India

त्यांना ‘आंबेडकर’ नावाची एलर्जी

महाविद्यालयीन दलित विद्यार्थ्यांचे अनुभव

Credit : Ambedkar Students Organisation

आज रोहित वेमुलाचा स्मृतीदिन. तीन वर्षापूर्वी आजच्याच दिवशी हैदराबाद विद्यापीठात शिकत असणाऱ्या पी.एच.डी. स्कॉलर रोहितनं विद्यापीठात केल्या जाणाऱ्या मानसिक छळामुळे आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येनंतर देशभरातल्या विद्यार्थ्यांमध्ये अंसतोषाचं वारं वाहू लागलं. विविध विद्यार्थी संघटना, आंबेडकरी संघटना, विद्यापीठं, बुद्धीजीवींनी आंदोलनं केली. शैक्षणिक कॅम्पसमध्ये अनेक दलित, आदिवासी, मुस्लीम विद्यार्थ्यांना भेदभाव, न्यूनगंड, हेटाळणी, सर्वांगीण विकासाच्या संधींमधली असमानता यामुळे मानसिक छळाचा सामना करावा लागतो. आज शैक्षणिक कॅम्पसमधील दलित - आदिवासी विद्यार्थी कोणत्या वातावरणात शिकत आहेत, रोहितच्या आत्महत्येनंतर जी विद्यार्थी आंदोलनं उभी राहिली, त्यातून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोणती यंत्रणा उभी केली गेली का? याचा आढावा घेण्यासाठी पुणे शहरातील काही विद्यार्थ्यांशी बातचीत केली. त्यात अनेकांनी आपल्या समस्या - आपल्याला मिळणारं वातावरण - संधी याबाबतीले अनुभव इंडी जर्नलसोबत शेअर केले.

ajay rahulwadअजय राहुलवाड.

अजय राहुलवाड हा नांदेडमधून पुण्यात शिकायला आलेला आदिवासी विद्यार्थी. त्याच्या घरची परिस्थिती बेताची. पुण्यातील फर्ग्यूसन कॉलेजमध्ये तो समाजशास्त्रात बी. ए. करतो आहे. अजय फर्ग्यूसन कॉलेजमध्ये आंबेडकराईट्स स्टूडंट ऑर्गनायझेशन ही संघटना चालवतो. त्याच्यासोबत त्याचे आठ - दहा सहकारी - मित्र या संघटनेचे सदस्य असून ते वर्षातून आठ ते दहा कार्य़क्रमांचं आयोजन कॉलेजमध्ये करतात. अगदी काल - परवाचीच गोष्ट अजय सांगतो.

“रोहित वेमुला शहादत दिवसानिमित्त आम्ही जो कार्यक्रम आयोजित केलाय, त्याची पोस्टर्स आम्हाला कॉलेजमध्ये लावायची होती, म्हणून आम्ही प्रभारी प्रिंसिपल सरांकडे गेलो. तर सरांनी आम्हाला पोस्टर्स लावायला परवानगी नाकारली. पोस्टर्सवर रोहित वेमुलाचा फोटो वगेरे बघून आम्हाला परवानगी नाकारली. कॉलेजच्या मॅनेजमेंटकडून परवानगी आणा म्हणाले. आमच्या कॉलेजमधल्या इतर संघटना उदा. अभाविप - पतितपावन संघटना यांना मात्र कार्यक्रमासाठी परवानगीचीही गरज वाटत नाही. अजय पुढं सांगतो, “मागच्या वर्षी आम्हाला कॉलेजमध्ये रोहित वेमुला स्मृतीदिनानिमित्त पथनाट्य करायचं होतं. परवानगीसाठी गेलो असता, आमचं स्क्रिप्ट आधी पाहायला मागितलं. मग स्क्रिप्टमध्ये बदल करायला लावले. रोहित वेमुलानं आत्महत्येपूर्वी लिहीलेलं पत्र आम्ही पथनाट्यात वाचणार होतो. आम्हाला रोहितच्या आत्महत्येच्या पत्राचा भाग त्यातून वगळायला लावला."

