India
आम्हाला आमचं सत्य मांडण्यासाठी झगडावं लागतं, त्यामुळं सत्य मांडण्याची किंमत आम्हांला माहित आहे
काश्मिरी पत्रकारांचा संघर्ष आणि त्यांच्या कथा
“श्रीनगरमध्ये दोन्ही बाजूंच्या लोकांना त्यांचा अजेंडा वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर पाहिजे असतो. काश्मीरमधल्या राजकारणानं संघर्ष जन्माला घातला. राजकारण एकटं कुठं यायला? त्याच्यासोबत हिंसाही आली. या संघर्षानं माध्यमांची काश्मीरमधल्या बातम्यांची भूक जास्तच वाढवली. त्यातून इथं जणू माध्यमस्फोट झालाय.” श्रीनगरमधल्या लाल चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेली प्रेस कॉलनी. तिथल्या ‘काश्मीर लाईफ’ नियतकालिकाच्या कार्यालयात संपादक मसूद सर काश्मीरमधली माध्यमं आणि विशेषत: पत्रकारितेबद्दल सांगत होते. मसूद यांची ही वाक्यं धगधगत्या काश्मीर खोऱ्यातील पत्रकारितेचं सार म्हणावी अशी…
काश्मीर! तुमची माझी सकाळ कित्येकदा या पृथ्वीतलावरची जन्नत म्हणवणाऱ्या प्रदेशातल्या हिंसाचाराच्या, दहशतवादी हल्ल्यांच्या, दगडफेकीच्या घटनांच्या बातम्या वाचून उजाडलीय. या बातम्यांनी काश्मीरबद्दलची तुमची मतं बनवली असतील, चकमकी, कारवाया आणि दगडफेकीच्या फोटोंनी या इलाक्याची एक विशिष्ट प्रतिमा तुमच्या मनात बनवली असेल. हा सगळा संघर्ष माध्यमांमधून आपल्यापर्यंत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात ते काश्मीरमधले पत्रकार. सतत जीव धोक्यात घालून या बातम्या, हा संघर्ष ते आपल्यापर्यंत पोहचवत असतात. काश्मीरच्या माध्यमांकडं पाहताना दोन दृष्टीकोन प्रामुख्याने दिसतात. एक काश्मीरमधील स्थानिक माध्यमं आणि त्यातून होणारं वार्तांकन, दुसरा दृष्टीकोन म्हणजे काश्मीरमधल्या घडामोडींचं वार्तांकन करणारी पण काश्मीरबाहेरची माध्यमं; म्हणजेच दिल्लीस्थित राष्ट्रीय आणि इतर राज्यातील प्रादेशिक वाहिन्या.
२०१३-१४ मधली घटना. काश्मीर प्रश्नावरच्या एका कार्यशाळेत सहभागी झालो होतो. या विषयातील एक तज्ज्ञ तिथं मार्गदर्शन करत होते. त्यांची मांडणी चालू असताना सहभागींपैकी एकानं त्यांच्या मांडणीवर शंका उपस्थित करणारे काही प्रश्न विचारले. संदर्भ म्हणून काश्मीर खोऱ्यातील काही स्थानिक वृत्तपत्रांच्या बातम्यांचा वापर केला. त्या तज्ज्ञाच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. प्रश्न विचारणाऱ्यानं वापरलेले संदर्भ हे त्यांच्या दृष्टीनं निरर्थक होते. तसं ते म्हणालेदेखील. या देशातील इतिहासात सर्वात जास्त काळ संघर्षाचं केंद्र असणाऱ्या काश्मीरची स्थानिक पत्रकारिता आमच्यापर्यंत कमालीची दूषित स्वरूपात पोचते. त्यामुळं या संघर्षाचं केंद्र असणाऱ्या काश्मीरमधील पत्रकारिता, तिथल्या लोकांचं माध्यमांबद्दलचं आकलन समजून घेणं गरजेचं आहे. त्यात काश्मीरमध्ये माध्यमातल्या व्यक्तींवर सतत होणारे हल्ले, त्यांना मिळणाऱ्या धमक्या, त्यात झालेले मृत्यू हा तर वेगळाच विषय आहे.
मे महिन्याची १५ तारीख उलटली होती. पुण्यावरून दिल्ली आणि दिल्लीवरून जम्मूला सकाळी सातच्या दरम्यान पोहचलो. जम्मू म्हटलं की एकदम थंड हा गैरसमज लगोलग दूर झाला. बाकी ठिकाणी असतं तेवढंच ऊन इथंही होतं. पहाटे जम्मूमध्ये प्रवेश केल्यापासून फोनची रेंज गायब झालेली. त्यामुळं रेल्वेतच गडबडून दोन तीन वेळा फोन स्वीच ऑफ–ऑन केला. पण रेंजचा काही पत्ता नाही. शेवटी जम्मूमध्ये उतरल्यावर रेल्वेस्थानकाबाहेर ढीगाने असलेल्या मोबाईल दुकानांमधल्या एका दुकानदाराशी बोलताना तो म्हणाला, “साहब आपका सीमकार्ड इधर काम नही करेगा. आपको यहा इधरका सीम कार्ड लेना पडेगा.” बोलत बोलत त्यानं एअरटेलचं सीमकार्ड माझ्या फोनमध्ये टाकलं. कार्डचे रेट तुमच्या म्हणण्यानुसार. म्हणजे घासाघीस करू शकता.
दोनशे ते सहाशे रुपयांपर्यंत. सर्वच दुकानांवर अनेक सैनिक सीमकार्ड घ्यायला, रिचार्ज करायला उभे होते. एवढ्या संख्येनं सैनिक वावरताना पाहायची आपल्याला सवय नसते. आपल्याकडं आंदोलनं-मोर्चे वा काही व्हीआयपी हालचाली असतील तरच जरा जास्त संख्येनं पोलिस वा सुरक्षा यंत्रणतले लोक दिसतात. इथं मात्र सगळीकडे सैनिकच. स्थानिकांनाही त्याची सवय झालेली. या सगळ्या जवानांची दुकानदारांशी चांगलीच मैत्री असल्याचं दिसून येत होतं. म्हणजे सगळं कसं खेळीमेळीनं चालू आहे असं जाणवत होतं. माझ्या बाजूला एक जण बोलत होता. त्याच्या भाषेतून आणि बोलण्यातून त्याचं मराठीपण जाणवत होतं. त्यामुळे मीच स्वत:हून पुढाकार घेऊन त्यांना विचारलं, “यहांसे श्रीनगरको कैसे जा सकते है ?” त्यानं तीन चार पर्याय सुचवले. बोलता-बोलता कळालं की तो बीडचा आहे. मग त्यानंच मला प्रश्न केला, “काश्मीर फिरायला एकटाच?” माझ्यातल्या बॅचलरला हसू फुटलं. मी उलटा प्रश्न केला, “का, एकटं नाही यायला पाहिजे?”
जम्मूवरून श्रीनगरला थेट रेल्वे नाही. बाय रोडच जावं लागतं. बसेस आणि ट्रॅक्स असे दोन पर्याय आहेत. स्टेशनच्या आवारातून श्रीनगरला निघणाऱ्या ट्रॅक्स जास्त पैसे घेतात हे अनेकांनी आधीच सांगितलं होतं. ट्रॅक्स स्टॅंडला जाण्यासाठी निघालो. ऑटोवालाही तेच विचारत होता, “अकेले घुमने आये हो?” मी निमूट हसून मान डोलवली.
जम्मू विद्यापीठ ओलांडल्यानंतर थोडं पुढे आलं की, डावीकडं एक जण ‘श्रीनगर श्रीगनर…’ ओरडत उभा होता. कदाचित ऑटोवाल्याला तो ओळखीचा असल्यानं त्यानं मला स्वस्तात डील करून दिल्याचं भासवलं. गाडी दुसरीकडूनच सुटणार असल्यानं त्यानं मला दुचाकीवर बसवून गाडीकडं न्यायला सुरूवात केली. हा सगळा व्यवहार मला काही नवीन वाटत नव्हता. कारण भारतातल्या सर्व भागात हे असे अनुभव अनेक वेळा आलेत. गाडीवर जाता जाता त्याला किती वेळ लागतो, नाष्ट्याला, जेवायला गाडी थांबणार का हे विचारून घेतलं आणि महत्त्वाचं म्हणजे गाडीतली समोरची सिट द्यायची अशी बोलणी केली.
