India

फेसबुकची विरोधी पक्षांवर खप्पा मर्जी तशीच, माकपचे खाते लाईव्हचं निमित्त करत केले ३ दिवस बंद

एका महत्त्वाच्या राष्ट्रीय पक्ष सरचिटणीसांची मांडणी कोणत्या कम्युनिटी स्टँडर्ड्सचं उल्लंघन करत असेल असा प्रश्न होता?

Credit : Indie Journal

वॉल स्ट्रीट जर्नलनं फेसबुक भारतातील द्वेषात्मक आशय पसरविणाऱ्यांबद्दल दुजाभाव करत असल्याची स्टोरी प्रकाशित केल्यानंतर फेसबुक आणि भाजपा याविरोधात वातावरण तापत असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र (माकपा) राज्य माध्यम समन्वयक शुभा शमिम मात्र त्यांच्यासमोर निर्माण झालेली एक मोठी अडचण सोडविण्यात व्यस्त होत्या. 

त्या समोरे जात असलेली अडचणही मोठी होती. पक्षाच्या राज्य कमिटीनं आयोजित केलेलं राष्ट्रीय सरचिटणीस सीताराम येचुरी यांचं फेसबुकवरील थेट प्रक्षेपित होत असलेल्या व्याख्यानाची लिंक त्या विविध फेसबुक पेजसवरून शेअर करण्यात व्यस्त होत्या. जेणेकरून सीताराम येचुरी यांची मांडणी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचेल. हे करत असताना अचानक त्यांना फेसबुककडून आलेल्या संदेशात सांगण्यात आलं की, तुम्ही शेअर करत असलेली लिंक वा माहिती फेसबुकच्या कम्युनिटी स्टँटर्डचे उल्लंघन करीत असल्यामुळं त्यांच्या प्रोफाईलवर बंदी घालण्यात येत आहे. त्या पुढील तीन दिवसांसाठी आशय पोस्ट करू शकणार नाहीत.  

शुभा शमिम यांच्यासाठी हे धक्कादायक होतं. एका महत्त्वाच्या  राष्ट्रीय पक्ष सरचिटणीसांची मांडणी फेसबुकच्या कोणत्या कम्युनिटी स्टँडर्ड्सचं उल्लंघन करत असेल असा प्रश्न त्यांना पडला होता? 

त्यांच्यासाठी खरं तर हे सगळं इथंच थांबणारं नव्हतं. त्याच दिवशी त्यांना तशाच आणखी एका अनुभवला समोरं जावं लागणार होतं. काही वेळानंतर राज्य किसान सभा, महाराष्ट्रने आयोजित केलेले अभ्यासक आणि कार्यकर्ते योगेंद्र यादव यांच्या फेसबुक लाईव्हची लिंक महाराष्ट्र राज्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अधिकृत पेजवरून शेअर करत असताना त्यावरही अशी बंदी घालण्यात आली. 

 

 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीनं १६ ऑगस्ट रोजी पक्षाच्या अधिकृत पेजवरून राष्ट्रीय सरचिटणीस सीताराम येचुरी यांचं मोदींची ‘नव्या भारता’ची फसवी प्रतिमा? या विषयावर व्याख्यान आयोजित केलं होतं. 

हे व्याख्यान सुरू झाल्यानंतर माध्यम समन्वयक असलेल्या शुभा शमिम त्या व्याख्यानाची लिकं त्यांच्या वैयक्तिक प्रोफाईलवरून इतर काही फेसबुक पेजेसवर शेअर करत होत्या. काही पेजेसवर लिकं शेअर केल्यानंतर त्या शेअर करत असलेला आशय हा फेसबुकच्या कम्युनिटी स्टँडर्डचे उल्लंघन करत असल्यामुळं त्यांना १८ ऑगस्ट पर्यंत काहीही पोस्ट करता येणार नसल्याचा मेसेज संदेश प्राप्त झाला. त्या दिवसातील ही त्याच्यासाठीची ही एकमेव घटना नव्हती.

अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून दर रविवारी शेतकरी प्रश्नांवर तज्ञांशी संवाद घडवून आणते. १६ ऑगस्ट रोजी पाच वाजता मोदी सरकारचे कृषी अध्यादेश या विषयावर योगेंद्र यादव यांच्याशी संवाद आयोजित करण्यात आला होता.

