Quick Reads

गोदाकाठ: गोदावरीचा प्रवाहीपणा घेऊन वाहणारा सिनेमा

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'ज्युरी सिलेक्शन' पुरस्कार 'गोदाकाठ' ला मिळाला.

Credit : इंडी जर्नल

जुजबी स्पॉईलर असण्याची शक्यता.

पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या तिसऱ्या दिवशी गजेंद्र अहिरे दिग्दर्शित गोदाकाठ या चित्रपटाचं स्क्रीनिंग पार पडलं. यंदाच्या मराठी चित्रपटांच्या पिफमधील चित्रपटांपैकी हा एक चित्रपट. प्रिती (मृण्मयी गोडबोले) या शहरातल्या, आयटी सेक्टरमध्ये उच्च पदी काम करणाऱ्या आणि स्पर्धेच्या जगात धावता धावता, अनेक ठेचांचा मार खाऊन आयुष्य संपवून टाकण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचलेल्या तिशीतल्या एका तरुणीची ही गोष्ट. मृण्मयीचं हे पात्र आजच्या अनेक तरुण तरुणींना आपलंसं वाटावं असं पात्र आहे. शहरातून निसर्ग, नदी यांच्या सानिध्यात आलेल्या, आणि उत्साह हरवून बसलेल्या तिची भेट होते सदानंद (किशोर कदम) याच्यासोबत. आणि खऱ्या अर्थानं चित्रपटाला सुरुवात होते.

सदानंद हा गावाच्या बाहेर एका मातीच्या घरात एकटा राहणारा, जगण्यातले अनेक चढउतार बघत पन्नाशीत पोहोचलेला, कमीत कमी आणि केवळ आवश्यक गरजांसोबत जगणारा गावातला एक प्राण्यांचा डॉक्टर. या दोन कलाकारांनी त्यांच्या अभिनयातून चित्रपटाचा बहुतांशी भाग आपल्या खांद्यावर पेललाय. चित्रपटाचे संवाद आणि दिग्दर्शन गजेंद्र अहिरे यांचं असून कृष्णा सोरेन यांनी छायाचित्रण तसंच चित्रपटाची निर्मिती केलीये. गजेंद्र अहिरे हे नेहमीच चोखंदळ आणि मेनस्ट्रीम चित्रपटांपेक्षा वेगळे चित्रपट बनवण्यासाठी नावाजले जातात. त्याच पठडीतली त्यांची ही अजून एक कलाकृती.

 

एक तास बेचाळीस मिनिटांचा कालावधी असणाऱ्या गोदाकाठमध्ये आपल्याला दिग्दर्शक अनेकदा फ्लॅशबकमध्ये घेऊन जात राहतो.

 

एक तास बेचाळीस मिनिटांचा कालावधी असणाऱ्या गोदाकाठमध्ये आपल्याला दिग्दर्शक गोष्टीसोबत घेऊन जात असताना अनेकदा फ्लॅशबकमध्ये घेऊन जात राहतो. जिथं प्रीतीच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी आपल्याला हळूहळू समजत राहतात. हे पात्र साकारत असताना मृण्मयीनं घेतलेलं कष्ट नक्कीच दिसून येतात. अवघ्या तिशीमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीत उच्च व्‍यवस्‍थापक पदावर काम मिळालेली प्रिती ही सत्तेसाठी भुकेलेली असून त्यामधून तिच्यात प्रचंड गर्व निर्माण झालेला आहे. नाती, प्रेम या कशाबद्दलच आपुलकी न ठेवता स्पर्धा करता करता तिच्यातली माणुसकी नाहीशी झालीये. व्यसन, मादक पदार्थ यांच्या प्रचंड आहारी गेलेल्या तिच्या आयुष्यात अनेक घटना घडत जातात ज्या तिला मानसिकरीत्या खचवत जातात आणि याच्यातच भर पडते अक्सीडेंटल प्रेगनन्सीची.

