India
लॉकडाऊनमध्ये पर्यटनक्षेत्र संकटात, ३ कोटी लोक बेरोजगार होण्याची शक्यता
हॉटेल्स, ट्रॅव्हल एजंट्स, टूर ऑपरेटर, प्रसिद्ध ठिकाणे, रेस्टॉरंट्स, कौटुंबिक करमणूक स्थळे आणि हवाई, जमीन आणि समुद्र वाहतुकीची संपूर्ण व्हॅल्यू चेन कोलमडून पडली आहे.
कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे भारतीय प्रवास आणि पर्यटन उद्योगाला तीव्र धक्का बसला आहे, विशेषत: सरकारने सर्व व्हिसा स्थगित केल्याने, हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक परिणामाचा भूर्दंड पर्यटन उद्योजकांना भोगावा लागत आहे. इंडस्ट्री चेंबर सीआयआयच्या मते, 'भारतीय पर्यटन उद्योगाला सर्व भौगोलिक कार्यक्षेत्रांवर, अर्थात अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय, नुकसान करणारे हे संकट आजवरच्या सर्वात वाईट संकटांपैकी एक आहे. देशातील साधारण, साहसी, हेरिटेज, समुद्री, कॉर्पोरेट, इ. सर्वच पर्यटनाला याचा फटका बसला आहे आणि बसणार आहे.
हॉटेल्स, ट्रॅव्हल एजंट्स, टूर ऑपरेटर, प्रसिद्ध ठिकाणे, रेस्टॉरंट्स, कौटुंबिक करमणूक स्थळे आणि हवाई, जमीन आणि समुद्र वाहतुकीची संपूर्ण व्हॅल्यू चेन कोलमडून पडली आहे.
भारतीय पर्यटन उद्योगासाठी, उन्हाळा हा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी प्रमुख हंगाम आहे. आता, जगभरात कोरोनाव्हायरस पॉझिटिव्हची एकूण संख्या पाच लाखांहून अधिक आहे, ज्यामुळे येता उन्हाळा पर्यटन उद्योगासाठी अत्यंत गंभीर दिसत आहे. भारतात एकूण कोरोना बाधितांची संख्या ९०० च्या वर गेली आहे.
सफायर वेंचर्स आणि काझिन ट्रॅव्हलचे संचालक कन्सल्टंट्स एलएलपीचे सीईओ सिद्धार्थ जैन 'द हिंदू बिझनेस लाईन'शी बोलताना म्हणतात, "व्यवसाय अक्षरशः ठप्प झाला आहे आणि आधीच व्यवसाय आव्हानात्मक परिस्थितीत सुरु होता. कोविड-१९ प्रकरणे कमी झाली तरीही, या नुकसानातून बाहेर पाडण्यासाठीच किमान ८-१० महिने लागतील. एकट्या खासगी भागधारकांना सरकारच्या आर्थिक सवलतीशिवाय ही नुकसानभरपाई करता येणार नाही.”
असंघटित क्षेत्र आणि परस्परांशी जोडलेले उद्योग मोठ्या प्रमाणात तोट्यात जातील. अकुशल कामगारांसार याचा सर्वात पहिला परिणाम होईल. फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटीच्या म्हणण्यानुसार पर्यटन उद्योग दिवाळखोरी, व्यवसाय बंद पडणे आणि मोठ्या प्रमाणात बेरोजगारीकडे पहात आहे. तज्ज्ञांचा असा अंदाज आहे, की ५.५ कोटी (प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष) कामगारांपैकी सुमारे ७० टक्के (3.8 कोटींपेक्षा जास्त) बेरोजगार होऊ शकतात. अनेक पर्यटन, आतिथ्य आणि विमानचालन उद्योग संस्थांनीही कर्मचार्यांना ईएमआय, हप्ते, कर आणि पगार भरण्यासाठी अंतरिम सवलतीसाठी सरकारला पत्र लिहिले आहे. किमान पुढच्या आर्थिक वर्षासाठी उद्योगासाठी नुकसानभरपाईचा रस्ता नक्कीच अवघड आहे.
