India

पहिल्या आदिवासी महिला कुलगुरु डॉ. सोनाझरिया मिंझ यांची मुलाखत

एखादी आदिवासी महिला विद्यापीठाची कुलगुरु बनण्याची ही पहिलीच घटना आहे.

Credit : femina.in

डॉ. सोनाझरिया मिंझ या जेनयुमध्ये कम्पुटर सायन्सच्या प्राध्यापक असून नुकतीच झारखंडमधील सिद्धो कान्हो मुरमू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. एखादी आदिवासी महिला विद्यापीठाची कुलगुरु बनण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यानिमित्ताने इंडी जर्नलने घेतलेली त्यांची मुलाखत

 

सर्वप्रथम, तुमचं खूप अभिनंदन. शिक्षण क्षेत्रातल्या खूप मोठ्या जबाबदारीच्या पदावर तुमची नियुक्ती करण्यात आली आहे. इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नसेल, तुमच्या बालपणाबद्दल आणि शालेय शिक्षणाबद्दल जाणून घ्यायला आवडेल.

डॉ. मिंझ: धन्यवाद. माझं बालपण गेलं झारखंडमधल्या रांची शहरात. १९६८ ते १९८० पर्यंत मी रांचीमध्ये होते. त्यावेळी झारखंडची निर्मिती झाली नव्हती, त्यामुळे रांची शहर बिहारचाच भाग होतं. तर रांचीमध्ये आमचं कुटूंब राहत होतं. माझे आई - वडील दोघेही उच्चशिक्षित आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून शिक्षणासाठी नेहमीच पाठबळ मिळालं. वडिलांनी आंथ्रोपोलॉजी, सोशोलॉजी, थिऑलॉजीचा अभ्यास केला, पी.एच.डी. केली, त्यानंतर त्यांनी ख्रिस्ती धर्माचा अभ्यास केला आणि ते धार्मिक अभ्यास, तत्वज्ञान इ. शिक्षण देण्याचं काम करू लागले. परंतु त्यांना हे खोलवर जाणवलं होतं की आदिवासींमध्ये क्रमिक शिक्षणाचा प्रसार होण्याची खूप गरज आहे, आदिवासी मुला-मुलींनी जास्तीजास्त शिकलं पाहिजे, यासाठी मग त्यांनी रांचीमध्ये कॉलेजची स्थापना केली. माझं शिक्षण झालं, हिंदी माध्यमात. संपूर्ण हिंदी मीडियम. आमच्या शाळेत जास्तकरून आदिवासी मुलं-मुलीच असायची. मी उराव जमातीची आहे आणि आमची मातृभाषा कुरुख. त्यामुळे हिंदी पण आम्हाला तेव्हा परकीय भाषाच वाटायची, आणि हिंदीतून सगळं शिकवलं जायचं, तेव्हा ते सर्वच आदिवासी विद्यार्थ्यांना अवघड जायचं कारण घरी बोलण्याची भाषा वेगळी...शाळेतली वेगळी. त्यामुळेच मला भाषाविषयांत जास्त रुची नव्हती. साहजिकच माझा ओढा गणिताकडे होता. गणित विषयासाठी भाषेची गरज पडत नव्हती. शालेय जीवनातले दोन किस्से मला ठळकपणे आठवतात. एकदा आमचे संस्कृतचे शिक्षक मला रागवत होते. संस्कृत विषयात वर्गात सगळ्यात जास्त गुण मिळवले म्हणून ते मला ओरडून म्हणाले, "संस्कृत मे इतने नंबर्स की क्या जरुरत..तू ये पढके क्या करेगी, यह तो आर्यो की भाषा हैं’’ 

दुसरा किस्सा म्हणजे दहावीत असताना एक शिक्षक म्हणाले, "कॉलेजमध्ये जाऊन तू बायॉलॉजी शिक, मॅथ्स घेऊ नको, ते तुला जमणार नाही.’’ हे ऐकल्यावर मला संताप आला. यांची हिंमतच कशी होते, असं बोलण्याची...असं मला वाटत राहिलं. मी खचले नाही, उलट तो सात्विक संताप मला पुढे गणित विषयात पदवी, पदव्यूत्तर शिक्षण घेण्यासाठी कारणीभूत ठरला. माझ्या वडिलांनी मला पाचवीत असताना सांगितलं होतं की, ईश्वरानं सगळ्यांना समान बुद्धी दिलेली आहे, प्रश्न फक्त त्याचा वापर करण्याचा आहे. त्यामुळे मला हेच वाटत राहिलं की बुद्धी सगळ्यांकडे सारखीच असेल तर कोणीही विद्यार्थी कोणताही विषय शिकू शकतो.  

