India

टॅरिफ आणि सुवर्ण बाजारातील चढउताराचा छोट्या सराफ दुकानदारांना फटका

छोट्या व्यापाऱ्यांचं या अस्थिरतेमुळे लाखो रुपयांचं नुकसान होत आहे.

Credit : इंडी जर्नल

 

गुरुवारी, २९ जानेवारीला १.७६ लाखांवर असलेलं सोनं जानेवारीला थेट १.६५ लाखांवर आलं. एमसीएक्स (मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड) वरील या वादळी घसरणीमुळे पुण्यातील सोन्याच्या व्यापारात मोठी अस्थिरता निर्माण झाली असल्याचं दिसून आलं आहे. विशेषतः छोट्या व्यापाऱ्यांचं या अस्थिरतेमुळे लाखो रुपयांचं नुकसान होत आहे.

अर्थसंकल्पाच्या आधी सोने-चांदीच्या किमतीतली आतापर्यंतची सर्वात मोठी एका दिवसातील घसरण ३० जानेवारी रोजी पाहायला मिळाली. शुक्रवारी देशभरातील सराफा बाजारात चांदीची सरासरी किंमत ४० हजार ६३८ रुपयांनी घसरत ३ लाख ३९ हजार ३५० रुपये प्रति किलो राहिली. सोन्याचे भाव ९ हजार ५४५ रुपयांनी स्वस्त होऊन १ लाख ६५ हजार ७९५ रुपये प्रति १० ग्रॅमवर आले.चांदी आणि सोन्याच्या किमतीतील विक्रमी तेजीचा सिलसिला शुक्रवारी केवळ थांबलाच नाही, तर गुंतवणूकदारांच्या नफावसुलीमुळे वायदा बाजारात त्यांच्या किमतीत एका दिवसातील सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली.

पुण्यातील सराफा व्यापारी दुहेरी संकटात जागतिक स्तरावरील या घडामोडींचा थेट परिणाम पुण्यातील रविवार पेठेतील सोने व्यापाऱ्यांवर होत आहे. नुकतेच ३० जानेवारीला एमसीएक्स वर सोन्याचे दर ९ टक्क्यांनी कोसळून १ लाख ५४ हजार १५७ रुपयांवर आले होते. यामुळे व्यापाऱ्यांना ‘इन्व्हेंटरी लॉस’ (मालसाठा हानी) चा मोठा फटका बसला असल्याचं व्यापारी सांगतात.“मागील काही काळापासून सोने दरात सातत्याने बदल होत आहेत. दोन दिवसांपूर्वी मला याचा मोठा फटका बसला, १ लाख ४७ हजार ८०० रुपये प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव सुरू होता. ग्राहकाकडून मी ऑर्डर घेतली आणि काही तासांमध्येच भाव वाढून १ लाख ५२ हजार ५०० रुपये झाला,” ‘मेड ज्वेलर्स’चे राकेश दीक्षित सांगतात.

 

 

ते पुढं म्हणाले, “ग्राहकाकडून ऑर्डर घेताना जो भाव होता त्याच भावाने आम्हाला ग्राहकाला विक्री करावी लागते त्यामुळे अगदी काही तासात मला ५ हजाराचा तोटा झाला.”“सोन्यातील भावात हा चढउतार मागील काही महिन्यांपासून प्रकर्षाने जाणवत आहे. ज्यामुळे लाखों रुपयांचे नुकसान सहन करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे. बिल करता करता जर भाव वाढत असतील, तर आम्ही धंदा करायचा कसा?” रविवार पेठेतील डी.एस ज्वेलर्सचे दुर्जन सिंग विचारतात.

“ग्राहकाकडून आम्हाला आधीच ऑर्डर घ्यावी लागते, त्यामुळे काही तासांमध्ये भाव वाढले तरी आम्हाला ऑर्डर देताना ज्या भावात सोने आहे त्याच भावात त्याची विक्री करावी लागते. नुकसान झाल तरी ग्राहकाकडून आम्ही जास्त पैसे घेऊ शकत नाहीत.”

