India

परभणी: गंगाखेडमध्ये देवस्थान जमिनीला ट्रस्टमध्ये रूपांतरित करण्यावरून वाद

बऱ्याच वर्षांपूर्वी इनाम म्हणून गावातील ब्राम्हण कुटुंबाला मिळालेल्या वर्ग ३ मधील जमिनीवरून सध्या गावात वाद सुरु झाला आहे.

Credit : इंडी जर्नल

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील वाघलगाव येथे देवस्थानच्या जमिनीवरून वाद  निर्माण झाला आहे. गावातील काही जणांनी ग्राम पंचायतीमार्फत या जमिनीसाठी ठरव घेण्याचे प्रयत्न केले असता त्यांच्यातील एका युवकाला ब्राम्हण संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी फोनवरून त्या कुटुंबाविरुद्ध असं न करण्याची 'सूचना' दिल्यामुळे या प्रकरणाला थोडं वेगळं स्वरूप येऊन गावात तणाव निर्माण झाला.  

इंडी जर्नलला प्राप्त झालेल्या एका फोन रेकॉर्डिंगमध्ये दिनेश कुलकर्णी हे गावातील युवक विठ्ठल घनवटे यांना, गावामध्ये असणाऱ्या देवस्थानच्या जमिनीवरून गावातील ज्या ब्राम्हण कुटुंबाकडं त्या जमिनीचे इतर अधिकार आहेत, त्यांच्या कुटुंबाला 'लक्ष केलं जातंय' आणि 'जमिनीवरून जो गोंधळ सध्या चालू आहे तो थांबवावा नाहीतर, माझी पोहोच खूप वरपर्यंत आहे,' असं म्हणत, पुढं 'गावात ठराव घेऊन काहीही केलं तरी मी चॅरिटी कमिशनरला एक फोन करून सांगितला तरी जमीन आहे तशी त्यांच्याकड राहिल," असंदेखील म्हणताना ऐकू येतं.

 

 

बऱ्याच वर्षांपूर्वी इनाम म्हणून गावातील ब्राम्हण कुटुंबाला मिळालेल्या देवस्थानच्या वर्ग ३ मधील जमिनीवरून सध्या गावात एक असा मतप्रवाह तयार होतोय की, देवस्थानची जी जमीन आहे ती अनेक वर्षांपासून या कुटुंबाकडे आहे मात्र देवस्थानचा कुठलाही विकास त्यांच्याकडून केला जात नाहीये. पुरातत्व काळातील मंदिर असून त्याची पाहणी नीट केली जात नाहीये, मंदिराची पडझड झालेली आहे. त्यामुळं देवस्थानसाठी एक ट्रस्ट तयार करून त्याच्यामधून देवस्थानचा विकास केला जावा. मात्र देवस्थानच्या जमिनीचे वारस हक्क असणाऱ्या गावातील ब्राम्हण कुटुंबाकडून याला आक्षेप घेतला जातोय.

गावामध्ये व्यंकटेश बाळासाहेब देवस्थान नावाचं एक प्राचीन काळातलं मंदिर आहे. पूर्वीच्या लोकांनी मंदिराची देखभाल, दिवाबत्ती यासाठी देवस्थानकरिता काही एकर जमीन दान देण्यात आलेली आहे. गावातील विठ्ठल घनवटे यांनी माहिती देताना असं सांगितलं की, "राघोपंत विठ्ठलराव फडणीस नावाच्या एका भटजींच्या नावे ही जमीन लोकांनी केली होती कारण देवस्थानची काळजी घेता येईल. मात्र देवस्थानाची सद्यपरिस्थिती अजिबात चांगली नाहीये. मधल्या काळात गावातील काही लोकांनीच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी पैसे जमवले होते मात्र त्यामधूनदेखील काहीच जीर्णोद्धार झाला नाही." 

 

देवस्थानच्या ज्या जमीनी असतात त्यावर पुजारी किंवा इतर कोणाचाही मालकी हक्क नसतो तर त्या देवाचा हक्क असतो.

 

देवस्थानच्या ज्या जमीनी असतात त्यावर पुजारी किंवा इतर कोणाचाही मालकी हक्क नसतो तर त्या देवाचा हक्क असतो. जमीन महसूल कायद्यांतर्गत इनाम वर्ग ३ मध्ये देवस्थान इनाम अशाप्रकारे १ ते ७ इनाम वर्ग होते. काळानुरूप या कायद्यात बरेच बदल आणि वाद विवाद झालेले आहेत. पूर्वीपासून गावातील जमिनीचं काही भाग हा गावातील देवस्थानसाठी दिला जातो किंवा राखीव ठेवला जातो. या वर्ग ३ मधल्या या जमिनींची वारसाप्रमाणे विभागणी होत नाही तसंच या जमिनीची विक्री किंवा यावर कोणाला हस्तांतरण करता येत नाही. या प्रकरणी गंगाखेड तहसीलदार येरमे यांच्याशी बोलल्यावर त्यांनी सांगितलं की, "माझ्यापर्यंत अजूनही हे प्रकरण आलेलं नाही. आणि धर्मादाय आयुक्तच याबद्दल निर्णय घेऊ शकतात." धर्मादाय आयुक्त यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलं मात्र त्यांनी फोनवरून माहिती देण्यास नकार दिला. 

