India

कौन बनेगा करोडपती कार्यक्रमातील कथित चमत्कारावर अंनिसचा आक्षेप

१६ नोव्हेंबरच्या रात्री आणि आणि १७ नोव्हेंबर सकाळी झालेल्या कौन बनेगा करोडपती या प्रसिद्ध कार्यक्रमात डोळ्यावर पट्टी बांधून लहान मुलांनी वाचून दाखवल्याचा कथित चमत्काराचा प्रयोग दाखवण्यात आला.

Credit : शुभम पाटील

पुणे । १६ नोव्हेंबरच्या रात्री आणि आणि १७ नोव्हेंबर सकाळी झालेल्या कौन बनेगा करोडपती या प्रसिद्ध कार्यक्रमात डोळ्यावर पट्टी बांधून लहान मुलांनी वाचून दाखवल्याचा कथित चमत्काराचा प्रयोग दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रधार आणि जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासमोर हा चमत्कार दाखवल्यामुळे आणि त्यांनी या गोष्टीचं कौतुक केल्यामुळे भोंदूगिरीचा प्रचार समाजात झाल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं केला आहे. त्याचबरोबर या घटनेचा जाब विचारत ही चूक दुरुस्त करण्याचं आवाहन त्यांनी अमिताभ बच्चन आणि सदर वाहिनीला केलं आहे.

घडलेल्या घटनेबद्दल पत्रव्यवहार चालू असून लवकरात लवकर संपर्क साधणार असल्याची माहिती तसंच जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत याविषयी तक्रार दाखल करता येऊ शकते का याचा कायदेशीर सल्ला घेत असल्याचं महाराष्ट अंनिसचे राज्य कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. इंडी जर्नलशी बोलताना ते म्हणाले, “हा खरंतर खूप सोप्पा प्रयोग आहे. डोळ्यावर पट्टी बांधल्यावर त्या पट्टीच्या खाली जी मोकळी जागा असते त्यातून अक्षरं दिसू शकतात. एवढ्या सोप्या गोष्टीला एक चमत्कार आहे असं सांगणं किंवा प्रशिक्षण घेऊन हे केलेलं आहे असं म्हणणं हे अनेक पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी दिशाभूल करणारं आहे.”  तसंच त्यांनी सांगितलं की, “जो कोणी असा चमत्काराचा दावा करत असेल आणि ज्याला वैज्ञानिक पाया नाहीये तो सिद्ध केल्यास अंनिस कडून २१ लाखांचं बक्षीस देण्यात येईल.”

पत्रकार परिषदेमध्ये अंनिसकडून सदर प्रयोगाचं प्रात्यक्षिकदेखील दाखवण्यात आलं. निहाल हांडे या १२ वर्षाच्या मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असतानाही त्यानं २-३ वेगवेगळ्या मजकुरांचं वाचन केलं. विज्ञानाच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या या भोंदुगिरीला लोकांनी बळी पडू नये तसंच कार्यक्रमाच्या पुढच्या भागात या कथित चमत्कारामागील सत्य लोकांसमोर आणण्याची मागणी अंनिसनं केलेली आहे.

 

 

डोळ्यावर पट्टी बांधून गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट तसंच अनेक राज्यातील मुलांचं मिड ब्रेन ऍक्टीव्हेशन करून त्यांचा बुध्यांक आणि स्मरणशक्ती वाढवतो, असे दावे करणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. मिड ब्रेनचे (मध्य मेंदू) उद्दीपन केल्यामुळे डोळ्यावर पट्टी बांधूनदेखील मुलांना केवळ स्पर्शानं किंवा वासानं गोष्टी ओळखता येतात असा दावा मिड ब्रेन ऍक्टीव्हेशनच्या जाहिरातींमध्ये केला जातो. मात्र यात तथ्य नसल्याचं महाराष्ट अंनिसचे सचिव अनिल वेल्हाळ यांनी इंडी जर्नलशी बोलताना सांगितलं. पुढं ते म्हणाले की, “अनेक पालकांना आमिष दाखवून या प्रकारात भुलवलं जातं. पैसे उकळण्याचा हा एक धंदा असून याआधीदेखील अंनिसनं अशा लोकांवर आणि जाहिरातींवर कारवाई केलेली आहे.” या मुद्द्याला धरूनच देशमुख असं म्हणाले की, “बऱ्याचदा मुलांना हे कसं केलं जातं याबद्दल पालकांनाही सांगू नका अशा सूचना दिल्या जातात.” विज्ञानाच्या नावावर हातचलाखीचा वापर करून चाललेली ही फसवणूक ताबडतोब थांबवण्याच्या सूचना यावेळी अंनिसकडून देण्यात आल्या.

डोळ्यावर पट्टी बांधलेली असताना नाक आणि डोळे यांच्यामध्ये जी जागा असते त्यातून गोष्टी दिसू शकतात. जर हातानं डोळे घट्ट बंद करून ठेवले किंवा आतून काळा रंग देऊन पोहण्याचा, चष्मा डोळ्यावर लावला तर गोष्टी वाचता किंवा बघता येणं शक्य होणार नाही, हे अंनिसने अनेक वेळा सिद्ध केलेलं आहे. आजूबाजूला पूर्ण अंधार केला अथवा डोक्याच्या मागच्या बाजूला वस्तू धरली असता मिड ब्रेन ऍक्टीव्हेशनचं प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना वस्तू ओळखता येत नाहीत. तसंच अंध मुलांना हे प्रशिक्षण दिलं तर त्यांनाही वाचता येत नाही, असं अंनिसनं जाहीर केलेल्या पत्रकात म्हटलेलं आहे.

वैद्यकीयदृष्ट्या मिड ब्रेन, वास घेणं किंवा स्पर्श या गोष्टींचा दिसण्याच्या प्रक्रियेशी कुठलाही संबंध नसल्यानं जैविक पातळीवर मिड ब्रेन ऍक्टीव्हेशनमुळे वास घेऊन किंवा स्पर्शानं डोळे बंद असताना दिसू शकतं हा दावा चुकीचा आहे. अशा प्रकारच्या दाव्याला आधुनिक बुवाबाजी म्हणत अशाप्रकारचे जे कार्यक्रमदेखील चालवले जातात त्याबद्दल अंनिसनं प्रसारभारतीकडे तक्रार केली आहे. केबीसीसारख्या मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकवर्ग असणार्‍या कार्यक्रमातून अशा प्रकारांच समर्थन करणं हे वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या तत्वांची पायमल्ली करण्यासारखं आहे. त्यामुळे या घडल्या प्रकाराबद्दल विरोध करत कृतीच्या स्पष्टीकरणाची मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समिती, महाराष्ट यांच्याकडून करण्यात येत आहे.