 

‘रिमोट कंट्रोल’ अमेरिकेच्या हातात

भारत सोन्याच्या बाबतीत पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे. सोन्याचे जागतिक दर अमेरिकेतील ‘कॉमेक्स’ वायदा बाजारात ठरतात. जानेवारी २०२५ पासून भारतीय रूपयाच्या तुलनेत अमेरिकेचा डॉलर अधिक मजबूत होत आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजाचे दर वाढवणार की कमी करणार, यावर भारतातातील सोन्याचे भाव ठरतात. त्यातच आता मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी केविन वॉर्श यांच्या निवडीमुळे अमेरिकेत व्याजदर कपात होणार नाही, अशी भीती जागतिक स्तरावर निर्माण झाली आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याचे जागतिक दर पडले आहेत, ज्याचा थेट परिणाम भारताच्या सोन्याच्या किमतीवर होताना दिसून येत आहे. भारतात सोन्याचे भाव मागील २ दिवसांत मोठ्या प्रमाणात घसरल्याचे दिसून येत आहे.

दुर्जन सिंग सांगतात, “याआधी सोन्याचे भाव सकाळीच घोषित केले जात असतं, आणि त्या नंतर भाववाढ ही एक ते दोन महिन्याला होत असे. ज्यामुळे ग्राहक आणि व्यापारी यांची विश्वासार्हता टिकून होती. मात्र आता ऐन दुपारी हे भाव जाहीर होतात आणि दररोज किंवा काही तासात भाव घसरतात, ज्यामुळे ग्राहकाचादेखील विश्वास कमी होत चालला आहे. दररोज असाच भाव घसरत गेला तर आम्ही साध्या व्यापाऱ्यांनी काय करायचं?”

 

 

दीक्षित सांगतात, “याचा सर्वाधिक फटका हा सामान्य व्यापाऱ्यांना बसत आहे. ‘बड्या ब्रॅंड’ वाल्या व्यापाऱ्यांकडे मुबलक साठा असतो ज्यामुळे त्यांना याचा फटका कमी बसतो. मात्र आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात साठा ठेऊ शकत नाहीत, त्यामुळे आम्हाला जागतिक स्तरावर जे चढउतार होतात त्याच्या हिशोबानेच चालाव लागतं.”

अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांनी इंडी जर्नलशी बोलताना सांगितलं की, “आपण जरी मागील काही महिन्यांचा विचार करून याला घसरण होत आहे असं म्हणत असू, मात्र मागील १ ते २ वर्षात सोन्याचे भाव आस्मानाला टेकले होते, आता हेच भाव कमी होत आहेत, त्यामुळे मी याला ‘घसरण’ न म्हणता ‘करेक्शन’ (दुरुस्ती) असं म्हणेन.”

ते पुढं म्हणाले, “मध्यवर्ती बँक सोन्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक करतात, ज्याचा परिणाम म्हणून बाजारपेठांमध्ये वाहतूक कमी होते आणि भाव वाढतात.

व्यापाऱ्यांना होणाऱ्या तोट्यासंदर्भात बोलताना चांदोरकर म्हणाले, “काही अपवाद वगळता व्यापाऱ्यांकडं मुबलक साठा असतो, त्यामुळं ग्राहकाकडून ऑर्डर मिळाल्या नंतर भाव घसरल्यावर व्यापाऱ्यांना घाटा होत नाही.”

 

ग्राहकांची सराफाकडे पाठ

याचा फटका केवळ सोनं व्यापाऱ्यांवरच पडलेला नाही, तर ग्राहकांवरदेखील याचा मोठा परिणाम झाला आहे. डी.एस ज्वेलर्सचे दुर्जन सिंग सांगतात, “सध्या लग्नसराईचे दिवस असूनही बाजारात गिऱ्हाईक नाही. ग्राहकांमध्ये ‘वेट अँड वॉच’ची भूमिका आहे. "उद्या भाव अजून पडतील का?" या विचारात खरेदी थांबली आहे.

ते पुढं म्हणाले, "ग्राहकांवर याचा ७०% परिणाम झाला आहे. पूर्वी १ ग्रॅम सोने ७-८ हजारांना मिळायचे, ते आता १७ हजारांच्या वर गेल्याने सर्वसामान्य ग्राहक बाजारातून बाद झाला आहे. मोठे ब्रँड साठा असल्यामुळे तग धरू शकतात, पण आमच्यासारख्या मध्यम व्यापाऱ्यांना आणि कामगारांना याचा मोठा फटका बसला आहे. कामगार कपातीची वेळ आता आमच्यावर आली आहे."

