India
मुलाखत: मेडिकल करियरची सुरुवातच कोरोनाग्रस्तांच्या सेवेपासून सुरु करणारी २४ वर्षीय डॉक्टर
२४ वर्षीय डॉ. सोनाली ठवकरची मुलाखत
ती २४ वर्षांची तरुणी. एम.बी.बी.एस करून नुकतंच वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवलेली. तिची प्रॅक्टीस अजून सुरूही झाली नव्हती कारण तिला पुढं शिकायचं होतं, आहे. एम.डी. करण्यासाठी पूर्वपरीक्षेचा अभ्यास करत असताना अचानक तिचं डॉक्टर म्हणून काम करणं सुरू झालं. करिअरची सुरुवात झाली तीच कोरोनासारख्या महामारीच्या संकटात काम करण्यापासून. करिअरच्या सुरुवातीला प्रत्येकाला अनेक अपेक्षा असतात.आपल्या क्षेत्राबद्दलची उत्सुकता, सकारात्मक उर्जा असते, मात्र एका वैश्विक संकटात जिनं डॉक्टर म्हणून कोरोना पेशंट्ससाठी काम करून आपल्या करिअरची सुरुवात केली, त्या डॉ. सोनाली ठवकर हिचा अनुभव खूप वेगळा आहे. हा अनुभव जाणून घेण्यासाठीच तिच्याशी केलेला हा मुक्त संवाद.
एक तरुण डॉक्टर म्हणून सध्या तू खूप महत्वाचं काम करते आहेस, त्यासाठी सर्वप्रथम तुझं अभिनंदन. या कामाची सुरुवात कशी झाली? तुझ्या शिक्षणाबद्दलही सांग.
सोनाली: २०१९ मध्ये मी एम.बी.बी.एस पूर्ण केलं. नागपूरच्या इंदिरा गांधी गवर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून ही डिग्री घेतली. त्यानंतर मी गडचिरोलीच्या ‘सर्च’ या डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या संस्थेत तीन महिने काम केलं. गडचिरोलीहून आल्यानंतर पुन्हा मी माझ्या इंदिरा गांधी कॉलेजमध्ये नागपूरला काम करू लागले. त्या कामातून काही दिवसांपूर्वीच मी पुढच्या अभ्यासासाठी ब्रेक घेतला. आता कोरोनासाठी काम करण्याआधी मी भंडाऱ्याला माझ्या घरीच होते. एम.डी. करण्यासाठीची एक पूर्वपरीक्षाही (PG-NEET) मी दिली. त्यात मला ऑल इंडिया-१५ रॅंकिंगही मिळालं.
पण मला जे स्पेशलायजेशन करायचं आहे ते दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानाच्या (एम्स) हॉस्पिटलमधून करायचं आहे, त्यासाठी त्यांची एक स्वतंत्र पूर्वपरीक्षा असते. या परिक्षेचा अभ्यास मी करत होते. कोरोनामुळे परीक्षा रद्द झाली. आता अभ्यासही नाही आणि लॉकडाऊनमुळे बाहेरही पडता येत नाही, यामुळे थोडी बैचेनी आली होती. त्यात एक दिवस आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लाईव्ह आले आणि त्यांनी रिटायर्ड सैनिक, हेल्थ प्रोफेशनल्सना कोरोनाविरोधातल्या संघर्षात मदत करण्याचं अपील केलं. मी ते ऐकून दुसऱ्या मिनिटालाच सरकारी यंत्रणेला ईमेल पाठवला. मी काम करण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं. लॉकडाऊनमुळे जवळपासच्या जिल्ह्यात काम करणं मला शक्य आहे इ. गोष्टींची माहिती दिली. मला लगेचच सरकारकडून उत्तर आलं आणि यवतमाळच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात मी रुजू झाले.
सध्या तू काम करत असलेल्या शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांची स्थिती कशी आहे?