या गाडीतच मला प्रवासभर काश्मीरी माणसं भेटली. काश्मीरी भाषेत एकमेकांशी बोलणारी, तजेलदार सफरचंदासारखीच गुलाबी गोरीपान… “जम्मूमध्ये आलं की आमच्यासाठी एकदम उन्हाळा असतो.” जीपमध्ये माझ्या बाजूला पहिल्या सीटवर बसलेले निस्सार अहमद सांगत होते. निस्सारजी श्रीनगरच्या पुढं असलेल्या बारामुल्लाचे. ते सरकारी नोकरी करतात. जम्मू–काश्मीर सरकारच्या पूरनियंत्रण विभागात कार्यरत आहेत. जम्मूपासून प्रवासाला सुरूवात केल्यानंतरच आमच्यात गप्पा रंगल्या होत्या. ‘काश्मीर जन्नत है, जन्नत! अब आपको पता चलेगा.’ जम्मू–श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरला वेढलेल्या शिखरांचे फोटो काढत असताता ते मला सांगत होते. निसर्गसौंदर्याची भरभरून वर्णनं करताना काश्मीर प्रश्न, तिथला हिंसाचार आणि माध्यमं याकडं चर्चा न्यायचा प्रयत्न केला की, ते बरोबर त्याला बगल द्यायचे. राजकीय विषयावर त्यांनी एकही शब्द काढला नाही. माझ्याबदद्ल त्यांना अविश्वास वाटला असावा का हा प्रश्न मला परत आल्यावरही सतावतो. ते एकच म्हणाले, “हम लोगतो आर्मी कोभी मदत करते है. हमें फ्लड कंट्रोल करनेके लिए बॉर्डर के उस पार भी जाना पडता है. हम सब देखते है.”
दहा सीटच्या त्या ट्रक्समध्ये आम्ही आठ लोकं श्रीनगरकडं निघालो होतो. मधल्या सीटवर दोन महिला बसल्या होत्या. एकदम मागच्या सीटवर दोन लहान मुली आणि एक पुरूष. आपल्या गावाकडं असणाऱ्या काळी–पिवळीची जशी अवस्था असते जवळपास तशीच अवस्था या गाड्यांची. म्हणजे पेट्रोल, स्पीडचा काटा अस्तित्वातच नाही. त्याठिकाणी भलं मोठं छिद्र पडलंय. त्यातल्या त्यात महत्त्वाचं एकच की, म्युझिक प्लेअर मात्र चांगल्या अवस्थेत होता. ड्रायव्हर, स्टेरिंग, गिअर बॉक्स आणि म्युझिक प्लेअर एवढंच त्या गाडीत नीट होतं. म्युझिक प्लेअरला मोबाईलची पीन जोडायची आणि गाणे लावायचे. निस्सारभाईंनी पूर्ण प्रवासात हे काम मात्र स्वत: अतिशय व्यवस्थित पार पाडलं. ते त्यांच्या आवडीची काश्मीरी गाणी लावत होते. गुणगुणत होते. हे सगळं चालू असताना मला मात्र समोरच्या काचेवर मध्यभागी खाली लिहिलेलं ‘REBEL’ नाव आकर्षित करत होतं. जिथं जगण्याला समानार्थी शब्दच संघर्ष आहे तिथं हे असं स्षष्टपणं लिहिणं खासच होतं. ड्रायव्हरला विचारलं तर तो म्हणाला, “बहुत सारी गाडीयों पे यहा लिखते है.” कदाचित अनेक जण लिहितात म्हणून त्यानंही लिहिलंय असं त्याला म्हणायचं होतं. पण रस्त्यावर जागोजागी सैन्य असणार आणि त्यातून असं रिबेल लिहिलेल्या अनेक गाड्या दररोज रस्त्यानं येणं जाणं करत असतील, हे नवीन होतं. माध्यमातून आपल्यापर्यंत येणाऱ्या काश्मीरपेक्षा तिथं फिरताना जाणवणारं काश्मीर जास्त गुंतागुतींचं आहे हे समजण्यासाठी गाडीवर लिहिलेला हा रिबेल शब्द पुरेसा होता.
उंच पहाडांमधून जाणारा रस्ता, उंचावर दिसणारी एकटी एकटी घरं, मध्येच खोल दरीतून वाहत जाणारी चिनाब, रस्त्याच्या बाजूला दऱ्यांच्या टोकांवर असणारे लहान-लहान धाबे, नुकताच उद्घाटन झालेला बनिहाल विद्युत प्रकल्प, भारतातला सगळ्यात मोठा चिनानी–नस्री बोगदा आणि जम्मू–काश्मीरला जोडणारा जवाहर बोगदा पार करत शेवटी ज्याला ‘व्हॅली’ म्हणतात त्या श्रीनगर–काश्मीरमध्ये प्रवेश केला. जवाहर बोगद्याला असणारी कडेकोट सुरक्षा पाहताच तुम्ही आता व्हॅलीत पोचलाय याची जाणीव व्हायला वेळ लागत नाही. जवाहर बोगदा ओलांडून घाट संपला की चार पदरी राष्ट्रीय महामार्गाची भव्यता जाणवायला लागते. मध्येच शस्त्रधारी सैनिक रस्त्याच्या कडेला उभे असलेले दिसायचे. वर्तमानपत्रांत चकमकीच्या बातम्यांमध्ये वाचलेली अनंतनाग, बारामुल्ला, गुलमर्ग या गावांची नावं आता रस्त्याकडेच्या पाट्यांवर दिसायला लागली होती. पण चकमकी होत असतील असं वाटण्यासारखं काही आसपास जाणवत नव्हतं. सगळीकडं शांतता होती. फक्त रस्त्यावर पेट्रोलिंगसाठी उभे जवान तेवढे या भागाच्या संवेदनशील असल्याची जाणीव करून देणारे.
हा सगळा अनुभव घेत संध्याकाळी सात वाजता श्रीनगरमध्ये पोहचलो. पुढं गुलमर्ग–बारामुल्लाकडं जाणाऱ्या त्या शेअरिंग जीपनं मला श्रीनगरमधील नौगाव कॉर्नरवरती सोडलं होतं. राष्ट्रीय महामार्गावर उभं राहून जाणवणाऱ्या शांततेनं तिच्या आत काय काय दडवून ठेवलंय, हे समजून घ्यायला मी उत्सुक होतो. लाल मण्डीला जायला ऑटो मिळवण्यासाठी जरा आसपास हिंडलो. शेवटी एक ऑटो भेटला आणि मी श्रीनगरमध्ये प्रवेश केला. तसं अंधार पडल्यावर शहर जवळपास बंद झालंच होतं. त्यात रमजान सुरू झालेला. लहान लहान गल्ली बोळातून ऑटो जात होता. मी आपला उत्सुकतेनं बंद दुकानांच्या शटर्सवर काळ्या रंगानं लिहिलेले शब्द वाचत होतो. काळ्या स्प्रेनं ‘रिबेल’, ‘गो बॅक’, ‘आजादी’ हे शब्द भिंतींवर, शटरवर लिहिलेले. प्रत्येक शब्दामागे मागच्या सत्तर वर्षांच्या राजकीय वातावरणाचे संदर्भ होते…
***
काश्मीर खोऱ्यात उन्हाळ्याची सुरूवात झाली होती. ‘गल्फ न्यूज’साठी फोटोजर्नलिस्ट म्हणून काम करणारा नजमस मला सकाळीच हॉटेलवर भेटायला आलेला. उंच, लेदर जॅकेट घातलेला, पाठीवर कॅमेऱ्याची बॅग असणारा हा वीस-एकवीस वर्षाचा पोरगा. नजमसला पोलीस अधिकारी व्हायचं होतं पण आजूबाजूला काही गोष्टी (त्या न छापण्याच्या अटीवर त्यानं मला सांगितल्या होत्या) घडल्या आणि तो फोटोग्राफीकडं वळला. त्याला काश्मीरमधली हिंसा, स्टोन पेल्टींग वगैरेचे फोटो काढण्यात मात्र रस नाही. यापेक्षा इतर गोष्टी कव्हर करायला वाव आहे असं त्याला वाटतं.