 

 

जमीनीचे इतर अधिकार असणारे या ब्राम्हण कुटुंबातील व्यंकटेश फडणीस असं म्हणाले की, "इतकी वर्षं या जमिनीचे, देवस्थानचे अधिकार आमच्या कुटुंबाकडे आहेत. त्यामुळे अशाप्रकारे अचानक ट्रस्ट स्थापन करण्याची गरज नाही. आमच्याकडे जागेची रीतसर कागदपत्रंदेखील आहेत. गावातील लोकांबरोबर बसून यावर मार्ग निघू शकेल."  

गावातील पोलीस पाटील विनायक आळनुरे यांच्याशी घटनेबद्दल बोललं असता त्यांनी सांगितलं की, "कोणालाही वयक्तिकरीत्या लक्ष करण्याचा गावातील कोणाचाही हेतू नाहीये. गावाच्या आणि इथल्या देवस्थानच्या चांगल्यासाठी गावातील काही तरुण प्रयत्न करतायेत. आणि त्याबद्दल या तरुणांचे प्रयत्न चालू आहेत. देवस्थानची जमीन आणि एवढं पुरातन काळातलं मंदिर आहे तर त्याची जोपासना व्हावी एवढंच या तरुणांचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांनी अशी मागणी केलीये की देवस्थानसाठी ट्रस्ट तयार करण्यात यावं जेणेकरून शासनाचे काही फंड उपलब्ध होतील आणि मंदिराची जोपासना करता येईल. गावामध्ये कोणाचंच कोणाशी वैर नसून हा मुद्दादेखील सामंजस्यानं सोडवला जाईल." ब्राम्हण महासंघाच्या अध्यक्षांच्या फोन बद्दल विचारलं असता ते म्हणाले की गावपातळीवर असणारा आणि फक्त देवस्थानचं काम व्यवस्थित चालावं यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना अशाप्रकारे फोन केला जात असेल तर ही बाब अत्यंत चुकीची आहे.

 

फक्त देवस्थानचं काम व्यवस्थित चालावं यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना अशाप्रकारे फोन केला जात असेल तर ही बाब अत्यंत चुकीची आहे.

 

"काही दिवसांपूर्वी या मुलांनी ही मागणी केलेली आहे आणि गावातल्या ऐशी टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की गावातील जे बालाजी देवस्थान आहे त्याच्या उद्धारासाठी ट्रस्ट स्थापन करावं. गावातली तरुण मुलं पुढाकार घेऊन हे करण्याचा प्रयत्न करत आहेत. फडणीस जे आहेत त्यांच्या ताब्यात ही जमीन अनेक वर्षांपासून होती. त्यामुळे त्यांच्याकडून अशी मागणी केली जातीये की ट्रस्ट करण्याचा विचार न करता जसं चालू आहे तसं चालू द्यावं परंतु या तरुणांनी गावातील ज्या लोकांचं याला समर्थन आहे त्यांच्या सह्या घेऊन तो कागद ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयामध्ये केलेला आहे. पुढची कार्यवाही झालेली नाहीये. देवस्थानच्या जमिनीचा उपयोग आणि मंदिराचं काम व्यवस्थित चालावं या दृष्टीकोनातून निर्णय घेतला जाईल." अशी माहिती गावचे सरपंच अंकुश आळसे यांनी दिली. "गावामध्ये असणाऱ्या देवस्थानचं चांगलं काही होणार असेल तर आपण अडवणूक कशाला करायचीये?" असंदेखील ते म्हणाले.

याबद्दल गावपातळीवर ठराव होऊन निर्णय घेतला जाणार आहे. देवस्थानच्या नावे असणाऱ्या जमिनीचा योग्य वापर व्हावा आणि त्यामधून देवस्थानचा विकास करावा अशा ठरावावर संमती गावातील लोकांच्या सह्या घेऊन पुढील गोष्टी ठरवल्या जाणार आहेत. ब्राम्हण संघटनेचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी यांनी असं सांगितलं की, "देवस्थानच्या ज्या जमीनी आहेत त्या सत्तरच्या काळापासून अशाप्रकारे इनाम किंवा वर्ग ३ च्या स्वरुपात अनेक कुटुंबांकडे आहेत. कोणालाही ती जमीन काढून घेता येत नाही.  गावातले सगळे लोक एका बाजूला आणि गावातलं हे ब्राम्हण समाजातलं घर एका बाजूला अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ब्राम्हण संघटनेचा अध्यक्ष या नात्यानं माझ्या समाजबांधवावर अन्याय होत असेल तर त्यावर मी भूमिका घेणारच. गावातील जे उपसरपंच आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. त्यांना योग्य वाटेल तो निर्णय त्यांच्याकडून घेतला जाईल."