सोनाली: सुदैवाने इथली स्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. आमच्याकडे एकूण ४८ पॉझिटिव केसेस आहेत. एक चांगली बातमी म्हणजे मागच्या आठवड्यात दोन पेशंट्स पूर्ण बरे होऊन घरी गेले. त्यातला एक जण ४५ वर्षाच्या आसपास वय असलेला पुरुष होता आणि दुसरा २५ च्या आसपास वय असलेला तरुण. शिवाय हे सरकारी हॉस्पिटल रुग्णांना खूप चांगला आहार देतं. त्यात फळं, दूध हे सगळं असतं. इथे स्वच्छता खूप चांगली मेंटेंन केली जातेय. साधारण पंधरा दिवसांपूर्वी मी इथे जॉईन झाले, तेव्हा आम्हाला कोरोना पेशंट्सना फिजीकली, मेंटली कसं हाताळयचं, याचं ३ दिवसांचं ट्रेनिंग दिलं. डॉक्टर्स, नर्सेस, इतर स्टाफला हे ट्रेनिंग मिळणं खूप महत्वाचं आहे, देशभरात अनेक ठिकाणी ते दिलं गेलं नाहीये. प्रॉपर ट्रेनिंग नसेल तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, पण इथली परिस्थिती पूर्ण वेगळी आहे.
तू नेमकं कसं काम करते आहेस, आणि सुरक्षेची साधनं पुरेशी उपलब्ध आहेत का?
सोनाली: देशभरातल्या अनेक हॉस्पिटल्समध्ये पीपीई किट्सचा तुटवडा असला तरी सुदैवाने इथली परिस्थिती वेगळी आहे. आमच्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांसाठी पुरेशी पीपीई किट्स आहेत, त्यामुळे काम करताना खूप भीती वाटत नाही. कामाचं म्हंटलं तर रोज किमान दहा-बारा तास काम करते मी. कोविड पॉझिटिव्ह पेशंट्सच्या वॉर्डमध्ये तसंच नॉन कोविड पेशंट्सच्या वॉर्डमध्ये असं दोन्हीकडे काम करावं लागतं. हे करताना आम्ही खूप काळजी घेतो. ज्या दिवशी कोविड पॉझिटिव्ह पेशंट्च्या वॉर्डमध्ये ड्युटी असते, त्यादिवशी ओपीडीतल्या पेशंट्सना हाताळत नाही, संबंध दिवस कोविडचेच पेशंट्स हाताळतो, आणि ज्या दिवशी ओपीडीमध्ये काम करावं लागतं तो सबंधं दिवस तेच पेशंट्स पाहतो.
संसर्ग टाळण्यासाठी अशा काही खबरदारी घ्याव्या लागतात. कोविडच्या पेशंट्सवर उपचार करताना त्यांना मानसिकरित्या बळ देण्याचा प्रयत्नही करतो. शरीरावरचे उपचार जितके महत्वाचे आहेत, तितकं या काळात पेशंट्सचं मनोबल वाढवणंही गरजेचं आहे. कोविड वॉर्डमधलं वातावरण स्ट्रेस फ्री राहावं म्हणून अनेकदा आम्ही पेशंट्ससाठी मोबाईलवर गाणीही लावतो. या हॉस्पिटलमध्ये काम करायला लागल्यापासून एकही सुट्टी घेता आली नाही, एकदा सुट्टी मिळाली, पण नेमकं त्यादिवशीच तीन डिलीव्हरीज करायच्या होत्या, त्यामुळे हॉस्पिटलला जावंच लागलं. बाकी डॉक्टर्ससाठीही या हॉस्पिटल प्रशासनाने चांगल्या सोयी उपलब्ध करून दिल्यात. हॉस्पिटलच्या आवारातच स्वतंत्र आयसोलेशन्स रुम्स आहेत, उत्तम प्रतीचं जेवण दिलं जातं. या सर्व गोष्टींमुळे काळजी कमी होते.
तीन महिलांची प्रसूती करण्याची इमर्जन्सी आली, ती कशी हाताळलीस?