ट्रॅव्हल एजेंट्स असोसिएशन आॅफ पुणे (TAAP) चे निलेश भंसाळी यांना इंडी जर्नलने संपर्क केला तेव्हा त्यांनी सांगितले की, "आमच्या अंतर्गत १०० हुन अधिक एजंट्स आहेत आणि संपूर्ण पुण्यात असे २००/२५० नोंदणीकृत असोसिएशन आहेत व हे बहुतांश असंघटित क्षेत्र आहे. या अचानक आलेल्या संकटामुळे आमच्यासारख्या संस्था असोत किंवा एखादा एजंट असो, सर्वच अडचणीत आले आहेत."
निलेश भंसाळी
"सिझनच्या आधीपासूनच आमचे काम सुरु झालेले असते, मग त्यात जाहिरात करणे, क्लायंट गोळा करणे, त्यांच्याशी सतत संपर्कात राहणे आणि इतरही अनेक गोष्टी, जसे हाॅटेल, एअरलाईन्स बुकिंग, अॅडव्हान्स मध्ये कराव्या लागतात आणि त्या नॉन-रिफंडेबल असतात. हे सर्व स्वबळावर किंवा बॅंके कडुन कर्ज काढून गुंतवणूक केलेली असते. एखादी ट्रिप जेव्हा पुर्ण होऊन माघारी येते, तेव्हा आमचा गुंतवलेला पैसा आम्हाला परत मिळतो. आता ज्या बुकिंग आम्ही केल्या होत्या त्यांचे पैसे तर बुडाले आणि आम्ही त्याबाबत काही करुही शकत नाही. आमच्यासाठीसुद्धा देशाचे आरोग्य महत्त्वाचे आहे," असे ते पुढे म्हणाले.
भंसाळी त्यांना झालेल्या नुकसानबाबत पुढे म्हणतात, "जेव्हा देशभर संपूर्ण लाॅकडाउन केले गेले, त्याआधी रेल्वे सेवा आणि एअरलाईन्स सुरुळित चालु होत्या, मात्र भरपुर क्लायंट्सनी आपल्या बुकिंग रद्द केल्या आणि आम्हाला त्यांचे पेमेंट करावे लागले, मात्र आम्ही जेव्हा एअरलाईन्सशी संपर्क केला, त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या काळात त्यांच्या सेवा चालू होत्या, तर रद्द करण्याचे शुल्क कापुनच पैसे त्यांनी आम्हाला पैसे परत करण्याचे ठरवले."
ट्रॅव्हल एजेंट्स असोसिएशन आॅफ पुणे (TAAP) ने या परिस्थितीत काही मागण्या समोर ठेवल्या आहेत, ज्यात, एअरलाईन्स आणि हाॅटेल लाइन्सला आदेश द्यावे की फेब्रुवारी मार्च आणि पुढच्या महिन्यांमध्ये होणार्या कान्स्लेशनचे पुर्ण पैसे परत करावेत, जीएसटी आणि ईनकम टॅक्स हाॅलिडे ६ महिने किंवा १ वर्षासाठी द्यावा, ट्रॅव्हल असोसिएशन किंवा एजंटचे जे काही लोन आहे त्याला सहा महिने स्थगिती द्यावी, ट्रॅव्हल इंडस्ट्रीच्या कर्मचार्यांचा पीएफ , आणि प्रोव्हिजन टॅक्सचा भार ह्या काळात सरकारने उचलावा, इ. मागण्यांचा समावेश आहे.
गिर्यारोहक वैभव एवळे यांच्याशी इंडी जर्नलने संपर्क केला असता त्यांनी सांगितले, "वीना, केसरी सारख्या मोठ-मोठ्या कंपन्यांचा खुप मोठे नुकसान झाले आहे, कारण या कंपन्या फॅमिली टूर्स अरेंज करतात आणि या सर्व टूर परिक्षेच्या नंतरच्या काळात केल्या जातात आणि त्या काळातच संकट आले आहे. टुर कंपन्यांचे नुकसान तर आहेच, मात्र गिर्यारोहक आणि शेरपा समुदायाला ही चांगलाच फटका बसला आहे. एव्हरेस्टचा मोसम मे महिन्याचा असतो आणि यासाठी सर्वजण मार्चमध्ये नेपाळमध्ये येऊन थांबतात आणि दोन महिने सराव करतात. माउंट एव्हरेस्ट चढाईचा एकंदरीत खर्च हा २५ लाखांच्या घरात जातो, मग त्यात नेपाळची राॅयल्टी, हाॅटेल्स, आॅक्सिजन, टेंट आणि लागणाऱ्या ३ महिन्याच्या कालावधीतला सगळा खर्च येतो."
