Quick Reads

बदलाल तर टिकाल: नियतकालिकांसमोर पॅनडेमिकनं उभं केलं आव्हान

तंत्रज्ञान पुढारलेल्या या दशकात नियतकालिकांच्या वाचकांच्या संख्येतही बराच फरक पडलेला पाहायला मिळतोय.

Credit : Indie Journal

कोरोनाकाळात नियतकालिकांच्या छपाईवर परिणाम झाला असून डिजिटल वितरणाकडे कल वाढल्याचं दिसून येतंय. आधीच परवडत नसलेला छपाई खर्च, तसंच वितरकांचं भरमसाठ कमिशन आणि बदललेल्या वाचनाच्या सवयी यामुळं छापील नियतकालिकांना उतरती कळा लागलीच होती. पॅनडेमिक आणि लॉकडाऊननं त्यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा केला.

बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये पहिल्यांदा नियतकालिकाची सुरुवात महाराष्ट्रात केली. ‘दर्पण’ या त्यांनी सुरु केलेल्या नियतकालिकाचा पहिला अंक ६ जानेवारी रोजी प्रकाशित झाला. ठराविक काळाच्या अंतरानं प्रकाशित होणार्‍या मुद्रिक किंवा हस्तलिखित प्रकाशनाला नियतकालिकं म्हणतात. जवळजवळ १५,००० नियतकालिकं महाराष्ट्रात प्रकाशित होतात. साधना, परिवर्तनाचा वाटसरू, मसाला, बळीराजा, मौज, लोकप्रभा, चित्रलेखा, चंपक चांदोबा, वनराई, महाराष्ट्र शासनाचे किशोर, रंगवाचा, अक्षरवाड्गमय, मुक्तशब्द, कवितारती, आपले वाड्गमय वृत्त त्याबरोबरच अंधश्रद्धा निर्मुलन समिती, राष्ट्र सेवा दल, विद्रोही सांस्कृतिक चळवळ या संघटनांकडूनही नियतकालिकं प्रकाशित केली जातात.

स्थानिक घडामोडींपासून ते आंतरराष्ट्रीय राजकारणापर्यंतचे अनेक विषय हाताळण्याचं कामही नियतकालिकं करतात. तंत्रज्ञान पुढारलेल्या या दशकात नियतकालिकांच्या वाचकांच्या संख्येतही बराच फरक पडलेला पाहायला मिळतोय. पूर्वी नियमितपणे साप्ताहिक, मासिक, त्रैमासिक किंवा दिवाळी अंक वाचणाऱ्या वर्गाची संख्या जास्त होती. पण काळानुरूप हातात आलेल्या स्क्रीननं या नियतकालिकांची जागा घेतल्याचं चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळतंय. याचाच परिणाम म्हणून सध्या नियतकालिकांनी देखील छपाई सोबतच डिजिटल वरती लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येतंय. आणि त्यात भर पडली आहे कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची.

 

कोव्हीड आणि छपाई बंदी

मराठी नियतकालिक परिषद ही अशा नियतकालिकांसाठी काम करते जी कुठल्या मोठ्या माध्यम समूहाशी संलग्न नाहीयेत. दिवाळी अंकांना मार बसत असल्या कारणानं मागच्यावर्षी पुण्यातील जवळजवळ २० भागांमध्ये स्वखर्चानं काही आउटलेट्स परिषदेकडून उघडले गेले. त्यामधून आर्थिक नफा असा झाला नाही पण उपनगरांमध्ये अंक पोहोचला जिथे आधी पोहोचत नव्हता. पहिल्या लॉकडाऊन मध्ये पोस्टाची सेवा बंद होती आणि इतर व्यवसायांनाही परवानगी नसल्यामुळे नियतकालिकांची छपाई बंद ठेवण्यावाचून पर्याय नव्हता. आता वर्तमानपत्राबरोबरच नियतकालिकांचा समावेशही अत्यावश्यक सेवेमध्ये केल्यामुळे सध्या काम चालू आहे. अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष डॉ. सागर देशपांडे यांनी दिली.  जडणघडण हे मराठी मासिकदेखील ते स्वतः चालवतात. महाराष्ट्रासोबतच इतर नऊ राज्याममधील मराठी वाचकांपर्यंत हे मासिक पोहोचतं.

 

जवळजवळ १५,००० नियतकालिकं महाराष्ट्रात प्रकाशित होतात.

