India

एसटी महाराष्ट्रासाठी इतकी महत्त्वाची का आहे?

असे अनेक दुर्गम, आदिवासी भाग आहेत, जिथे पोहोचण्यासाठी फक्त एसटीच आहे.

Credit : Indie Journal

डोंगर, नद्या, शेतांमधून जाणारा लांबसडक मातीचा रस्ता, क्वचितच दिसणारी विरळ वस्ती, माळरान नाहीतर झाडांमधून क्वचितच दिसणारी माणसं, आणि रस्त्यावरून धूळ उडवत जाणारी लालपरी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या, डोंगर-दऱ्यांमधल्या बऱ्यचशा गावांमध्ये प्रवासाचं एकमेव साधन फक्त एसटी बसेस आहेत. रस्ता कितीही खराब असूदेत, पाऊस-पाण्याचं वातावरण असूदेत, कितीही कमी प्रवासी असूदेत, दिवसातून दोन वेळा एसटी बस येणार म्हणजे येणार. गावाच्या अर्थव्यवस्थेचा, शिक्षण, आरोग्य व्यवस्थेचा एसटी अविभाज्य भाग आहे. 

कोकणात दापोलीपासून साधारण २८ किमी अंतरावर गुडघे हे गाव आहे. साधारण ८९-९० साली रस्ता झाल्यापासून गाव मुख्यतः एसटी बसेसनी तालुक्याला जोडलं. प्रवासाचा दुसरा कुठलाही मार्ग नसल्यामुळे शाळकरी मुलं, नोकरदार, गावातले शेतकरी यांना तालुक्याच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी तेव्हापासून एसटी हाच आधार आहे. "कित्येक मुलांसाठी एसटी बसमुळे कॉलेजची दारं उघडी झालीयेत. गावामध्ये पिकणाऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टी, दूध आजूबाजूच्या गावांमध्ये विकायला नेता येतात. मच्छीमारांना मासे विकायला नेता येतात. जवळच्या आरोग्य केंद्रात जायचं असल्यास, किराणा मालाची खरेदी करायला शेजारच्या गावात जायचं असेल, तरी या प्रत्येक गोष्टीसाठी गावकरी एसटी वर अवलंबून आहेत. खरं तर गावात एसटी जरी दिवसातून दोनच वेळा येत असली, तरी गावकऱ्यांच्या रोजच्या आयुष्यात तिचं महत्वाचं स्थान आहे. एक दिवस जर बस आली नाही, आणि वैयक्तिक वाहन जर नसेल, तर प्रवासाचं दुसरं कुठलंच साधन उपलब्ध नाही," मूळ गुडघे गावची असलेली आणि आता पुण्यात राहणाऱ्या वैदेही दांडेकरनं इंडी जर्नलशी बोलताना सांगितलं.

 

"कित्येक मुलांसाठी एसटी बसमुळे कॉलेजची दारं उघडी झालीयेत."

 

मागच्या काही आठवड्यांपासून चालू असणारं एसटी कर्मचाऱ्यांच आंदोलन अजूनही चालूच आहे. रास्त मागण्या घेऊन अनेक वर्ष एसटीची अविरत सेवा करणारे कर्मचारी आपल्या कुटुंबासह या आंदोलनात सहभागी झालेत. या आंदोलनाचा परिणाम सर्वात जास्त फटका बसतोय तो ग्रामीण दळणवळणाला. महाराष्ट्रात अशी असंख्य गावं आहेत ज्या गावात कोणतीही खाजगी दळणवळण व्यवस्था पोहोचलेली नाहीये किंवा पोहोचली असेल तरी एसटी एवढ्या माफक आणि सवलतीच्या दरात ती उपलब्ध नाहीये. ज्या गावांमधले अनेक लोक फक्त एसटी वर अवलंबून आहेत. त्या सर्वांना सध्या प्रवासासंदर्भातील अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय.

