India

माजी न्यायाधीशांकडूनच न्यायालयाचा अवमान - साकेत गोखले

माजी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी.

Credit : Shubham Gokhale

माजी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विविध संघटना आणि विधी क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केली आहे. विधिज्ञ साकेत गोखले यांनी या संदर्भात भारताच्या महान्यायप्रतिनिधीकडे (ऍटर्नी जनरल) के के वेणुगोपाल यांना पत्र लिहून यासंबंधी विचारणा केली आहे.

सध्या राज्यसभेचे खासदार आणि माजी सरन्यायाधीश असणाऱ्या रंजन गोगोई यांनी १२ जानेवारी रोजी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. इंडिया टुडे आयोजित करत असलेल्या कॉन्कलेव्ह कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारताच्या न्यायव्यवस्थेसंबंधी काही विधानं केली होती. या विधानांनी भारताच्या न्यायालयाचा अवमान होत असल्याचा आरोप करून आता त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

"आता एक संसदपटू म्हणून काम करणाऱ्या विधिज्ञ व न्यायाधीशाकडून भारताच्या न्यायालयाचा 'घोर' अवमान झाला असून त्यांनी हे बोलणं अधिक धक्कादायक आहे," असं साकेत गोखले यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी रंजन गोगोई यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची यादी सोबत जोडली आहे.

 

 

''मला विचाराल, तर कोणत्याही गोष्टीसाठी न्यायालयात अजिबात जाणार नाही. न्यायालयात जाणं म्हणजे पश्चात्ताप करून घेण्यासारखं आहे. तिथे तुम्हाला न्याय मिळत नाही'', असं ते म्हणाले होते. आपल्या देशाला पाच लाख कोटींची अर्थव्यवस्था हवी आहे. मात्र, देशाच्या न्यायव्यवस्थेची अवस्था विदीर्ण झाली असल्याचं नोंदवत त्यांनी "आपलं न्यायव्यवस्थेविषयीचं मत सकारात्मक नसल्याचं" म्हटलं आहे. 'करोडो रुपये मोजू शकणाऱ्या मोठमोठ्या कंपन्याच सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात. न्यायव्यवस्था रसातळाला जायला कित्येक कारणं आहेत' असं त्यांनी सांगितलं. भारतातील अनेक न्यायाधीश टीका सहन करू शकत नाहीत, असं गोगोई म्हणालेत.

गेल्या काही दिवसांत न्यायालयाचा अवमान होत असल्याचा आरोप करून कुणाल कामरा आणि रचिता तनेजा यांच्यावर न्यायालयानं कारवाई केली होती. त्यांच्यापेक्षा फार आक्षेपार्ह भाषा गोगोई यांनी वापरली आहे. बाकी दोन निरपराध लोकांवर कारवाई करण्यापेक्षा न्यायालयानं आपल्या माजी सरन्यायाधीशाची दखल घ्यावी, असं गोखले यांनी पत्रात म्हटलं आहे.