India

चुनाभट्टी-लाल डोंगर प्रकरणात पोलिसांच्या ढिसाळ कामगिरीविरोधात आंदोलन, भेदभावाचा आरोप

जालना जिल्ह्यातील १९ वर्षीय तरुणीवर ७ जुलै २०१९ रोजी चेंबुर येथे सामुहिक बलात्कार झाला.

Credit : Ajay Mane

जालना जिल्ह्यातील १९ वर्षीय तरुणीवर ७ जुलै २०१९ रोजी चेंबुर येथे सामुहिक बलात्कार झाला. ही मुलगी चेंबुर येथे तिच्या भाऊ आणि वहिनीसोबत राहत होती. मुंबईत झालेल्या अत्याचारानंतर ३३ दिवसांनी तिचा औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात बुधवारी २८ आॅगस्ट रोजी रात्री मृत्यू झाला. चेंबुर मध्ये राहत असताना तिची परिस्थिती खालावली म्हणुन भावाने पिडितेला औरंगाबादला पाठवले. त्यानंतर घाटी रुग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात आले. तेव्हा पिडितीने तिच्यावर झालेले अत्याचार डाॅक्टर आणि तिच्या कुटुंबाला सांगितले. औरंगाबादला ह्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आणि पुढील तपासासाठी हा गुन्हा मुंबईतील चुनाभट्टी पोलिस ठाण्याकडे देण्यात आला.

सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेच्या कार्यकर्त्यांनी काल आंदोलन केलं होते तसेच सुप्रियाताई सुळे आणि नवाब मलिक ह्यांनी स्वत: चुनाभट्टी पोलिस ठाण्याकडे हा मोर्चा नेला. अजुनही आरोपी पकडले का नाही? पोलिस प्रशासन कारवाई का करत नाही असे वेगवेगळे प्रश्र्न सुप्रिया सुळे यांनी मांडले, तसेच लवकरात लवकर कारवाई करून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे व हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. राज्य महिला आयोग एक महिना झोपले होते का असेही त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका करत म्हटले की ठाण्यात झाले, चेंबुर मध्ये झाले, चाळीसगावात झाले, पुण्यात झाले तरीही गृहमंत्री आणि सत्ताधारी पक्ष प्रचारात व्यस्त आहे.

supriya sule

चुनाभट्टी पोलीस ठाण्याबाहेर गेल्या दोन दिवसांपासून भिम आर्मी संघटना तसेच वेगवेगळ्या आंबेडकरी विचारांच्या संघटनांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांशी जेव्हा आम्ही इंडी जर्नलतर्फे बोललो तेव्हा त्यांची बाजू वेगळीच होती. २९ आॅगस्ट, सकाळी ११ वाजल्यापासून हे आंदोलन त्यांनी सुरु केले आहे अशी माहिती अशोक कांबळे यांनी दिली. "या आंदोलनात राष्ट्रवादीचा निषेध करण्यात आला, राष्ट्रवादी सुध्दा प्रचाराच्या हेतूने मोर्चा काढत आहे, असे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे आमदारपण फक्त नावाला येऊन गेले. सुप्रिया सुळे यांना स्पेशल ट्रिटमेंट देण्यात आली. सर्व माध्यमांनी राष्ट्रवादीचा मोर्चा कवर केला, पण मोर्चानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घरी गेले. आता इथे फक्त आंबेडकर चळवळीतील लोक आहेत. मग ते कोणत्याही पक्षाचे असो," असे ते म्हटले. 

"पण आम्ही आता जागे झालो आहोत, आम्ही समाजमाध्यमांवर आंदोलनाची संपूर्ण माहिती देत आहोत आणि जर आमच्या बहिणीला न्याय नाही मिळाला तर आम्ही महाराष्ट्रातच नाही तर देशभरात आंदोलन करू," असे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

"पोलिसांच्या वागण्यातुन असे वाटत आहे की आरोपींना पाठीशी घातले जात आहे. पोलिसांनीअजुन एकही पाऊल उचलले नाही. प्रकरण जर नीट पाहिले तर दिसते की सरळ-सरळ हा जातिवादाचा मुद्दा आहे. हाॅस्पिटलमधल्या डीनने पिडित मुलींची जात विचारली आणि मग उपचार केले.तिची सुधारणा झाली होती, पण जात कळाल्यानंतर तिच्याकडे दुर्लक्ष करण्याणे पिडितेचा मृत्यूच झाला. पोलिस उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, बलात्कार झालाच नाही असे एका मॅडमनी सांगितले, मग मुलीच्या बाबांनी, भावांनी बलात्कार केला का? असे प्रश्न तिच्या कुटुंबाला विचारले," असे आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या मुंबई उपाध्यक्ष बुध्दभुषण ह्यांनी सांगितले.

"जातिवादी-मनुवादी सरकार हे प्रकरण दाबत आहे. हे सरकार स्त्रियांच्या अब्रुची काळजी करत नाही हे दिसुन येत आहे. दोन दिवस झाले आम्ही इथे आहोत, पोलिसांनी आमच्यात आणि खासदार, आमदार मध्ये भेद केला. रास्तारोको केल्याने विद्यार्थ्यांना आणि कार्यकर्त्यांना अटक केले गेले, पण सामुहिक बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांना यांनी अजुन पकडले नाही. ह्या केसची पाहणी शिर्के मॅडम पाहत आहेत, त्यांची पार्श्वभूमी विवादास्पद आहे. अजुन एसआयटीची नेमणुक केली नाही, सीबीआय कडे केस दिली गेली नाही, मग पोलिस प्रशासन करतंय तरी काय? आम्ही न्यायालयीन लढा देऊ, आणि जे प्रशासन आपले कर्तव्य करत नाही त्यांच्यावर अॅस्ट्रोसिटी नोंद करण्याची मागणी करु," असे मत Thoughts of Ambedkar चे शिक्षण घेणाऱ्या मुंबई विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने व्यक्त केले.

दरम्यान, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे म्हणाल्या की त्यांनी, आरोपींचा शोध घ्यावा आणि याप्रकरणी आरोपपत्र योग्य प्रकारे दाखल केले पाहिजे याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मुंबई पोलिसांना केल्या आहेत. पीडितेच्या आईने एका मराठी वृत्तवाहिनीला सांगितले की कुटुंबाला न्याय हवा आहे. "माझ्या मुलीबरोबर जे घडले ते इतर मुलींना होऊ नये. माझ्या मुलीला न्याय मिळायला हवा. आम्हाला न्याय हवा आहे," ती म्हणाली.

तिच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर चार अनोळखी तरुणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित तरुणी ही मूळची जालनाची रहिवाशी असून काही दिवसांपूर्वी ती मुंबईत आली होती. चेंबुर भागात ती भावासोबत राहत होती. ७ जुलैला मैत्रिणीच्या वाढदिवसाला म्हणून ती घराबाहेर पडली. त्याच दिवशी चेंबूरच्या लाल डोंगर भागात तिच्यावर चौघांनी बलात्कार केला. या घटनेनंतर तिची मानसिक आणि शारीरिक प्रकृती गंभीर झाल्यानं अर्धांगवायूचा झटका आल्याचं समजून तिला गावी पाठवण्यात आलं. तिथं तिच्यावर उपचार झाले. मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नसल्यामुळं तिला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी विचारपूस केल्यानंतर तिनं सर्व प्रकार सांगितला. जोवर बलात्कार करणाऱ्या चारही आरोपींना अटक होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही असं म्हणत आज आंबेडकरी पक्ष संघटना आणि पीडितेच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना निवेदन दिलं.