कोल्हापूर जिल्हातल्या राधानगरी तालुक्यात अशी अनेक गावं आहेत. राधानगरी पासून ४-५ किलोमीटरवर असणारं बहिरे बांबर,पाळ्याचा हुडा, कोंडूशी, मानबेट, पाटपन्हाळा, भुदरगड आणि राधानगरीच्या मध्यावर असणारं वाकी घोळ तसंच काळम्मावाडी धरणाला लागून असणारी बरीच गावं ही एसटीच्या प्रवासावर जास्त अवलंबून आहेत. राधानगरी येथील सामाजिक कार्यकर्ते मारुती टिपुगडे यांच्याबरोबर इंडी जर्नलनं संपर्क साधला असता ते या गावांमधील एसटीच्या प्रवासाचं महत्व सांगताना म्हणाले की, “भुदरगडपासून ही गावं तशी जवळ आहेत. पण राधानगरी हे तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे त्यांना शासकीय किंवा इतर उदरनिर्वाहाच्या कामासाठी तालुक्याला यावं लागतं. काळम्मावाडी धरणावरून हा रस्ता आहे. या गावांसाठी सकाळी एक एसटी आणि त्यानंतर थेट संध्याकाळी एक एसटी अशा दोनच फेऱ्या होतात. दिवसभर गाडी नसते. वाकी घोळ किंवा या इतर गावांमधून माणूस सकाळी तालुक्याला आला तर त्याला संध्याकाळी सहापर्यंत इथेच थांबावं लागतं. किंवा एकमेव पर्याय असा राहतो की गारगोटीमार्गे जाणाऱ्या एसटीने जात ५० ते ७० किलोमीटरचं अंतर पार करावं लागतं.” थोडक्यात २५ किलोमीटरच्या प्रवासासाठी ३०-४० किलोमीटर जास्त जावं लागतं कारण दिवसभर दुसरी एस टी नसते असंही ते म्हणाले.

मोठमोठ्या शहरांची दळवळण व्यवस्था या संपामुळे कोलमडल्याचं चित्र सध्या दिसतंय. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, संपामुळे खाजगी बसेसनी वाढवलेली भरमसाठ तिकिटं या अडचणी अनेकांना सतावतायत. मात्र ग्रामीण भागाच्या दळणवळणावर एसटी संपामुळे तितकाच परिणाम झाल्याचं स्पष्ट होतंय. लोकांना सोयीचा प्रवास मिळणं बंद झालंय. “एसटी आंदोलनामुळे सध्या ज्या गाड्या या गावांमध्ये जात होत्या. त्यादेखील आता जात नाहीयेत आणि रस्ता खराब असल्या कारणानं सिक्स सिटर किंवा वडाप इथं जात नाहीत. त्यामुळे ज्यांच्याकडे स्वतःचं वाहन आहे त्यांच्याबरोबर जाणं-येणं, असं इथले अनेक लोक या दिवसांमध्ये करतायेत,” असं टिपुगडे म्हणाले.

 

जिथं एसटीला १० रुपयांच्या तिकिटात प्रवास व्हायचा तिथं ३०-४० रुपये खर्च करावे लागणार आहेत.

 

सुनील दळवी हे वाकी घोळचे रहिवासी आहेत. सध्या ते कोल्हापूर मधील एसटी क्वार्टर्समध्ये राहतात. ग्रामीण भागातल्या दळणवळणावरवर संपामुळे काय परिणाम झाला हे सांगताना ते म्हणाले की, “राधानगरी आणि गारगोटीवरून आमच्या गावात बस येते. सध्या संप चालू असल्यामुळे एसटी बंद आहे. अजून या गोष्टीची दाहकता तितकी लोकांना समजली नसली तरी जशा शाळा पूर्ण क्षमतेनं चालू होतील तेव्हा या गोष्टीचा फटका पालक आणि विद्यार्थ्यांना बसणार आहे. वडापसारखे  खाजगी वाहतुकीचे पर्याय उपलब्ध झाले तरी जिथं एसटीला १० रुपयांच्या तिकिटात हा प्रवास व्हायचा तिथं ३० किंवा ४० रुपये खर्च करावे लागणार आहेत. वेळेचा मुद्दादेखील आहेच. एसटीची एक ठराविक वेळ असल्यामुळे लोक पुढच्या कामांच्या दृष्टीनं त्या प्रवासावर अवलंबून राहतात किंवा राहू शकतात पण सिक्स सीटर, वडाप यांच्याबाबतीत हे थोडं वेगळं पडतं. लोकांना गाडी भरेपर्यंत थांबावं लागतं ज्याचा परिणाम शासकीय काम किंवा इतर दिलेल्या वेळांवर होऊ शकतो.”