‘स्टोन पेल्टिंगचे फोटो काढण्यात रस नाही म्हणणारा हा कसला काश्मीरमधला फोटोग्राफर’ असं मला सतत त्याच्याबदद्ल वाटून गेलं. कारण सगळी माध्यमं, त्यात काम करणारी माणसं यांचं अस्तित्व आणि अवकाश फक्त तिथला संघर्षच आहे, असं आपल्यासारख्या बाहेरून जाणाऱ्याला वाटू शकतं. पण वास्तव अजून खूप काही निराळं आहे. तिकडून आल्यावर हे लिहिताना काही दिवसांपूर्वी त्याचा फोन आल्यानंतर कळालं की, तो आता पुढच्या तीन वर्षासाठी असोसिएट प्रेससोबत काम करण्यासाठी इजिप्तला गेलाय.
लाल मंडीकडून जे मॉल चौकाकडं जाताना भरपूर पंजाबी हॉटेल्स आहेत. तिथंच एक मोठा गुरूद्वारापण आहे. तिकडं साहजिकच अनेक पंजाबी लोकांची उठबसही आहे. मुलाखती आणि इतर गोष्टींचं नियोजन आणि भेटीगाठीसाठी ही जागा चांगली होती. एका सकाळी नजमससोबत तिकडं बसलो होतो.
बोलता बोलता नजमस म्हणाला, “अरे सर, आपको वो मसरत जेहरा का पता चला क्या?”
मी म्हणालो, “नहीं, क्या हुआ है?”
तो सांगू लागला, “अरे सर, उसका एक एनकाऊंटर कव्हर करते वक्त का फोटो व्हायरल हुआ है. फेसबुक पर लोक उसको मुखाबिर कहके बहोत गंदी गंदी गालियां दे रहे है.”
हे बोलता बोलता त्यानं तो फोटो मला दाखवला. श्रीनगरच्या जवळपासच्या जंगलातला एनकाऊंटर साईटवरचा हा फोटो होता. अंगावर बुरखा–हिजाब घातलेली, गळ्यात कॅमेरा अडकवलेली, पाठीवर निळ्या रंगाची फोटोजर्नालिस्टकडं असावी तशी बॅग, पायात पाढऱ्या रंगाचे बूट अशी एक मुलगी झाडाच्या आड उभारून एनकाऊंटरचे फोटो काढत आहे.
तिच्या आजूबाजूला सैन्याचे चार जवान पोझिशन घेऊन उभे आहेत. पाहता क्षणी लक्षात येईल की, तिला या फोटोत फ्रेम करण्यात आलं आहे. हा फोटो स्वत: मसरतनी फेसबुकवर टाकला होता. तो व्हायरल झाला. तिला मुखाबिर अर्थात हेर म्हणून ट्रोल करायला सुरूवात झाली. नंतर तिनं तो फोटो हटवला खरा पण तिला जेवढा त्रास व्हायचा होता तो झाला. मसरत काश्मीर सेंट्रल विद्यापीठाची विद्यार्थीनी आहे. सोबतच ती फोटोजर्नालिस्ट म्हणून कामही करते. श्रीनगरमधल्या मुक्कामात मी अनेकांकडून तिच्या मुलाखतीसाठी प्रयत्न केले पण ती कोणाशीही बोलायला तयार नसल्याचं कळलं. या सगळ्या प्रकरणानं मात्र अनेक प्रश्न माझ्यासमोर उभे केले होते.
मसरतचा राजकीय स्टँड काय माहिती नाही, पण फक्त एनकाउंटर कव्हर करताना तिच्या आजूबाजूला सैनिक आहेत म्हणून ती लगेच गद्दार कशी होवू शकते? फोटोजर्नलिस्ट म्हणून ती फक्त तिचं काम करत होती की अजून काही? बाकीचेही लोक कॅमेरे घेऊन तिथंच असतील मग फक्त ती मुलगी आहे म्हणून तिला फ्रेम आणि ट्रोल केलं गेलं का? समजा तिला एखादी बंदुकीची गोळी लागली असती तर काश्मीरमध्ये एनकाउंटरमध्ये मारले गेलेल्यांच्या अंत्यविधीला असते तेवढी गर्दी तिच्यासाठीही झाली असती का? यापुढं काम करताना तिच्यात तेवढं धैर्य राहील का? यापुढं काम करताना तिच्या डोक्यात ती आधी पत्रकार आहे की काश्मीरी आहे, हा घोळ असणार की नसणार? यानंतर असं काम करताना किती पत्रकारांना त्यांच्या अस्मितांच्या पलीकडं जाऊन काम करण्याचं धाडस दाखवता येईल?
श्रीनगर शहरातली बहुतांश माध्यमांची कार्यालयं ही लाल चौकाजवळच्या प्रेस कॉलनीमध्ये आहेत. तर काही मोजक्या पण महत्त्वाच्या वर्तमानपत्राची कार्यालयं ही जवाहर नगरमध्ये आहेत. लाल मण्डीहून जवाहरनगर तसं पायी दहा मिनिटाचं अंतर. त्यामुळं तिकडं कोणाला भेटायचं असलं की चालतच जायचो. लालमण्डी आणि जवाहर नगरच्यामध्ये जे मॉल चौक लागायचा जिथं सतत प्रचंड सिक्युरिटी असायची. कदाचित हा सिव्हिल लाईनकडं जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी असल्यामुळं असेल. चौकाच्या प्रत्येक कोपऱ्यावर दहा-दहा पावलांच्या अंतरावर छातीवर बंदूक धरून सतत सज्ज असलेले सैनिक दिसायचे. सोबत सशस्त्र जीपही.
वृत्तपत्रांच्या फोटोंमधून दिसणारं काश्मीर मला फक्त अशा काही मर्यादित चौकांमध्येच दिसायचं. बाकी ठिकाणी जास्त काही सुरक्षा जाणवली नाही. या चौकातून डावीकडं जवाहर नगरकडं जाण्यासाठी वळलं की रस्ता पूर्ण मोकळाच असायचा. म्हणजे सहाशे-सातशे मीटर चालत जाऊन पुढं उजवीकडं वळेपर्यंत फक्त एखादं-दुसरं वाहन गेलेलं दिसायचं. त्या मोकळ्या रस्त्यावरून थोडं दूरवर पाहिलं की समोर बर्फानं झाकलेली शिखरं दिसायची. जवाहर नगरच्या जे–३८ क्रमांकाच्या इमारतीकडं जाण्यासाठी वळलं की, डावीकडं इंडियन एक्सप्रेस, डेली चट्टान आणि एक दोन वृत्तवाहिन्यांची कार्यालयं लागतात.
त्या रांगेतलं शेवटचं कार्यालय हे “काश्मीर इमेजेस” या वृत्तपत्राचं. जवाहर नगर मधली ही कार्यालयं सरकारी बांधकामं व इमारतींमधली. एकदम काश्मीरमधलं खास लाकडी बांधकाम. बाहेर एक गेट, त्यानंतर थोडी मोकळी जागा आणि मग मुख्य दरवाजा अशी रचना. बाहेरच्या गेटचा मोठा भाग सतत बंद आणि बाजूला एक येण्या जाण्यापुरता छोटा दरवाजा. तो उघडा असायचा. आकाशी रंगाच्या त्या गेटवर पांढऱ्या स्प्रेनी मोठ्या अक्षरांमध्ये लिहिलेलं प्रेसचं किंवा त्या वर्तमानपत्राचं नाव त्या इमारतीची आयडेंटिटी गडद करणारं. कदाचित तो बचावपण होता अप्रत्यक्षपणे. ही इमारत माध्यमांचं कार्यालय आहे, हे सांगत केला जाणारा…
जवाहर कॉलनीमधल्या जे-३७ इमारतीच्या गेटचा छोट्या दरवाज्याच्या बाजूला लावलेली बेलची कळ दाबली. आतून आवाज आला, ‘कौन?’ मी स्वत:बद्दल सांगितलं, “बशीर साब से मुलाकात तय हुई थी.”
बशीर मंजर, ‘काश्मीर इमेजेस’ वर्तमानपत्राचे संपादक. २०१७ मध्ये पुण्यात ‘इंडो–पाक पीस फोरम’अंतर्गत काश्मीरमधील दोन पत्रकारांशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात बशीर मंजर यांची ओळख झालेली.
काश्मीरी वेशात असलेल्या एका व्यक्तीनं गेट उघडलं. नंतर कळालं की तो तिथला सहसंपादक आहे. गेटमधून आत गेलो. व्हरांड्याची जागा सोडली की पुढं मुख्य दरवाजा. मुख्य दरवाज्यातून आत गेलं की, कार्यालयाचं ते वेटिंग रूम. डावीकडं असलेलं दार म्हणजे न्यूज रूम. त्याच्या थोडं पलीकडचं दार म्हणजे, नमाज पढण्याची आणि कर्मचाऱ्यांच्या राहण्याची जागा. पुढं जाऊन डावीकडं लाकडी पायऱ्या चढून वर गेलं की, संपादकांचं ऑफीस. पूर्ण लाकडात बनवलेलं.
