India
हलिमाच्या पत्रकारितेतला 'अनहर्ड' इंडिया
केवळ दहावीपर्यंतच शिकलेली हलिमा झारखंडमध्ये इलेक्ट्रॉनिक पत्रकार आहे.
मागच्या वर्षी झारखंड दौऱ्यात मी धनबादमधले कवी नईम एझाझ यांची मुलाखत घ्यायला त्यांच्या घरी गेले होते, त्यांच्याकडे पोहोचल्यावर त्यांच्या घरातली एक महिला आम्हाला चहा- पाणी देत होती. साधासा पंजाबी ड्रेस घातलेली, डोक्यावरून ओढणी घेतलेली ती बारीकशी अंगकाठी असलेली महिला आमचं आदरातिथ्य करत होती. तिचं ते चहा – पाण्याची लगबग, पेहराव, देहबोली बघून ही बाई आदर्श गृहिणीच्या साच्यात अगदी फिट बसतेय, असं मला लगेच वाटून गेलं. नईमजींशी बोलून झाल्यांनतर मी त्या बाईला म्हणाले, ”दीदी आप भी आईये ना, आपसे भी मुझे बात करनी है “ मला, ती काय करते, तिचं आणि नईमजींचं सहजीवन कसं आहे, तिथल्या सामाजिक, राजकीय परिस्थितीकडे ती कसं बघते हे जाणून घ्यायचं होतं, पण एकूण तिची पाहूणचाराची लगबग आणि खूप कमी बोलणं, यामुळे हि बाई आपल्याशी किती बोलेल, हिला मोकळ कसं करायचं हे प्रश्नही मनात आले.
तिला विचारलं, दीदी आप क्या करती हो? हाऊसवाईफ हो क्या? यावर तिने अतिशय शांतपणे उत्तर दिलं – "जी नही, मै जर्नलिस्ट हूँ". तिचं हे उत्तर ऐकून मी अवाक झाले. या सुखद धक्क्यामुळे निर्माण झालेल्या कुतूहलात तिच्याशी पुढे काय बोलायचं हे मला सुचत नाही, तोवर तिने बोलायला सुरुवात केली आणि म्हणाली, "मैं विडीयो व्हॉलंटियर मीडिया संस्था मे कम्युनिटी करस्पॉडंट हूँ."
मग तिने तिचा लॅपटॉप सुरु करून मला तिचे विडीओ दाखवायला सुरवात केली. तिने केलेल्या विडिओ स्टोरीज बघून मी अवाक झाले. तिच्या ब्लॉकमधल्या आंगणवाडीचा प्रश्न असो की सांडपाण्याचे पाईप फुटल्याचा, की साथीचा आजार पसरल्याचा प्रश्न असो, या सगळ्या स्टोरीज तिने स्वत: केल्या होत्या. लोकांचे बाईट्स घेणं, जिल्हाधिकारी, आरोग्य – अधिकारी, तहसीलदार ते मंत्र्यांचे बाईट्स घेणं असो, हे सगळं ती किती आत्मविश्वासाने करते, हे त्या विडिओजमधून दिसत होतं. मग विडीओ वॉलिंटिअर या माध्यमसंस्थेबद्दल तिने सांगितलं की, “ही संस्था समांतर मिडीयाचं काम करते.
भारतातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात तिथल्याच लोकल कम्युनिटी करस्पॉंडंटची नेमणूक संस्था करते. महिला पत्रकारांचीच नेमणूक केली जाते. कमी शिकलेल्या, गरीब आणि विशेषत दलित, मुस्लीम, आदिवासी स्त्रियांना या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन, प्रशिक्षण, संसाधनं आणि रोजगार देण्याच्या हेतूने या संस्थेचं काम चालतं. विविध गावाखेड्यातले हे कम्युनिटी करस्पॉडंट्स त्यांच्या भागातल्या नागरी समस्या, सामाजिक - राजकीय घटनांचं रिपोर्टिंग करतात. आपल्याकडे न्यूज चैनल्समध्ये विविध जिल्ह्यातले स्ट्रिंजर्स जे काम करतात, तशाच स्वरूपाचे काम हे करस्पॉडंटस करतात. त्यांनाही स्ट्रिंजर्सप्रमाणे जितक्या स्टोरीज वा बातम्यांचं वार्तांकन केलं जाईल, त्यानुसार तितके पैसे मिळतात.” हलिमाने दिलेली ही माहिती माझ्यासाठीही पत्रकारितेचं एक वेगळं रुप दाखवणारी होती.
तिचे सगळे विडीओ बघून, तिचा एकूण कॅमेरा प्रेझेन्स बघून मी पंधरा मिनिटांपूर्वी तिच्याबद्दल मनात बांधलेले आडाखे मोडून पडले. तिचं काम बघून तिला विचारलं, मिडीयाचं शिक्षण कुठून घेतलंस? तर ती म्हणाली, "मैडम...माझं शिक्षण फक्त दहावी झालंय. पुढे शिकायची आवड होती, पण शिकण्यासारखी परिस्थिती नव्हती आणि लग्नही लवकर झालं.”
मग तू हे काम कसं करतेस? असं विचारल्यावर ती म्हणाली, आमच्या संस्थेत सगळ्या माझ्यासारख्याच बायकांना काम दिलं जातं. कमी शिकलेल्या, परिस्थितीमुळे शिकू न शकलेल्या, निराधार, काही तरी करण्याची जिद्द असलेल्या आणि थोडसं बोलता येणाऱ्या बायकांना इथे कामासाठी घेतलं जातं. त्यांना सगळ प्रशिक्षण दिलं जात. बोलायचं कसं, उभं कसं रहायचं, कॅमेरा कसा फेस करायचा, कॅमेरा कसा हाताळयचा, शुटिंग कसं करायचं, लाईट कसा हवा इथपासून ते एडिटिंग कसं करायचं, मोबाईलच्या मोबाईलमध्येच आपण कोणते एप्लिकेशन्स वापरुन एडिटिंग करू शकतो, लॅपटॉप कसा वापरायचा, ईमेल कसा पाठवायचा.. हे सगळं त्यांनी आम्हाला शिकवलं.