अजयची मैत्रीण आणि एएसओची (आंबेजकराईट्स स्टुडंट ऑर्गनायझेशन) सदस्य असलेली वैष्णवी बागडे फर्ग्यूसनमध्ये इतिहास विषयात बी.ए करते. तिनं सांगितलं. “आम्ही कॉलेजच्या ग्राऊंडवर पथनाट्याची प्रॅक्टीस करत असताना शिपाई काका अनेकदा तिथं थांबून आम्ही काय करतोय ते मुद्दाम बघत असतात. आम्ही कोणत्या विषयावर बोलतोय, काय करतोय यावर काटेकोर लक्ष ठेवतात. ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटचे लोकही आम्हाला सहकार्य करत नाहीत.”

vaishnaviवैष्णवी बागडे.  

वैष्णवीने तिला नुकताच आलेला अनुभवही सांगितला, “कॉलेजच्या एका फेस्टीव्हलच्या जमाखर्चाची सगळी कागदपत्रं - पावत्या घेऊन मी नुकतीच एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये गेले. सगळी कागदपत्रं व्यवस्थित असूनही मला तीन दिवस अप्रूव्हल मिळालं नाही. ऑफिसच्या वेळांमध्ये गेलं तरी सह्या द्यायला टाळाटाळ करायचे. शेवटी वैतागून मी माझ्या दुसऱ्या मैत्रिणीला पाठवलं - तेव्हा ते काम झालं.”

एएसओची आणखी एक सदस्य विभा. ती फर्ग्यूसनमध्ये मानसशास्त्रात बी. ए. करते. तिचा अनुभवही असाच धक्कादायक. बी.ए. च्या शेवटच्या वर्षी तिला इंटर्नशिपऐवजी वयक्तिक रिसर्च करायचा होता. इंडिविज्युअल रिसर्च ज्यांना करता येत नाही त्यांना फायनल इयरसाठी इंटर्नशिपचा पर्याय असतो. विभाने रिसर्चमध्ये आवड म्हणून रिसर्च करायचं ठरवलं.  ‘पॉर्न साईट्सवर सरकारकडून घातल्या जाणाऱ्या बंदीमुळे तरुण - तरुणींमध्ये लैंगिकता - हिंसा या बाबींबदद्ल होणारे मानसिक बदल आणि त्यांची विचाप्रक्रिया’ हा विषय तिने रिसर्चसाठी निवडला. त्याची पूर्वतयारी केली. तिच्या विषय निवडीचं एक - दोन प्रोफेसर्सकडून कौतुकही झालं.

पुढं काय झालं याबद्दल ती सांगते, “मी उत्तम प्रेंझेटेशन दिलं. तोंडी परीक्षेत आत्मविश्वासाने उत्तरं दिली. फक्त एका प्रश्नाचं उत्तर मला देता आलं नाही. म्हणून मी प्रामाणिकपणे याबद्दल मला माहित नाही. असं उत्तर दिलं होतं, पण माझा एकूण इंटरव्ह्यू  - तोंडी परीक्षा चांगलीच झाली होती. माझी रिसर्चसाठी नक्की निवड होणार असं वाटत होतं,” म्हणत विभा पुढं सांगते, “दुसऱ्या दिवशी त्या पॅनलवरच्या एका प्रोफेसरनी मला विचारलं - रिसर्चसाठी तुझे गाईड कोण आहेत? कारण त्यांना वाटलं माझं सिलेक्शन रिसर्चसाठी झालं असेल. पण मी नाराजीच्या सुरात त्यांना माझं सिलेक्शन झालंच नसल्याचं सांगितलं.”

विभाला मागील अकादमिक वर्षात १० सीजीपीए पॉईंट्सपैकी  ८.५ सीजीपीए पॉंईट्स आणि सर्व पेपर्समध्ये A+ अशा ग्रेड्स आहेत. याचा अर्थ तिचा अकादमिक आलेख उत्तम आहे. तरी देखील तिला इंडिविज्युअल रिसर्च - जे करण्यात तिला रस होता, ज्यासाठी कष्ट करण्याची तिची तयारी होती, ती संधी तिला नाकारली गेली. मानसशास्त्र हा विषय - स्पेशल विषय म्हणून डिग्रीला अभ्यासायला मिळणं अत्यंत कठीण असल्याचं आणि त्यातूनही शिक्षकांकडून मुलाखतीवेळी दलित विद्यार्थ्यांना कपडे - भाषा - देहबोली या निकषांना महत्व दिलं गेल्याने रिसर्चपर्यंत पोहोचणं खूप अवघड असतं. अशी सल विभानं बोलून दाखवली.

