Europe
फ्रान्सच्या अणुचाचण्यांतून लाखो आदिवासी नागरिकांना कर्करोग
फ्रान्सच्या मुख्यभूमीपासून दूर आदिवासी समूहांच्या वसाहतीत हे धोकादायक प्रयोग करण्यात आले होते.
फ्रेंचांनी १९६६ ते १९७४ काळात केलेल्या अणुचाचण्यांमुळं पॉलिनेशिया अर्थात न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया जवळील बेटसमूहांवरील स्थानिक रहिवाश्यांवर विघातक परिणाम झाल्याची धक्कादायक बाब नव्या संशोधनातून समोर आली आहे. पॅरिसमधील राष्ट्रीय आरोग्य आणि वैद्यकीय संस्था 'इन्सर्म' यांनी संरक्षण विभागाच्या विनंतीवरून प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही बाब समोर आली आहे. याद्वारे जवळपास एक लाख दहा हजार लोकांवर म्हणजे तत्कालीन सर्वच रहिवाश्यांवर या चाचण्यांचे विपरीत परिणाम झाले असल्याचं निदर्शनास आलं असून त्यांच्यात रक्त, गलगंड, पेशी तसेच पोट-स्तन-फुफ्फुसं यांचा कर्करोग झाला असल्याचं समोर आलं आहे. फ्रान्सच्या मुख्यभूमीपासून दूर आदिवासी समूहांच्या वसाहतीत हे धोकादायक प्रयोग करण्यात आले होते.
स्ट्रोन्टीयम या रासायनिक मूलद्रव्याचा हाडांवर, सेसियम द्रव्याचा स्नायूंवर व आयोडीनचा थायरॉइडवर विपरीत परिणाम होऊन क्षयसंसर्ग वाढला असल्याचं संशोधकांनी नमूद केलं आहे.
काळ्या मोत्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या गँबियर बेटांपासून फ्रान्सनं या क्षेत्रात अणुचाचण्या घेण्यासाठी सुरुवात केली. ४१ अण्वस्त्रांच्या चाचणीनंतर या बेटांवर राहणाऱ्या ४५० नागरिकांवर किरणोत्सर्गाचा परिणाम झाला. यात ६१ अल्पवयीन मुलांचा समावेश होता. ४२४ किमी क्षेत्रात या उत्सर्गाचा परिणाम झाला असल्याचं संशोधकांनी नोंदवलं आहे. या चाचण्या घेण्यापूर्वी सुरक्षेची पुरेशी पूर्वतयारी केली नसल्याचंही समोर आलं आहे. फ्रेंच सैन्य आणि अणुऊर्जा आयोगानं केवळ वाऱ्याची दिशा तीच असेल यावर विसंबून हे स्फोट घडवून आणले होते. मात्र वाऱ्याची दिशा बदलली असल्याचा अंदाज आल्यावरही हे स्फोट थांबवण्यात आले नाहीत. आदिवासींना या घटनेची कल्पनाही देण्यात आली नव्हती. फ्रेंच नागरिकांनी आक्षेप घेऊ नयेत व आदिवासींनी गांगारून जाऊ नये म्हणून हे लपवलं असल्याचं कारण फौजेच्या कागदपत्रांत मांडलं आहे.
शासकीय कागदपत्रांतून १९७० साली झालेल्या किरर्णोत्सर्गाची क्षेत्रफळातील माहिती दर्शवली आहे.
दुसऱ्या स्फोटानंतर हा किरणोत्सर्ग ६१ दशलक्ष बॅकरेल्स प्रति वर्ग मीटर एवढा प्रचंड वाढला होता. जगातील भयानक अणुअपघातांतच एवढा किरणोत्सर्ग यापूर्वी आढळून आला आहे. याच प्रदेशातील मॅगारेव्ह बेटांवर पसरलेल्या क्षयरोगात १९६० सालापासून सातत्यानं वाढ होत आहे.
एवढं होऊनही फ्रान्सनं १९७१ साली पुन्हा याच ठिकाणी आण्विक पाणबुड्यांच्या चाचण्या घेतल्या होत्या. याच्या काहीच दिवसानंतर सैन्यानं तयार केलेल्या अभ्यासात स्थानिक लोकांच्या पिकात तसंच पिण्याच्या पाण्यात हे पदार्थ आढळून आल्याचं स्पष्ट झालं होतं. तरीही ते टाळण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. 'सात वर्षांखालील मुलांना याचा सर्वाधिक धोका असल्याचं' दर्शवूनही फ्रान्स सरकारनं कोणतीही पावलं उचलली नव्हती.
मॅगारेव्ह बेटांवरच्या टाकू गावी राहणारे स्थानिक आदिवासी वेस सॅलमन २० वर्षांचे असताना त्यांना पेशी आणि उतींचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. त्यांची पत्नी देखील या रोगाला बळी पडली. फ्रान्स सरकारनं या घटनेला आपण जबाबदार असल्याचं मान्य केलं आहे. सॅलमन यांचे दोन मेव्हणे या रोगाचे बळी ठरले आहेत.
फ्रान्स सरकारनं आजवर १०,००० नागरिकांना याचा त्रास झाला असल्याचं मान्य केलं आहे. मात्र उरलेल्या १,१०,००० नागरिकांविषयी कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. या नागरिकांना अद्यापही न्याय मिळेल याची आस लागून राहिली आहे.