India

'मर्डर इन माहीम': एलजीबीटीक्यू समुदायाचे वास्तववादी थरारनाट्य

'मर्डर इन माहीम' वेब-मालिकेच्या निमित्ताने

Credit : Indie Journal

 

काही वर्षापूर्वी 'I am' नावाचा एक चित्रपट येऊन गेला. ज्यात चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या चार कथा होत्या. ओनीर या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाची एक कथाही यात होती, ज्यात एका समलिंगी पुरुषाला स्वतःच्या जाळ्यात ओढून पोलिसांच्या मदतीने एक तरुण ब्लॅकमेल करतो. समलैंगिकांच्या विश्वाच्या काळ्या बाजू‌ची ही एक ओझरती झलक होती. अलीकडेच जिओ सिनेमावर आलेली 'मर्डर इन माहीम' ही मालिका याच प्रश्नांचा सखोल वेध घेते. जेरी पिंटो यांच्या याच नावाच्या कादंबरीवर ही मालिका बेतलेली आहे.

एलजीबीटीक्यू समुदायाच्या प्रश्नांवर, समस्यांवर भाष्य केलं जातं, तेव्हा बऱ्याचदा एक टोकाची भूमिका दिसते. समुदायाचे प्रश्न कधी फार मोठे करून दाखवले जातात, कधी त्यात अनावश्यक मेलोड्रामा ओतला जातो. त्यातही समुदायातल्या जोडप्यांचे प्रश्न, प्रेमप्रकरणांना समाजाकडून होणारा विरोध हे सगळं अधिक येतं. यापलीकडे जाऊन विचार करणारी 'अलीगढ'सारखी कलाकृती फार क्वचित येते. बुलिंग, अत्याचार या अनुषंगाने येणाऱ्या कथानकांमध्ये बर्‍याचदा शाळा, कॉलेज, कामाचं ठिकाण अशा पार्श्वभू‌मीवर घडणारी कथानकं दिसतात. मात्र क्रूझिंगच्या जागा, पार्ट्या अशा ठिकाणी जे घडतं, त्याचं वास्तववादी चित्रण क्वचितच पाहायला मिळतं. या दृष्टीने 'मर्डर इन माहीम' महत्त्वाची ठरते.

 

एलजीबीटीक्यू समुदायाच्या प्रश्नांवर, समस्यांवर भाष्य केलं जातं, तेव्हा बऱ्याचदा एक टोकाची भूमिका दिसते.

 

मालिकेची सुरुवातच माहीम स्थानकाच्या एका प्लॅटफॉर्मच्या टोकाला असलेल्या पुरुषांच्या मुतारीत होणाऱ्या एका भयानक खुनाने होते. ज्याचा खून झालाय, तो प्रॉक्सी. खुन्याने त्याची किडनी काढून नेलीय आणि या खुनाचा तपास शिवा झेंडे सुरू करतो. त्यात त्याला फिरदौस रब्बानी ही त्याची कनिष्ठ सहकारी मदत करते आहे. यालाच समांतर पीटर फर्नांडिस या पत्रकाराची कथा सुरू होते.

पीटरचा मुलगा सुनिल टीव्हीवर या खुनाविरुध्द एलजीबीटीक्यू समुदायाच्या व्यक्तींनी काढलेल्या निषेध मोर्चामध्ये पीटरला दिसतो. सुनिलचा नंबर पोलिसांना तपास करताना मिळतो. त्यामुळे शिवाचा सुनिलवरही संशय आहे. पीटर आणि शिवामध्ये जुनं वैर आहे. पीटरमुळे शिवाच्या वडिलांची नोकरी गेली आहे. त्याचा वचपा काढण्याची संधी म्हणून शिवा सुनिलला या खुनात अडकवू पाहतो आहे. नंतर खुनांची मालिकाच सुरू होते आणि या हत्याकांडात पोलिस आणि इतरांचीही नावं पुढे येतात. हळूहळू खुनाचं रहस्य उलगडत जातं आणि ही मालिका एका विचित्र, काहीशा सकारात्मक, काहीशा नकारात्मक वळणावर संपते.