 

पुढे महाविद्यालयीन शिक्षण, पी.एच.डी पर्यंतचा प्रवास कसा होता, यादरम्यान आदिवासी विद्यार्थिनी/ तरुणी म्हणून काही भेदभावाचा सामना करण्याचे प्रसंग वगेरे?

डॉ. मिंझ: अकरावीपर्यंतचं माझं शिक्षण रांचीमध्ये झालं. त्यावेळी खरं अकरावी-बारावी वगैरे नव्हतंच. इंटर किंवा पी.यु.सी. (प्री युनिवर्सिटी कोर्स) होतं. तर मी पी.यु.सी. चं पहिलं वर्ष रांचीत केलं आणि दुसऱ्या वर्षासाठी बंगळुरूमध्ये एडमिशन घेतलं. त्यानंतर गणित हा मुख्य विषय घेऊन चेन्नईत बी.एस.सी केलं, आणि त्यानंतर गणितातच एम.एस.सी केलं. मग मी एम. फिल आणि पीएच.डी करण्यासाठी १९८६ मध्ये जेएनयूत गेले. एम. फिल. आणि पीएच.डी कम्प्युटर सायन्समध्ये केलं. यादरम्यान सुदैवाने मला आदिवासी महिला म्हणून भेदभावाच्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं नाही. याची दोन प्रमुख कारणं आहेत. एक म्हणजे मी महाविद्यालयीन शिक्षण दक्षिण भारतात केलं आणि नंतर संशोधन जेएनयुमध्ये. जेएनयुमधलं वातावरण तर खूपच सुरक्षित आणि अकादमिक करियरसाठी पूरक आहे. दुसरं म्हणजे महाविद्यालयीन शिक्षणासाठी साऊथला जाण्याचा निर्णय आम्ही जाणीवपूर्वक घेतला होता. आदिवासी किंवा एकंदर जातीय भेदभावाच्या बाबतीत उत्तर भारतातलं वातावरण किती कट्टर आहे, हे वडिलांना माहीत होतं, त्यामुळे तो पर्याय बाद केला. शिवाय मी रंगानं डार्क आहे, तर माझं कलर कॉम्प्लेक्शन साऊथच्या लोकांमध्ये सहज मिसळून जाईल, आणि मला वेगळी वागणूक दिली जाणार नाही, असा वडिलांचा कयास होता आणि तो खरा ठरला. पुढे १९८६ च्या जुलैमध्ये मी जेएनयूमध्ये पहिलं पाऊल ठेवलं...आणि माझं इव टीझिंग झालं नाही, या गोष्टीने मला धक्काच बसला...अर्थात पॉझिटिव्ह. आयुष्यात आपण महिला म्हणून छेडछाड आणि इतर अशा प्रकारांना इतक्यांदा सामोरं गेलेलो असतो, की मुली- महिलांसाठी इतकी मोकळी, सुरक्षित, उबदार जागा अस्तित्वात असू शकते, याचा सुरुवातीला अचंबाच वाटला. 

 

तुमचं नाव थोडं वेगळं वाटतं...त्याचा अर्थ काय आहे?

डॉ. मिंझ: (हसतात) हो. सोनाझरिया हे कुरुख भाषेतलं एक प्रसिद्ध नाव आहे. त्याचा अर्थ होतो, सोन्याचा फवारा...आमच्या स्थानिक लहेजात अनेक मुलींना प्रेमानं सोनाझरियो....अशी हाक मारली जाते जसं आपण लहान मुलांना प्रेमानं सोना, बाबू म्हणतो अगदी तसंच!

 

पुन्हा तुमच्या अकादमिक कामाकडे वळते. खरं तर गणित, कम्प्यूटर सायन्स, डेटा सायन्समध्ये मुली शिक्षण घेत नाहीत..असा एक स्टिरियोटाईप आहे, त्यात तुम्ही ज्या काळात या प्रकारचं शिक्षण घेतलंत, ते पाहता, ही कौतुकाचीच गोष्ट आहे.

डॉ. मिंझ: हो. याचं श्रेय माझ्या आई वडिलांना जातं. माझी आईसुद्धा एकदम बंडखोर विचारांची. वेगळं काही करण्यासाठी ती नेहमीच पाठिंबा द्यायची. शाळेत भाषेच्या कारणामुळे गणिताकडे माझा ओढा होताच. त्यामुळे त्यातच पुढे शिकण्याच्या निश्चयावर मी ठाम होते. आणि आमच्या शाळेत गणित, विज्ञान, संस्कृत शिकवण्यासाठी बिगर आदिवासी शिक्षक होते, त्यामुळे त्यांना आमच्या भाषेत बोलता येत नसे. शिवाय गणित, विज्ञानासारखे विषय आदिवासी शिक्षक का शिकवू शकत नाहीत? त्यांना ती संधी का नाकारली जाते, त्यांच्यामध्ये ती क्षमता नाही काय? असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले..आणि त्यातूनच मग आपणही गणिताचं शिक्षक होऊनच दाखवायचं..असा विचार मनात जोर धरू लागला. 

