटसोल्जर बनविणे हा त्यांचा राजकीय हेतू आहे म्हणूनच त्यांनी पुन्हा आंबेडकरांच्या अपहरणाचा प्रपोगंडा राबवायला सुरुवात केली आहे.  त्यामुळेच अशा अपहरणाची वारंवार चिकित्सा झाली पाहिजे. ते कसे इतिहासाचे मोडतोड करतात असे उदाहरणासह आणि साधनांच्या आधारे आग्रहाने मांडले पाहिजे असे मला वाटते.

 

. Keith Meadowcroft, “The All India Hindu Mahasabha, Untouchable politics, and ‘Denationalising’ conversion: the Moonje- Ambedkar Pact, South Asia, Journal of South Asian Studies, Vol. XXIX, no. 1, April 2006, पृ.२०

. कित्ता

३. सह्याद्री, फेब्रुवारी १९३६

४. सह्याद्री, फेब्रुवारी, १९३६

५. वि. रा. करंदीकर, तीन सरसंघचालक, स्नेहल प्रकाशन, १९९९, पृ. ४६३

६. पत्ररूप गुरुजी, भारतीय विचार साधना, पुणे, १९८५ पृ. ५७४

७. कित्ता, पृ. ५७६-७७

८. Dr. BAWAS, Vol. 17-Part-1, GoM, 2003. पृ. ४०२

९. Richard Leonard Park, India’s General Elections, Far Eastern Survey-American Institute of Pacific relations, January 9, 1952, Vol. XXI  No. 1

 

लेखक इतिहासाचे अभ्यासक व संशोधक आहेत.

(लेख २६-०४-२०२० रोजी दुपारी १.५५ वा.संदर्भ आणि युट्युब एम्बेड साठी सुधारित.)