Quick Reads
स्वातंत्र्याच्या आंदोलनात पुण्याची तरुणाई!
पुणे शहराने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात वेगवेगळ्या माध्यमातून नेतृत्व दिले आहे.
जगभरातील स्वातंत्र्याच्या चळवळींमध्ये, सामाजिक बदलांच्या प्रक्रियांमध्ये युवकांचा आणि विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. जुलमी राजवटी, हुकुमशाही राजवटी आणि साम्राज्यवादी सत्तांना प्रतिरोध करत अनेक युवक आणि विदयार्थी हे शहीद झाले आहेत. भारताच्या इतिहासातही अनेक युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी हसत हसत भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करले आहे. म्हणूनच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना अशा युवकांची आणि विद्यार्थ्यांची स्मृती जागवणे हे आपले आद्यकर्तव्य बनते.
यानिमित्ताने देशभरात वेगवेगळ्या शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये समाजातील वेगवेगळ्या घटकांनी स्वातंत्र्य आंदोलनात काय योगदान दिले याची चर्चा केली जात आहे. पुणे शहराने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासोबतच सामाजिक, वैचारिक लढ्याला सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून नेतृत्व दिले आहे. त्यामुळेच पुणे शहराचे भारताच्या इतिहासात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात युवकांनी पुण्यात संघटीतपणे इंग्रजी सत्तेला विरोध करायला सुरुवात केली असे दिसते. म्हणूनच १८९७ ते १९४७ अशा पन्नास वर्षात पुणे शहर आणि जिल्ह्यात युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिलेल्या योगदानाची चर्चा आपण करणार आहोत.
दुष्काळ, प्लेगचा हाहाकार आणि चाफेकरकृत रँडची हत्या
१८९७ साली एकीकडे पुणे शहरात दुष्काळ आणि प्लेगचा हैदोस असतांना दुसरीकडे महाराणी व्हिक्टोरियाच्या राज्यरोहणाचा हिरक महोत्सव डामडौल व उधळपट्टीने साजरा होत होता. याच पार्श्वभूमीवर चाफेकर बंधूनी रँडची हत्या केली. तत्पूर्वी, चाफेकर बंधूंनी शारीरिक शिक्षण आणि इतर मुद्यांसाठी ‘चाफेकर क्लब’ची स्थापना केली होती. चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केल्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा झाली.
चाफेकर बंधूंच्या बलिदानामुळे महाराष्ट्रातील आणि देशातील अनेक युवकांना व विद्यार्थ्यांना इंग्रजीसत्तेच्या विरोधात लढण्याची प्रेरणा मिळाली. त्यामध्ये प्रामुख्याने विनायक दामोदर सावरकर आणि गणेश दामोदर सावरकर – या सावरकरबंधूंचा विशेष उल्लेख केला पाहिजे. या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या युवक संघटना उदयाला आल्या आणि त्यातून नवीन युवानेतृत्व जन्माला आले.
वंगभंग आंदोलन, स्वदेशीच्या चळवळी आणि लढाऊ कारवाया
बंगालची फाळणी १९०५ साली झाली. त्याच्या विरोधात टिळकांनी राष्ट्रव्यापी आंदोलनाची भूमिका घेतली आणि त्यातूनच स्वदेशी चळवळीचा उदय झाला. २७ ऑगस्ट १९०५ रोजी पुण्यात टिळक आणि शिवराम परांजपे यांनी सभा घेतली. त्यामध्ये तीन हजार विदयार्थी व युवक सहभागी झाले होते. अशा पद्धतीने युवक आणि विदयार्थी राष्ट्रीय चळवळीत आले. १९०५ च्याच दसऱ्याच्या दिवशी स्वा. सावरकरांनी विदयार्थी असतांना विदेशी कपड्यांची होळी केली. त्यामुळे त्यांना फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतीगृहातून काढून टाकण्यात आले होते.