बशीरजी गेली तीन दशकं पत्रकारितेत आहेत. रमजान चालू असल्यामुळं कमीत कमी वेळात मुलाखत संपवायची असं ठरलं होतं. त्यामुळं मोजके प्रश्न आणि मोजकी उत्तरं असा संवाद सुरू झाला. काश्मीरमधली माध्यमं, ती देत असलेला आशय याबदद्ल बोलताना ते स्पष्टपणे सांगतात की, “काश्मीर प्रश्न आणि घडामोडींबदद्ल स्थानिक माध्यमं सर्वाधिक प्रोफ्रेशनल राहिली आहेत. त्यांनी सातत्यानं जे आहे तेच मांडण्याचा प्रयत्न केलाय.”
प्रोफेशनालिझमबद्दल अधिक विचारल्यावर ते सांगू लागले, की “बातमीमध्ये फॅक्ट्स महत्त्वाचे असतात. त्यांच्याबाबतीत तुम्ही तडजोड करू शकत नाही.” सोप्या भाषेत आहेत ते फॅक्ट्स लोकांसमोर व्यवस्थित मांडत राहणं ही मंजर यांची प्रोफेशनालिझम बदद्लची सोपी व्याख्या. पण ते फॅक्ट्स कोणत्या परिस्थितीमध्ये अस्तित्वात येतात याची चिकित्सा करायला नको का? असं विचारल्यावर ते म्हणाले, “त्यासाठी अभ्यासक आहेत. ते त्यांची मतं त्यांच्या लेखांमधून व्यक्त करू शकतात. बातमीमध्ये वार्ताहराचं वैयक्तिक मत नसायला हवं. वार्ताहरानं जे घडतंय ते योग्य पद्धतीनं वाचकांपर्यंत पोचवलं पाहिजे. काश्मीर सतत संघर्षाचं केंद्र असल्यानं राजकारण आणि संघर्षापलीकडचे विषय आम्हाला माध्यमं म्हणून जास्त प्रमाणात हाताळता येत नाहीत, त्याला आमच्याही मर्यादा आहेत.
आमची पत्रकारिता प्रोफेशनल आहे म्हणून काश्मीरमधल्या तरूणांना सिरियामधील संघर्ष कव्हर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून सर्वाधिक मागणी आहे. काश्मीरमधले पत्रकार सिरियामधला संघर्ष, तसंच रोहिंग्यांचा विषय तेवढ्याच प्रोफेशनल पद्धतीनं कव्हर करताहेत, कारण असा संघर्ष त्यांना जन्मापासून सवयीचा आहे. पत्रकारितेमध्ये आल्यानंतर प्रोफेशनल कसं राहायचं हे त्यांना शिकवायची गरज पडत नाही.” मीडिया अॅ्क्टिविजमबद्दल विचारल्यावर मंजर यांचं उत्तर आतापर्यंत भेटलेल्या काश्मीरी पत्रकारांहून थोडं वेगळं होतं. ते म्हणतात, “मीडिया अॅाक्टिविजममुळं काश्मीरमधली पत्रकारिता मरत चाललीय. इथं संघर्ष आहे, त्यामुळं बातमी आहे. ती योग्य बातमी वाचकांपर्यंत जाण्यासाठी अॅक्टिविजमपेक्षा चांगल्या जर्नालिझमची गरज आहे. आतापर्यंत तरी स्थानिक पत्रकारितेनं तो प्रोफेशनालिझम जपलाय. त्यामुळं संपादक म्हणून सहकारी निवडतान प्रोफ्रेशनालिझम हा महत्त्त्वाचा मुद्दा मी गृहीत धरतोच.”
पुढं स्थानिक पत्रकारितेबदद्लच्या आव्हानांबदद्ल बोलताना मंजर सांगतात, “एक संपादक म्हणून कोणत्याही परिस्थितीत माझ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता माझ्यासाठी सर्वात महत्वाची. मग तो बातमीदार असो, फोटोजर्नालिस्ट असो वा न्यूजरूममधला सहाय्यक संपादक असो. सगळ्या परिस्थितीला पत्रकार म्हणून सामोरं जाणं गरजेचं आहे. इथला तणाव कमी करण्यासाठी स्थानिक माध्यमांची महत्त्त्वाची भूमिका असणार आहे.”
मालक आणि संपादक अशा दोन्ही पदांवर असणारा पत्रकार मी पहिल्यांदा पाहत होतो. कदाचित यामुळंच त्यांच्यासाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता प्राथमिकतेवर असावी. माध्यमांमधून या संघर्षाचा मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न मंजर करत आहेत.
निघताना त्यांनी आवर्जून त्यांच्या कार्यालयाच्या बाजूला असणाऱ्या ‘डेली चट्टान’ या उर्दू वृत्तपत्राच्या संपादकांना भेटण्यास सांगितलं. ‘डेली चट्टान’ हे काश्मीरमधील सर्वाधिक खपाचं उर्दू वर्तमानपत्र. बत्तीस वर्षापूर्वी या वर्तमानपत्राची सुरूवात झाली होती. असंही सांगितलं जातं की, काश्मीरमध्ये सुरू झालेल्या मिलिटन्सीची पहिली बातमी याच वर्तमानपत्रानं केली होती.
वर्तमानपत्राचे संपादक ताहिर मोईद्दीन यांना फोन केला, तर ते कार्यालयातच होते. त्यांनी लगेच वेळ दिला. ‘डेली चट्टान’चं कार्यालयही ‘काश्मीर इमेजेस’ सारखं. गेटवरही तसंच वर्तमानपत्राचं नाव पांढऱ्या स्प्रेनी लिहिलेलं.
पांढरा कुर्ता-पायजमा घातलेले, त्यावर जांभळ्या रंगाचं काश्मीरी जॅकेट, वयाची साठी ओलांडलेल्या ताहिर साहेबांचं व्यक्तिमत्त्व सहज छाप पाडणारं. गेल्या-गेल्या त्यांनी अत्यंत आपुलकीनं माझी विचारपूस केली. रमजानच्या काळात हा एकटाच संपादक होता ज्यानं माझ्यासोबत गप्पा मारता–मारता चहा बिस्किट घेतले. ते कदाचित रमजान पाळत नसावेत. बत्तीस वर्षापूर्वी त्यांनी ‘डेली चट्टान’ हे उर्दू वर्तमानपत्र सुरू केलं. त्यांनी पत्रकारितेला सुरूवात केली ती ‘डेली आफताब’ या नामांकित वर्तमानपत्रामधून. या मुलाखतीमुळं कदाचित तेही त्यांचा प्रवास पुन्हा नजरेसमोर आणत होते. या माणसाकडं काश्मीरच्या संघर्षातून आतापर्यंत प्रवास झालेल्या तिथल्या पत्रकारितेच्या जेवढ्या आठवणी होत्या तेवढ्या कदाचित दुसऱ्या कोणाकडं नसाव्यात, असं बशीर मंजर यांनी मला सांगितलं होतं.
आमच्या सगळ्या चर्चेत ताहिर यांनी एक महत्त्वाचा मुद्दा नजरेस आणून दिला तो म्हणजे, सरकारी संकेतस्थळावर काश्मीरमधील जेवढी वर्तमानपत्र आहेत त्यातील जवळपास चारशे वर्तमानपत्रं ‘फेक’ आहेत. काश्मीरमधील माध्यमांसंबंधी समित्या गठित करण्यात आल्या, तेव्हा सातत्यानं ‘काश्मीर एडिटर्स गिल्ड’नं या मुद्दाकडं त्या समित्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पण त्याचं पुढं काही झालं नाही, याची खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती.
श्रीनगरमधील स्थानिक माध्यमांकडं बाहेरच्या लोकांच्या पाहण्याच्या दृष्टीकोनाबदद्ल विचारलं असता ते म्हणतात, की ‘हे दुटप्पी वागणं आहे. म्हणजे इथं सुरू असलेल्या वर्तमानपत्रांची माहिती सरकारच्या संकेतस्थळावर आहे. सरकार त्यांना परवानगी देतं. ती सुरू आहेत की नाहीत याच्याशी त्यांना काही देणं-घेणं नाही. म्हणजे सरकार जर काश्मीरमधील स्थानिक माध्यमांची बाहेर एवढी बदनामी करत असेल तर ते ‘जिहादी अखबार’ नावाच्या वर्तमानपत्राला परवानगी देतंच कसं?
