India

हाथरस घटनेचे देशभर पडसाद, अजय बिश्त सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

हाथरस पीडितेची अवमानना तिच्या मृत्यूवरही थांबली नाही

Credit : The Tribune India

वार्तांकन सहाय्य प्रदीप बिरादार

उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील, बुलगऱ्ही गावात  १४ सप्टेंबरला, चार सवर्ण तरुणांनी एका १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर या आरोपींनी पीडितेला अमानुष मारहाण केली. तिची जीभ छाटली. बेदम मारहाणीमुळे तिच्या बरगड्यांना गंभीर जखमा झाल्या होत्या. पीडीतेच्या हात-पायांनाही गंभीर इजा केली, आरोपींनी तिला फासावर लटकवण्याचा प्रयत्नही केला होता, असंही सांगितलं जात आहे. 

पीडित तरुणीला अलीगढमधील मुस्लीम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर १० दिवस तिथे उपचार केल्यानंतर तिला दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तिथंही तिची प्रकृती गंभीर होती, आणि काल (मंगळवारी) सकाळी उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला. सफदरजंग हॉस्पिटलबाहेर तिचे नातेवाईक आणि दलित कार्यकर्ते न्यायाच्या मागणीसाठी ठाण मांडून बसले होते. भीम आर्मी आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही सफदरजंग हॉस्पिटलबाहेर आंदोलन केलं. 

हॉस्पिटलबाहेरची तणावपूर्ण परिस्थिती अधिकच चिघळलेली पाहून, (मंगळवारी) काल रात्री आठ वाजता पीडीतेचे वडील, भाऊ यांना पोलीस जबरदस्तीनं त्यांच्या गाडीतून बुलगऱ्ही या त्यांच्या मूळ गावी घेऊन गेले. अखेरपर्यंत पीडितेचं पार्थिव तिच्या कुटुंबियांना सोपवलं गेलं नाही. भीम आर्मीच्या चंद्रशेखर रावण यांनाही पोलिसांनी त्याच गाडीतून नेलं. पीडीतेच्या भावानं हॉस्पिटलमध्ये, शवागारात चौकशी केली असता, तिथं मृतदेह नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं. ‘आम्हाला न्याय हवा आहे. गावात आम्हाला उच्चजातीयांकडून सतत धमक्या मिळतात, मारुन टाकण्याची भाषा केली जाते, त्यामुळे आम्हाला सुरक्षा हवी’ असं पीडितेच्या भावानं वृत्तवाहिन्यांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं. पोलिसांनी पीडितेचा मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात न देता, तसंच त्यांच्या परवानगीशिवाय काल मध्यरात्री अडीचच्या सुमारास घाईघाईनं तिचे अंत्यसंस्कार केल्याचा आरोप पीडितेच्या कुटूंबानं केला आहे. इंडिया टुडेच्या पत्रकार तनुश्री पांडे काल मध्यरात्री घटनास्थळी उपस्थित होत्या. पोलिसांनी पीडितेच्या कुटूंबियांना, इतर स्थानिकांना घरात बंद करून, बॅरिकेडिंग करून, जबरदस्तीनं, कुटूंबियांना एकदाही पार्थिवाचं अंत्यदर्शन न घेऊ देता अंत्यसंस्कार केल्याची माहिती आणि फोटो त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. पोलिसांनी मृतदेह बूलगऱ्हीला मूळ गावी आणला, तेव्हा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, जिल्हा न्यायाधीश, अतिरिक्त न्यायदंडाधिकारी देखील तिथं उपस्थित असल्याची माहिती पांडे यांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून काल पीडितेचा मृत्यू होण्याआधी तिचा मृत्यूपुर्व जबाब नोंदवला आहे का, याची माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, मात्र अद्याप त्याबाबत खात्रीशीर माहिती मिळू शकली नाही. 

१४ सप्टेंबरला पीडित तरुणी तिच्या कुटूंबियांसह घराजवळील शेतात गवत आणण्यासाठी गेली होती. ती आणि तिचं कुटूंब एकत्र काम करत असलं तरी शेतात ते एकमेकांपासून पुरेसे दूर होते. त्यावेळी चार सवर्ण जातीतील (ठाकूर) तरुणांनी पीडितेला तिथून पळवून नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला तसंच तिला अमानुष मारहाण केली. या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.  दरम्यान ‘वैद्यकीय चाचणीतून पीडितेवर बलात्कार झाला नसल्याचं, निष्पन्न होतं’, असं वादग्रस्त वक्तव्य हाथरसचे आय. जी. पियुष मोर्डिया यांनी केलं होतं. 

या घटनेनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सर्व स्तरांतून टीका होत आहे. उत्तर प्रदेशातील महिलांवरील, दलितांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटना पाहता तेथील कायदा व सुव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. तर आदित्यनाथ यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र एस.आय.टी. स्थापन करण्याचे आणि खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे आदेश दिले आहेत. उ.प्र. सरकारच्या प्रवक्त्यांनी मात्र उत्तर प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे, पोलिस चांगलं काम करत आहेत आणि विशेष म्हणजे ‘महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी स्थापन केलेले एंटी रोमियो स्कॉड्स चांगलं काम करत आहेत’, असं म्हंटलं आहे.

 

 

दरम्यान ‘बेटी पढाओ’ अभियानाचा मोठा गाजावाजा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून निर्मल गंगा मिशन, आंतरराष्ट्रीय योग दिवस, गंगा म्युझियम अशा महत्वाच्या घटनांबाबत मागील दोन दिवसात अनेक ट्वीट केलेली आहेत, मात्र हाथरस बलात्कार घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया लिहिलेली नाही. पंतप्रधान मोदींनी, उ.प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर बोलून या घटनेचा सखोल तपास करण्याबाबत सूचना केल्या आहेत. तर, ‘हे सगळं दलितांची दडपणूक करण्यासाठी, त्यांना समाजात ‘त्यांची जागा’ दाखवून देण्यासाठी केलं जात आहे. हे उत्तर प्रदेश सरकारचं लाजिरवाणं षडयंत्र आहे, आमची लढाई याच घृणास्पद विचारसरणीविरोधात आहे’, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे.

कालच महाराष्ट्रातील खैरलांजी हत्याकांडाला १४ वर्ष पूर्ण झाली. सुरेखा भोतमांगेला अजूनही न्याय मिळालेला नाही. भारतातील स्त्रीयांवर विशेत: दलित स्त्रीयांवर होणारे अत्याचार ही काय नवीन गोष्ट राहिलेली नाही. एका बाजूला दिल्लीतील निर्भयासारखं प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेलं आपण पाहतो. निर्भयाच्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळून न्याय मिळत असताना दुसऱ्या बाजूला दलित स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचारांवर कारवाई करण्यासाठी आपली व्यवस्था तितकी सजग नाही, हे सत्य दलित स्त्रीयांवरील जातीय, वर्गीय आणि लैंगिक अशा तिहेरी शोषणाची विषण्ण करणारी जाणीव करून देणारं आहे. 'बलात्काऱ्यांना भरचौकात फाशीवर लटकवा', असा प्रतिक्रियावादी आवेशी आक्रोश टाळून या बलात्कारांमधले आर्थिक-राजकीय-सामाजिक कंगोरे लक्षात घेतले पाहिजेत. 

त्यामुळे दलित स्त्रीवर सवर्ण पुरुषाकडून होणाऱ्या बलात्काराकडे निव्वळ त्या पुरुषाची वासनांधता आणि विकृती म्हणून न पाहता जात, वर्ग आणि लिंगाधारित शोषणाला प्रतिकार करू पाहणाऱ्या कुठल्याही स्त्रीला अद्दल घडवून आणणे. त्यातून कुठल्याही प्रकारच्या अन्यायाविरोधात उभा राहू पाहणाऱ्यांवर जरब बसवून आहे ती विषमाधारित व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठीची सोय म्हणून हाथरससारख्या घटनांकडे पाहणं गरजेचं आहे. जातीनं महार असूनही स्वतःच्या हिमतीवर जगू पाहणाऱ्या सुरेखा भोतमांगेवर गावातील मराठ्यांनी केलेला बलात्कार हा मग फक्त एका स्त्रीवर पुरुषांनी केलेला अत्याचार न राहता जातीय, वर्गीय आणि लैंगिक आधारावरील या शोषणव्यवस्थेत एका विशिष्ट गटाचीच अधिसत्ता टिकून रहावी यासाठी त्यांनी केलेला 'पराक्रम' असतो. दलित स्त्रीवर बलात्कार करण्याचा हाच पराक्रम करून भाजपचे नेते कुलदीप सेंगर जेव्हा जेलमधून सुटतात तेव्हा त्यांच्या जंगी स्वागतासाठी जमा झालेली एका विशिष्ट समूहाचि गर्दी नेमकं काय दर्शवत असते?