 

तसंच ते म्हणाले की, "नियतकालिकांच्या बाबतीत अडचण अशी होते की त्यांना मिळणाऱ्या जाहिराती ज्या त्या वेळी छापल्या गेल्या नाहीत तर त्यांच्या वार्षिक करारातून ते जाहिरातदार कमी होऊ शकतात. आणि त्यामळे बंद असण्याचा जास्त फटका जाहिरातदार कमी होण्यानी बसला. त्यामुळे आत्ता असं म्हणावं लागतंय की आमचा तोटा कमी व्हावा म्हणून आम्ही अंक काढतोय. पूर्वी होत्या त्यातल्या बऱ्याच जाहिराती देखील आत्ता मिळत नाहीयेत. आणि ज्यांच्या जाहिराती मिळतायेत त्या ५०-६० टक्के कमी दरानं छापाव्या लागत आहेत. मग मिळतात त्या जाहिराती जाऊ नयेत म्हणून आम्हाला कमी दरामध्ये या जाहिरातींची छपाई करावी लागतीये. काही वर्गणीदारांचा नियतकालिकांवरती विश्वास ही एक यातली महत्वाची बाजू आहे. कारण त्यांना हे माहितीये की जेव्हा कधी अंक छापणं शक्य आहे तेव्हा आम्ही अंक काढणारच आहोत." म्हणजे पुण्यात कोरोनाची भयंकर परिस्थिती असतानाही अंकाची छपाई करून वाटप करण्यात आलं होतं. तर अशा काही वर्गणीदारांच्या बळावर सध्या बरीच नियतकालिकं टिकून असल्याचं त्यांनी सांगितलं.

पोस्टाबद्दल असणार्‍याही काही अडचणींचा उल्लेख त्यांनी यावेळी बोलताना केला. ते म्हणाले की, पोस्टाकडून ५-८ टक्के अंक हे पोहोचतच नाहीत. ते गहाळ होतात. ते पुन्हा कुरियरनं पाठवावे लागतात. यामुळे खर्चात परत भर पडते. त्यामुळे अशा काही अंकांच्या बाबतीत वर्गण्या येऊन न मिळाल्यासारखंच आहे. उलट प्रकाशक म्हणून आम्हालाच वेगळा खर्च अशा काही अंकांसाठी करावा लागतो. पण हा आता पूर्ण व्यवस्थेचा भाग झाल्या कारणानं आम्ही इतर खर्चामध्ये असा काही खर्च गृहीत धरत असतोच.

कोरोनाच्या काळात ज्या अडचणी प्रामुख्यानं आल्या त्या म्हणजे छपाई बंद. त्यामुळे वाचकवर्ग कमी झाला असून जाहिरातीदेखील कमी मिळत आहेत. कागद आणि छपाईचे दर लॉकडाऊननंतर वाढलेत. एका बाजूला कमी जाहिराती, कमी वर्गणीदार आणि दुसर्‍या बाजूला शाळा, महाविद्यालयं, ग्रंथालयं बंद, त्यामुळे वर्गण्यांचं नुतनीकरण बंद आहे. आर्थिक घडी बिघडल्यानं मार्केटिंग करता येत नाही. नियतकालिक वाचणारा वर्गही कमी झालेला आहे. त्यामुळे या नियतकालिकांची छपाई करणाऱ्या बऱ्याच प्रकाशकांनी या काळात डिजिटल अंक सुद्धा सुरु केलेत. त्यातून विशेष आर्थिक फायदा नसला तरी लोकांपर्यंत नियतकालिक पोहोचत राहावा असा अनेकांचा उद्देश आहे.

या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या कामगारवर्गाबद्दल बोलत असताना ते म्हणाले की, इतर व्यवसायांप्रमाणे थोडा परिणाम या क्षेत्रात काम करणाऱ्या वर्गावरही झाला आहे. पण कामगारांना काढून टाकण्याचे प्रकार घडलेले नाहीयेत. कारण, ठराविक नियतकालिकाबरोबर वर्षानुवर्षे छपाईचं काम करत आलेली जी मंडळी आहेत, त्यांना त्या नियतकालिकाची मांडणी, स्वरूप याबद्दल माहिती असते. इतर भाषांच्या तुलनेत मराठीमध्ये नियतकालिकांची संख्या जास्त आहे. किमान पन्नास टक्केपेक्षा जास्त वाचक कमी झाल्याचा फटका या दिवसांत बसल्याचं त्यांनी सांगितलं.