 

 

या सगळ्या प्रवासात तुमची प्रेरणास्थानं काय आहेत?

डॉ. मिंझ: हा महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला शाळेत आपला स्वातंत्र्यलढा, इतर महत्वाच्या ऐतिहासिक घटना सांगितल्या जातात. इतिहासातून, मिथकांमधून अनेक आदर्श आपल्यासमोर ठेवले जातात. आदिवासी नायक-नायिकांचा समावेश मात्र अभ्यासक्रमात, पुस्तकात केलेला नसतो. मला त्यामुळे इतिहासातल्या व्यक्तिरेखांपेक्षा माझ्या आजूबाजूच्या माणसांनी प्रेरित केलं. कार्तिक उराव म्हणून एक जागतिक दर्जाचे आर्किटेक्ट आमचे परिचित होते, त्यांच्या कामातून मला नेहमीच प्रेरणा मिळत असे. त्यांच्यासारखं खूप शिकायचं आणि नावलौकिक मिळवायचा असं तेव्हा वाटत असे. याशिवाय आजूबाजूची इतर सामान्य आदिवासी माणसं प्रेरणा देत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल खूप काही शाळा-कॉलेजमध्ये असताना वाचलं नव्हतं. त्यात मी मॅथ्सची विद्यार्थिनी. ह्युमॅनिटीजच्या विद्यार्थ्यांसारखं सगळं वाचायची सवय नव्हती. जेएनयूत गेल्यावर मी हे सगळं वाचलं. 

 

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रक्रियेत भाषा आणि इतर अडथळे येतात, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो, त्यावर मात करण्यासाठी काय करता येईल? 

डॉ. मिंझ: आदिवासींच्या मातृभाषेव्यतिरिक्त ज्या भाषेत त्यांना शिकवलं जातं, ती प्रत्येक भाषा जणू त्यांना परग्रहावरची भाषाच वाटते. त्यामुळे प्रत्येक विषय शिकताना त्यातल्या संकल्पना समजून घेणं अवघड होऊन बसतं. यामुळेच त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. हा न्यूनगंड घालवण्यासाठी आदिवासी मुला-मुलींना खेळासाठी प्रोत्साहन आणि सुविधा उपलब्ध करून देणं हा एक चांगला मार्ग आहे. आदिवासी मुलं खेळांमध्ये तरबेज असतात, त्यामुळे त्यात चांगली कामगिरी केली तर त्यांचा आत्मविश्वास उंचावतो, त्याचं प्रतिबिंब त्यांच्या अभ्यासातही पडतं. 

आपण काही तरी उत्तम करू शकतो, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते. मी स्वत: कॉलेजमध्ये हॉकी खेळायचे. हॉकीत राज्य पातळीपर्यंत पोहोचले होते..पण पुढे ते राहून गेलं. शाळेतही राज्य पातळीवर खो-खो खेळले होते. आमच्या शाळेत हॉकी खेळण्याची सुविधा नव्हती, नाही तर मी शाळेपासूनच हॉकी खेळायला सुरूवात केली असती. खेळामुळे एक वेगळंच मानसिक स्वास्थ लाभतं.  

 

 

जेएनयूमध्ये तुम्ही अनेक आंदोलनात सहभागी झालात, अलीकडच्याच एका आंदोलनात जखमीही झालात, अनेक जोखिमा पत्करूनही आंदोलनात सहभागी होता, या सगळ्याकडे कसं पाहता? 