योगी आदित्यनाथ यांची सत्ता आल्यानंतर उत्तर प्रदेशमधील दलितांवरील अत्याचारांची वाढलेली संख्या आणि हा अत्याचार करणाऱ्या सवर्णांचीच बाजू घेणारे उत्तर प्रदेशचे पोलिस आणि न्यायालय भाजपला अभिप्रेत असणाऱ्या हिंदू राष्ट्रामधील दलित स्त्रीचं असलेलं स्थान अधोरेखित करतात. या प्रकरणातही पीडित मृत महिलेच्या कुटुंबीयांना हिणकस वागणूक देणारी पोलीस आणि न्यायालयीन व्यवस्था आरोपींच्या समर्थनार्थ आक्रमकपणे उभी राहिलेली दिसली. बलात्कार झालाय हे सिद्ध होऊनही बलात्कार यांच्या बाजूने ठामपणे उभा राहणाऱ्या सवर्ण परिषद सारख्या संघटना समानतेच्या तत्वावर उभा राहिलेल्या आपल्या लोकशाहीला दलित स्त्रीयांचं शोषण थांबविण्यासाठी अजून बराच लांबचा पल्ला गाठावा लागणार आहे, याचंच द्योतक आहे. जात, वर्ग आणि लिंगाधारित शोषणावर उभी राहिलेली ही आपली व्यवस्था वरकरणी कितीही शांत आणि सामाजिक स्थिरता देणारी वाटली तरी या शोषणाविरुद्ध हाक देत ही शोषणाधारित व्यवस्थाच उद्धवस्त केल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. 

भारतातली स्त्रियांवर होणार्‍या अत्याचारांचं प्रमाण इतकं आहे की त्याची कधी बातमीही होत नाही. सदरील हाथसर मधली दुर्दैवी घटनासुद्धा १४ सप्टेंबर रोजी घडली होती. तब्बल पंधरा दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या या 'दलित 'निर्भया'चा जीव वाचवणं शक्य होतं. पण बलात्कार झाल्यानंतर चांगली आरोग्य सुविधाही तिच्या नशीबी आली नाही, ही गोष्ट जातीयवाद आणि पुरुषसत्ताक वृत्ती आपल्या व्यवस्थेत किती खोलवर रुजलेली आहे याचंच द्योतक आहे. दलित अत्याचारांच्या कित्येक घटनांना वैयक्तिक वादाचा अँगल देत त्यातलं जातीय शोषण नाकारण्याचा कोडगेपणा आपण सगळेच करत आलेलो आहोत. खैरलांजी हत्याकांडालाही वैयक्तिक वाद आणि विवाहबाह्य संबंधांचं हिणकस वळण देण्याचा निर्लज्जपणा आपण तेव्हाही केला होता. हाथरस मधल्या जातीयवादी हिंसेला देखील वैयक्तिक वाद म्हणून निस्तारण्याचा पुरेपूर प्रयत्न पोलीस आणि उत्तर प्रदेश प्रशासनाने याही वेळेस केलाच. पण सुदैवानं मीडियातून हे प्रकरण गाजल्यानं ही घाण निस्तारणं व्यवस्थेला जमलं नाही. 

समानतेचं तत्व स्वीकारलेल्या आपल्या लोकशाहीत जातीयवाद आणि लिंगभेद अजूनही तितकाच प्रखर आहे. जात,लिंग, वर्गाच्या या उतरंडीत सर्वात खालच्या स्थानी असलेली दलित स्त्री आणि तिचं शोषण अधोरेखित करून मोदी आणि योगींसारख्या हिंदुत्ववादी नेत्यांना अभिप्रेत असलेली हिंदूराष्ट्राची संकल्पना वेळीच ठेचली नाही, तर अशा कित्येक दलित निर्भया आपल्या मनगुटीवर भूत बनून राहतील, हे नक्की. कट्टरपंथीय उजव्या राजकीय विचारसरणीनं पोखरून टाकलेल्या या लोकशाहीला वाचवण्यासाठी दलित स्त्रीयांवरील या तिहेरी अत्याचाराचं भूत उतरवणं आधी भाग आहे. आणि याचं उत्तर या बलात्काऱ्यांना भर चौकात फाशी देण्याच्या प्रतिक्रियावादात नसून हा बलात्कार आपण करू शकतो, असा आत्मविश्र्वास आणि नैतिक बळ या बलात्काऱ्यांना देणाऱ्या या व्यवस्थेला आणि हिंदुराष्ट्राच्या संकल्पेनाला प्रश्नांकित करण्यातच दडलेलं आहे.