India
महाराष्ट्रातून १,३०० महिला शेतकरी दिल्लीला रवाना
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोर्चा.
गोठवणाऱ्या थंडीत, कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील १,३०० शेतकरी महिला दिल्लीला रवाना झाल्या. शुक्रवारी रात्री (१५ जानेवारीला) सातारा, जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणांहून निघालेल्या स्त्रिया दिल्लीत पोहोचल्यावर १८ जानेवारीला महिला शेतकरी दिन साजरा करणार आहेत. त्यानंतर त्या दिल्लीच्या सर्व सीमांवरील शेतकऱ्यांना भेट देऊन आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत.
‘लोकसंघर्ष मोर्चा’ आणि ‘सातारा जिल्हा महिला संघटने’च्या नेतृत्वाखाली शेतकरी महिलांचा हा जत्था दिल्लीला निघालेला असून, त्यात प्रामुख्यानं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुर महिलांचा समावेश आहे. एका शेतकरी संघटनेच्या वतीनं एड. ए.पी. सिंह यांनी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाला, महिला आणि लहान मुलं या आंदोलनात सहभागी होणार नाहीत, असं सांगितलं. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं या म्हणण्याचं ‘स्वागत’ही केलं. न्यायालयाच्या या भूमिकेवर सर्व स्तरांतून टीकाही झाली. या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी संघटनांनी, विशेषत: महिलांनी १८ जानेवारी हा महिला शेतकरी दिवस दिल्लीच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होऊन साजरा करायचं ठरवलं आहे. याबाबतच सातारा जिल्हा महिला संघटनेच्या वतीनं एड. वर्षा देशपांडे इंडी जर्नलशी संवाद साधताना म्हणाल्या, “शेतीचा शोध स्त्रियांनी लावला. आजही शेतीतली दोन तृतीयांश कामं स्त्रिया करतात. शेतमजुर स्त्रिया मोठ्या प्रमाणात राबतात. दिल्लीलाही आता मोठ्या प्रमाणात महिला शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. असं असताना भारताचे सरन्यायाधीश, आंदोलनामध्ये महिला नकोत, या भूमिकेचं स्वागत करतात, ही निषेधाची गोष्ट आहे. त्यामुळेच आम्हा महिलांना दिल्लीला जाऊन आंदोलनात सहभागी व्हायचं आहे. हा मुद्दा फक्त शेतकऱ्यांचा नाही, तर सगळ्याच माणसांना अंबानी, अदानीसारखे भांडवलदार पिळत आहेत आणि सरकार त्यांना पाठीशी घालतंय, त्यामुळे या आंदोलनाकडे फक्त शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणून आम्ही पाहत नाही, तर हा एक व्यापक लढा आहे. म्हणूनच स्वातंत्र्य चळवळीसारखं स्वरुप असलेल्या या ऐतिहासिक लढ्यात आम्ही सहभागी होतोय.’’ शुक्रवारी संध्याकाळी साताऱ्यात जमलेल्या सातारा जिल्हा महिला संघटनेच्या शेतकरी महिलांनी नगरपरिषदेसमेरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन केलं, तसंच कृषी कायद्यांना विरोध करत एक रॅलीही काढली आणि त्यानंतर त्यांनी दिल्लीसाठीच्या प्रवासाला सुरुवात केली. या जत्थ्यात सामील झालेल्या खटाव तालुक्यातल्या बायडाबाई मदने यांच्याशी इंडी जर्नलनं संवाद साधला त्यावेळी त्या म्हणाल्या, “शेतकऱ्यांची परस्थिती लय खराब आहे आणखी या कायद्यामुळं शेतकऱ्याची आणखीच वाट लागत्या, त्यासाठी मी दिल्लीला चाललीया, आणिक आम्हाला न्याय मिळेस्तोवर तिथंच राहणाराय आमी.’’
बायडाबाईंचं वय ६५ पेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत आणि दिल्लीतल्या गोठवणाऱ्या थंडीत त्या आंदोलनात सहभागी होत आहेत. साताऱ्यातल्या गजवडी गावातल्या सीमा बळीप यांनीही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “माझी पाच एकर शेती आहे. त्यात मी ज्वारी, गहू, आलं, भात हे पिकवते. माझी तर जमीन पण माझ्या नावावर आहे. मग मी तर शेतकरी म्हणून या आंदोलनाला जायलाच पाहिजे. आता मी दिल्लीला १२-१३ दिवस आंदोलनात राहणार आणि मग येऊन शेतीची कामं करणार.’’ आंदोलनासाठी महिला शेतकऱ्यांसोबत दिल्लीला जाण्याचा उत्साह सीमाताईंच्या बोलण्यातून ओसंडून वाहत होता. त्यांंनी आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगितला, “एरव्ही शेताची कामं आणि बाकी कौटूंबिक अडचणींमुळे बाहेर जास्त कुठेच जायला मिळत नाही. पण शेतकऱ्यांसाठी दिल्लीला जायचं म्हणल्यावर घरच्यांनी लगेच परवानगी दिली आणि माझे मिष्टर पण मला सोडायला आले होते,’’ सीमाताई म्हणाल्या.
साताऱ्यासह राज्याच्या जळगाव, धुळे, नंदुरबार, सातारा या जिल्ह्यांसह अन्य काही भागांतूनही शेतकरी महिला या जत्थ्यात सामील झाल्या असून त्या दहा दिवस शेतकरी आंदोलनात सहभाग घेत विविध कार्यक्रम करणार आहेत.