India

जर्मन बेकरी प्रकरणात शिक्षा भोगलेल्या हिमायत बेगच्या वडलांचं निधन

बेग जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी

Credit : Indie Journal

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील दोषी हिमायत बेग याच्या वडिलांचं आज (रविवार) सकाळी साडेआठ दरम्यान र्हदयविकाराच्या झटक्यानं बीडमध्ये निधन झालं. इनायत बेग (हिमायतचे वडील) ऐंशी वर्षांचे होते. बीड शहरातील हत्तीमहल मोहल्ल्यात त्यांचा जिलबी विकण्याचा लहानसा ठेला होता.

१३ फेब्रुवारी २०१० ला पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधल्या जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक नागरिक जखमी झाले होते. स्फोटानंतर काही दिवसांतच पुणे पोलिसांच्या दहशतवादविरोधी तपास पथकानं (ए.टी.एस) हिमायतला अटक केली होती. पुणे सत्र न्यायालयानं त्याला युएपीएसह भारतीय दंडविधान संहितेच्या अनेक कलमांखाली, तसंच स्फोटक पदार्थांचा साठा जवळ बाळगल्याबद्दल दोषी ठरवलं होतं. पुढे मुंबई उच्च न्यायालयानं त्याला स्फोटक पदार्थ बाळगल्याच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवलं मात्र त्याला युएपीए तसंच भारतीय दंडविधान संहितेच्या इतर कलमांमधून निर्दोष मुक्त केलं. स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी हिमायत सध्या नाशिकच्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयावर हिमायतच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलेलं आहे, त्यावर सुनावणी होणं अद्याप बाकी आहे.  

हिमायत हा एक शिक्षित तरुण असून त्यानं पुण्यातील आझम कॅम्पसमध्ये शिक्षण घेतलं होतं. त्यानं डी.एड. केलं होत, मात्र 2008 पासून तो नोकरीचे प्रयत्न करत होता पण त्याला नोकरी मिळाली नसल्यानं तो पुण्याहून औरंगाबादला गेला आणि तिथं कम्प्युटर ट्रेनिंग देऊ लागला होता, २०१० मध्ये त्याला अटक झाली. त्याच्या घरची स्थिती गरिबीची असून वडील इनायत घराजवळच जिलबी विकण्याचा व्यवसाय करायचे तर लहान भाऊ मिर्झा शहजाद बेग रिक्षा चालवून कुटूंबाला हातभार लावतो. हिमायतची आई झुबेदा तीन चार वर्षांपासून अंथरुणाला खिळलेली आहे. पक्षाघाताचा झटका आल्यापासून दिवसेंदिवस त्यांची प्रकृती ढासळली गेली, ती आजतागायत तशीच आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन जाहीर झालं, त्यानंतर विविध तुरुंग प्रशासनांनी कैद्यांना भेटण्याबाबतचे नियम बदलले, त्यामुळे अलीकडच्या आठ-नऊ महिन्यांत हिमायत आणि कुटूंबियांची भेट होऊ शकली नाही. महिन्याभरापुर्वी त्याच्या कुटूंबियांचं त्याच्याशी फोनवर बोलणं झालं. वडिलांचं आणि त्याचं ते फोनवरचं शेवटचं संभाषण ठरलं.

इनायत शेख यांचं पार्थिव शवागारात वा हॉस्पिटलमध्ये ठेवावं आणि हिमायतला पॅरोल मिळाल्यावर त्यांचे अंत्यसंस्कार करावेत, असं त्याच्या कुटूंबियांना काही आप्तांनी सुचवलं मात्र बेग कुटूंबाकडे यासाठी पैसे नसल्यानं त्यांना आजच वडिलांचं पार्थिव दफन करावं लागलं.
"हिमायतच्या वडलांचा त्याच्यावर खूप विश्वास होता, त्यांना त्याला (हिमायतला ) निर्दोष सुटून आलेलं बघायचं होतं पण त्याआधीच ते गेले. त्यांची तब्येत बरी होती, आज सकाळी उठल्यावरही त्यांनी नेहमीप्रमाणे कामं केली आणि आठच्या सुमारास ते जरा आडवं पडू म्हणून झोपले, ते उठलेच नाहीत.’’ इनायत शेख यांचे जावई आलीम यांनी उर दाटून आलेल्या आवाजात इंडी जर्नलला माहिती दिली.

"हिमायतचं कुटूंब फार साधं आणि गरीब आहे, त्यांच्यावर आज ही वेळ आली की पैशांअभावी मुलगा आणि वडलांची शेवटची भेटही होऊ शकली नाही, हे फार दुर्दैवी आहे आणि भारतात असं दुर्दैव त्याच्यासारख्या शेकडो मुस्लीम तरुणांच्या वाट्याला येतं. फार हुशार मुलगा होता तो, त्याच्या कुटूंबियांची ही अवस्था बघवत नाही.’’ अशी प्रतिक्रिया जर्मन बेकरी केसमध्ये बेग कुटुंबियांना मदत करणारे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते अंजुम इनामदार यांनी दिली.

दरम्यान हिमायत बेगच्या वकिलांशी संपर्क साधल्यावर एड. कायनात शेख यांनी, लवकरात लवकर त्याच्या पॅरोलसाठी प्रयत्न करून, त्याची आणि त्याच्या कुटूंबियांची भेट घडवून आणणार असल्याचं सांगितलं. त्याच्या कुटूंबियांनी त्याला नाशिकच्या तुरुंग प्रशासनाला फोन करून वडलांच्या निधनाची बातमी देण्याचा प्रयत्न केला, पण आज त्यांचं हिमायतशी बोलणं होऊ शकलंच नसल्यानं, त्याला ही बातमी अजूनपर्यंत कळवली गेली नाही, असं बेग कुटूंबियांनी सांगितलं.

 

बातमीच्या अधीच्य आवृत्तीत मथळ्यात 'हिमायत बेग निर्दोष' शिक्षा भोगल्याचं लिहिलं होतं. ते सुधारण्यात आलं आहे. चुकीबाबत दिलगीर आहोत."