 

"आमच्याकडे येणारा सर्व सामान्य ग्राहक भावांच्या अस्तिरतेमुळं पूर्णपणे बंद झाला आहे, जसं की घरकाम, मोलमजुरी करणारे किंवा सामान्य कामगार."

 

दीक्षित सांगतात, “आमच्याकडे येणारा सर्व सामान्य ग्राहक भावांच्या अस्तिरतेमुळं पूर्णपणे बंद झाला आहे. आमच्याकडे घरकाम, मोलमजुरी करणाऱ्या किंवा सामान्य कामगाराची ये जा सातत्याने होत असते. हे ग्राहक सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. मात्र आता एवढ्या वेगानं बदलणाऱ्या भावांमुळे त्यांचं येणं पूर्णपणे बंद झालं आहे.”

नुकतंच सोने खरेदी करून आलेले ओम भोसले यांनी इंडी जर्नलशी बोलताना सांगितल की, “ज्या वेळी ७ ते ८ हजार प्रति ग्रॅम सोन्याचा भाव होता तेव्हा सोनं खरेदी करायला परवडत होती. मात्र सोनं महाग झालं आहे आणि सध्या सोन्याचा भाव सतत बदलत आहे, त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी भीती वाटते.”

दुर्जन सांगतात, “सतत बदलणाऱ्या या भावांमुळे अंदाज बांधणे देखील अवघड झाले आहे. कधी ३ हजार ने कमी होतो तर ५ हजार ने वाढतो यात कुठलीही व्यावहारिक सुसूत्रता नाही. आधी सोन्याचा भाव एक दोन महीने स्थिर असायचा, त्यामुळे आवक जावक करायला सोयीच जायचं.”

 

 

दीक्षित यांनी २९ आणि ३० जानेवारी रोजी बदलेल्या भावांची यादी दाखवली. २९ तारखेला सायंकाळी सोन्याचा भाव १ लाख ७६ हजार ३६० प्रति १० ग्रॅम होता, ३० तारखेला सकाळी तोच भाव १ लाख ६५ हजार ७०० झाला आणि दुपारनंतर सोन्याचा भाव खाली येत १ लाख ६५ हजार ८०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झाला.

दीक्षित सांगतात, “२९ तारखेला विक्री १ लाख ८१ हजार ६५० रुपये प्रति १० ग्रॅम होती, मात्र ३० तारखेला सोनं विकताना ते आम्हाला १ लाख ७० हजार ७७४ रुपयांना विकावं लागलं म्हणजेप्रत्येक १० ग्रॅममागे आम्हाला १० हजार ८७६ रुपयांच नुकसान झालं.”

इंदु शिरसे यांनी नुकतेच सोनं खरेदी केल आहे, त्या म्हणतात, “मागील एका आठवड्यापासून मी सोनं घेण्याचा विचार करत होते पण भाव सतत बदलत होते. मागील आठवड्यात मी दुकानात जाऊन परत आले कारण भाव अचानक वाढले होते आणि कमी होतील असं सांगितल जात होत.”

त्या पुढं म्हणाल्या, “आत्ता मी १ लाख ६० हजार रुपये प्रति १० ग्रॅमनं सोनं घेतलं आहे. मात्र काल रात्री सोन्याचे भाव १ लाख ५३ हजार रुपये प्रति १० ग्रॅम होते. अशा बदलत्या भावामुळे सोन्यात गुंतवणूक कधी करायची याचा काही अंदाज येत नाही.”

रविवार पेठेतील सोन्याच्या दुकानात काम करणारे प्रमोद टाक सांगतात, “सातत्यानं सोन्याच्या होत असलेल्या घसरणीमुळे कामगारांवरदेखील याचा परिणाम होत आहे. अनेक कामगारांना हाताला काम नसल्यामुळे काढून टाकलं जात आहे. धंदा मंद असल्यामुळे ग्राहक नाही आणि त्यामुळे कमी कामगार लागतात.”