टिळकांनी आक्रमकपणे जहाल भूमिका घेतल्यामुळे अनेक युवक आणि विद्यार्थ्यांचे ते प्रेरणास्थान झाले होते. त्याच प्रेरणेतून अनेक युवकांनी गुप्त संघटना काढल्या. सावरकरबंधूंनी अभिनव भारत (१९०६) ही संघटना नाशिकमध्ये स्थापन केली होती. पण, काही दिवसांतच पुणे, चिंचवड, खेड येथे अभिनव भारतच्या शाखा स्थापन झाल्या होत्या. मूळचे पारनेरचे असलेले पांडुरंग महादेव बापट हे डेक्कन महाविद्यालयात विदयार्थी होते. टिळकांच्या प्रभावामुळे बापटही क्रांतिकारी विचारांकडे वळले. इंग्लंडला उच्चशिक्षण घेत असतांना त्यांनी इंग्रजांच्या कारभाराचा निषेध केला म्हणून इंग्रज सरकारने त्यांची शिष्यवृत्ती बंद केली होती. त्यावेळी टिळकांनी श्यामजी कृष्ण वर्मांना सांगून बापटांची व्यवस्था इंडिया हाउसमध्ये केली. सोबतच, दोन हजार रुपयांची तजवीज सुद्धा केली. पुढे, बापटांनी सशस्त्र लढ्यासाठी फ्रान्समध्ये जाऊन बॉम्ब निर्मितीचे तंत्र शिकले. सोबतच, रशियन भाषेतील बॉम्बविषयक पुस्तकाचे इंग्रजी भाषंतर करून भारतात पाठविले.
अनेक क्रांतिकारी युवकांना इंग्रजी सरकारने पकडले.
त्यात विष्णू गणेश पिंगळे यांचाही समावेश होता.
१९१५ चे गदर आंदोलन अत्यंत महत्वाचे आहे. भारतातील विविध भागातील युवक आणि विदयार्थी जे अमेरिका, जपान, इंग्लंड, जर्मनी अशा देशांमध्ये शिकत होते. त्या सगळ्यांनी यामध्ये कृतीशील सहभाग घेतला होता. यामध्ये पुण्यातील विष्णू गणेश पिंगळे आणि नारायण सदाशिव मराठे यांचा सहभाग होता. विष्णू गणेश पिंगळे हे तळेगावच्या समर्थ विद्यालयाचे विदयार्थी होते. त्यामुळे त्यांची राष्ट्रवादी जडणघडण झालेली होती. १९११ मध्ये त्यांनी अमेरिकेतील विद्यापीठात विद्युत अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतला होता. भारतात सशस्त्र लढा उभारण्यासाठी परदेशात शिक्षण घेणाऱ्या युवकांनी आणि विद्यार्थ्यांनी ‘गदर’ ची स्थापना केली होती. पहिले महायुद्ध सुरु झाल्यावर गदरच्या कार्यकर्त्यांनी इंग्रजी सत्तेच्या विरोधात उठाव करण्याची योजना आखली होती. त्यानुसार विष्णू गणेश पिंगळे यांच्यावर उठावात भारतीय सैनिकांना सामील करून घेण्याची आणि त्यांचे मन वळवण्याची जबाबदारी दिलेली होती. १९१५ साली उठावाचा प्रयत्न फसल. अनेक क्रांतिकारी युवकांना इंग्रजी सरकारने पकडले. त्यात विष्णू गणेश पिंगळे यांचाही समावेश होता. त्यांना १६ नोव्हेंबर १९१५ रोजी फाशी देण्यात आली.
नवे टिळकवादी झाले गांधी अनुयायी
१९१९ मध्ये पंजाबात जालियानवाला बाग हत्याकांड झाले. त्याची प्रतिक्रिया संपूर्ण भारतात उमटली. पुणे शहरही त्याला अपवाद नव्हते. गांधींनी सत्याग्रह सभा स्थापन करून ब्रिटीश सत्तेविरोधात असहकार पुकारला. टिळकांची भूमिका गांधींपेक्षा काहीशी वेगळी होती. परंतु स्वदेशी व बहिष्कार हा टिळकांनी संकल्पित केलेला कार्यक्रम गांधींनी व्यापक स्वरुपात राबविल्यामुळे गांधीच टिळकांचा वारसा चालवीत आहे असे अनेक पुणेकरांना वाटले. टिळकांच्या निधनानंतर टिळकवाद्यांमध्ये दोन गट पडले. एक जुन्या किंवा वयोवृद्ध टिळकवाद्यांचा होता आणि दुसरा हा नवीन किंवा तरुण टिळकवाद्यांचा होता. नवीन टिळकवाद्यांमध्ये प्रामुख्याने तरुणांचा भरणा होता. या गटाने गांधींच्या मार्गाने राजकीय प्रवास करायचे निश्चित केले आणि असहकार चळवळीत सहभाग घेतला.