 

डिजिटलकडे वाटचाल

वनराई मासिकाचे कार्यकारी संपादक अमित वाडेकर इंडी जर्नलशी बोलताना म्हणाले, "जनप्रबोधन हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून वनराई हे मासिक काम करतं. पहिल्या लॉकडाऊनमध्ये पीडीएफ स्वरूपात आम्ही मासिक जास्तीत जास्त लोकांपर्यंत मोफत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. लोक घरी बसलेले असताना त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय काय असू शकतात यावर विचार करून ते विषय त्या अंकांमध्ये मांडले. सोशल मिडिया वरती व्हायरल झाल्यामुळे हे दोन अंक अनेकांपर्यंत पोहोचले आणि त्याचा परिणाम चांगल्या पद्धतीनं पुढच्या काळात वाचक वर्गावर झाल्याचं पाहायला मिळालं. वनराई या मासिकाचा व्यावसायिक दृष्टीकोन फारसा नाहीये, त्यामुळे खूप आर्थिक अडचणींचा सामना आम्हाला करावा नाही लागला पण जी व्यावसायिक दृष्टीकोनातून काम करणारी नियतकालिकं आहेत त्यांना मात्र याचा थोडासा फटका बसलेला जाणवतोय."

आत्ता सध्या नियतकालिक वाचणारा वर्ग हा प्रामुख्यानं चाळीशी उलटलेला आहे. नवनवीन प्रयोग, डिजिटल माध्यमाचा उपयोग करून नवीन पिढीला या माध्यमांकडे वळवण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच ते म्हणाले की सध्या शहरांतील तरुण हे जास्तीत जास्त इंग्रजी माध्यमात शिकलेले असल्यामुळे ते मराठी नियतकालिक सहसा वाचत नाहीत. आणि दुसर्‍या बाजूला ग्रामीण भागातील शिक्षणाचं प्रमाण वाढत आहे. साक्षर पिढी तिथे तयार होतीये. मराठी साहित्यात काम करणारे सध्याचे अनेक लोक हे ग्रामीण भागातून आहेत. तर यावर लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागातील साक्षर होत असणारी ही पिढी हाच नियतकालिकांचा भविष्यातील वाचक वर्ग आहे असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

कृषी जागरण या मासिकाचे कंटेंट हेड म्हणून काम करत असणारे भारत जाधव यांनी कशाप्रकारे सध्या नियतकालिकं डिजिटल विश्वात जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायेत याबद्दल माहिती दिली. कृषी जागरण हे शेतीविषयक माहिती पुरवणारं मासिक आहे. मराठीबरोबरच इतर भाषांमध्येही त्यांचं काम चालतं. कोरोना काळात खूप झपाट्यानं डिजिटल आवृत्यांमध्ये वाढ झाली असून नियतकालिकाची निर्मिती करणारे बरेच लोक सध्या डिजिटल माध्यमातून काम करतायेत. "फेसबुक, व्हॉट्सअप आणि वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही अंक प्रकाशित करतोय. या माध्यमाचा सध्या फायदा नियतकालिकांना होत असून डिजिटल स्वरूपातील अंक हाच इथून पुढच्या काळातील पर्याय आहे. प्रकाशकांच्या बाजूनी विचार करायचा झाल्यास अंक लोकांपर्यंत सोप्या पद्धतीनं पोहोचतो. तसंच लोक क्लिक करून संबंधित अंक किंवा लेख बघतात आणि त्याचा फायदा प्रकाशकांना होतो," असंही ते म्हणाले.

डिजिटल मधील वाचकांची संख्या वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच कोरोनाकाळात प्रिंट मध्ये काम करणाऱ्या अनेक लोकांचे पगार कमी झाले आणि याच काळात डिजिटल मध्ये काम करायला लोकांचे पर्याय निर्माण झाले. कामाचं स्वरूप बदललं असून काही प्रमाणात क्लिक मिळवण्यासाठी स्पर्धा चालू असलेली दिसून येतीये.

 

तरुणांचा कमी झालेला प्रतिसाद 

तरुण वाचकांचं नियतकालिक वाचण्याचं प्रमाण कमी आहे ही बाब खरी आहे. तरुण नियतकालिकं वाचत नाहीत या गोष्टीकडे तक्रार म्हणून बघण्यात अर्थ नाहीये. आत्ताच्या एकूण परिस्थितीमधून हे तयार झालेलं असून याची कारणं म्हणजे सगळंच ऑनलाईन झालंय. जगाच्या कानाकोपऱ्यातल्या सर्व घडामोडी त्यांना क्षणार्धात मिळतात. आठवड्यानं किंवा महिन्याभरानं त्याबद्दल वाचण्यात विशेष रस आत्ताच्या तरुण वाचकांना नसतो, ही त्यामधील एक बाब. प्रत्येक क्षणाला वेगळे विषय सध्या चर्चेत असतात त्यामुळे एकूणच वाचकवर्ग आकर्षित होईल असे विषय हाताळण्याची जबाबदारी नियतकालिकावर येऊन पडते.

