India

वडिलांनी केला वर्षानुवर्षं कौटुंबिक हिंसाचार: शेहला रशीद

वडिलांच्या खळबळजनक आरोपांवर रशीद यांचं प्रत्युत्तर.

Credit : NewsBytes

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची माजी विद्यार्थिनी आणि कार्यकर्ती शेहला रशीदवर तिच्या वडिलांनी खळबळजनक आरोप केले आहेत. तिचे वडील अब्दुल रशीद यांनी, देशविरोधी कारवाया करणाऱ्या लोकांशी तिचा संबंध आहे, आणि ते मी उघड करत असल्यानं, आता तिच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, असा आरोप केला आहे. मात्र शेहलानं हे आरोप फेटाळून लावत, वडिलांनीच तिच्यासह तिच्या कुटूंबासोबत हिंसाचारी वर्तन केल्याचं म्हटलं आहे. आणि त्याविरोधात न्यायालयीन खटला दाखल केल्यावर, न्यायालयानं अब्दुल रशीद यांना, आमच्या घरात पाऊलही ठेवायचं नाही, असा आदेश दिल्याचं सांगत शेहलानं त्या आदेशाची प्रतही समाजमाध्यमांवर शेअर केली आहे.

अलीकडेच शेहलाचे वडील अब्दुल रशीद यांनी काश्मीरमधील माध्यमांना मुलाखत देऊन शेहलावर बरेच आरोप केले. काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनाही त्यांनी पत्र लिहिलं. "जहूर बटाली, रशीद इंजीनीयर यांसारख्या वादग्रस्त लोकांशी शेहलाचे संबंध आहेत, २०१७ मध्ये ती काश्मीरच्या राजकारणात सक्रीय झाली, आधी ती नॅशनल कॉन्फरन्स पक्षात गेली, त्यानंतर जम्मू काश्मीर पीपल्स मूवमेंट, अवामे इत्तेहाद पक्षांशी तिचा संबंध आला, या काळातल्या तिच्या कारवाया योग्य नाहीत, तिचा संबंध आलेल्या लोकांच्या कारवाया देशविरोधी आहेत, त्यामुळे तिनं त्यात सहभाग घेऊ नये, त्यांच्याशी संबंध ठेऊ नये, असं मी तिला समजावलं, पण तिनं ऐकलं नाही, त्यानंतर ती शाह फैजल यांच्यासोबत गेली, फैजल यांनी अमेरिकेतच पार्टी स्थापन केली, त्याबद्दलची सगळी चर्चा तिकडे अमेरिकेत झाली, शेहलाही दोनदा अमेरिकेत गेली होती. ती ज्या पॉलिटिकल फ्रंटसोबत काम करते, त्यांचं काम तरुणांची माथी फिरवणं, हे आहे," असं अब्दुल रशीद यांनी न्यूज नेशन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हंटलं आहे.

यावर शेहला रशीदनं काल तिच्या ट्विटर हॅंडलवर काही कागदपत्रांचे फोटो पोस्ट करत आपल्या वडिलांच्या कौटूंबिक अत्याचाराची माहिती दिली आहे. या कौटूंबिक अत्याचाराविरोधात आपल्या कुटूंबानं खटला दाखल केला असून, १७ नोव्हेंबरला न्यायालयानं, वडिलांनी आमच्या घरात पाऊल ठेऊ नये, असा आदेश दिला, त्यामुळेच वडील आता माझ्यावर काहीबाही आरोप करत आहेत, असं शेहलानं म्हटलं आहे.

 

 

"माझ्या जन्मदात्या वडिलांनी मी, माझी बहीण आणि आईवर खूप अत्याचार केले आहेत. मला कळायला लागलं तेव्हापासून मी घरात वडिलांचा हिंसक व्यवहार पाहते आहे. आईला, मला नि बहिणीला बेदम मारणं, घाणेरड्या शिव्या देणं हे लहानपणापासून सातत्यानं सुरु आहे. आम्ही दोघी बहिणी लहान असताना आमच्या आईचं रक्षण करू शकलो नाही, पण मोठं झाल्यावर जेव्हा आम्ही मध्ये पडून वडिलांचा हा व्यवहार रोखायचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला अपयश आलं. त्यामुळे आम्ही वडिलांवर कौटूंबिक हिंसाचाराचा खटला दाखल केला, मी स्वत:ही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वडिलांना या सगळ्या न्यायालयीन कारवाया टाळायच्या आहेत, ते कोर्टात सुनावणीलाही येत नाहीत, त्यामुळे न्यायालयीन कारवाया टाळण्यासाठी ते असे आरोप-प्रत्यारोप करत आहेत," असं शेहलानं वृत्तमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हंटलं आहे. ती पुढे म्हणते, "वडिलांसोबत माझं भावनिक नातं कधीही नव्हतं. मी काय शिकते, काय करते याबाबत त्यांना काहीही माहिती नाही. आम्हाला आमच्या आईनंच वाढवलं. एकल पालक म्हणून आम्हा दोघी बहिणींना वाढवताना आमच्या आईसमोर किती आव्हानं होती, हे आम्हालाच माहीत आहे. हा आमच्या घरातला वैयक्तिक मामला असल्यानं आम्ही कधीही सार्वजनिकपणे याची वाच्यता केली नाही, पण आता वडिलांनी आम्हाला हे करायला भाग पाडलं आहे."

यावर माजी सनदी अधिकारी शाह फैजल यांनीही ट्विटरवर प्रतिक्रिया देताना, "माझ्या माजी सहकाऱ्यावर बिनबुडाचे आरोप होत आहेत, त्यामुळे मी हे स्पष्ट करू इच्छितो की माझा कोणत्याही देशविरोधी कारवाया वा ते घडवून आणणाऱ्या लोकांशी कधीच संबंध आलेला नाही, तरीही कोणत्याही तपासयंत्रणेला काही तपास करायचा असेल, तर मी पूर्ण सहकार्य करायला तयार आहे’," असं म्हंटलं आहे.

तर शेहला रशीदसारख्या काश्मिरी मुस्लीम स्त्रीसाठी इतक्या कौटूंबिक अडचणींचा सामना करून राजकारणात सक्रीय असणं, किती आव्हानात्मक आहे, असं म्हणत अभिनेत्री स्वरा भास्करपासून अनेक राजकीय कार्यकर्ते, पत्रकारांनी ट्विटरवर तिला पाठिंबा दिला आहे.