Quick Reads

चमचागिरी आणि अंधभक्ती

चमचागिरी आणि अंधभक्ती या फक्त राजकीय गोष्टी नाहीत, त्यांना दीर्घ इतिहासही आहे.

Credit : शुभम पाटील

एकेकाळी भारताच्या राजकीय वर्तुळात आणि चर्चाविश्वात ‘चमचागिरी’ हा शब्द खूपच प्रचलित होता. प्रामुख्याने बहुजन समाज पक्षाचे संस्थापक मा. कांशीराम यांनी ‘चमचायुग’ हे पुस्तक लिहून या चर्चेला सुरुवात केली होती. आजकाल अंधभक्ती या शब्दाची राजकीय चर्चाविश्वात खूपच चलती आहे. दोन्ही शब्द राजकीय चिकित्सा, टीकाटिपण्णी म्हणूनच विकसित झाली आणि मग समाजातील सर्वच क्षेत्रात पसरलेली दिसतात. म्हणूनच, भारतीय राजकीय स्थित्यंतर हे नुसते कॉंग्रेस ते भाजप असे नाहीये तर चमचागिरी ते अंधभक्ती असेही आहे.

भाजप आणि प्रामुख्याने प्रधानमंत्री मोदींच्या अनुयायांना अंधभक्त म्हणून हिणवले जाते कारण, मोदींच्या कोणत्याही निर्णयाला ही मंडळी पाठींबा आणि अधिमान्यता देतात. त्यांना वाटते की, मोदी कोणताही निर्णय घेतात, तो देशाच्या, आपल्या भल्याचाच असतो. समजा तो निर्णय म्हणावा तसा यशस्वी झाला नाही तर लोक मोदी आणि भाजपला जबाबदार धरण्यापेक्षा दुसरयांना जबाबदार धरतात किंवा मोदींचा हेतू चांगलाच आहे पण अंमलबजावणी खालचे लोक व्यवस्थित करत नाही असे म्हणतात. या सगळ्या गोष्टी भक्तीभावाने होतात. त्यामध्ये नागरिक म्हणून कोणतीही चिकित्सा आणि टीका नसते म्हणून मोदी आणि भाजपच्या अचिकित्सक अनुयायांना अंधभक्त म्हटले जाते.

पूर्वीच्या कॉंग्रेस व्यवस्थेमध्येही अंधभक्तीसारख्याच पण काहीश्या वेगळ्या ‘चमचागिरी’चा बोलबाला होता. इतिहासकार राम गुहांनी ‘कॉंग्रेस चमचागिरीचा संक्षिप्त इतिहास’ असा लेखच गांधी घराणे आणि कॉंग्रेसवर लिहिला आहे. आजच्या काळात मोदी आणि भाजप जवळ जशी अंधभक्तांची फौज आहे तशीच कॉंग्रेसजवळ एकेकाळी चमचांचे जाळे होते. दोन्हींचे कामे सरकारवर स्थुतीसुमने उधळणे, सरकारच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन करणे, विरोधकांना नामोहरण करणे, देशी-विदेशी सरकार आणि पक्षाचा प्रचार–प्रसार करणे यासारखी बरीच होती.

आज समाजात मोदी-भाजप समर्थक लोकांना अंधभक्त म्हटले जाते त्यावेळी प्रतिक्रिया म्हणून मोदी-भाजप अनुयायी लोक इतरांना चमचे असेही म्हणतात. याचीच परिणीती अशी झाली आहे की. जे मोदी-भाजप समर्थक आहेत ते अंधभक्त आणि जे विरोधक आहे ते चमचे. पण परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. समाजात अजूनही असे बरेच लोक आहेत की, जे नुसते मोदी-भाजपच्या अंधभक्तीच्या विरोधात नाहीत तर ते कॉंग्रेसच्या चमचेगिरीच्या विरोधातही होते. भाजप-कॉंग्रेस किंवा मोदी-गांधी या धृवीकरणात राजकीय सपाटीकरण काहीवेळा केले जाते. म्हणूनच, समाजातील वेगवेगळ्या विरोधी आवाजांना आणि मतभेदांना विरोधी पक्षाचा आवाज म्हणून पाहू नये.

