India
राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका
राज्यभरात कांदा, द्राक्ष, गहू, केळी, हरभरा, मका, इ पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.
हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील काही भागात अवकाळी पावसानं गेल्या २ दिवसांपासून हजेरी लावलेली आहे. शेतीचं बरंच नुकसान झाल्याचं तसंच धुळे भागात जीवितहानीची घटना घडल्याचं पाहायला मिळालं. उत्तर महाराष्ट्र म्हणजेच जळगाव, नंदुरबार आणि धुळे या भागाला अवकाळीचा मोठ्या प्रमाणवर फटका बसलेला असून अनेक ठिकाणी वादळी वारा आणि गारपिटीसह पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा आणि मालेगाव या तालुक्यातही अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलंय. अवकाळी पावसामुळं अनेक ठिकाणी शेतकयांनी हाताशी आलेलं पीक गमावलं. राज्यभरात कांदा, द्राक्ष, गहू, केळी, हरभरा, मका, इ पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
धुळ्यात अंगावर वीज कोसळून महिलेचा मृत्यू
काल संध्याकाळी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बोपखेल कुडाशी या याठिकाणी वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर गारपीट होऊन रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तसंच मापलगाव मधील शिवारांमध्ये सुद्धा गारांचे खच पाहायला मिळाले.
धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये मंगळवार सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. शेतात असताना अंगावर विज कोसळल्यानं शितल गिरासे या २७ वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली असून महिलेला शवविच्छेदनासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शितल गिरासे यांना ग्रामस्थांनी दुर्घटनेनंतर लगेचच सोनगिर येथे रूग्णालयात दाखल केले व तिथून शवविच्छेदनासाठी धुळे येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यांना एक लहान दिड वर्षाचा मुलगा व मोठी मुलगी आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं कारण समजू शकणार आहे.
धुळे जिल्ह्याला मंगळवार संध्याकाळपासून अवकाळी पावसासह गारपिटीने अक्षरशः झोडपून काढलं. जिल्ह्यातील रब्बी पिकं आणि फळबागा उध्वस्त झाल्या आहेत.
नाशिकमध्ये कांदा आणि द्राक्षाचं जास्त नुकसान
नाशिकमध्ये कांदा आणि द्राक्षबागांना या अवकाळीचा फटका जास्त बसलेला आहे. नाशिकमधील देवळा तालुक्यातील कांद्याचे शेतकरी गोरख पवार यांनी सांगितलं की, या परिस्थितीमुळं कांद्यावर करपा रोगाचा हल्ला झालेला आहे. पुढील आठ दहा दिवसांत तो कमी होतो की नाही याचा वातावरणाच्या परिस्थितीवरून अंदाज येईल.
द्राक्षाचंही नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं असून त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “द्राक्षांची परिस्थिती जास्त वाईट आहे. द्राक्षाला या अवकाळीमुळं क्रॅकिंग गेलं असून ज्यांची निर्यातीची द्राक्षं होती ती त्यांना स्थानिक बाजारात विकावी लागतायत. पिकासाठी घातलेले पैसे निघणंदेखील अवघड आहे अशी परिस्थिती आहे. शेतीचं नुकसान होईल अशी मोठी गारपीट नव्हती मात्र काही ठिकाणी लहान आकाराच्या गारा पडल्या."
नंदुरबार मध्ये काढणीला आलेली पिकं जमीनदोस्त
अंतिम टप्प्यात काढणीला आलेली पिकं अवकाळीमुळ जमीनदोस्त झाल्याचं नंदुरबार भागातील शेतकऱ्यांनी सांगितलं. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्याच्या पट्ट्यातील गावांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. यामध्ये वडाळी, कोंडावळ, जयनगर, खापरखेडा, दुधखेडा, मानमोड इ गावांचा समावेश आहे. यामध्ये कोंडावळ भागात गारपीट जास्त झाल्याचं पाहायला मिळालं. केळी, पपई, गहू, हरभरा, मका, कांदा इ. पिकांचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या ऐन तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं काढून घेतलेला आहे.
गणेश माडी हे शहादा तालुक्यातील कोंडावळ मधील शेतकरी असून त्यांनी अडीच एकर क्षेत्रावर केळीचं पिक घेतलं होतं. इंडी जर्नलसोबत बोलताना ते म्हणाले की, “वडाडी, कोंडावळ, जयनगर या भागात गारपीट आणि वाऱ्यासह पाऊस पडला. केळीचं नुकसान जास्त प्रमाणावर झालेलं आहे. त्याचबरोबर गव्हाचं आणि कांद्याचं प्रामुख्यानं नुकसान झालेलं आहे. गहू काढणीला आलेले असताना आत्ता झालेल्या अवकाळीमुळ त्यांची लोंब तुटून पिक उध्वस्त झालंय. केळीचे बरेच खांब पडलेले आहेत. सात तारखेला संध्याकाळी जास्त पाऊस पडला. माझ्या अडीच एकर केळीच्या बागेतली जवळपास २०० ते २५० झाडं पडलेली आहेत. प्रचंड मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागतंय.”
स्थानिक स्तरावर पंचनामे चालू झाले असल्याचंही ते म्हणाले.
जळगावमध्ये गहू आणि केळीचं नुकसान
जळगावमधील गोपद्म फेड शेतकरी उत्पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन लोखंडे यांनी जळगावमधील शेतीला अवकाळीमुळे जबर फटका बसल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “तापी पट्ट्यामध्ये असणाऱ्या गहू आणि केळीचं भयंकर नुकसान अवकाळीमुळ झालं. नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी भागातल्या शेतकऱ्याची अडीच एकारातली संपूर्ण द्राक्षबाग आडवी झाली. रबी हंगामातला गहू, हरभरा, मका इ पिकांचं फक्त जळगाव जिल्ह्यातलं नुकसान हे साडे पाच हजार हेक्टर एवढ्या क्षेत्राचं आहे. मक्याचं पूर्णच्या पूर्ण पिक आडवं पडलेलं आहे.
जिल्हातील २१४ गावांमधील सुमारे आठ हजार शेतकऱ्यांना या अवकाळीचा फटका बसलेला असून चोपडा, एरंडोल, अंमळनेरच्या भागातल्या शेतकऱ्यांचं कांदा, मका आणि इतर भाजीपाल्याचं नुकसान हे जास्त झालेलं आहे. आज पाऊस थोडा थांबलेला आहे. कंपनीतल्या काही शेतकऱ्यांनी ज्वारीचं पिक घेतलं होतं पण त्याचंही पूर्णपणे नुकसान झालेलं आहे.
औरंगाबाद आणि वाशीम जिल्ह्यातही अवकाळी
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी अवकाळी पाऊस झाला. कन्नड शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वैजापूर, पिशोर, सोयगाव, कन्नड परिसरात पाऊस पडला. देवगाव रंगारी इथं वीजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. औरंगाबाद शहरातही काही परिसरात हलका पाऊस झाला असून, ढगाळ वातावरण आहे.
वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी आज सकाळी रिमझिम पावसाला सुरुवात झाल्यानं गहू, हरभरा, कांदा पीक उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
काही ठिकाणी पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र बहुतांश ठिकाणी गारांसह पाऊस तर उर्वरित ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचं पाहायला मिळालं.