ASO1

प्राध्यापकांचा तुमच्याशी वर्तनव्यवहार कसा असतो हे विचारल्यावर, अजय म्हणाला - “परवाच आम्ही एका सरांच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो. तिथं आम्हाला दोघा - तिघांना बघून एक - दोन सरच आमच्याशी बोलले. आमचे साधे कपडे, अवतार बघून अनेक शिक्षकांनी आम्हाला ओळखसुद्धा दाखवली नाय, साधी स्माईलसुद्धा दिली नाय.”

वर्गातील - कॉलेजमधील दलितेतर विद्यार्थी तुमच्याशी कसं वागतात - हे विचारल्यावर अजय म्हणाला - “त्यांना आंबेडकर नावाची एलर्जी आहे. त्यांना आम्ही आंबेडकरांचं नाव संघटनेत लावतो, हे आवडत नाय. बऱ्याच जणांनी आम्हाला नाव बदलायचं सुचवलं आहे. आमच्या चांगल्या कार्यक्रम, व्याख्यांनानासुद्धा आमचे इतर जातींतील मित्र - मैत्रिणी येत नाहीत. काही काम असेल तेव्हाच येतात. बाकी आम्ही एकमेकांशी सुख-दु:ख शेयर केलंय, सोबत जेवलोय, अभ्यास केलाय. असं होत नाही. आम्ही आंबेडकरांच्या नावाने काही कार्यक्रम घेण्याचं सांगितलं की ते  अंगावर पडलेली पाल झटकावं तसं करतात.”

एएसओचा आणखी एक सदस्य सांगतो - “काही दिवसांपुर्वी आम्ही कॉलेजमध्ये झालेल्या सत्यनारायणाच्या पुजेचा निषेध केला होता. शांततामय मार्गाने आम्हाला न पटलेल्या कृत्याचा आम्ही निषेध केला, तेव्हापासून आम्हाला जास्तच टार्गेट केलं जातंय. प्रशासन अजिबात सहकार्य करत नाही. इतकं की ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यासाठी आम्ही एडमिन डिपार्टमेंटकडे सावित्रीबाई फुलेंचा फोटो मागायला गेलो तर डिपार्टमेंटकडे दोन फोटो असूनही त्यांनी आम्हाला सावित्रीबाईंचा फोटो दिला नाही. याऊलट उर्मटपणे बोलून आम्हाला परत पाठवलं.”

हे विद्यार्थी बोलतच होते, भरभरुन त्यांचे अनुभव, अनेक प्रसंग सांगत होते. त्यांना कार्यक्रम करायला परवानगी दिली जात नाही, कुणाचं व्याख्यान कॉलेजमध्ये आयोजित केलं तर, त्यांनी बोलावलेल्या वक्त्याचं नाव पाहून - वक्ते बदलण्याचे सल्ले दिले जातात. कधी काही प्रश्न विचारले तर इतर संघटनांची मुलं मारायला धाऊन येतात. एन.सी.सी. तसंच एन.एस.एस आणि कॉलेजच्या इतर सांस्कृतिक कार्यक्रमात गुणवत्ता असूनही डावललं जातं. जबाबदारीचं काम दिलं जात नाही. असा एक ना अनेक प्रकारचा भेदभाव त्यांच्या वाट्याला येऊन त्यांचं अनेकप्रकारे मानसिक खच्चीकरण केलं जातं. तुम्ही दलित - आदिवासी विद्यार्थी या सगळ्याला साामोरं कसं जाता? मानसिक ताण - तणाव दूर करुन, तितक्याच जोमानं कसं शिक्षण पूर्ण करता? असा प्रश्न विचारल्यावर वैष्णवीनं सांगितलं,

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचं प्रेरणास्थान आहे. त्यांच्या विचारातून लढण्याचं बळ मिळतं. आम्ही प्रत्येक जण एकमेकांसोबत काय घडतं ते शेअर करतो. त्यामुळे आमचं टेंशन - शेअर होतं. एकमेकांमधलं बॉंडिंग चांगलं असल्यामुळे एकमेकांशी बोलणं - सोबत एकजुटीनं राहणं आणि संघर्ष करणं सोपं होतं. आंबेडकर नावाच्या धाग्याने आम्हाला एकमेकांशी घट्ट बांधल आहे आणि आम्ही गप्प राहण्यापेक्षा संघर्षाची वाट निवडली आहे.”