रशियन क्रांतीचा प्रभाव आणि युवक चळवळी
रशियन क्रांतीचा भारतातील युवक आणि विद्यार्थ्यांवर मोठा प्रभाव पडला होता. रशियाची साम्यवादी प्रेरणा तसेच आर्यलंड, तुर्कस्थान आणि चीनमधील आंदोलनच्या पार्श्वभूमीवर भारतातील युवक चळवळीत दोन प्रवाह उदयास आले. एक जहाल साम्यवादी क्रांतिकारकांचा आणि दुसरा समाजवादी अहिंसावादी तरुणांचा होता. पहिल्या पक्षात पुणे जिह्यातील शिवराम हरी राजगुरू, वैशंपायन, दत्तात्रय बळवंत करंदीकर, श्रीराम बळवंत सावरगावकर, काशिनाथ विठ्ठल सहस्त्रबुद्धे हे होते आणि केशवराव जोगळेकर, न. वी. गाडगीळ, रघुनाथ खाडीलकर, धुंडिराज ठेंगडी, श्रीपाद अमृत डांगे, लालजी पेंडसे, अनंत काणेकर, एस. एम. जोशी, के. एन. फडके, रामभाऊ निंबकर, आर. बी. चिकेरुर इत्यादी युवक दुसऱ्या प्रवाहाचे होते. पुढे यातील अनेक तरुणांचे वैचारिक मार्ग बदलले.
नारायणराव सुब्बाराव हर्डीकरांनी स्थापन केलेले (१९२३) हिंदुस्थानी सेवा दल, युसुफ मेहरअलींनी स्थापन केलेली (१९२५) यंग इंडिया सोसायटी आणि के. एम. नरीमन आणि युसुफ मेहरअली यांनी स्थापन केलेली बॉम्बे युथ लीग (१९२७) या संघटनांनी मुंबई, पुणे व संपूर्ण मुंबई इलाख्यातील शहरांमध्ये युवक चळवळीस गती दिली. या सगळ्यामुळे पुण्यातील युवक संघटीत अशा युवा चळवळीकडे ओढले गेले. बॉम्बे युथ लीगसारखीच ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी युथ लीग’ ही संघटना युसुफ मेहरअली, आ. रा. भट, नरीमन आणि न. वि. गाडगीळ यांनी २१-२२ जानेवारी १९२८ रोजी मुंबई इलाखा स्तरासाठी स्थापन केली. या संघटनेशी संलग्न असलेली ‘पूना युथ लीग’ ची संघटनेची स्थापना झाली. ही संघटना अल्पावधीतच पुण्यात खूपच क्रियाशील आणि सक्रीय बनली.
३ मे १९२८ रोजी पुण्यात मराठी भाषिक युवकांची महाराष्ट्र प्रांतिक परिषद भरली. सुभाषचंद्र बोसांच्या उपस्थितीमुळे युवकांमध्ये मोठा उत्साह संचारला होता. यामुळे पुण्यात सुभाषचंद्र बोसांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. १२-१३ डिसेंबर १९२८ रोजी पुण्यात मुंबई इलाखा युवक संघाचे (बॉम्बे प्रेसिडेन्सी यूथ लीग) अधिवेशन झाले. या अधिवेशनातून एस एम. जोशी, ना.ग. गोरे, डी.जी. पंडित, के.एन. फडके, एस.बी. मेहंदळे यांच्यासारखे तरुण राष्ट्रीय चळवळीला मिळाले.
या अधिवेशनात पुढील ठराव मांडले होते.
१. १८५७ चा वर्धापनदिन दरवर्षी साजरा करावा.
२. लालाजींच्या निधनाचा जनजागृतीसाठी उपयोग करून घेणे.
३.आर्म्स अॅक्टचा निषेध करावा.
४. युथ गार्डस निर्माण करणे.
५. संपूर्ण स्वातंत्र्य हे कॉंग्रेसचे घ्येय आहे हे निर्धारित करणे.
