India

सिंघू सीमेवर अटक झालेल्या पत्रकारावर 'पोलिसांशी गैरवर्तणूक' केल्याचा गुन्हा दाखल, दुसऱ्या पत्रकाराची सुटका

अटक करण्यात आलेले दुसरे पत्रकार ऑनलाईन न्यूज इंडियाचे धर्मेंदर सिंह यांनाही अलीपूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

Credit : Twitter

दिल्ली पोलिसांनी कॅराव्हॅन मॅगझिन मनदीप पुनिया यांना शनिवारी रात्री उशिरा अटक केली होती. त्यांच्यावर भारतीय दंडविधान कलम ३५३, ३३२ व कलम १८६ अंतर्गत 'सरकारी कामात अडथळा आणण्याप्रकरणी', 'सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात हिंसेचा अवलंब केल्याप्रकरणी' व  पोलिसांसोबत 'गैरवर्तणूक' आरोपात अलीपूर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. त्यांना सोमवारी कोर्टात सादर केलं जाण्याची शक्यता आहे. 

अटक करण्यात आलेले दुसरे पत्रकार ऑनलाईन न्यूज इंडियाचे धर्मेंदर सिंह यांनाही अलीपूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. रविवारी सकाळी पहाटे ५ वाजता त्यांची सुटका करण्यात आली.

धर्मेंदर सिंह

 

दरम्यान मनदीप पुनिया यांच्या सुटकेसाठी अनेक संघटनांनी आवाज उठवला असून #FreeMundeepPunia हा ट्रेंड ट्विटरवर चालवला जात आहे. त्यांना पोलीस अटक करत असतानाचा व्हिडीओ वायरल झाला असून विविध पत्रकार आणि आंदोलकांनी त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे. कॅराव्हॅन मॅगझिनचे राजकीय घडामोडींचे संपादक हरतोष सिंह बाळ यांनीही  मनदीप पुनिया यांच्या समर्थनार्थ ट्विट केलं. 'शनिवारचा पूर्ण दिवस मनदीप हा शेतकरी आणि स्थानिक यांच्यात नेमकं काय घडलं यामागचं सत्य जाणून घेण्यासाठी धडपडत होता. सिंघू बॉर्डरवर सुरक्षाबलांचे पथक  तीन वेगवगळ्या ठिकाणी रस्ता अडवून असतानाही ते नेमके आत कसे आले याची चाचपणी मनदीप करत होता. भाजप कडून 'स्थानिक' म्हणवले जाणारे लोक नक्की कोण होते याचा छडा लावत असताना त्याला अटक करण्यात आली आहे' असं  हरतोष सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'उद्या त्याला जामीन मिळेल अशी आम्ही आशा करत आहोत' असंही त्यांनी म्हटलं आहे.

 

 

संयुक्त किसान मोर्चानेही पत्रक काढत 'शेतकरी आंदोलन माध्यमांसमोर मांडणाऱ्या पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो' असं म्हटलं आहे. 'आसपासचे स्थानिक लोक आमच्यासोबत साफसफाई आणि लंगरच्या जेवणात आमची मदतच करत आहेत. सरकार त्यांना शेतकऱ्यांच्या विरोधात भडकावू पाहत आहे, पण त्यांचे हे प्रयत्न सफल होणार नाहीत' असंही या पत्रकात म्हटलं आहे. 

कॅराव्हॅन मॅगझिनकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानीय फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीशांनी याप्रकरणी 'तपास अधिकाऱ्यांकडून अलीपूर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार यांच्याकरवी कायदेशीर प्रत्युत्तर द्यावं व मनदीप पुनिया यांना एक फेब्रुवारी रोजी कोर्टासमक्ष आणावं' असे आदेश दिले आहेत.

अलीपूर पोलीस ठाण्याचे प्रदीप पालिवाल हे शेतकरी आणि तथाकथित 'स्थानिक' लोकांदरम्यान झालेल्या झटापटीत जखमी झाले होते. २९ जानेवारीच्या दुपारी सिंघू सीमेवर 'स्थानिक' म्हणून जमलेल्या ५०० ते ६०० व्यक्तींनी निदर्शने केली व किसान आंदोलनविरोधी घोषणा दिल्या होत्या. त्यानंतरच मनदीप यांना अटक करण्यात आली होती. इंडी जर्नलने या घटनेसंदर्भात केलेलं वार्तांकन इथं वाचता येईल

दरम्यान २६ नोव्हेम्बर रोजी सिंघू सीमेवर सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनाचा रविवारी ६७ वा दिवस असून येथे तैनात केलेला फौजफाटा वाढवण्यात आला आहे.