काश्मीरमधील संघर्ष आणि माध्यमांबद्दल बोलताना ते सांगतात की काश्मीरमधील संघर्षानं बातमीला जन्म दिला. या बातम्यांमधून इथं माध्यमांचा स्फोट झालाय. बहुतांश आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय माध्यम समूहांचे वार्ताहर तुम्हांला इथं भेटतील. त्यातले अनेक मुक्त पत्रकार आहेत. सोबतच स्थानिक माध्यमांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलीय. पण त्यावर कुणाचं नियंत्रण नाही.
ताहिरजी त्यांच्यावर दोन्ही बाजूंकडून झालेल्या हल्ल्याबद्दल सांगत होते. खलिसिंगा इस्टेटमध्ये ‘चट्टान’चं कार्यालय असताना तिथं बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला होता. ह्या सगळ्या अडचणींमधून ‘चट्टान’चा प्रवास अजूनही सुरू होता. पत्रकारांच्या आणि त्यांच्या स्वत:च्या अपहरणाच्या अनेक आठवणी त्यांच्याकडं आहेत. ‘पापा २’ या चौकशी कक्षातील त्यांच्या आठवणी ऐकताना काश्मीरमध्ये पत्रकार म्हणून वावरणं काय हे उमजायला लागलं होतं. ‘पापा २’ हे सीमा सुरक्षा दलातर्फे १९८९ ते १९९६ या काळात स्थापन करण्यात आलेलं चौकशी केंद्र होतं. या केंद्राबद्दल वार्तांकन करतानाचे त्यांचे अनुभव, त्यातून बातमी मिळविण्याची धडपड आणि ती छापेपर्यंतचा हा संघर्षच त्यांना आजपर्यंत पत्रकारितेत टिकून राहण्यासाठी महत्त्वाचा ठरला असावा.
या सगळ्या शोधात तरूण पत्रकारांना भेटणंही महत्त्वाचं होतं. त्यातही पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना भेटणं माझ्या मुख्य अजेंड्यावर होतं. ना जीवाची खात्री ना म्हणावा तेवढा पैसा, असं असताना या सगळ्यांची पत्रकारितेत यायची प्रेरणा काय याचा शोध घ्यायचा होता. त्यासाठी काश्मीर केंद्रीय विद्यापीठ गाठायचा निर्णय घेतला. काश्मीर केंद्रीय विद्यापीठातील एका मैत्रीणीच्या ओळखीनं तिथल्या पत्रकारिता विभागातल्या प्राध्यापकांच्या ओळखी झाल्या.
काश्मीर केंद्रीय विद्यापीठाच्या कॅम्पस दोनच्या चौथ्या मजल्यावर पत्रकारिता विभाग आहे. ‘स्कूल ऑफ मिडिया स्टडीज’, ‘डिपार्टमेंट ऑफ कॉर्न्व्हंजन्ट जर्नालिझम’ अशा पाट्या त्या मजल्यावर दिसतात. वातावरण कोंदट. ‘द हाफ मदर’ या कादंबरीचे लेखक शहनाज बशीर याच विभागात कार्यरत आहेत. ‘द हाफ मदर’ ही तशी गाजलेली कादंबरी. तिचं मराठी भाषांतर पण नुकतंच आलंय.
शहनाज यांच्या केबिनमध्ये शिरताच समोर मोठी काचेची खिडकी दिसते. उजव्या बाजूला निळा शर्ट घातलेले साधारण पंचेचाळीशीचे शहनाझ खुर्चीवर बसलेले. मागे असलेल्या बोर्डावर त्यांच्या ‘द हाफ मदर’ या कादंबरीची काही परिक्षणं आणि त्यांच्या मुलाखती चिकटवलेल्या. त्यांच्याशी बोलण्याची सुरूवात काश्मीरी मुलं पत्रकारितेमध्ये कशामुळं येतात या प्रश्नानंच झाली.
शहनाज खूप काळजीपूर्वक शब्द वापरत त्यांचं म्हणणं मांडत होते. प्राध्यापक, लेखक आणि पत्रकार असल्यामुळं सध्याच्या पत्रकारितेबदद्ल सांगण्यासारखं त्यांच्याकडं खूप काही होतं. विद्यार्थ्यांबदद्ल सांगायला त्यांनी सुरूवात केली. “आमच्याकडं श्रीनगरमधल्या लाल चौकातून ते दुर्गम पर्वतरांगातल्या गावांमधून मुलं पत्रकारिता येतात. त्यात आता मुलींची संख्याही वाढते आहे. पण ती मुलांएवढी नक्कीच नाही. या सर्व मुलांकडं जगाला सांगण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत, ते सांगण्याची गरजच त्यांना पत्रकारितेकडं घेऊन येते.”
या मुलांसाठी उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संधींबद्दल विचारलं असता ते म्हणाले, “आतापर्यंत तरी कोणत्याही राष्ट्रीय माध्यम समूहांनी श्रीगनरमध्ये येऊन प्लेसमेंट केली नाही. ‘ई – टिव्ही भारत’नं नुकतीच प्लेसमेंट केली पण त्याची कारणं वेगळी आहेत. एकतर काश्मीरमध्ये आता उर्दू पत्रकारिता कमी होत चालली आहे. त्यामुळं कमी पैशांत उर्दू पत्रकारितेसाठीचं मुलं त्यांना इथं मिळतात म्हणून ते इकडं आले होते. आणि काश्मीरमधील स्थानिक जागांसाठी देखील आता स्थानिक मुलांना म्हणाव्या तेवढ्या संधी नाहीत. राष्ट्रीय माध्यमसमूह त्यांचे बाहेरचे वार्ताहर इथं आणताहेत.”
या बाहेरच्या वार्ताहरांबदद्लची त्यांनी केलेली मांडणी महत्त्वाची वाटली. ते सांगतात, “इथली सुरक्षा यंत्रणा वार्तांकनासाठी स्थानिक पत्रकारांपेक्षा या बाहेरच्या पत्रकारांना पूरक अशी वागत असते, कारण हे लोक त्यांचा अजेंडा पुढं नेण्याचं काम करतात. परिस्थितीचं काहीसं चुकीचं चित्र ते बाहेरच्या लोकांसमोर मांडतात. बरं त्यातही तो बाहेरचा पत्रकार दिल्लीच्या धोरणांशी पूरक वार्तांकन करत नसेल तर त्याच्यावर कंट्रोल म्हणून दुसरा वार्ताहर तिथं नेमण्यात येतो.”
संघर्षातून येणाऱ्या या मुलांना बायस्ड न होता वार्तांकन करायला शिकवणं अवघड आहे का हा जरा खोचक प्रश्न त्यांना विचारल्यावर, त्यांच्या बोलण्याचा सूर पूर्णपणे बदललाच. ते म्हणाले, “मला वैयक्तिक बॅलन्स्ड असणं आवडत नाही. जिथली परिस्थिती मुळातच बॅलन्स्ड नाहीये तिथं बॅलन्स्ड वार्तांकन करता येतं असं समजणं हे मुळातच चुकीचं आहे.”
मसरत जेहरा ही शहनाज यांची विद्यार्थींनी. त्यामुळं तिच्याबद्दल त्यांना विचारल्यावर ते अत्यंत आत्मीयतेनं बोलायला लागले. ‘मसरतला मी चांगल्या प्रकारे ओळखतो. त्यामुळं तिच्या बाबतीत जे घडलं त्यानंतर सुरूवातीला मी माझ्या विभागाकडून प्रतिक्रियेची वाट पाहिली. ती मिळाली नाही तेव्हा मी स्वतःच पहिल्यांदा या प्रकरणाचा वैयक्तिक निषेध नोंदविला. तिला बरोबर त्या सगळ्यामध्ये फ्रेम करण्यात आलं होतं. हे सगळं जाणीवपूर्वक केलं गेलं हे सांगण्याची विशेष गरज नाही.”
इथल्या विद्यार्थ्यांकडं सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. पण त्या पत्रकारितेमधूनच का मांडायच्या, यावर शहनाज यांनी एका वाक्यात दिलेलं उत्तर खूप महत्त्वाचं होतं. ते म्हणाले, की ‘जर्नलिझम इज अॅदन इन्स्टिट्युशनल आर्ट.’
