India

सिंघू सीमेवर 'स्थानिकांकडून' शेतकरी आंदोलकांवर पोलिसांसमक्ष दगडफेक

जमावाकडून सीमेवरील लंगरच्या भिंती व वॉशिंग मशीनची मोडतोड करण्यात आली.

Credit : Punjabi News Express

आत्ता सिंघू सीमेवर 'स्थानिक' म्हणून जमलेल्या ५०० ते ६०० व्यक्तींनी निदर्शने केली व किसान आंदोलनविरोधी घोषणा देण्यात आल्या. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मते जमलेले लोक हे भारतीय जनता पक्षाचे समर्थक होते असा आरोप केला जात आहे. आसपासच्या गावातील पंचायतींमधील भाजप पुरस्कृत उमेदवारांचाही यात भरणा असल्याचं अंकित सिंह या प्रत्यक्षदर्शीने सांगितले. जमावाकडून सीमेवरील लंगरच्या भिंती व वॉशिंग मशीनची मोडतोड करण्यात आली. 

दुसरीकडं संसदेला उद्देशून केलेल्या अभिभाषणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 'शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये लाल किल्ल्याजवळ राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची घटना घडली, हे दुर्दैवी आहे,' असं ठाम विधान केलं. मात्र इंडी जर्नलनं सिंघू बॉर्डरवर उपस्थित असलेल्या आंदोलकांशी व विद्यार्थी प्रतिनिधींशी संपर्क केला असता वेगळंच चित्र समोर आले. 

हल्लेखोरांकडून शेतकऱ्यांच्या तंबूंवर दगडफेक करण्यात आली तसेच तंबू उखडण्याचाही प्रयत्न झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

"भाजपकडून स्थानिक लोकांचा वापर करून घेतला जात आहे. शेतकऱयांना चिथावण्याचा प्रयत्न करून आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु आहे. आज दुपारी दोन वाजता अचानक ५०० ते ६०० व्यक्तींचा जमाव सिंघू सीमेवर थांबून निदर्शने करत होता. त्यांनी 'किसान आंदोलन बंद करो', 'खलिस्तानी वापस जाओ' अशा चिथावणीखोर घोषणा दिल्या. त्यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला होता. मात्र आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी आपल्या आंदोलनाचे गांभीर्य राखत परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही. या आंदोलनकर्त्या लोकांना कोणताही प्रतिसाद न दिल्याने ते तिथूनच परत गेले," असं या प्रत्यक्षदर्शीनं इंडी जर्नलशी बोलताना सांगितलं.  या आंदोलनाला हिंसक स्वरूप देऊन मोडीत काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, पण सिंघू वरून हटवले गेले तरी मागं न वळता दिल्लीच्या दिशेनं जाण्याचा निर्धार याप्रसंगी शेतकऱ्यांनी व्यक्त केला. 

 

 

दरम्यान सरकारकडून सीमेवरील इंटरनेट बंद केलं गेलं असल्यानं शेतकरी नेते व प्रतिनिधींकडून कोणतीही माहिती बाहेर येत नाही. गावांकडून नातेवाईकांची विचारपूस करण्यातही अडचणी येत आहेत. मात्र सरकारची बाजू मांडायला विविध मीडिया चॅनेल उपस्थित आहेत. शेतकऱ्यांकडून आपली बाजू मांडायला सुरु केलेले 'ट्रॉली टाइम्स' हे प्रकाशन प्रसिद्ध करण्यातही अडचणी येत आहेत.  त्यामुळे लोकांपर्यंत एकतर्फी माहिती पोचत असल्याचे चित्र आहे. 

हिंसाचार करणारे लोक शेतकरी आंदोलनातील नसून त्यांना पेरण्यात आल्याचा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला होता. हिंसाचार पसरवणाऱ्या लोकांना ओळखण्याचा व त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न शेतकरी संघटनाकडून सुरु आहे. आंदोलनांची पुढची दिशा आणि धोरण ठरवत झालेल्या नुकसानाचा आढावा घेत असल्याचं शेतकरी नेतृत्वानं सांगितलं. 

दरम्यान पंजाबवरून दिल्लीच्या दिशेनं अनेक गावांतून येणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे. छात्र एकता मंच या संघटनेच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार जथ्था सिंघूच्या दिशेने रवाना झाला आहे.