India

दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी एन साईबाबा यांना कारागृहात कोरोनाची लागण

जेलच्या डॉक्टरांकडूनच कोठडीत उपचार होतील, तुरुंग प्रशासनाची दर्पोक्ती.

Credit : Shubham Patil

माओवादी संबंध असल्याच्या आरोपावरून २०१७ पासून नागपूर तुरुंगात असलेले प्रा. जी एन साईबाबा यांना तुरुंगात कोरोनाची लागण झाली आहे. शरीरानं ९० टक्के अपंग असलेले साईबाबा यांच्या प्रकृतीशी सतत हेळसांड केली जात असल्याचं यापूर्वी त्यांच्या वकिलानं म्हटलं होतं. तुरुंग अधिकाऱ्यांनी साईबाबा यांच्यापर्यंत काही जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यासही मनाई केली होती.

कारागृह निरीक्षक अनुप कुमारे यांना यासंबंधी विचारलं असता त्यांनी 'साईबाबा यांना थोडासा खोकला व थंडीतापच होता' असं म्हणत 'गुरुवारी त्यांचं दवाखान्यात निदान केलं असता शुक्रवारी त्यांना कोविड झाल्याचा अहवाल हाती आल्याचं' सांगितलं आहे. साईबाबा यांना नागपूर कारागृहातून दिल्ली विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांशी दूरध्वनीमार्फत संपर्क करण्याची अनुमती मिळाली. या विद्यार्थ्यांशी इंडी जर्नलनं बातचीत केल्यानंतर 'साईबाबा यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना नागपूरच्या शासकीय दवाखान्यात स्कॅन आणि एक्स-रे करण्यासाठी नेलं जात आहे' असं समजलं. त्यांनी साईबाबा यांच्या प्रकृतीविषयी चिंताही व्यक्त केली. साईबाबा यांच्या पत्नी वसंता यांनी आपल्या पतीच्या सततच्या आजारपणामुळं आपण भीतीच्या सावटाखाली असल्याचं सांगितलं.

९ मे २०१४ रोजी साईबाबा विद्यापीठात शिकवून आपल्या घराकडं जात असताना त्यांना रस्त्यातून 'उचलून' गडचिरोलीतील अहेरी इथं नेण्यात आलं होतं. तिथून त्यांची रवानगी नागपूरच्या केंद्रीय कारागृहात केली गेली होती. यापूर्वी आजारी पडले असता साईबाबा यांना नागपूरच्या तुरुंगातील दवाखान्यात नेलं होतं. त्यावेळी त्यांनी वर्तमानपत्राला खुलं पत्र लिहून तेथील भयानक परिस्थीतीचा सविस्तर आलेख मांडला होता. "मी तिथल्या दवाखान्यातून तुरुंगात आलो म्हणून मी जिवंत आहे, नाहीतर केव्हाचा मेलो असतो," अशा शब्दांत त्यांनी या कारागृहातील व्यवस्थेचं वर्णन केलं होतं. "तिथं कायमस्वरूपी डॉक्टर्स आणि औषधांची वानवा असून उपकरणंही उपलब्ध नाहीत. मी तिथं असताना माझ्यासमोर तब्बल पाच कैद्यांनी जीव सोडला होता, ज्यातले तिघं आपल्या तिशीतच होते. वेळीच उपचार मिळाले असते तर ते पाचही जण वाचू शकले असते," असं त्यांनी आपल्या अनुभवातून लिहिलं होतं.

साईबाबा यांना अंडा सेलमध्ये ठेवण्यात आल्यानं वेगळ्या खोलीची व्यवस्था केली जाणार नसल्याचं कुमारे म्हणाले. नागपूर तुरुंगातील अरुण गवळी या कुख्यात गुन्हेगाराला दोन दिवसांपूर्वीच कोविड झाल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. मात्र त्याला विविध कारणांसाठी तसंच घरगुती समारंभांसाठी पॅरोल रजा देण्यात आली होती. दुसरीकडं आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी साईबाबा यांना पॅरोल नाकारण्यात आला होता. 'हैद्राबादमध्ये कोरोना संक्रमण वाढलं म्हणून पॅरोल नाकारत असल्याचं' कारण प्रशासनानं यावेळी दिलं होतं.

साईबाबांना कारागृहातून वेगळे ठेवण्याच्या शक्यतेविषयी विचारलं असता 'त्यांना आधीपासून वेगळ्या कोठडीत ठेवलं असल्यानं कशाची गरज नाही. दवाखान्यातून परतल्यानंतर त्यांच्यावर कारागृहाच्या आवारातच उपचार केले जातील' असं कुमारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.