India

अमित शहांना कधी काळी अटक केलेल्या माजी सीबीआय संचालक अश्वनी कुमार आत्महत्या

शिमल्यातील राहत्या घरी घेतला गळफास.

Credit : The Indian Express

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) चे माजी संचालक अश्वनी कुमार यांनी बुधवारी संध्याकाळी, शिमल्यातील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. कुमार यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी सापडली असून, त्यात त्यांनी सततच्या आजार आणि नैराश्यामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हणलं आहे. ‘आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये’ असंही त्यांनी चिठ्ठीत नमूद केलं आहे. आज (गुरुवारी) कुमार यांच्या  पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अश्वनी कुमार १९७३ च्या आय.पी.एस बॅचचे ऑफिसर असून त्यांनी ऑगस्ट २००८ ते नोव्हेंबर २०१० या कालावधीत सीबीआयचं संचालकपद भूषवलं. कुमार यांनी आपल्या कारकिर्दीत हिमाचल प्रदेशच्या पोलीस महासंचालक पदाची धुराही सांभाळली होती. निवृत्तीनंतर नागालॅंडच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती केली गेली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे कुमार सीबीआयच्या संचालकपदी असताना विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सोहराबुद्दीन फेक एन्काउंटर प्रकरणात अटक करण्यात आली होती. देशभर गाजलेल्या आरुषी तलवार दुहेरी खून प्रकरणाचा तपासही त्यांच्याच कार्यकाळात सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.

अश्वनी कुमार हे एक उत्तम पोलिस अधिकारी होते, आपलं काम ते प्रामाणिकपणे करत असत, कनिष्ठ सहकाऱ्यांशी कधीही वरच्या आवाजात बोलत नसत, ते खूप संयमी होते, अशा अनेक प्रतिक्रिया त्यांच्या माजी पोलीस सहकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

बुधवारी संध्याकाळी कुमार यांचा मुलगा आणि सून संध्याकाळच्या फेरीसाठी घराबाहेर पडताना, कुमार यांच्या खोलीचा दरवाजा आतून बंद आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. अनेकदा आवाज देऊनही आतून दरवाजा न उघडला गेल्यानं, त्यांनी दरवाजा तोडला, तेव्हा कुमार यांचा मृतदेह त्यांना दिसला. मृतदेहाच्या बाजूला शिडी आणि गळफास लावण्यासाठी आणलेला दोरही होता. कुमार यांनी चिठ्ठीत दीर्घ आजार आणि नैराश्यामुळे आत्महत्या करत असल्याचं लिहिलं होतं, मात्र मंगळवारी आणि बुधवारी त्यांची मनस्थिती चांगली होती, असं काही सूत्रांनी शिमल्यातील स्थानिक दैनिकाला (द ट्रिब्यून) सांगितलं आहे. मंगळवारी दुपारी त्यांनी पत्नीसोबत जेवण केलं आणि संध्याकाळी ते शिमल्यातील मॉल रोडला फिरायला गेले होते तसंच तिथल्या काली बारी मंदिरातही ते जाऊन आले होते, असं द ट्रिब्यूननं सूत्रांच्या हवाल्यानं आपल्या वृत्तात म्हणलं आहे.

कुमार यांना मृत्यूपश्चात अवयवदान करण्याची इच्छा होती, तशी तरतूदही त्यांनी करून ठेवली होती, मात्र त्यांच्या आत्महत्येनंतर न्यायवैद्यकीय प्रक्रिया करण्यात बराच वेळ गेल्यामुळे अवयवदान करणं शक्य झालं नाही. कुमार यांचा शवविच्छेदन अहवाल येणं अद्याप बाकी आहे.