India
मुसळधार पावसात शेतीचं प्रचंड नुकसान होताना पिकविमा कंपन्या 'नॉट रिचेबल'
मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात प्रचंड प्रमाणात पाऊस सध्या पडत आहे.

राज्याच्या बऱ्याच भागात आज सकाळपासून पावसाने उघडीप दिली असली तरी पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अशातच पिकविमा कंपन्यांचे फोनच लागत नसल्यामुळं अनेक शेतकरी पिकविम्याविना अडचणीत सापडले आहेत. परभणी शहरासह जिल्ह्यात सोमवारी दुपारी सुरू झालेला पाऊस मंगळवारीही सुरूच होता. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील ओढे, नाल्यासह गोदावरी पात्रही दुथडी भरून वाहत आहे.
दरम्यान या पावसाने जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. परभणी शहरासह तालुक्यातील सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने या ठिकाणच्या नागरिकांना रात्रभर जागुन पाणी घराबाहेर काढावे लागले. जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या या पावसामुळे नदी, नाल्यांना पुर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. मागच्या २-३ वर्षांमध्ये पिकांचं नुकसान होत असताना अचानक आलेल्या या पावसाने पुन्हा एकदा अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर शेतीच्या नुकसानीची वेळ आलेली आहे.
उमेश सूर्यवंशी हे सुनेगाव सायळा येथील शेतकरी असून त्यांनी यंदा ३ एकर जागेमध्ये कापूस आणि ३ एकर जागेमध्ये सोयाबीनची लागवड केली होती. त्यांची संपूर्ण शेती पाण्याखाली असून पिक विमा कंपनीचा फोन मात्र लागत नाहीये अशी तक्रार त्यांनी इंडी जर्नलसोबत बोलताना केली. ते म्हणाले, "गंगेच्या वॉटरबॅकमुळे प्रचंड नुकसान झालंय. ३ एकर सोयाबीन आणि ३ एकर कापूस पाण्याखाली गेलाय. विमा कंपनीला करण्याचा प्रयत्न करतोय पण फोन लागत नाहीये. तक्रारीसाठी कालपासून प्रयत्न करत असून गावातल्या सगळ्यांना हीच अडचण येतीये. गावातली शंभर ते दीडशे एकर शेती पाण्याखाली असून सर्वच शेतकरी चिंताग्रस्त आहेत." त्यांच्या गावामध्ये पाणी शिरलं असून पाऊस असाच राहिला तर पाणी घरांंमध्ये जाण्याची भीती आहे.
गावांचा संपर्क तुटल्यामुळे गावातील शेतकऱ्यांना तालुक्याच्या गावी जाऊन तक्रार नोंदवणं शक्य नाहीये आणि विमा कंपन्याचं 'क्रॉप इन्शुरन्स अॅॅप' आहे, तेदेखील सतत क्रॅॅश होत असून त्यावरूनही फोटो आणि इतर माहिती अपलोड करत असताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत, अशी तक्रार खळी गावचे शेतकरी ओमकार पवार यांनी केली. इंडी जर्नलला माहिती देत असताना ते म्हणाले की, "जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी आलेलं असून शेतीचं नुकसान झालेलं आहे. कालपासून विमा कंपनीकडे तक्रार करण्याचा प्रयत्न करतोय पण टोल फ्री नंबरला कोणीही प्रतिसाद देत नाहीये. अनेक शेतकऱ्यांना पीकविमा कंपनीच्या ऍपमध्ये गोष्टी अपलोड करणं अवघड जातंय आणि नेटवर्कच्या प्रचंड अडचणी आहेत. जो ओटीपी एका खात्यासाठी मिळतो तो संबंधित खात्यावरून दोन वेळाच वापरता येतो मात्र नुकसानीबद्दल माहिती भरत असताना सतत अप बंद होतंय यामुळे शेतकरी हैराण आणि चिंताग्रस्त आहेत आहेत."
गावांचा संपर्क तुटल्यामुळे गावातील शेतकऱ्यांना तालुक्याच्या गावी जाऊन तक्रार नोंदवणं शक्य नाहीये आणि विमा कंपन्याचं 'क्रॉप इन्शुरन्स अॅॅप' आहे तेदेखील सतत क्रॅॅश होत असून त्यावरूनही फोटो आणि इतर माहिती अपलोड करत असताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
ते सोयाबीनचे शेतकरी असून त्यांचं गट २५८, २५९ आणि २६० या गटातलं ११ हेक्टर सोयाबीन पाण्याखाली आहे. पावसाच्या अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तक्रार करणं अवघड आहे आणि ७२ तासांमध्ये माहिती देण्याची विमा कंपन्यांची अट ही प्रचंड जाचक असल्याची तक्रार त्यांनी यावेळी बोलताना केली.
पीकविमा कंपन्यांकडून होणाऱ्या लुटमारीबद्दल अनेकदा शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे. काही दिवसांपूर्वी पीकविमा कंपन्याविरोधात किसान सभेच्या वतीने आंदोलनदेखील केले होते. विमा कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या टोल फ्री क्रमांकाला प्रतिसाद मिळत नाहीये ही नवीन बाब आता समोर आली असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल की नाही अशी भीती निर्माण झालेली आहे.
परभणी बरोबरच नांदेड, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि रत्नागिरी या भागात पावसाने थैमान घातले. महाड, चिपळूण हे कोकणातील भाग आत्ताच येऊन गेलेल्या पुरातून सावरत असताना, पुन्हा एकदा पूरपरिस्थिती इथल्या अनेक भागामध्ये निर्माण झालेली आहे. खेड, संगमेश्वर येथील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचं वतावरण निर्माण झालेलं आहे. मुरुड, चिपळूण, दापोली या भागामध्ये सर्वाधिक पाऊस झाला असून अनेक व्यापाऱ्यांना नुकसान सहन करावं लागलेलं आहे.
महाड येथील पराग बद्रिके यांनी इंडी जर्नलशी बोलताना सांगितलं की, "महाडमध्ये पाऊस आहे पण आजूबाजूच्या भागातील पावसाच्या तुलनेत कमी आहे. मुरुडमध्ये काल अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. या पावसाचा प्रचंड फटका आदिवासी वाड्यांना, बेलदार समाजातील लोकांना, शेतकऱ्याना आणि सर्व व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. महाड भागातील शेतकऱ्यांना इन्शुरन्स कंपन्यांकडून असं सांगण्यात आलं की महाड हे पूरप्रवण क्षेत्र असल्यामुळे विमा पण मिळू शकणार नाही. चवदार तळ्याच्या स्वच्छतेसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता मात्र त्या पद्धतीचं काम केलं गेलं नाही, असंही ते म्हणाले. काल संगमेश्वर येथील आठवडा बाजारात पाणी साचलं होतं. दोन दिवस प्रचंड पाऊस झाला मात्र सकाळपासून पावसाचा जोर कमी असल्यामुळे परिस्थिती स्थिर आहे. अशी माहिती रत्नागिरी येथील निशिकांत जाधव यांनी दिली.
थोड्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसाने पुन्हा एकदा अनेक भागांमध्ये हाहाकार माजवला आहे. आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी राज्यातील अनेक भागांमध्ये अजूनही पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.