India

टेट परीक्षेचा निकाल खोळंबला; उमेदवारांमध्ये संभ्रम

टेट २०२५ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी एमएससीइकडून कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही.

Credit : Indie Journal

 

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) २०२५ परीक्षेचा निकाल ५० दिवसांहून अधिक कालावधी लोटला तरी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (एमएससीइ) जाहीर करण्यात आलेला नसल्यामुळं, २ लाखांहून अधिक उमेदवारांमध्ये अंसतोषाच आणि संभ्रमाच वातावरण पसरलं आहे. २७ मे ते ५ जून २०२५ दरम्यान ऑनलाइन पद्धतीनं घेण्यात आलेल्या टीएआयटी किंवा टेट २०२५ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी एमएससीइकडून कोणतीही स्पष्टता मिळालेली नाही. 

“मागच्या वर्षी २१ दिवसात परिषदेनं निकाल जाहीर केला होता. मात्र यंदा ५० दिवसांहून अधिक कालावधी होऊनदेखील निकाल जाहीर का करण्यात आला नाही? हा आमच्या भविष्याचा प्रश्न आहे,” असं बीड येथील आष्टी तालुक्यातील ज्ञानेश्वर घोडके म्हणतात. 

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं उमेदवारांना सांगण्यात आलं आहे की, “बीएड आणि डीएड पदवीच्या अंतिम वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक दाखल करण्यासाठी एक महिना वेळ देण्यात आला आहे. सर्वांचा निकाल सोबत लावण्यात येणार असल्यामुळं निकाल रखडला आहे.” 

परीक्षा परिषदेनं या वर्षी बीएड आणि डीएडच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास पात्र ठरवलं होतं. तसंच त्यांना परीक्षा झाल्यानंतर गुणपत्रक दाखल करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मात्र एक महिना उलटून गेल्यानंतर अजूनही काही विद्यापीठांचे निकाल लागले नसल्यानं सर्व अंतिम वर्षातील उमेदवारांच गुणपत्रक सादर झालेलं नाही. 

मात्र २ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, “अंतिम वर्षात शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल वेगळा लावला जाईल.”

धैर्यशील खुडे

 

सातारा जिल्ह्यातील धैर्यशील खुडे यांनी इंडी जर्नलशी बोलताना सांगितलं की, “ बीएड आणि डीएडच्या अंतिम वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना या वर्षी पासूनच परीक्षा देण्याची संधी देण्यात आली आहे. २ मे रोजी सरकारनं काढलेल्या जीआर मध्ये स्पष्ट नमूद केलं गेलं आहे की, शेवटच्या वर्षाला असणाऱ्या या विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवून, ज्यांची पात्रता पूर्ण आहे अशा विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाईल. मात्र परीक्षा परिषद कार्यालयात विचारायला गेल्यावर असं सांगण्यात आलं आहे की, पात्र आणि अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निकाल सोबतच लावण्यात येणार आहे.” 

“वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांचा निकाल वेगवेगळ्या वेळेत लागतो, यामुळे आम्ही निकालाच्या प्रतीक्षेत कधी पर्यंत थांबायचं? जीआर नुसार आमचा निकाल स्वतंत्र लावण्यात येणार होता. ऐनवेळी बदल करून पात्र आणि अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निकाल सोबत का लावण्यात येत आहे ?” खुडे म्हणाले.   

एमएससीइकडून अद्याप कोणतही अधिकृत निवेदन प्रसिद्ध झालेलं नाही. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, निकाल जुलै २०२५ च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे, परंतु याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. उमेदवारांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु परीक्षा परिषदेकडून त्यांना स्पष्ट उत्तरं मिळाली नाहीत.

जळगाव जिल्ह्यातील यावळ तालुक्यात खाजगी शाळेत शिकविणारे अभियोग्यता धारक नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, “२०२२ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल अवघ्या २१ दिवसात लावण्यात आला होता, परंतु यावेळी एवढा वेळ का लागत आहे याचे अद्याप उत्तर परीक्षा परिषदेनं दिलेलं नाही. यातच युट्युब वरील काही चॅनेलवर ‘पैसे घेऊन मार्क वाढवले गेल्याच्या अफवा’ पसरवत आहेत, त्यामुळे मनात भीती आणि संभ्रम निर्माण होत आहे. उमेदवारांसाठी यासंबधी खरी महिती देण्यात यावी यासाठी परीक्षा परिषदेला ईमेल द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.”

“आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला चार महिन्यांनी निकाल लावायचा असलं तर तसं स्पष्ट काळवा, आम्ही थांबू, परंतु काहीच प्रतिक्रिया न देणं आमच्यासाठी अनेक संभ्रम निर्माण करणारं आहे. यामुळं आमच्यापुढं दुसऱ्या परीक्षांचा अभ्यास करावा की नाही हा प्रश्न उभा आहे.”

ज्ञानेश्वर घोडके म्हणतात, “परीक्षांच्या तयारीसाठी पुण्यासारख्या शहरात राहताना बराच खर्च होतो. त्यामुळे वेळेत परीक्षा होणं आणि त्यांचा निकाल लागणं, हे आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं. अशा वेळी ५० दिवसांहून अधिक दिवस होऊन देखील कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया परीक्षा परिषदेकडून आलेली नाही. परीक्षा दिल्यानंतर सकारात्मक निकालाची वाट पाहताना दुसऱ्या परीक्षांचा अभ्यास करावा की निकालाची वाट पाहावी असे द्वंद्व आमच्यापुढं आहे.”

सहा दिवस चालणाऱ्या या परीक्षेत उमेदवारांना वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये पेपर द्यावा लागतो, ज्यामुळे सर्व शिफ्ट मधील प्रश्नपत्रिकांची काठिण्य पातळी सारखी नसते. अशा वेळी नॉर्मलायझेशन पद्धत अवलंबली जाते. यामध्ये सूत्र वापरून काठिण्य पातळी अधिक असणाऱ्या शिफ्ट मधील उमेदवारांना गुण वाढवून मिळतात. याचा सर्व अधिकार आयबीपीएस कडे असतो.  

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अधीक्षक हेमंत वाटाडे यांनी इंडी जर्नल ला सांगितलं की, “बीएडच्या अंतिम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचा निकाल लागला आहे, तसंच डीएडच्या विद्यार्थ्यांचा निकाल एका आठवड्यात लागेल. मात्र डीएड च्या निकालामुळे टेट परीक्षेचा निकाल प्रलंबित नाही. आयबीपीएस कडून अजून आमच्यापर्यंत परिपक्व यादी आलेली नाही ती यादी आली की आम्ही लगेच निकाल लावणार आहोत.”

 

"डीएड च्या निकालामुळे टेट परीक्षेचा निकाल प्रलंबित नाही. आयबीपीएस कडून अजून आमच्यापर्यंत परिपक्व यादी आलेली नाही ती यादी आली की आम्ही लगेच निकाल लावणार आहोत.”

 

वाटाडे पुढे म्हणतात, “विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं कोणी करत असल्याचं आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आम्ही करू.”

“नॉर्मलायझेशन पद्धत लागू आहे की नाही याबद्दल देखील कोणत्याही प्रकारचा खुलासा केला नाही, ज्यामुळे निकालाचं स्वरूप काय असेल याबद्दल काहीच उत्तर मिळत नाही. परीक्षा परिषदेतील लिपिकांना कॉल करून विचारणा केली असता, लवकरच निकाल लागेल यापलीकडे काहीच उत्तर मिळालं नाही.” घोडके पुढं म्हणतात.  

उमेदवारांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून तात्काळ निर्णय घेण्याची मागणी केली आहे. "शिक्षणमंत्री म्हणून, लाखो उमेदवारांचे हित जोपासण्याची जबाबदारी आपली आहे. एमएससीइला त्वरित निकाल जाहीर करण्याचे, प्रक्रियेत पारदर्शकता सुनिश्चित करण्याचे आणि अफवांबाबत स्पष्टता आणण्याचे आदेश द्यावेत," असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

यामध्ये नॉर्मलायझेशन पद्धत लागू असून, परीक्षेचा निकाल येत्या दोन आठवड्यात जाहीर करणार असल्याचं यावेळी वाटाडे म्हणाले. 

खुडे म्हणतात, “परीक्षा परिषदेनं निकालाची निश्चित तारीख असलेलं प्रसिद्धी पत्रक काढावं, सोशल मीडियावर पसरत असणाऱ्या निकालाबाबतच्या अफवांबद्दल स्पष्टीकरण द्यावं आणि अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवून इतर पात्र विद्यार्थ्यांचा निकाल तात्काळ जाहीर करावा."