हे सर्व पार करता करता स्वतःच आयुष्य संपवण्याचा निर्णय घेऊन मिळेल ती गोदावरी नदीकाठच्या एका गावात पोहोचते. सदानंद हा गावातला कोणाच्या अध्यात मध्यात नसणारा आणि जगत असताना सोप्पा पण अनेकांना अवलंबवायला अवघड जाणारा असा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन असणारा माणूस. प्रचंड मोठं इमोशनल बॅगेज घेऊन आलेल्या प्रीतीला गोदावरी नदी आणि निसर्गाच्या सानिध्यात रहायला लावून, भौतिक आणि क्षणिक गोष्टींचा अविरतपणे पाठलाग करण्यापेक्षा जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करायला शिकवतो. आणि त्या सर्व वातावरणात तो स्वतःचही आयुष्य तिच्यासमोर मांडून एक नवा अर्थ तिच्या जगण्याला द्यायचा प्रयत्न करतो.  

लहापणापासून स्वतःच्या वडिलांकडून स्वतःला प्रोडक्ट असं म्हणवून घेत असतानाचा त्रास आणि त्यामुळं स्वतःच्या पोटात असणाऱ्या मुलाचा बाप कोण हे माहीत नसण्याबद्दल प्रितीनं व्यक्त केलेलं समाधान आजच्या पुढारलेल्या, अतीशिक्षित परंतु पैशांभोवती स्वतःला बांधून घेतलेल्या पिढ्यांचं प्रतिनिधित्व करतं. माणसाचं जगणं हे निसर्गचक्रासारखंच आहे असं सांगत नदी जशी वाटेत येणारा प्रत्येक अडथळा कापत, नवीन मार्ग तयार करत अखेर समुद्राला मिळते. तसंच अनेक अडथळे पार करत, नवीन वाट करत माणसाला त्याच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत पोहोचायचं असतं असं हा चित्रपट सांगतो. आणि फक्त सांगत नाही तर प्रीतीच्या आयुष्यातून तिच्या शेवटच्या निर्णयापर्यंत आपल्याला दाखवून देतो.

 

चित्रपट बघत असताना आपण गोदावरीच्या वाहत्या प्रवाहात आणि आजूबाजूच्या हिरव्यागर्द निसर्गात आपोआपच सामावून जातो.

 

चित्रपट बघत असताना आपण गोदावरीच्या वाहत्या प्रवाहात आणि आजूबाजूच्या हिरव्यागर्द निसर्गात आपोआपच सामावून जातो असा कॅमेराचा वापर सोरेन यांनी केलाय. आणि त्यात किशोर कदम यांच्या तोंडातून बाहेर पडणारी अनेक वाक्यं आपल्याला अजून निसर्गाच्या जवळ घेऊन जातात. दिग्दर्शक म्हणून अहिरे यांनी कलाकारांकडून करून घेतलेली मेहनत आणि त्याचवेळेला त्यांना दिलेलं स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी चित्रपट बघत असताना जाणवतात. संवाद थोडे जड असले तरी समजून घ्यायला सोप्पे आहेत. फ्लॅशबकमध्ये घेऊन जातानाही वर्तमानाशी प्रेक्षकांचा संबंध तुटणार नाही याची व्यवस्थित जबाबदारी दिग्दर्शकानं घेतलेली आहे.

अत्यंत कमी टीम आणि बजेट यामधून एक चांगली कलाकृती उभी केलीये. तिन्ही ऋतुंमध्ये शूट केलेल्या या चित्रपटात सर्व दृश्यांमधील जागांची आणि पात्रांची उभारणी उत्तमरीत्या केलीये. शेवटी येणाऱ्या अंगाईच्या काही ओळी चित्रपटाचा आलेख अजून वरती घेऊन जातात. जगत असताना माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी अनेक असतात, मात्र आपण त्या अडचणींकडे कोणत्या दृष्टीकोनातून बघतो आणि समाधानी आयुष्यासाठी आपल्या गरजा नक्की काय आहेत हे जरी माणसाला समजलं तरी तो एक सुखकर आयुष्य जगू शकतो. जगण्याकडे बघण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोन हा चित्रपट आपल्याला देतो. चित्रपट येत्या वर्षात फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये चित्रपटगृहात पहायला मिळण्याची शक्यता आहे. सर्वांनी आणि तरुण पिढीच्या मुलांनी तर नक्की बघावा असा हा गोदाकाठ!