ते पुढे म्हणतात, "मात्र यात सर्वात महत्त्वाचे शेर्पाचे काम असते, शेर्पा हे नेपाळचे स्थानिक लोक, ज्यांच्यासाठी हा काळ खुप महत्त्वाचा असतो. एका शेरपाला एका फेरीचे ३-४ लाख रुपये मिळतात व त्यानंतर ते शहरात येऊन छोट्या- मोठ्या जागी काम करतात आणि पुन्हा मार्च ला एव्हरेस्टच्या कामाला जातात. यंदाची एव्हरेस्ट फेरी रद्द होईल अशीच चिन्हे दिसत आहेत ज्यामुळे त्या शेरपांचे नुकसान होईल."
"नेपाळप्रमाणेच भारतात असलेले पर्वत सुद्दा ह्माच दिवसात चढता येतात आणि तेथील स्थानिक सुद्धा ह्या सिझनवर अवलंबून असतात हा सिझन साधारणतः मार्च पासुन सुरु होतो. आता या कारणांमुळे लोकांच्या पोटावर पाय आला आहे. त्यांच्यासाठी भारत सरकार काही सुविधा पुरवेल की नाही हे अजुन माहित नाही आणि हे संकट किमान ३ महिने शहरांना नुकसान करेल पण पुन्हा तितक्याच प्रमाणात पर्यटन सुरु व्हायला ८-९ महिन्याचा कालावधी जाईल आणि ८-९ महिन्यानंतरही परदेशी गिर्यारोहकांना किंवा टूर्सला परवानगी मिळेल की नाही, यावरही प्रश्नचिन्हच आहे." असं ऐवळे म्हणतात.
वैभव एवळे
वैभव यांनी किलीमंजारो सारख्या मोठ्या पर्वतांवरर भारताचा झेंडा फडकवला आहे. दरवर्षी १५ आॅगस्टच्या दिवशी ते वेगवेगळ्या पर्वतांवर भारताला स्वातंत्र्य मिळून जेवढी वर्ष झाली आहेत तेवढे झेंडे फडकवतात, यंदाच्या वर्षी त्यांनी आॅस्ट्रेलियातील माऊंटनवर ७४ झेंडे फडकवन्याची योजना आखली होती, मात्र त्यांना जायला मिळणार नाही याची नाराजगी त्यांनी व्यक्त केली. मात्र त्यांनी शेवटच्या दिवसा पर्यंत वाट बघेन, असेही सांगितले.
या संकटामुळे महाराष्ट्रातील प्रबळगड (पनवेल) च्या आजुबाजुच्या लोकांची परिस्थितीही बिकट झाली आहे. प्रबळगडावर जेवणाची खाणावळ चालवणारे बाळू इंडी जर्नलशी बोलताना म्हणाले की त्यांच्या गावात २९ घरे आहेत आणि सामान्यपणे त्यांचे आयुष्य हे प्रवाशांवर अवलंबून असते. "शुक्रवार, शनिवार आणि रविवार ईथे ट्रेकर ग्रुप्स येतात आणि त्यांची जेवणाची व्यवस्था आम्ही पाहतो. साधारणतः १३० रुपयांना जेवणाची थाळी आम्ही देतो. रोज एक घर ९-१० माणसं जेवू घालतं आणि या दिवसांच्या कमाईवर आमचा आठवडा चालतो."
बाळू पुढे सांगतात, "आमच्या गावापासून पनवेल १४ कि.मी आहे, त्यामुळे आम्हाला धान्य-भाज्यांचा तुटवडा आहे सध्या जे घरात आहे तेच खातोय. सध्या आम्ही स्वतः पिकवलेली भात आणि नाचणी खातोय. कडधान्य आहेत, परंतु ७-८ दिवसांनी हा साठा संपेल, त्यानंतर काय करायचे हा प्रश्न उभा आहे. हे संकट लवकर गेले की आम्ही काहीतरी कमवू शकू. असे किती दिवस बसावे लागणार हेदेखील माहित नाही आणि घरात बसण्याची सवय नसल्यामुळे त्रासही होतोय."