India
फेसबुकचा नवा चेहराही भाजपाचाच?
शिवनाथ ठुकराल हे व्हॉट्सअपचे पब्लिक पॉलिसी डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. आता ते फेसबुक इंडियाचे भारतातील उच्चपदस्थ अधिकारी असतील.

फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी डायरेक्टर आंखी दास यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांची जागा कोण घेणार याबद्दल उत्सुकता होती. अंखी दास या संसदीय समितीच्या चौकशीला सामोरं जात आहेत.
आंखी दास यांच्या जागी शिवनाथ ठुकराल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवनाथ ठुकराल हे व्हॉट्सअपचे पब्लिक पॉलिसी डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. आता ते फेसबुक इंडियाचे भारतातील उच्चपदस्थ अधिकारी असतील. ठुकराल यांची एवढीच ओळख नाही, तर ठुकराल यांनी २०१४ च्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या प्रचार यंत्रणेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असल्याची चर्चा सातत्यानं झाली आहेच. ऑगस्टच्या टाईम मसिकाच्या अंकामध्ये ठुकराल यांच्या संबधीच्या एका घटनेचा उल्लेख करण्यात आला होता.
भारतीय जनता पक्षाचे आसाममधील लोकप्रतिनिधी शिलादित्य देव यांनी 'मुस्लिम हे बलात्कारी असतात', या आशयाची एक बातमीवजा पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती. त्यानंतर जुलै २०१९ मध्ये कार्यकर्त्या अल्फिया झोयब ह्यांनी फेसबुकवर असलेल्या १८० द्वेषात्मक पोस्टबद्दल फेसबुक कर्मचार्यांसोबत सुरू असलेल्या व्हिडिओ कॉल वरील बैठकीमध्ये देव यांनी शेअर केलेल्या पोस्टचाही मुद्दा उपस्थित केला होता. हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर शिवनाथ ठुकराल ती मिटिंग अर्ध्यातून सोडून गेल्याचं अल्फिया झोयब यांनी टाईम्स मासिकाशी बोलताना सांगितलं होतं. ती सविस्तर घटना टाईम्स मासिकानं त्यांच्या ऑगस्टच्या अंकामध्ये प्रकाशित केली होती.
त्यानंतर ठुकराल उपस्थित असलेल्या एका बैठकीमध्ये काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबद्दल प्रश्र्न उपस्थित केले असता ठुकराल तीही बैठक अर्ध्यातून सोडून निघून गेले होते. हे सर्व घडल्यानंतरही ती पोस्ट एक वर्ष फेसबुकवर होती. त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. तर आता हे शिवनाथ ठुकराल भारतात फेसबुकची धुरा सांभाळणार आहेत.
आंखी दास यांच्या जाण्यानं फेसबुकच्या भारतातील कार्यपद्धतीमध्ये सुधारणा होतील, अशी जी काही शक्यता वर्तवण्यात येत होती, ती ठुकराल यांच्या नियुक्तीनं संपुष्टात आली आहे.