६. आयर्लंड, इजिप्त व चीनमधील आंदोलनांचा आदर्श समोर ठेवणे.
अशा सक्रीय कृतींमुळे संपूर्ण पश्चिम भारतात पुणे युथ लीग सर्वात क्रियाशील शाखा म्हणून प्रसिद्ध होती.
असहकार आंदोलनात स्थापन झालेल्या टिळक महाविद्यालयातील बहुतेक शिक्षक हे पुणे युथ लीगच्या युवकांचे मार्गदर्शक होते. त्या सगळ्यांनी मिळून कामगार श्रमिकांमध्ये जागृती करण्यासाठी आणि जमीनदार व भांडवलदारांविरुद्धचे विवाद-तंटे सोडविण्यासाठी पुण्यात ‘ लेबर लीग’ ची स्थापना केली. त्यामध्ये न.वि. गाडगीळ, र.के. खाडीलकर, एस.एम. जोशी, श्री.पु. लिमये, आचार्य जावडेकर, आचार्य भागवत, विनायकराव भुस्कुटे, पा.वा. गाडगीळ, व्ही.व्ही. परांजपे, जी.आर. इनामदार, इत्यादी जन सक्रीय असल्याची नोंद इंग्रजी गुप्तचर खात्याने केली होती. रॉयवादी म्हणून नंतर प्रसिद्ध पावलेले व्ही.बी. कर्णिक हेही पुणे युथ लीगचे कार्यकर्ते होते.
भगतसिंहाच्या नवजवान भारत सभेचे समर्थक आणि कार्यकर्तेही पुण्यात होते.
भगतसिंहाच्या नवजवान भारत सभेचे समर्थक आणि कार्यकर्तेही पुण्यात होते. त्यामध्ये केशवराव जोगळेकर यांचे नाव आग्रहाने घ्यावे लागते. श्रीराम सावरगावकर आणि काशिनाथ विठ्ठल सहस्त्रबुद्धे हे पूर्वी वाईच्या प्राज्ञ पाठशाळेचे विदयार्थी होते. त्यांनी मुळशी सत्याग्रहात सहभाग घेतला म्हणून त्यांना कारावास भोगावा लागला होता. पुढे दोघेही दत्तात्रय बळवंत करंदीकरांच्या संपर्कात आले आणि मग तिघेही हिंदुस्थान सोशालीस्ट रिपब्लिकन आर्मीशी जोडले गेले.शिवराम हरी राजगुरू आणि श्रीराम सावरगावकरांनी अमरावतीला जावून शारीरिक शिक्षण घेतले. पुढे, सावरगावकरांनी हैद्राबाद संस्थानातून काडतुसे विकत घेतली व चंद्रशेखर आझादांना दिली. याच काळात पुण्यात ‘यंग सोशालीस्ट लीग’चे जी. पी. खेर, ह. रा. महाजनी, व पी. एन. दांडेकर हेही कार्यरत होते.
सायमन आयोगाविरुद्ध निर्दशने
देशभरात कॉंग्रेसने सायमन कमिशनविरुद्ध भूमिका घेतली होती. पुण्यातही युवकांनी सायमन आयोगाविरुद्ध निदर्शने व सरकारच्या हस्तकांचा निषेध करण्याचे आवाहन करणारी पत्रके वाटली. पुण्यातील युवकांच्या निदर्शनांना मनाई करणाऱ्या पुणे जिल्हा दंडाधिकारयाचा निषेध करणारा ठराव प्रेमा कंटक या युवतीने मांडला. सायमन आयोगाचे सदस्य ज्या रेल्वे गाडीने मुंबईहून पुण्याकडे निघाले. तिच्या मार्गात घोषणा देण्यासाठी पुणे युथ लीगचे युवक खंडाळा घाटात गेले असता त्यांना अटक झाली. याविषयी रघुनाथ खाडीलकर यांनी लिहिले की, “रेल्वे मार्गावरील प्रत्येक गावाजवळ दोन दोन मालमोटारी ठेवून त्यामध्ये ‘सायमन गो बॅक’ असे फलक घेतलेले तरुण उभे होते.”