सोनाली: या तीन महिलांपैकी दोघीजणींची याच हॉस्पिटलमध्ये नोंद केलेली होती. त्यामुळे त्या गरोदरपणात दर महिन्याला तपासणी आणि औषधांसाठी हॉस्पिटलमध्ये येत होत्या आणि त्या डिलीव्हरीच्या दिलेल्या तारखेला हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. तिसऱ्या महिलेची डिलिव्हरीसाठी नोंदणी केलेली नव्हती आणि तिला त्यादिवशी अचानक लेबर पेन सुरु झालं. तिघींपैकी दोघीजणी हॉस्पिटलला येत असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही, हे माहीत होतं. तिघींचीही व्यवस्थित तपासणी केली गेली. मागच्या आठवड्यात एकाच दिवशी तिघींची डिलीव्हरी झाली.
माझी खरं तर सुट्टी होती त्यादिवशी, पण दुपारी इमरजन्सीचा फोन आल्याने जावं लागलं पण तो अनुभव खूप अविस्मरणीय आहे. एम.बी.बी.एस. करत असताना सीनीयर डॉक्टर्सच्या हाताखाली शिकण्यासाठी डिलीव्हरीजचं निरिक्षण करणं वेगळं आणि स्वत: डिलिवरी करण्याचा अनुभव खूप वेगळा असतो. सुदैवाने या तिन्ही महिलांचं डिलीव्हरी एकदम नॉर्मल झाली, सीझरची वगेरे गरज पडली नाही आणि तिघींनीही मुलींना जन्म दिला. या तीन तान्ह्या मुलींना बघून मला खूप आनंद झाला...एखाद्या सुंदर निर्मितीचा आपण भाग आहोत असंच वाटलं आणि खूप अभिमानही. दुसरं म्हणजे डिलीव्हरी ही फक्त बाईने बाळाला जन्म द्यायचा, एवढ्या जैविक दृष्टीकोनातून मी त्याकडे पाहत नाही. अनेक सामाजिक निरिक्षणांचीही मी यानिमित्ताने मनात नोंद घेते. उदा., या तीन बायकांची प्रसूती नॉर्मल झाली, कारण त्या मजूर बाया होत्या. या बायांना अगदी प्रसूतीच्या दिवसापर्यंतही खूप शारिरिक श्रम करावे लागतात.
तू कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा देते आहेस, तुझ्या कुटूंबाला काळजी वाटत असेल ना?
सोनाली: हो. खरं तर आई बाबांनी माझ्या या निर्णयाला विरोधच केला. त्यामागची त्यांची भावना मी समजू शकते. कोणत्याही पालकांना आपल्या मुलांची काळजी वाटणं स्वाभाविक आहे. त्यात माझं प्रोफेशन असं की संसर्गाची भीती जास्त आणि त्यातूनही मी हॉस्पिटलमध्ये काम करत असले असते तर त्यांनी इतका विरोध करून काम मध्येच थांबवायला सांगितलं नसतं. पण मी छान घरी होते, निवांत...तेव्हा घरी बसलेलं असताना आपण या काळात हॉस्पिटलला जायचं म्हणजे त्यांच्यासाठी मी आगीतून फुफाट्यात जाण्यासारखंच आहे. पण अशा संकटाच्या काळात जर आपल्या अभ्यासाचा, ज्ञानाचा उपयोग समाजासाठी केला नाही, तर शिक्षणाला काय अर्थ...असं मला वाटलं आणि त्यांचा विरोध न जुमानता मी यवतमाळला आले. माझी मोठी बहीणही पोलीस इनस्पेक्टर आहे, त्यामुळे तिलाही दिवसरात्र काम करावं लागतं तेही ती मोठ्या संख्येने रुग्ण असलेल्या मुंबई शहरात ती सध्या आहे. दोन्ही तरुण मुली आपल्यापासून दूर तेही अशा प्रोफेशनमध्ये आहेत की त्यांचा लोकांशी संपर्क येणं अटळ आहे, यामुळे माझ्या आई - बाबांना काय वाटत असेल, हे मी समजू शकते, भीतीच्या भावनेसोबतच त्यांना आमचा अभिमानही वाटत असणार.