समुदायातल्या पुरुषांना क्रूझिंगच्या जागांबद्दल नव्याने काही सांगण्याची तशी गरज नाही. लैंगिक सुख मिळवण्यासाठी, निव्वळ नवीन कुणीतरी भेटावं, ओळखी व्हाव्यात, म्हणून समुदायातले पुरुष अशा ठिकाणी भेटत असतात. सार्वजनिक मुताऱ्या, बागा, पडक्या इमारती अशा अनेक जागी. अशा ठिकाणी समुदायातलेच लोक पोलिसांच्या संगनमताने इथे लैंगिक सुखासाठी येणाऱ्या पुरुषांना ब्लॅकमेल करण्याचे प्रकार सर्रास चालतात. त्याविषयी कुणी बोलत नाही, इतकंच. या मालिकेतून दिग्दर्शक राज आचार्य यांनी हा विषय मुख्य धारेत आणण्याचा प्रयत्न केला आहे, जो वाखाणण्याजोगा आहे. लेखक मुस्तफा नीमुचवाला आणि उदय सिंग पवार यांनी गोळीबंद मालिका लिखाणाचा उत्तम नमुना या निमिताने पेश केला आहे.

मालिकेची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे ती केवळ एलजीबीटीक्यू समुदायापुरती मर्यादित राहत नाही. शिवाचं कुटुंब, पीटरचं कुटुंब, दुर्राचं कुटुंब, फिरदौस आणि रिहानाचं कुटुंब, प्रॉक्सीचं कुटुंब स्क्रीनवर दाखवताना कुटुंबसंस्थेचाच आडवातिडवा लसावि लेखक-दिग्दर्शकाने काढला आहे. शिस्तप्रिय असलेल्या शिवाच्या कुटुंबातले लोक त्याला घाबरून जगत आहेत. याउलट भ्रष्ट दुर्रा मुलाशी फार प्रेमळपणे वागताना दिसतो. फिरदौस आणि रिहानाचे आईवडील आकांडतांडव करताना. मात्र, पीटर आणि मिली सुनीलला मनापासून समजून घेताना दिसतात. पीटर-सुनिल, शिवाचे वडील आणि शिवा, शिवा आणि त्याचा मुलगा, दुर्रा आणि त्याचा मुलगा, यांच्यातलं बापलेकाचं नातं दाखवतानाचे प्रसंग फार सुंदर जमून आले आहेत. दुखावलेली माणसं प्रेमाने जवळ येताना या मालिकेत दिसतात.

 

लेस्लीचं एकटेपण अधोरेखित होत असतानाच विरलसारखे त्यांचा फायदा घेणारेही दिसतात.

 

लेस्लीचं एकटेपण अधोरेखित होत असतानाच विरलसारखे त्यांचा फायदा घेणारेही दिसतात. प्रॉक्सी या आपल्या मित्राच्या खुनाचा बदला युनिट ज्या क्रूर पद्धतीने घेतो, ते पाहण्यासारखं आहे.

फिरदौसचं आयुष्य दाखवताना लेस्बियन मुलींवर असणारा दबाव या मालिकेत दिसतो. आत्महत्यांचे संदर्भ येतात, तेव्हा कम्युनिटीतल्या लोकांना कसं सतत आपली बदनामी होणार नाही, या भीतीखाली जगावं लागतं, याचं हृदयद्रावक चित्रण या मालिकेत येतं. चंद्रकांत पगमत या वृद्ध शिक्षकाच्या चारित्र्यावर विनाकारण होणारी चिखलफेक सनसनाटी पत्रकारितेवर भाष्य करणारी आहे. त्यासोबत कामाच्या निमित्ताने मुंबईत येणाऱ्या स्ट्रगलिंग माॅडेल्स आणि अभिनेत्यांच्या आयुष्याचीही बाजू या मालिकेत एका लहानशा प्रसंगात दिसते.

 

 

सर्व कलाकारांचा अभिनय दाद देण्याजोगा आहे. विजयराज आणि आशुतोष राणा यांची पडद्यावरची जुगलबंदी तर पाहण्यासारखी आहेच, पण शिवाजी साटम यांचा त्यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी वेगळा उल्लेख करावा लागेल. भारत गणेशपुरे यांचा दुर्रा लक्षात राहतो. स्मिता तांबे यांची लहानशी भूमिकाही उत्तम आहे. शिवानी रघुवंशी, राजेश खट्टर, आशुतोष गायकवाड, रोहन वर्मा यांनीही आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत.

मालिकेतला घटनाक्रम पाहता भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७ हटवण्यापूर्वीचा हा काळ आहे, हे सहज लक्षात येईल. मात्र, या मालिकेच्या निमित्ताने त्यानंतरही चित्र फार बदललंय का, हे तपासून पाहणं महत्त्वाचं ठरेल. खरा बदल घडायला हवा असेल, तर कम्युनिटीतल्या व्यक्तींचं केवळ गुडीगुडी चित्रण न करता वास्तवाचा आरसा दाखवणारे असे वेगळ्या धाटणीचे प्रयत्न नव्या जुन्या सर्वच लेखक-दिग्दर्शकांनी करायला हवेत आणि प्रेक्षकांनीही त्यांचं खुल्या दिलाने स्वागत करायला हवं.