व्याख्यान संपल्यानंतर योगेंद्र यादव यांच्या व्याख्यानाची लिंक त्या पक्षाच्या अधिकृत फेसबुक प्रोफाईलवरून इतर पेजेसवर शेअर करीत होत्या. काही वेळानंतर इथंही त्यांना फेसबुककडून त्या शेअर करीत आशय हा फेसबुक कम्युनिटी स्टँडर्ड्चं उल्लंघन करीत असल्यामुळं त्यांना १८ ऑगस्ट पर्यंत गोष्टी करता येणार नाही असा मेसेज प्राप्त झालं.  

 

 

याबद्दल शुभा शमिम सांगतात, २०१४ पासून मी आमच्या पक्षाचे सोशल मिडिया अकाऊंट्स सांभाळत हे. यापूर्वीही अशा घटना घडल्या होत्या. काही वेळा मर्यादेपेक्षा जास्त पोस्ट तुम्ही शेअर करत असल्यामुळं एक दिवसाची बंदी घालण्यात आली होती. पण आम्ही त्याकडं दुर्लक्ष केलं होतं. पण काल कम्युनिटी स्टँड्डर्सचं कारण देऊन तीन दिवसांची बंदी घालणं हे जाणिवपूर्वक करण्यात आल्याचं लक्षात येतंय.

पुढं शमीम सांगत होत्या, कोव्हिड संदर्भातल्या कोणत्या कम्युनिटी स्टँडर्ड्सचं उल्लंघन आम्ही वा आमच्या नेत्यांनी बोलताना केलं? आम्ही हिंसा, द्वेषात्मक आशय किंवा खोट्या माहितीचा प्रसार करत नसताना आमच्या प्रोफाईल्सवर फेसबुकनं ही बंदी घालणं म्हणजे आमची लोकशाहीतली स्पेस नाकारण्यासारखं आहे. 

कोव्हिडच्या आडून केंद्र सरकार रावबित असलेल्या धोरणांची चिकित्सा आणि माहिती आम्ही आमच्या फेसबुकवरून लोकांपर्यंत पोहचवित आहोत. सरकारवर होत असणारी टिका अधिकाधिक लोकांपर्यंत पसरू नये म्हणून अशा कम्युनिटी स्टँडर्ड्सच्या आडून विरोधकांचा आवाज फेसबुकमार्फेत दाबण्यात येतोय की काय अशी शंका शमीम व्यक्त करतात.

सध्या कोव्हिड १९ च्या काळामध्ये सरकारच्या धोरणांवर टिका करण्यासाठी, त्याबदद्लची माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी किंवा त्या धोरणांबद्दलची असहमती दर्शविण्यासाठी बहुतांश राजकीय पक्ष आणि संघटना सोशल मिडियाचा वापर करताना दिसत आहेत. सोशल मिडियाच्या माध्यमातून व्याख्यानं आयोजित करून लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जातोय. माकपा, महाराष्ट्र ही त्यांच्या फेसबुक पेजवरून अशा व्याख्यानं मागील काही दिवसांपासून आयोजित करत आहे. नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानांमधली सीताराम येचुरी आणि योगेंद्र यादव यांनी केलेली मांडणी सरकारच्या धोरणांवर टिका करणारी असल्यामुळंच हा बंदी घालण्यात आल्याचा आरोपही शुभा शमिम फेसबुकवर करतात. 

सध्या वॉल स्ट्रीट जर्नलनं प्रकाशित केलेल्या स्टोरीमुळं फेसबुक पक्षपाती आहे हे म्हटलं जातंय. याबद्दल विचारलं असता शमीम सांगतात, नक्कीच यात तथ्थ आहे असं वाटते आहे. एकीकडं भारतीत जनता पक्षातील लोकांच्या हिंसा, द्वेष पसरविण्यास मदत करणाऱ्या खोट्या बातम्या, भडकावू पोस्टवर फेसबुक कोणतीच कारवाई करत नाही. पण आम्ही फक्त सरकारच्या धोरणांवर जरी बोलत असलो तर कम्युनिटी स्टँडर्ड्स सारखी तद्दन खोटी कारणं सांगून आमच्यावर बंदी घालण्यात येते. त्यामुळं फेसबुकची कार्यपद्धती शंभर टक्के पक्षपाती आहे.