सविनय कायदेभंग, पुणे युथ लीग आणि ब्राह्मणेत्तर युवक
जुलै १९३० मध्ये सत्याग्रह मंडळाने जिल्हाभर विदेशी कापडांविरुद्ध मोहीम राबवली. त्यामुळे अनेक कॉंग्रेस नेत्यांना अटक झाली. सोबत पुणे युथ लीगचे नेते एस. एम. जोशी, ना. ग. गोरे व र. के. खाडीलकर यांनाही अटक झाली. जनता ही ब्रिटीश सरकारविरुद्ध भूमिका घेत होती. यावेळी ब्राह्मणेत्तर चळवळीतील काही प्रस्थापित नेते मंडळी ही सरकारधार्जिणी भूमिका घेत होती. त्यामुळे ब्राह्मणेत्तर युवकांनी त्यांना विरोध करायला सुरुवात केली. गांधींच्या नेतृत्वामुळे कॉंग्रेसमध्ये सामजिक बदलही झाला होता. त्यामुळेही ब्राह्मणेत्तर युवक कॉंग्रेसशी जोडले गेले आणि त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला. केशवराव जेधे या तरुण ब्राह्मणेत्तर युवक नेत्याने शेतकऱ्यांचे ‘फुले पथक’ बनवले तर दिनकरराव जवळकरांनी ‘सत्यशोधक महात्मा’ असा लेख लिहून गांधींच्या नेतृत्वाचे महत्व विशद केले.
१९३१ साली हॉटसन-गोगटे प्रकरणानेही पुण्यात बरीच चर्चा घडवून आणली. तर झाले असे की, भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव फाशीची शिक्षा आणि सोलापूर मार्शल लॉ खाली आल्यामुळे झालेल्या अन्याय- अत्याचारांनी जनमत खवळले होते. सुडाची भावना पसरली होती. अशा वातावरणात फर्ग्युसन महाविद्यालयातील वासुदेव बळवंत गोगटे या युवकाने हैद्राबादमधून दोन बंदुका विकत घेतल्या व नेमबाजीचे शिक्षण घेतले आणि प्रभारी गृहमंत्री असलेल्या अर्नेस्ट हॉटसनची हत्या करण्याचे ठरविले. २२ जुलै १९३१ रोजी गव्हर्नर म्हणून हॉटसन ने फर्ग्युसन महाविद्यालयाला अनौपचारिक भेट दिली. ही संधी साधून गोगटेने हॉटसनवर गोळी झाडली.
हॉटसन बचावला पण गोगटेला शिक्षा झाली. २६ एप्रिल १९३४ रोजी सोलापुरातील कामगारांच्या मागण्या व संपाच्या संदर्भात के. एन. फडके, श्री. पु. लिमये, ना. ग. गोरे यांनी पुण्यात पाच बॉम्बस्फोट घडवून आणले. एस. पी. आणि फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांवर त्यावेळी क्रांतिकारी विचारांचा प्रभाव वाढत होता म्हणून इंग्रजी अधिकारी चिंताग्रस्त झाले होते असे दिसते.
भारत छोडो चळवळ, नारायण दाभाडे आणि स्वातंत्र्यप्राप्ती
९ ऑगस्ट १९४२ रोजी देशभराप्रमाणेच पुण्यातही उग्र निदर्शने लोकांनी केले. त्यामध्ये युवकांचा आणि विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. पोलिसांनी लोकांवर लाठीमार व अश्रुधूर सोडल्यामुळे आठ हजाराचा मोर्चा कॉंग्रेस भवनवर जाऊन पोलिसांवर दगडफेक करू लागला. लाठीमार आणि अश्रुधुराने लोक पांगले नाहीत म्हणून गोळीबार करण्यात आला. त्यातच नारायण दाभाडे हा तिरंगा झेंडा घेतलेला १६-१७ वर्षाचा युवक शहीद झाला. पुण्यातील छोडो भारत चळवळीतील पाहिला हुतात्मा झाला. इंग्रज अधिकाऱ्यांनी गोळीबार केल्यामुळे पुणे शहरातील विदयार्थी व युवक अधिकच चवताळले. १० ऑगस्टला फर्ग्युसन, इंजिनिअरिंग, अॅग्रीकल्चर महाविद्यालय आणि स.पा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मिरवणूक काढली. त्यामध्ये ४ हजारांच्यावर विदयार्थी व युवक सहभागी झाले होते असे इंग्रजी गुप्तचर खात्याने नोंदविले आहे.