त्याचबरोबर जी सुरक्षितता एसटीच्या प्रवासात आहे ती इतर खाजगी प्रवासात मिळत नाही. अनेक सवलती एसटीमध्ये दिल्या जातात ज्या आर्थिकदृष्ट्या ग्रामीण भागासाठी महत्वाच्या ठरतात. अपघातासारख्या घटना घडल्या तर निधीची व्यवस्था, प्रवासामध्ये ज्येष्ठ नागरिक,अपंग व्यक्ती, महिला, विद्यार्थी यांना मिळणाऱ्या सवलती यामुळे ग्रामीण भाग हा बऱ्यापैकी एसटीवर अवलंबून आहे आणी त्यांचा या प्रवास व्यवस्थेवर विश्वास आहे. ग्रामीण भागातील बऱ्याच विद्यार्थ्यांना दर दिवशी ८०-१०० रुपयांचा खर्च परवडू शकत नसल्याचंही दळवी म्हणाले. कोकणचा सर्व पट्टा, महाराष्ट्रातील ८० टक्के ग्रामीण भाग संपूर्णतः एसटीवर अवलंबून आहे. सध्या इतर साधनं उपलब्ध तरी आहेत. ज्यावेळेला एसटीशिवाय इतर वाहतूक व्यवस्थेची सुविधा नव्हती तेव्हा एसटीमुळे ग्रामीण भाग अनेक गोष्टी करू शकलाय. स्त्रियांच्या प्रसुतीपासून ते संकटकाळात मदतीसाठी एस टी चा वापर झालाय. इथल्या प्रत्येक माणसाची नाळ कुठल्या न कुठल्या अंशी एसटी बरोबर जोडली गेलीये.

दळवी हे स्वतः एसटी महामंडळात क्लर्क म्हणून काम करतात. शासनानं या मागण्यांचा विचार करत असताना काय केलं पाहिजे हे सांगताना ते म्हणाले की, “केंद्र आणि राज्य सरकारकडून डीझेल प्रत्येकी १८ टक्के जीएसटी लावला जातो. जर यामध्ये आणि टोल भरण्यामध्ये सवलत मिळू शकली तर अनेक प्रश्न सुटू शकतात. अनेक ठिकाणी एसटी च्या मालकीचा भूखंड आहे. त्याचा योग्य वापर होतोय का याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. थोडक्यात गुणवत्ता वाढीसाठी जर शासनानं प्रयत्न केले तर एस टी प्रचंड फायदा सरकारला मिळवून देऊ शकते आणि लोकांनाही सुरक्षित प्रवास मिळू शकतो.” त्यामुळे विलीनीकरणाच्या मुद्द्याकडे सरकारनं  गांभीर्यानं बघितलं पाहिजे, असं ते म्हणाले.

माळेवाडी पाटेवाडी हे संपूर्णतः डोंगरवस्तीत असणारं गाव आहे. गावापुढेही अनेक वाड्या आणि वस्त्या आहेत ज्या तालुक्याच्या गावापासून २५-३० किलोमीटरवर आहेत. त्यामध्ये रींगेवाडी, कळकेवादी, आंबेवाडी, नेरूचा वाडा, बुर्म्बाळवाडा, माळेवाडी धनगरवाडा, वाघोशी या गावांचा समावेश आहे. माळेवाडी पाटेवाडी येथील तानाजी पवार यांनी इंडी जर्नलशी बोलताना सांगितलं की, “आमच्याकडे दळणवळणासाठी एसटी हेच मुख्य साधन आहे. मुळात डांबरी रस्ता नसल्यामुळे आणि असणारा रस्ता पावसात खराब होऊन जातो. त्यामुळे खाजगी प्रवासाची इकडे सोय नाही. एसटीमुळे अनेकांची जी सोय होते ती सध्या संप चालू असल्यामुळे खंडित झालीये.” 