डॉ. मिंझ: खरं तर मी विद्यार्थी असताना क्वचितच अशा आंदोलनांमध्ये जायचे. पण जेनयुतलं वातावरणच वेगळं आहे. इथे कम्प्युटर सायन्स, मॅथ्स शिकणारे विद्यार्थीही सामाजिक दृष्ट्या तेवढेच जागरुक असतात, इतर विषय वाचतात, ते तेवढ्याच ओढीने आंदोलनांमध्ये सहभागी होतात. आणि आंदोलनं, प्रोटेस्ट याकडे मी एका वेगळ्या दृष्टीने पाहते. आंदोलनं हे एक सर्जनशील माध्यम आहे, आपले मुद्दे घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचं, कम्युनिकेशन करण्याचं...एखाद्या मुदद्यावर जनजागृती करण्याचं. आणि जेएनयुतले प्रोटेस्ट मार्च तुम्ही पाहिले तर लक्षात येईल की ते खूप क्रिएटीव असतात. खूप चांगल्या घोषणा मुलं तयार करतात, त्या घोषणांनी आपोआपच तुम्हाला त्या समूहाचा भाग बनण्याची इच्छा होते. दुसरं म्हणजे प्रोटेस्ट मार्च ही एक इंटेलेक्चुअल क्रिएटिविटी आहे. जेएनयुमध्ये प्रत्येक आंदोलनानंतर एका जागी जमून एक मीटींग घेतली जाते, त्या मीटिंगमध्ये एखाद्या प्रश्नाचे सर्वच पैलू सोप्या भाषेत समजावून सांगितले जातात...आंदोलनं, मोर्चांची अशी संस्कृती खूप कमी ठिकाणी असेल की जिथे, आपण एखाद्या मुद्द्यासाठी आंदोलन का करत आहोत, पुढे त्याचा मार्ग कसा असणार आहे, त्याचा फॉलो अप इ. गोष्टी सर्वांना समजावून सांगितल्या जातात, मुख्य म्हणजे ही आंदोलनं शांततामय मार्गाने केली जातात. एखादा प्रश्न संबंधित यंत्रणेशी संवाद करूनच सोडवला जातो, मात्र त्या प्रश्नावर जनजागृती, आपलं म्हणणं प्रभावीपणे यंत्रणांसमोर पोहोचवण्यासाठी आंदोलनांची गरज असते. बऱ्याचदा काय होतं की, विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर ते कुलगुरु आणि विद्यापीठ प्रशासन आंदोलनांशिवाय ऐकून घेत नाहीत, खरं तर असं व्हायला नको, आंदोलनांशिवायही विद्यार्थ्यांचे प्रश्न कुलगुरुंनी ऐकून घेतले पाहिजेत, सोडवले पाहिजेत, पण तसं घडत नाही. त्यामुळे आंदोलनं करावी लागतात. आता राहिला माझ्या सहभागाचा प्रश्न तर विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांना पाठिंबा देणं, हे शिक्षकांचं कामच आहे. जेएनयू टीचर्स असोसिएशनने नेहमीच विद्यार्थ्यांच्या संघर्षाला साथसोबत केली आहे. माझ्या घरून मला सुरुवातीपासूनच बंडखोरीचे संस्कार मिळाले होते, नीडरपणे काम करण्याचा वारसा मिळाला होता, त्यामुळे जेएनयुतल्या वातावरणात या सगळ्याचा मी भाग बनले, हे साहजिकच होतं.

 

आता कुलगुरुपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विद्यापीठ पातळीवर उच्च शिक्षण व्यवस्थेत कोणते मुख्य बदल करावेसे वाटतात, त्यासाठी तुमच्या काय कल्पना आहेत?

डॉ. मिंझ: खरं तर मला हे झारखंडला गेल्यावर, विद्यापीठात आधी काय काय कामं झाली आहेत, हे प्रत्यक्ष पाहिल्यावरच सांगता येईल. सगळ्यात आधी अर्धवट कामं मार्गी लावणं, प्रस्तावित कामांचा फडशा पाडणं, हे आव्हान असेल. दुसरं म्हणजे तिथे नवीन काय बदल करायचे, याबाबत तिथे जाऊन आधी जमिनीवरची परिस्थिती माहित करून घेईन. शैक्षणिक सुधारणा, वातावरण याबाबतीत माझी एक महत्वाकांक्षा, कल्पना मात्र कायम माझ्या डोक्यात असते, आणि त्यासाठी मी अहोरात्र झटेन. ते म्हणजे प्रत्येक कॉलेज, विद्यापीठात स्त्रियांसाठी मोकळं, सुरक्षित वातावरण तयार करणं. जो अनुभव मी जेएनयुमध्ये घेतला, त्याची श्रृंखला मला वाढवायची आहे. मुली, महिला खूप आव्हानांचा सामना करून कॉलेज, विद्यापीठांपर्यंत शिकण्यासाठी पोहोचतात. त्यांना मोकळेपणाने शिकता आलं पाहिजे, कॅम्पसमध्ये बिंधास्त वावरता आलं पाहिजे, शिक्षणाची जागा त्यांना त्यांची स्वत:ची, हक्काची वाटली पाहिजे. यासाठी धोरणात्मक पातळीवर काही गोष्टी करण्याचा मानस आहे. जेएनयुमध्येही मी लिंगभाव समतेसाठी काही काम केलं आहे, तो अनुभवही गाठीशी आहे आणि या अनुभवात अनेक महत्वाच्या गोष्टी कळून चुकल्या. स्त्रियांसाठी अधिकाधिक उबदार अवकाश निर्माण करणं किती आवश्यक आहे, हे त्यामुळेच उमगलं.  विद्यापीठ पातळीवर हे करण्याकरता तीन वर्षांचा कालावधी खूप कमी आहे, पण होईल तेवढं मी करेन, पुढे कोणी तरी येईलच अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याकरता.