शहनाज यांची भेट खूप काही उलगडून सांगणारी होती. त्यांच्या केबिनसमोरच्या वर्गात काही मुलं बसली होती. थोड्या वेळातच त्यांचं लेक्चर सुरू होणार होतं. रशिद मकबूल हे प्राध्यापक वर्गात शिरणार तेवढ्यात त्यांच्याशी ओळख करून घेतली. त्यांच्या वर्गातच त्यांच्यांशी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांशी गप्पा रंगल्या.
रशिद मकबूल यांनी स्वत: आंतरराष्ट्रीय माध्यमांसोबत काम केलंय. ते सांगतात, “काश्मीरमधली हिंसा ही काही बुऱ्हाण वाणी प्रकरणानंतर सुरू झाली नाही. ती त्याआधीही इथं होतीच. फक्त भारतीय माध्यमांनी त्याचं वार्तांकन करायला वाणी प्रकरणानंतर सुरूवात केली. पूर्वी फक्त आंतरराष्ट्रीय माध्यमं हा हिंसाचार कव्हर करत होती. भारतीय माध्यमांनी काश्मीरमधील हिंसाचाराला कधीच न्याय दिला नाही. राज्यव्यवस्थेनं तर सातत्यानं काश्मीरी लोकांची बाजू मांडणाऱ्या स्थानिक माध्यमांना त्रासच दिला. मागील सरकारच्या काळात पी. चिदंबरम गृहमंत्री असताना इथल्या पत्रकारितेच्या दमनाचा नवा अध्याय इथं सुरू झाला. पूर्वी पत्रकारांवर हल्ले व्हायचे, त्यांना बाहेर काढून मारहाण केली जायची. चिदंबरम यांनी स्थानिक माध्यमांच्या सरकारी जाहिराती बंद केल्या. काश्मीरमध्ये उद्योग नाहीत त्यामुळं जाहिराती आहेत त्या फक्त सरकारीच. माध्यमांना त्रास देण्याची ही नामी युक्ती त्यांनी शोधून काढली. मी कधी काळी काम करत असलेलं ‘इत्तिलाख’ हे वर्तमानपत्र याच धोरणामुळं बंद पडलं. अशी अनेक नावं सांगता येतील.”
हे सगळं बोलताना, २०१० मध्ये नवहाटा परिसरात त्यांच्यासोबत घडलेली एक आठवण त्यांनी सांगितली. वार्तांकन करत असताना त्यांना सीआरपीएफच्या जवानांकडून रोखण्यात आलं होतं. तिथल्या जवानानं त्यांना वरिष्ठाकडं पाठवलं. वरिष्ठ म्हणाले, “मेरे खिलाफ लिखने जा रहे हो तो मैं कैसे तुम्हे जाने दूं?” त्यानंतर एका जवानानं बंदुक रोखत त्यांना तिकडून हाकलून लावलं होतं.
पुढं बोलताना ते सांगत होते की, “आता पूर्वीसारखा मिलिटन्ट्सचा धाक माध्यमांवर राहिला नाहीये. मिलिटन्ट्सकडून होणाऱ्या हिंसाचाराच्या बातम्या आता स्थानिक माध्यमांमध्ये पहिल्या पानावर छापल्या जातात. पण मुळात माध्यमांच्या बाजूनं पाहताना, राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर चालणाऱ्या प्राईम टाईम डिबेट्स या सध्याच्या काश्मीरमधील अस्थिरतेसाठी कारणीभूत आहेत, असं मला वाटतं.”
या अशा चर्चांमुळं अजूनही काश्मिरी लोकं स्थानिक माध्यमांवर जास्त विश्वास ठेवून आहेत.
रशीद मकबूल यांच्याशी चर्चा केल्यानंतर आमची चर्चा ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारलं की, “पत्रकारिता तुमच्यासाठी काय आहे?” उमर फैज नावाच्या विद्यार्थ्यानं मोकळेपणानं सांगितलं की, “इथं जगाला सांगण्यासाठी सगळ्यांकडे वेगवेगळे अनुभव आहेत. आम्हांला आमचं सत्य मांडण्यासाठी झगडावं लागतं. त्यामुळं सत्य मांडण्याची किंमत आणि महत्त्व आम्हांला माहिती आहे. आपलं जगणं जगासमोर मांडणं याशिवाय दुसरा कोणताच स्वार्थ आमच्यासमोर नाहीये. सत्य मांडण्यासाठी कोणत्या परिस्थिताला समोरं जावं लागतं ते कामरान युसूफ प्रकरणानंतर परत एकदा स्पष्ट झालंय.”
कामरान युसूफ या फोटोजर्नालिस्टला राष्ट्रीय तपास यंत्रणेनं तो ‘स्टोन पेल्टर’ (दगडफेक्या) आहे म्हणून अटक केली होती. त्यानंतर कामरानच्या सुटकेसाठी अनेक राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनांनी दबाव टाकला. चार महिन्यानंतर कामरानची सुटका झाली. कामरान सध्या स्वत:चा मोबाईल वापरत नाही. त्यामुळं त्याच्या वकिलांशी बोलून त्याच्याशी थोडी चर्चा करता येईल का यासाठी प्रयत्न केला. पण तेही शक्य झालं नाही.
दुसऱ्या दिवशी बारामुल्ला, सोपोरला जाण्याचं नियोजन करत बसलो होतो. सोपोरचा फोटोजर्नालिस्ट जुनेदचा फोन आला. “सर कल आप बाहर मत निकलना. कल प्राईम मिनिस्टर श्रीनगर आनेवाले है तो श्रीनगर बंद का ऐलान हुवा है. उधर आने को आपको बस, जीप कुछ नही मिलेगा.”
तो दिवस होता १९ मे. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय काश्मीर दौऱ्यावर आले होते. त्यात ते जोझिला बोगदा आणि किसनगंगा जलविद्युत प्रकल्पाचं लोकार्पण करणार होते. त्यांच्या दौऱ्याचा निषेध करण्यासाठी त्या दिवशी फुटीरतावादी संघटनांनी श्रीनगर बंदचं आव्हानं केलं होतं. त्यामुळं आदल्या रात्री जेवायला बाहेर पडलो तेव्हा वातावरणात तणाव जाणवायला सुरूवात झाली होती. हॉटेलवाल्यांनी ‘उद्या बाहेर पडू नका’ असं आवर्जून बजावलं होतं. सैन्याच्या गाड्यांची, काश्मीर पोलिसांच्या जीप्सची वर्दळ आज जास्त वाढल्याचं जाणवत होतं.
१९ तारखेला थोडा अंदाज घेऊन हा तणाव अनुभवायचा असं ठरवलं आणि फोटो जर्नालिस्ट सना मट्टोला भेटण्यासाठी वेळ घेतली. इंटरनेट कालपासूनच बंद झालं होतं. लाल मण्डीतील माझ्या हॉटेलसमोरूनच झेलम वाहत होती. लाल मण्डीकडून झेलमच्या किनाऱ्यानं सिव्हिल लाईनकडं थोडं चालत गेलं, की डावीकडं नदीवर एक पूल लागतो. बंदमुळं त्या पुलाच्या दोन्ही बाजूला सैन्याची वाहनं आणि जवान दिसत होते. पूल ओलांडून पलीकडं काही एक पावलं चालत गेलो की, संघर्षाचं केंद्र असणारा लाल चौक. पुलाच्या मध्यभागी लावण्यात आलेल्या खांबावर रिबेल, फ्रिडम हे शब्द खोडलेले असले तरी कळत होतेच.
पूल ओलांडून पलीकडे लाल चौकाकडं निघालो. तणाव आणि शांतता एकाचवेळी अनुभवत होतो. रस्त्यावर कोणीच नव्हतं. अजून तरी कोणीच हटकलंही नव्हतं. एका बोळीतनं वळणं घेऊन काही पावलं चाललो तर पुढं लाल चौकामधला घड्याळ असलेला खांब स्पष्ट दिसत होता. तेवढ्यात समोर उभ्या असलेल्या, छातीवर बंदुक असलेल्या जवानानं हातानंच परत जाण्याचा इशारा केला. अंगावर काटाच आला. शांतपणे परत फिरण्याशिवाय पर्याय नव्हता. बाजूलाच असलेल्या प्रेस लाइनपर्यंत जाण्याची परिस्थितीही दिसत नव्हती. त्यानंतर अनेक वेळा गजबजलेल्या लाल चौकात फिरलो पण १९ तारखेला जे अनुभवलं होतं तो माझ्यासारख्या नवख्यांसाठी टोकाचा तणावच होता.