११ ऑगस्टला म्हणजे लढ्याच्या तिसऱ्या दिवशी पुण्यातील सर्व महाविद्यालये, शाळा पूर्णपणे बंद होत्या. युवक वर्ग रस्त्यावर आला. त्यांनी टेलिफोन तारा, विजेचे दिवे, शहरी वाहतूक निकामी केली. पोलीस शिपायांना चोप देऊन त्यांचे गणवेश जाळले, पोलीस चौक्याची मोडतोड केली. इंग्रजी अधिकाऱ्यांनी दहशत बसावी म्हणून शहरभर रणगाडे फिरवले व रणगाड्यांतून गोळीबार केला. तरीही, विद्यार्थ्यांचा प्रतिरोध मंदावला नव्हता. विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालयांवर बहिष्कार टाकला. तसेच, बहुतेक विद्यार्थ्यांनी भूमिगत कार्यकत्यांना मदती केल्या. कॉंग्रेसचे नेते अटकेत होते. उर्वरित नेते भूमिगत होते. अशावेळी लोकांना चळवळीसाठी प्रेरित करण्याचे कार्य पुणे शहरात युवकांनी व विद्यार्थ्यांनी केले. त्यामध्ये गोपालसिंह परदेशी, अनंत काळोखे पाटील, के.एल. जोशी, व्ही.के. केळकर, बापू नागपूरकर, मधु लिमये, वसंत बापट, ग.प्र. प्रधान, चंद्रशेखर झपके, अनुताई लिमये, इंदू भट, विमल गरुड, कुसुम कारखानीस, मृणालिनी धनेश्वर नेतृत्वात समावेश होता.
चळवळीसाठी प्रेरित करण्याचे कार्य पुणे शहरात युवकांनी व विद्यार्थ्यांनी केले.
नाना डेंगळे हेही असेच एक युवक-विदयार्थी होते की, ज्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला होता. त्यांनी त्यांच्या आठवणीत लिहिले आहे की,
“इंजिनिअरिंग कॉलेजचा सिव्हील इंजिनिअरिंगचा मी विदयार्थी होतो. कॉलेजचा अभ्यास करून पुणे शहरातील राष्ट्र सेवा दलाचे कार्ये १९४१ पासून प्रमुख संघटक या नात्याने करीत होतो. मी संघटक पदाचा राजीनामा देवून शिरुभाऊ लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील भूमिगत कार्यात दाखल झालो. रोज किमान दहा हजार बुलेटिन्स छापील व सायक्लोस्टाईल करून देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली...मला सहकार्य करणाऱ्या पाच सहा गटातील सहकाऱ्यांची मनस्वी साथ मिळाली. अनेकांनी आपल्या घराचा मशीन चालविण्यासाठी वापर करू दिला व मोलाचे सहकार्य केले. दर दोन दिवसांनी सायक्लो- स्टाईल यंत्र दुसऱ्या जागी हलविणे सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक होत असे. या सर्व ठिकाणी शाई, कागद व रोजचा मजकूर ठरलेल्या वेळी, ठरलेल्या जागी पोहचविण्याचे कामही करीत होतो. छापील व सायक्लो-स्टाईल केलेली बुलेटिन्स रोज पहाटे तीन ते चारपर्यंत तयार होत असे, ती त्या त्या विभागात ठराविक जागी पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था केलेली होती.”
नाना डेंगळे यांच्या सारखेच अनुभव अनेकांचे आहे. त्यांनी जीव धोक्यात घालून चळवळ जिवंत ठेवली, वाढवली आणि पसरवली म्हणूनच १५ ऑगस्ट रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. त्या स्वातंत्र्याचे मोल आपण सगळ्यांनी केले पाहिजे. तसेच, सगळ्या युवक आणि विदयार्थी क्रांतीकरकांचे स्मरणही केले पाहिजे.
डॉ. देवकुमार अहिरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे इतिहास विभागात प्राध्यापक आहेत.
Pune, Freedom Movement , Marathi , article, news , freedom struggle , amrut mahotsav , tiranga , keshavrao jedhe , Lokmanya Tilak , Savarkar , Chafekar , Rand , Senapati Bapat , azadi , sangram