India
कौतूकास्पद! केडीसी बँकेनं दिलं तृतीयपंथीय व्यक्तींना व्यवसायकर्ज
तृतीयपंथीयांना कर्ज देणारी राज्यातली पहिली बँक

सूचना: खासगी अवकाश जपण्यासाठी या वृत्तातील तृतीयपंथी महिलांची नावं बदलेली आहेत.
मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर अनेक मजूर, कामगार बेरोजगार झाले. लाखो कुटुंबांची परवड झाली. अशा स्थितीत ज्यांच्या हाताला कामच नाही, ज्यांना लोकांकडे मागितल्याशिवाय पोट भरता येत नाही, अशा तृतीयपंथीयांचेही खूप हाल झाले आणि अजूनही होत आहेत. अशा स्थितीत ‘कोल्हापूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँके’च्या इचलकरंजी मुख्य शाखेनं काही तृतीयपंथी महिलांना बिनातारण कर्ज देऊन मदतीचा हात दिला आहे.
तृतीयपंथी महिलांच्या बचत गटांना अशा प्रकारे बिनातारण व्यवसाय कर्ज देणारी ही महाराष्ट्रातली पहिली बँक आहे. या बॅंकेनं आतापर्यंत दोन तृतीयपंथीय महिलांना व्यवसायाकरता छोटी कर्ज दिली आहेत. इचलकरंजी शहरातील जवळपास १२५ तृतीयपंथीय महिला आहेत. त्यापैकी २५ जणींची बँकेत खाती आहेत. प्रत्येकी पाच जणींचा एक असे त्यांचे एकूण पाच बचतगटही स्थापन केलेले आहेत. या महिला २०१८ पासून दरमहा बँकेत थोडे थोडे पैसे भरतात. आणि आता त्यांना व्यवसायाकरता छोटी छोटी कर्ज मिळू लागल्यावर त्या स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी धडपड करत आहेत. याबाबत इंडी जर्नलनं त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला असता,
इचलकरंजीतल्या रेणुकामाता मंदिराबाहेर नारळविक्रीचा व्यवसाय नव्यानेच सुरु केलेल्या रंजना यांनी सांगितलं, "माझं शिक्षण नाही, मी कधी शाळेचं तोंडच बघितलं नाही..त्यामुळं आतापर्यंत मागून खाण्याशिवाय काय पर्याय नव्हता, पण आता हे बॅंकेचं कर्ज मिळालं आणि त्यातून मी नारळ विकायला सुरवात केली, कोरोनामुळं अजून एवढा धंदा नाही पण होईल हळहळू. आणि ह्यामुळं मनाला लय चांगलं वाटतं..की आपुनबी काय तर करू शकतो. स्वत:च्या पायावर उभारू शकतो.’’ आपल्या व्यवसायाबद्दल अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, ‘’मी होलसेल भावानं एकदम नारळ खरेदी करते आणि ते मंदिराबाहेर बसून विकते. सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी बारा-एक वाजेपर्यंत आणि दुपारी तीन ते संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत नारळ विकते. सध्या तसा चांगला धंदा नाही, दिवसाला दहाएक नारळ खपतो. पण हळूहळू जम बसंल. माझ्या मैत्रिणीनं चांदणीनं मला खूप मदत केली कर्ज मिळवून हा व्यवसाय सुरु करायला, नाही तर मला काय माहित बी नव्हतं.’’
सध्या कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे निवळली नसल्यानं रंजनाचा व्यवसाय अपेक्षित प्रमाणात होत नाही, मात्र ती हळूहळू जम बसवण्याचा प्रयत्न करते आहे. रंजनाप्रमाणेच चांदणीलाही बॅंकेनं वीस हजार रुपयांचं कर्ज दिलं आहे. त्यातून आता ती घरगुती पातळीवर कपडे विकण्याचा व्यवसाय सुरु करणार आहे. याबद्दल तिनं सांगितलं, "लॉकडाऊनचा काळ आम्हाला खूप कठीण गेला. त्या काळात मागायला पण बाहेर पडता येत नव्हतं. वेगवेगळ्या लोकांनी त्यावेळेला मदत केली पण स्वत:चं काही तरी उभं करणं गरजेचं होतं. माझं बारावीपर्यंत शिक्षण पण झालेलं आहे, थोडीफार सरकारी योजनांची माहिती आहे, मग बॅंकेकडं कर्जासाठी प्रयत्न केले आणि कर्ज मिळालं. आता हाताचं ऑपरेशन झाल्यामुळे मी काही दिवस घरी आहे, यातून एकदा बरी झाले की, घरीच लेडीज कपडे आणून विकणार आहे.’’
कर्जवाटपाच्या या एकूण प्रक्रियेबद्दल कोल्हापूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेच्या इचलकरंजी शाखेचे निरीक्षक राजू लायकर यांनी सांगितलं, "२०१३ मध्ये महाराष्ट्र शासनानं एक जीआर काढला आहे. त्यानुसार वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला, तृतीयपंथीय महिला यांचं सक्षमीकरण करण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे बचत गट तयार करून त्यांना उद्योगव्यवसायाला कर्ज दिली पाहिजेत. पण याची अंमलबजावणी फारशी होत नाही. पण आमच्याकडे कोल्हापूरमध्ये दिलशाद मुजावर यांनी याच्यासाठी खूप इनिशिएटिव घेतलं. मलाही उपेक्षित महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे, असं वाटलं. त्यामुळे मी कर्जाची प्रक्रिया पार पाडली. आता आणखी काही तृतीयपंथीयांनाही आम्ही कर्ज मंजूर केलं आहे. काही दिवसांत त्यांना ते मिळेल.’’
"नॅशनल लीगल अथॉरिटी सर्विसेस (नालसा) विरुद्ध भारत सरकार या याचिकेच्या निकालानुसार तृतीयपंथीयांनी भीक मागून आपली गुजराण करणं, याला न्यायालयानं गुन्हा ठरवलेलं आहे. मात्र हे करताना तृतीयपंथींयांसाठी पर्यायी उपजीविकेची साधनं किंवा मार्ग यावर मात्र सरकारी पातळीवर अजूनही तितकेसे प्रयत्न होत नाहीत.’’ असं एड. दिलशाद मुजावर यांनी इंडी जर्नलशी बोलताना सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या, "तृतीयपंथीयांना जगण्यासाठी थोडीफार मदत कुणीही करू शकतं पण त्यांना आत्मसन्मानानं आयुष्यात उभं राहता यावं यासाठी मी त्यांना संघटित केलं. त्यांच्याशी सतत संवाद करून बॅंकेमध्ये खाती उघडणं, बचतगट वगेरे तयार केले. लॉकडाऊनच्या काळात मी अनेक बँकांना विनंती केली की, या बायकांना कर्ज द्या. पण कुणीच कर्ज दिलं नाही. तृतीयपंथीयांबाबत बँकांना विश्वास नसतो. या महिला कर्जाची परतफेड करणार नाही, असंच त्यांना वाटतं. त्यामुळे बँकांनांही मानसिकता बदलण्याची गरज आहे.’’