परतल्यावर काही वेळानं फोटो जर्नालिस्ट सना मट्टोला भेटण्यासाठी तोच पुल ओलांडून पलीकडं झेलमच्या किनाऱ्यावर टाकलेल्या बाकड्यांकडं जायला निघालो. प्रेस लाईन जवळ असली तरी तिकडं न भेटता झेलमच्या बाजूने टाकलेल्या बाकड्यांवर सना मट्टोची मुलाखत घ्यायची ठरलं होतं. दुपारी तीनच्या दरम्यान मी पोचलोच होतो. समोर नदीमध्ये एका बोटीच्या डागडुजीचं काम चालू होतं.
डोक्यावर हिजाब, स्पष्ट आवाज, सुबक ठेंगणी अशी ही फोटो जर्नालिस्ट सना मट्टो. काश्मीरमध्ये मोजून तीन महिला फोटो जर्नालिस्ट आहेत त्यातली सना एक. काश्मीरमधील सध्याची पिढी राजकीयदृष्ट्या किती स्पष्ट आहे हे या सनासोबत बोलताना जाणवत होतं. तिचं प्रत्येक वाक्य मोजून मापून राजकीय मत व्यक्त करणारं होतं.
सना मुक्त छायाचित्र पत्रकार आहे. ती ‘झूमा’ या आंतरराष्ट्रीय फोटो एजन्सीसाठी काम करते. २०१७ला ‘काश्मीर केंद्रीय विद्यापीठा’तून कॉर्न्व्हजन्ट जर्नालिझममध्ये तिनं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आणि मागील दोन वर्षांपासून ती फोटो जर्नालिस्ट म्हणून काम करते आहे. ती या क्षेत्रात का आली असं विचारलं असता तिनं स्पष्ट उत्तर दिलं. “मला इथल्या लोकांचं जगणं डॉक्युमेंट करायचं आहे. माझं काम हे माझं इथल्या परिस्थितीला उत्तर आहे. मी माझं काम इथल्या लोकांच्या ‘कॉझ’साठी करत आहे. इथं मोठ्या प्रमाणात हिंसाचार चालू आहे. कित्येक नागरिकांचे बळी गेले आहेत. लोकांना हा संघर्ष मिटवायचा आहे. पण सरकारच्या बाजूनं जोपर्यंत हा विषय काश्मीरचे लोक आणि भारत यांच्यामधला आहे असं गृहीत धरून पावलं उचलली जात नाहीत तोपर्यंत हे असंच चालत राहणार. कारण सध्या प्रश्न काश्मीरचा आहे आणि चर्चा भारत–पाकिस्तानमध्ये होते.”
महिला म्हणून वावरताना तिला येणाऱ्या अनुभवाबद्दल बोलताना ती म्हणाली, “लोक सहकार्य करतात, आता परिस्थिती बदलत चाललीय. लोक स्विकारायला लागलेत. बाकीच्या ठिकाणांसारखं आम्हांला ब्रेकिंग न्यूजची घाई नसते. कुठंही काही झालं तर आम्ही सर्व फोटोजर्नालिस्ट एकत्र जातो. डिस्क्रिमिनेशनचा तर मुद्दाच नाही कारण तुमच्याकडं येणारी बंदुकीची गोळी तुम्ही स्त्री आहात की पुरूष याचा विचार करत नाही!”
तुझ्या कामाची प्रेरणा काय असं विचारल्यानंतर ती लागलीच म्हणाली, “काश्मीर इज इटसेल्फ इन्स्पिरेशन फॉर वर्क.”
सनाच्या बोलण्यातून झुएब मकबूल या फोटोजर्नालिस्टचा संदर्भ आला होता. २०१६चा हिंसाचार कव्हर करताना झुएबच्या चेहऱ्यावर पॅलेट गनचा मारा करण्यात आला होता. त्यात तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्यानंतर त्यानं फोटोजर्नालिझम सोडलं.
या सगळ्यात प्रवासात मला खूप कमी महिला पत्रकार भेटल्या. सना मट्टो, मुनाजाह कवल आणि अनुराधा भसीन. सना मट्टो आणि मुनाजाह या श्रीनगरमध्ये फोटोजर्नालिस्ट म्हणून काम करतात. त्या नव्यानं पत्रकारितेत आलेल्या पिढीच्या प्रतिनिधी आहेत. एकीकडं काश्मीरमध्ये स्टोन पेल्टींगमध्ये मुलींची संख्या वाढत आहे. मात्र सोबतच त्या फोटोजर्नालिस्ट म्हणूनही त्या काम करू लागल्यात. मी काश्मीरवरून परतल्यानंतर ‘द क्वीन्ट’ संकेतस्थळानं श्रीनगरमधील या महिला छायाचित्र पत्रकारांवर केलेली विशेष स्टोरी महत्त्वाची वाटली होती.
अनुराधा भसीन या १९९० मध्ये पत्रकारितेमध्ये आलेल्या पिढीच्या प्रतिनिधी. त्या ‘काश्मीर टाईम्स’च्या संपादक आहेत. जम्मूमध्ये राहतात. काश्मीरवरून परतताना त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्या स्वत: मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. १९९०च्या काळात त्यांच्या वर्तमानपत्राच्या न्यूजरूममध्ये ६० टक्के महिला होत्या. हे त्या आवर्जून सांगत होत्या. आता ते प्रमाण कमी झालं आहे. २०१० पासून त्यांच्या वर्तमानपत्राला मिळणाऱ्या मिळणाऱ्या सरकारी जाहिराती बंद करण्यात आल्या.
श्रीनगरमधली वर्तमानपत्रांची सर्व कार्यालय प्रेस लाईनमध्ये आहेत. प्रेस लाईनच्या सुरूवातीला असलेल्या फुलांच्या दुकानाजवळ तुम्ही आत पाहिलं तरी तुम्हांला कित्येक वर्तमानपत्रांच्या कार्यालयाचे फलक दिसतील. ग्रेटर काश्मीर ते राईजिंग काश्मीरपर्यंत. ‘तिकडं कोणावर विश्वास ठेवायचा नाही’ असं मला अनेकांनी बजावून सांगितलं होतं. तिकडं अनेक जण मिलिट्न्ट्स आणि सैन्याचे खबरी म्हणून वावरतात असं त्या सगळ्यांचं म्हणणं असायचं. त्या सगळ्यां कार्यालयांच्या गर्दीमध्ये मी ‘काश्मीर लाईफ’ या मासिकाचं कार्यालय हुडकत आत शिरलो. तीन चार इमारती सोडून आत गेल्यावर डाव्या बाजूला ‘काश्मीर लाईफ’ असं हिरव्या अक्षरात नाव लिहिलेली पाटी दिसली. त्याच्या बाजूला वरच्या दिशेचा बाण. तिसऱ्या मजल्यावर कार्यालय. फक्त चौदा लोकांचा स्टाफ असलेलं हे मासिक पण यांचा वाचकवर्ग भरपूर. मासिकाचे संपादक मसूद हुसेन यांच्या रूमपर्यंत पोहचलो. दारातून आत डोकावून पाहिलं तर समोरच्या टेबलावर मासिकाचे गठ्ठे पडलेले. काही ठिकाणी लेखाच्या प्रती पडलेल्या. दाराच्या आड टाकलेल्या सोफ्यावर पांढरा कुर्ता-पायजमा घातलेले मसूद सर बसले होते. फरशी आणि छत दोन्ही लाकडी अशी ही सगळी कार्यालयं.
काश्मीरमधल्या त्यांच्या पत्रकारितेबद्दल आणि अनुभवाबदद्ल बोलताना ते म्हणाले, “काश्मीरात तुम्ही दोन स्वायत्ततांच्यामध्ये, म्हणजेच एक सरकार आणि दुसरी सरकारविरोधी गट, यांच्या वातावरणात काम करत असता. संघर्षामुळं इथं प्रत्येकाला ओळख निर्माण करायची गरज पडत नाही. माध्यमांचे आणि राजकारण्यांचे देखील विशेष स्वार्थ इथं निर्माण झालेत. राजकारण, माध्यमं आणि विचारधारा या सगळ्यांचा एकत्रित संगम इथं झालेला दिसतो. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल आणि इथली लोकशाही टिकवायची असेल तर माध्यमांचं स्वातंत्र्य टिकवलं पाहिजे आणि इथं उदयाला आलेली मिलिटन्सी हे व्यवस्थेचं अपयश आहे हे मान्य करायला हवं.”