 

 

मा. कांशीरामांनी चमचायुगमध्ये सहा प्रकारचे चमचे सांगितले होते - १. जाती किंवा समाजनुसार चमचे, २. पार्टीनुसार चमचे, ३. ज्ञानी चमचे, ४. अज्ञानी चमचे, ५. चमच्यांचे चमचे, ६. विदेशात राहणारे चमचे. सहा प्रकारचे चमचे समाजात वेगवेगळ्या माध्यमातून सत्ताधारी लोकांच्या राजकीय हितसंबंधाचे जतन आणि संवर्धन करतात. आपल्या ज्ञानाच्या माध्यमातून, आपल्या जातीच्या माध्यमातून आणि कधी कधी आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यक्रमाचे आयोजन करून आपले नेत्याची प्रतिमा उभी करतात. कांशीरामांनी त्यांच्या काळातील राजकीय व्यवहारावर लिहिले म्हणून त्यांना चमचे दिसले.

आजच्या काळात कोणी असे पुस्तक लिहिले तर त्याला ‘अंधभक्तांचे युग’ असे शीर्षक देणेच योग्य होईल. कारण, आजच्या आपल्या समाजात चमच्यांसारखेच अनेक प्रकारचे अंधभक्त आहेत. त्यांची वर्गवारी पुढीलप्रमाणे करता येवू शकते:

१. जाती-धर्मातील अंधभक्त

२. पार्टी-व्यक्तीचे अंधभक्त

३. ज्ञानी अंधभक्त

४. अज्ञानी अंधभक्त

५. अंधभक्तांनी बनवलेले अंधभक्त आणि शेवटी

६. विदेशात राहणारे अंधभक्त.

ही सर्व अंधभक्त मंडळी पूर्वीच्या चमच्यांसारखीच कामे करतात. त्यामुळे दोन्हींमध्ये म्हणावा तेवढा फरक नाही. एक-दोन छोटेसे फरक आहेत. ते म्हणजे

१. अंधभक्तांसारखे चमचे जाहीरपणे आम्ही चमचे आहोत हे जाहीरपणे मान्य करीत नव्हते.

२. चमचे आधी वातावरण निर्मिती करायचे आणि मग पाठींबा द्यायचे. पण, अंधभक्त वातावरणनिर्मितीसोबतच पाठींबाही देतात.

चमचागिरी आणि अंधभक्ती या फक्त राजकीय गोष्टी नाहीत. या दोन्हींना दीर्घ इतिहासही आहे. राजेशाही, घराणेशाही आणि सामंतशाहीमध्ये सत्ताधारी मंडळींची चमचागिरी आणि अंधभक्तीच करावी असाच काहीसा समाजनियम होता. त्यांच्या प्रत्येक निर्णयाचे प्रश्न विचारता स्वागत करावे लागत असे. लोकशाहीत हे चित्र पालटले पाहिजे होते. पण, नाही बदलले. कारण, चमचागिरी आणि अंधभक्तीचे एक अर्थकारण असते. त्याला सामाजिक अधिमान्यता असते.

आपल्या समाजात अजूनही लोकांची चमचेगिरी आणि भक्ती करणाऱ्या लोकांना मानमरातब मिळतो. पदे-प्रतिष्ठा मिळते. संपत्ती-समृद्धी मिळते. म्हणूनच असे दिसते की, राजकीय पातळीवर दिसणाऱ्या चमचेगिरीला आणि अंधभक्तीला समाज जन्माला घालतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे की, ‘अध्यात्मात भक्ती मोक्ष मिळवून देत असेल पण राजकारणात मात्र भक्ती ही हुकुमशाहीला जन्माला घालते.’ कारण, भक्तीत लोक प्रश्न विचारत नाहीत. अचिकित्सक बनतात. स्वामीवर निष्ठा ठेवतात. लोकशाही राजकारणात मात्र असे करणे म्हणजे आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य गमावणे ठरेल. म्हणूनच, लोकशाही राजकारणात चमचागिरी आणि अंधभक्ती करण्यापेक्षा नागरिक कर्तव्ये बजावणे अधिक महत्वाचे आणि सर्वांच्या भल्याचे आहे.

 

देवकुमार अहिरे हे अभ्यासक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्राध्यापक आहेत.