बाबा दररोज फोन करून माझी चौकशी करतात, आई सध्या थोडी रुसलेली आहे, पण लवकरच तिचाही रुसवा जाईल.
करिअरच्या सुरुवातीला तू अशा प्रकारच्या वैश्विक महामारीत काम करते आहेस, तुझ्या मनात नेमक्या काय भावना आहेत? स्वत:ला संसर्ग होण्याची भीती वाटत नाही का?
सोनाली: सुरवातीला थोडीशी भीती वाटली, पण आता वाटत नाही. सुदैवाने आमच्या हॉस्पिटलमध्ये पीपीई कीट्स पुरेशी आहेत, त्यामुळेही काळजी कमी होते. बाकी मला समाजासाठी, देशासाठी वेळ पडली तर काही करावं असं वाटत असल्याने आताच्या कामाचा त्रास होत नाही. घरी असताना मी एम्सच्या पूर्वपरीक्षेची तयारी करत होते. या परीक्षेचा निकाल लगेचच पाच दिवसात लागतो, त्यामुळे मग दिल्लीला जाण्याची, कार्डिओलॉजी या माझ्या आवडत्या विषयात मास्टर्स करण्याची स्वप्नं पाहत होते. आता परीक्षाच पोस्टपोंड झाल्याने या सगळ्याला ब्रेक लागलाय. मास्टर्ससाठी वेगळ्या शहरात, मोठ्या हॉस्पिटलला जाण्याची एक वेगळीच एक्साईटमेंट होती..पण कोरोनामुळे जगभरातलीच परिस्थिती बदललीये. त्यामुळे आताच्या स्थितीत स्वत:ची वैयक्तिक स्वप्नं बाजूला ठेवली आहेत आणि हे सगळं कधी संपतंय याचीच वाट पाहते आहे.
जगभरात कोरोनामुळे जितक्या रुग्णांचा मृत्यू झालाय, त्या तुलनेत भारतातल्या स्थितीबद्दल काय सांगशील?
सोनाली: हे खरंय की भारतात सुदैवाने अजूनपर्यंत कोरोनाचे हजारो बळी गेले नाहीत. आम्हीही कोरोना पॉझिटिव पेशंट्सचं मनोबल वाढवण्याकरता त्यांनाही आपल्याकडचा मॉरटॅलिटी रेट सांगतो. पण याचा अर्थ आपल्याकडे सगळं आलबेल आहे असं नाही, आपल्याकडे टेस्टचं प्रमाण खूप कमी आहे. कोरोनाची लक्षणं नसलेल्या लोकांची आपण तपासणी करू शकत नाही, कारण तपासणीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात तेवढी किट्स नाहीत. पण बरेचदा लक्षण दिसत नसलेली, तपासणी न केलेली व्यक्तीही पॉझिटिव्ह असू शकते.
दुसरं म्हणजे हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची कोविड टेस्ट होणं आवश्यक आहे, पण तसं होत नाही. आम्ही जेव्हा नॉन कोविड ओपीडीमध्ये काम करतो, तेव्हा पीपीई कीट आम्हाला दिलं जात नाही. अशावेळी नॉन कोविड वॉर्डमधला लक्षणं न दिसलेल्या, तपासणी न झालेल्या पॉझिटिव्ह रुग्णाशी संपर्क आला तर कितीतरी मोठं संकट ओढवू शकतं. अशा परिस्थितीत फक्त डॉक्टर्सनाच नाही तर डॉक्टरकडून इतर नॉन कोविड पेशंट्सनाही हा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे टेस्टचं प्रमाण खूप वाढवायला हवं. आपल्याकडचा मॉरटॅलिटी रेट तुलनेनं कमी दिसतोय, याचं एक मुख्य कारण टेस्टचं कमी प्रमाण हे आहे. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटची तर टेस्ट व्हायलाच हवी पण यापुढच्या काळात वाड्या - वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊनही लोकांच्या टेस्ट करायला हव्यात.