या सगळ्या प्रवासात मी काश्मीर नव्यानं उलगडून पाहत होतो. काश्मीरमध्ये कधी काळी आणि आताही काही प्रमाणात बीबीसीचा रेडिओ मोठ्या प्रमाणात ऐकला जातो. पत्रकारितेच्या त्यातील तत्वांच्या वेगवेगळ्या छटा पावलोपावली जाणवत होत्या पण शेवटी त्या हिंसेभोवतीच फिरत होत्या. स्थानिक वर्तमानपत्रं न्याहाळताना त्यात रशिया व त्या आजूबाजूच्या देशांतील मेडिकल कॉलेजेसच्या जाहिराती जास्त दिसत होत्या. इथले तरूण या देशामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी जात असावेत. त्यात वातावरणाचाही मुद्दा महत्त्वाचा होता. काश्मीर खोऱ्यातील मुलांना भारताच्या इतर भागात शिक्षणासाठी जाणं हे अधिक तापमानामुळं न झेपणारं असतं असं अनेक जण सांगत होते. त्यामुळं रशिया व इतर देशामध्ये जाण्याला त्यांचा प्राधान्यक्रम असतो.
मी श्रीनगरमध्ये असताना दोन वेळा इंटरनेटची स्पीड कमी करण्यात आली होती. या सगळ्या मर्यादा असताना देखील काश्मीरमध्ये आता डिजीटल माध्यमं वाढत आहेत. ‘काश्मीर न्यूज ऑब्झर्व्हर’ हे त्यातलं एक महत्त्वाचं नाव. नसीर आझम खान हा तरूण हे संकेतस्थळ चालवतोय. झेलमच्या किनाऱ्यावर त्याचं घर आहे. झेलमचं पाणी थोडं जरी वाढलं की त्याच्या घरात शिरेल अशी त्याची राहण्याची जागा. मी जाण्याच्या दोन-तीन दिवस आधीच या भागात एनकाऊंटर झाला होता. त्याच्या खुणा अजूनही त्या परिसरात शिल्लक होत्या. नसीरची वीस जणांची टीम आहे.
या नवीन माध्यमाचं महत्त्व त्याने ओळखलंय. तो त्याच्या वापराबद्दल जागरूक असल्याचं त्याच्या बोलण्यातून जाणवत होतं. सध्या अशा संकेतस्थळांना कोणत्याच जाहिराती नाहीत. त्यामुळं स्वत:च्या पैशातूनच हे सगळं चालवावं लागत आहे. पण नसीरसमोर ही सर्वात मोठी समस्या नाहीये तर माध्यमातला व्यक्ती म्हणून ऑनलाईन माध्यमातून निर्माण होणारी ‘फेक न्यूज’ ही त्याला सध्याची सर्वात मोठी अडचण वाटते. हिंसाचार किंवा बंदच्या काळात इंटरनेट बंद केल्यामुळं अशा अफवा जास्त प्रमाणात पसरतात असं नसीरला वाटतं. तसंच ऑनलाईन माध्यमं म्हणून काम करणाऱ्या संकेतस्थळांच्या नोंदणीसाठी कोणतंच धोरणं आणि मार्गदर्शक तत्व सरकारकडं नसल्याची खंत त्याला वाटते. अनेक संकेतस्थळांमुळं खोट्या बातम्या जाणीवपूर्वक पसरविल्या जातात.
मागच्या वर्षी सरासरी ३८ वेळा इंटरनेट बंद करण्यात आलं होतं. बुऱ्हाण वाणी प्रकरणाच्या वेळी तर एसएमएस करून लोकांपर्यंत बातम्या पोहचिण्याचं काम केलं असं तो सांगत होता. सध्या ‘काश्मीर न्यूज ऑब्झर्व्हर’ला एक लाख लोकं फॉलो करतात. काश्मीरमधली लोकं स्थानिक माध्यमांना जास्त महत्त्व देत असले तरी सरकारी पक्ष काश्मीरचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय माध्यमांना जास्त प्राधान्य देतं असंही नसीरला वाटतं. सगळ्यात महत्त्त्वाचं म्हणजे काश्मीर प्रश्नाबद्दल सगळ्याच माध्यमांनी लोकांना तोडण्यापेक्षा जोडण्यासाठी काम करण्याची गरज नसीर मांडत होता. सईद रिशा गिलानी या फुटीरतावादी नेत्यानं त्यांच्या कार्यक्रमात राष्ट्रीय माध्यमांना येण्यावर बंदी घातल्याचं देखील नसीरने सांगितलं.
नसीरच्या घरून हॉटेलकडं परतताना भेटलेला रिक्षावाला माध्यमांबद्दल बरंच बोलत होता. त्याच्या सांगण्यानुसार दिल्लीतल्या लोकांनी इथलं सारं काम बिघडवलं होतं. शिवाय ‘टाईम्स नाऊ’, ‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिन्यांबद्दल अनेक लोक नकारात्मक बोलत होते. या वाहिन्या अँटी काश्मीर आहेत, असंही त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे.
***
आता या सगळ्याला आपण कसं सामोरं जायचं हा आपला प्रश्न आहे. पत्रकार व माध्यम अभ्यासक म्हणून या सगळ्याकडं पाहताना मला खरंच काश्मीरमधली स्थानिक माध्यमं कुठं कमी पडत आहेत असं वाटत नाही. त्यातले खरे आवाज आपल्याला ऐकता आले पाहिजेत. या सगळ्याला खूप पदर आहेत. प्रत्येक पत्रकाराची स्वतःची एक स्टोरी आहे. त्याला जगाला काही सांगायचं आहे. ते जोवर आपल्यापर्यंत योग्य पद्धतीनं पोहचणार नाही तोपर्यंत स्टोन्स आणि बुलेटमधला माध्यमस्फोट असाच धगधगत राहणार हे वास्तव आहे. त्यात सामान्य नागरिकांसोबत अनेक पत्रकारही मारले जातील.
काश्मीरमध्ये असताना फोनवर सुजात बुखारी यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यांच्या धावपळीत त्यांना भेटता आलं नव्हतं. परतून काही दिवस होत नाही तर ह्या माणसाची हत्या होते. असे कित्येक पत्रकार या संघर्षात बळी गेले आहेत. पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांची यादी इंटरनेटवर उपलब्ध आहे.
त्यातही वर उल्लेख केलेली, सत्याच्या अवतीभवती वावरणारी माणसं या सगळ्या संघर्षात पत्रकारिता जिवंत ठेवण्याचं काम करत आहेत हे माझ्यासाठी महत्त्वाचं.
सोपोरचा जुनेद, त्याला भेटता आलं नाही. त्यानं आता स्वतःची व्हॉट्सअप अपडेट सर्विस सुरू केलीय. तो उत्तम छायाचित्रकार आहेत. काश्मीरमधील जवळपास सर्व वृत्तछायाचित्रपत्रकार इन्स्टाग्रामवर आहेत. काश्मीरमध्ये घडणाऱ्या बहुतांश चकमकी, घडामोडी आता मला त्यांच्या फोटोमधूनच कळतात. या सगळ्या नवमाध्यमांचा वापर करून ते लोकांपर्यंत त्यांचं जगणं पोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंसा, राजकारण या पलीकडं जाऊनही वेगवेगळे प्रयोग इथं होत आहेत. साकीब माजीदचं काश्मीर खोऱ्यात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचं छायाचित्र लॉर्डस स्टेडियम मध्ये लागलंय. हिसेंच्या सावलीखाली हे सगळं सुखावह चित्र झाकोळून जातंय. शिल्लक राहतोय तो फक्त माध्यमस्फोट. शेवटी एका वाक्यात काश्मीरच्या पत्रकारांचं जगणं सांगायचं झालं, तर सना मट्टो म्हणाली तसं ‘काश्मीरी पत्रकारांचा दिवस एनकाऊंटर कव्हर करण्यानं सुरू होतो आणि अंत्ययात्रा कव्हर करून संपतो.’ हेच त्यांचं अपरिहार्य जगणं आहे.
हा वृत्तांत 'अक्षरलिपी' २०१८ अंकात प्रथम प्रकाशित. लेखकाच्या परवानगीने पुनर्प्रकाशित.