नियतकालिकांची औपचारिक भाषा हे पण एक महत्वाचं कारण तरुण वाचक कमी असण्याबद्दल वाटतं. "तरुण वर्ग आकर्षित होण्यासाठी या भाषेच्या वापरात थोडा बदल करण्याची गरज आहे. मुळातच आमच्या पिढीमध्ये वाचनाचं प्रमाण कमी आहे, अटेन्शन स्पॅन कमी असल्यामुळे दोन किंवा तीन हजार शब्दांचे लेख वाचणं अनेक तरुणांना अवघड जातं," असं आदित्य संतोष यानं इंडी जर्नलशी बोलताना सांगितलं. २४ वर्षाचा आदित्य हा अनेक नियतकालिकांचा वाचक असून बदलत्या काळाबरोबर नियतकालिकांनी तरुण वाचक वर्गाला आकर्षित करण्यासाठी नेमकं काय करायला हवं याबद्दल त्याचं मत सांगितलं.

 

समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये महत्वाचं काम नियतकालिकं करतात. राजकारण, मनोरंजन, कायदा, कला, क्रीडा, शेती असे अनेक विषयांवरील लेख आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचवतात.

 

तो म्हणाला, "प्रिंटींग चालू राहिलंच पाहिजे कारण त्यावर अनेकांचं अर्थार्जन चालतं. त्याचबरोबर भारताच्या डाक सेवेतील बरंच काम या नियतकालिकांमुळे होतं. पण ज्याप्रमाणे परिवर्तनाचा वाटसरू सारखं नियतकालिक डिजिटल आणि प्रिंट अशा दोन्ही स्वरूपातील अंकासाठी वेगवेगळं सबस्क्रीप्शन देतं, त्याप्रमाणेच डिजिटल होऊ घातलेल्या इतर नियतकालिकांनी काम करणं गरजेचं आहे. डिजिटल स्वरुपात काम अचूक आणि वेळ कमी लागत असल्यामुळे डिजिटल कडे सरकत असणाऱ्या नियतकालिकांच्या व्यवसायाकडे सकारात्मक पद्धतीनं बघितलं पाहिजे."

 

महाराष्ट्राला नियतकालिकांची मोठी परंपरा

समाजपरिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये महत्वाचं काम नियतकालिकं करतात. राजकारण, मनोरंजन, कायदा, कला, क्रीडा, शेती असे अनेक विषयांवरील लेख आणि माहिती वाचकांपर्यंत पोहोचवतात. ‘मौज’ सारखं मासिक १९२२ पासून वाचकांचं मनोरंजन करतंय. दिवाळी अंकाची परंपरा मौजनं सुरु केली.

सुजाता लेले या पुण्यातील वाचक आहेत. त्याचं वय ६० वर्षं असून त्या काही साप्ताहिकं आणि मासिकं नेहमी वाचत असतात. त्याचबरोबर त्या काही मासिकांसाठी लेखदेखील लिहितात. इंडी जर्नल सोबत बोलताना त्या म्हणाल्या, "आमच्या पिढीतील वर्ग हाच नियतकालिकांच्या वाचनाशी जास्त जोडला गेलेला आहे. आणि सध्या पीडीएफ स्वरुपात अनेक मासिकं उपलब्ध आहेत. परंतु नियतकालिक हातात घेऊन वाचन करण्याची सर या माध्यमात नाहीये. प्रत्येक मासिकातून खूप चांगल्या प्रकारे माहिती मिळते. मराठी भाषेचं प्रसाराचं बरचं काम नियतकालिकांमार्फत होतं. नियतकालिकांचं महत्व सांगत असताना त्या म्हणाल्या की लहानपणापासून मुलांना पालकांनी नियतकालिकांमधल्या गोष्टी, लेख वाचून दाखवले पाहिजेत. ज्यामुळे त्यांना चांगल्या वाचनाची सवय लागू शकते. आणि भविष्यात हे माध्यम त्याचं अस्तित्व टिकवून ठेवू शकेल."

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा फटका साधारण सर्व क्षेत्रांना बसलेला आहे. अनेक व्यवसाय आणि उद्योगांचं स्वरूप याकाळात बदललंय. याचाच एक भाग हा नियतकालिकांचं होत असणारं डिजिटलायझेशन आहे. अनेक वर्षांची परंपरा असलेली ही नियतकालिकं आत्ता जो काळ बघतायेत तो कदाचित या माध्यमातील उत्क्रांतीचा काळही असेल. पुढील वर्षांमधील नियतकालिकांचं स्वरूप पाहणं औस्तुक्याचं ठरेल.