India

पंजाब: १५० एकर पिकं कापून शपथविधी

शपथविधीच्या व्यवस्थापनाच्या एकूण खर्चासाठी २ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत.

Credit : Shubham Patil

उद्या (बुधवारी) पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे आम आदमी पक्षाचे भगवंत मान यांच्या शपथविधी कार्यक्रमासाठी खातकर कलान येथील सुमारे १५० एकर जमिनीवरील गव्हाच्या पिकाची कापणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्यवस्थापनाच्या एकूण खर्चासाठी २ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये पार्किंगची व्यवस्था, पाण्याची सोय, बांधण्यात येणारं स्टेज तसंच जागेचं निर्जंतुकीकरण यांचा समावेश आहे. पंजाब राज्यावर असणाऱ्या कर्जाकडे बघता अशाप्रकारे शपथविधी कार्यक्रमावर इतका खर्च करणं हे येऊ घातलेल्या मान यांच्या सरकारसाठी तोट्याचं ठरण्याची शक्यता आहे. 

खातकर कलान येथील शहीद-ए-आझम भगतसिंग हुतात्मा स्मारक आणि संग्रहालयाच्या सीमा भिंतीचा काही भागदेखील तोडण्यात आलेला असुन ज्या वीस शेतकऱ्यांच्या जमिनीवरील पिकांची कापणी केली जाणार आहे त्यांना नुकसान भरपाईपोटी एकरी ४५,००० रुपये दिले जाणार आहेत.स्थानिक रहिवाशांनी अशाप्रकारे पिकांची कापणी केल्याबद्दल अडचण नसल्याचं सांगितलंय. सुरुवातीला कार्यक्रमात सहभागी लोकांची संख्या एक लाख लोकांची होती मात्र कालपर्यंत सहभागी लोकांच्या संख्येत वाढ होऊन सुमारे २ लाख लोक कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काल संध्याकाळी बोलत असताना भगवंत मान यांनी लोकांना शपथविधी कार्यक्रमासाठी खुलं आमंत्रण दिल्यामुळ मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी तसंच चार हेलीपड बनवण्यासाठी पिकांची कापणी करण्यात आली आहे.

 

पंजाब हे भारतातील सर्वात जास्त कर्जबाजारी असणाऱ्या राज्यांपैकी एक आहे.

 

पंजाब हे भारतातील सर्वात जास्त कर्जबाजारी असणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या राज्य आर्थिक अहवाल २०२१-२२ नुसार पंजाबमध्ये कर्ज आणि राज्याचं सकल देशांतर्गत उत्पादन यांचं गुणोत्तर (Debt-Gross State Domestic Product Ratio) इतकं ४२.५ टक्के आहे जे जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश आणि नागालँड नंतर सर्वाधिक आहे. आम आदमी पक्षानं ३ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन अकाली दल, भाजप आणि या निवडणुकीपूर्वी सत्ता असणाऱ्या काँग्रेस सरकारवर पंजाबला कर्जात बुडवल्याचा आरोप केला होता. त्यावेळी बोलत असताना आपचे पंजाबमधील नेते राघव चढ्ढा म्हणाले होते, "काँग्रेस आणि बादल सरकारनं गेल्या ५० वर्षांत पंजाबला ३ लाख कोटी रुपयांचे कर्जदार बनवलं आहे. ३ कोटी लोकसंख्येसह आज पंजाबमधील प्रत्येक व्यक्तीवर १ लाख रुपयांचं कर्ज आहे. पंजाबमध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलावर त्यांच्या जन्मानंतर लगेचच १ लाख रुपयांचे कर्ज आहे." 

आत्ता झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांपैकी लक्षवेधी ठरलेल्या पंजाब निवडणुकीत आम आदमी पक्षाला भरघोस यश मिळालं. भगवंत मान हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते आणि त्यामुळे आम आदमी पक्षाकडून या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी चालू असून अधिकारी तसंच व्यवस्थापनेमधील लोकांची खातकर कलानमध्ये मोठ्या प्रमाणावर ये जा चालू आहे.शहीद भगतसिंग यांचे जन्‍मगाव असणार्‍या खातकर कलान या गावामध्ये मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची घोषणा मान यांनी निवडून आल्यानंतर दिलेल्या भाषणात केली होती. तसंच यानंतर पुढच्या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये भगतसिंग आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा लावल्या जातील असंही त्यांनी सांगितलं होतं.