विद्यार्थ्यांच्या होत असणाऱ्या नुकसानीबद्दल सांगताना ते म्हणाले की, “कोरोनामुळे शाळा बंद होत्या त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले आणि आता एस टी बंद असल्यामुळे दुर्दैवाने आमच्या भागातील विद्यार्थी अजूनही वंचित आहेत असं म्हणावं लागेल. लवकरात लवकर एस टी सुरु होणं गरजेचं आहे.”

 

मुंबई-पुण्यातही अनेक दुर्गम, आदिवासी भाग आहेत, जिथे पोहोचण्यासाठी फक्त एसटीच आहे.

 

मुंबई-पुणेसारख्या जिल्ह्यातही असे अनेक दुर्गम, आदिवासी भाग आहेत, जिथे पोहोचण्यासाठी फक्त एसटीच उपलब्ध आहे. "नुकत्याच सुरु झालेल्या शाळेला जाणारी मुलं  एसटी बंद असल्यामुळे  ५ ते ६ किलोमीटर पायपीट करतायत. या बंदमुळे काही कॉलेजना देखिल सुट्टी देण्यात आली आहे. दवाखान्यात, बँकांमध्ये जाण्यासाठी गैरसोय होत आहे,  मोल मजुरीनं जगणारे मजूर कामावर जाऊ शकत नाहीयेत. रोज येणाऱ्या-जाणाऱ्यांची गैरसोय होत आहे, आठवडे बाजाराला जाता येत नाही. परिणामी जास्तीचे पैसे लोकांना मोजून गाडी करून बाजार करावा लागत आहे," पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गावचे रहिवासी आणि आदिवासी कार्यकर्ते निलेश साबळे म्हणाले. 

यावर्षी पावसाच्या हाहाकारामुळे आधीच इथल्या भात पिकाचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय. "तोंडाला आलेलं पीक पदरात पडताना दळणवळण ठप्प झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रमाणात गैरसोय होत आहे त्यामध्ये पर्याय व्यवस्था म्हणून या भागात काही जीप चालतात त्या दुप्पट तिप्पट पैसे मोजावे लागत आहे, आठवडे बहरात पोहचता न आल्यामुळे कमालीची गैरसोय होतेय," साबळे पुढं म्हणाले.

आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर मंदिराच्या आजूबाजूच्या गावांमधल्या लोकांचा उदरनिर्वाह मोठ्या प्रमाणात भीमाशंकरला भेट देणाऱ्या भाविक आणि पर्यटकांवर अवलंबून आहे. मात्र एसटीच्या संपामुळे येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झाली आहे, त्यामुळे तिथले स्थानिक हॉटेल व्यावसायिक, छोटे-मोठे दुकानदार सर्वांनाच समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. कोव्हीड नंतर जनजीवन सुरळीत होत असताना या भागातील लाईफ लाईन असलेली एसटी संपामुळे बंद असल्यामुळे परत एकदा मागच्या दोन वर्षांसारखी परिस्थिती निर्माण होतानाच चित्र उभं राहतय आणि यामध्ये प्रशासन सुद्धा पर्यायी व्यवस्था उभी न करता बघ्याची भूमिका घेत आहे.

एसटीची ग्रामीण भागातील गरज लक्षात घेऊन विलीनीकरणाबरोबर एसटी कार्माचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत आहेत त्याचा विचार सरकारने करणं गरजेचं आहे आणि ग्रामीण दळणवळणाची झालेली अडचण दूर करणं गरजेचं आहे.

कारण दांडेकर सांगतात, "आमच्या इथे रस्ता कितीही खराब असूदेत, कितीही उशीर होऊदेत, ती बस दररोज न चुकता गावात येते. बाहेरगावी जाण्यासाठीही एसटी वरच लोकं अवलंबून असतात. त्यामुळे एसटी ची अवस्था कशीही असली, अगदी दळण आणण्यापासून ते शिक्षण, आरोग्य, बाजारपेठ, या सुविधा लोकांपर्यंत एसटीच पोहोचवते."

सह-वार्तांकन: प्राजक्ता जोशी.