‘काही तरी करण्याची ईच्छा आणि थोडसं बोलता येणं’ हाच क्वालिफिकेशन क्रायटेरिया असतो इथे. माझ्यासारख्या कित्येक बायका ज्यांना मोबाईल फक्त फोन, मेसेज करण्यासाठीच वापरायचा असतो, यापलीकडे काहीच माहित नव्हतं, अशा सगळ्या बायका आज कम्युनिटी करस्पॉडंट आहेत. आत्मविश्वासाने सगळं काम करतायत. मी गेल्या पाच वर्षांपासून हे काम करतेय. माझ्या सगळ्या स्टोरीजच तुम्हाला युट्यूबवर बघता येतील.
या सगळ्या प्रवासाची सुरुवात कशी झाली.. यावरही तिने सांगितलेल्या गोष्टी आनंद आणि आश्चर्याचा धक्का देणाऱ्या होत्या. सात वर्षांपूर्वी हलीमा आंगणवाडी सुपरवायझर होती. सामाजिक प्रश्न, आंदोलनं याबाबत आस्था असल्यामुळे तिचं नेहमी वेगवेगळया ठिकाणी जाणं व्हायचं. अशाच एका कार्यक्रमात तिला भेटलेल्या एका सामाजिक कार्यकर्तीने तिला या संस्थेच्या कामाबद्दल आणि त्यांच्या जाहिरातीबद्दल सांगितलं.
झारखंडमधल्या सगळ्या कम्युनिटी करस्पॉडंटच्या मुलाखती रांचीला होणार होत्या. हलीमाला उत्सुकता वाटली. तिने ही गोष्ट तिच्या नवऱ्याला सांगितली आणि मुलाखत देण्याची इच्छा व्यक्त केली, पण तिला अजिबात आत्मविश्वास नव्हता. आपलं शिक्षण कमी, धड बोलता येत नाही शिवाय तिथे संपूर्ण राज्यभरातून किती तरी महिला येणार, त्यात आपली निवड होईल का? असे विचार तिच्या मनात आले. त्यात रांचीला जायचं तर धनबाद ते रांची असा चार तासांचा प्रवास करून, पैसे खर्च करून जावं लागणार. तिनं तरीही जेव्हा ही गोष्ट नवऱ्याला सांगितली तेव्हा तो आनंदी झाला. त्याने तिला आत्मविश्वास दिला, नाहीच झालं सिलेक्शन तर आपली रांचीची पिकनिक होईल, असं नईमजी म्हणाले.
“मग आम्ही दोघे इंटरव्ह्यूला गेलो, तिथे माझ्यासारख्याच सगळ्या बायका होत्या. माझी जिद्द, सगळं शिकण्याची तयारी बघून त्यांनी माझी निवड केली. नईमजी आणि मला तर आनंदाचा धक्काच बसला.. मी इतकी स्वप्नं बघून आजवर कॉलेजचंही तोंड बघू शकले नव्हते, माझ्यासाठी ही मोठी संधी होती.”
“निवड झाल्यांनतर आमचं पंधरा दिवसाचं प्रशिक्षण झालं. प्रशिक्षकांनी आम्हाला कायम हेच सांगितल कि पत्रकारितेसाठी कोर्सच केला पाहिजे, डिग्रीच घेतली पाहिजे असं काही नाही. तुम्हाला आपल्या आजूबाजूला जे काही चाललंय ते, ‘चौकन्ना’ नजरेनं बघता आलं, ते कळलं, ते बदललं पाहिजे असं वाटलं आणि जे काय बघाल ते तुमच्या भाषेत मांडता, सांगता आलं तरी पुरेसं आहे. या गोष्टीमुळे मला खूप आत्मविश्वास मिळाला आणि आपलं औपचारिक शिक्षण झालं नाहीये तेव्हा आपण हे सगळं नीट करु शकणार नाही, हा न्यूनगंड गेला.” हलिमाने सांगितलं.
“संस्थेने मला लॅपटॉप, मोबाईल, कॅमेरा, पेनड्राईव्ह अशा साऱ्या लागणाऱ्या वस्तू दिल्या. मी एकेक गोष्टी शिकून जोमाने काम करायला सुरुवात केली. लोकांशी चांगला संपर्क तर होताच, त्यामुळे प्रश्न, समस्या दिसत होत्या, पण बोलण्याचं कौशल्य कमावण्यासाठी रोज आरशासमोर उभं राहून प्रॅक्टीस करायचे. हे सगळं करणं माझ्यासाठी सोपं नव्हत, पण नईमजी माझ्या प्रत्येक गोष्टीचं स्वागत करत होते, प्रोत्साहन देत होते. ते चांगले लेखक - कवी आहेत. त्यांनीच मला स्क्रिप्ट कशी लिहायची, परिणामकारकपणे कसं वाचायचं, कसं बोलायचं हे शिकवलं. माझ्याकडून प्रॅक्टीस करवून घेतली. आजही ते अनेक स्टोरीज करायला माझ्यासोबत फिल्डवर येतात. त्यांनीच सुरुवातीला फिल्डवर शूट करायला मला मदत केली. मी लोकांशी बोलायचे, ते कॅमेरा हाताळायचे. आज कधी तरी ते माझ्यासोबत फिल्डवर आले नाहीत, तर लोक गंमतीने मला विचारतात, क्या रिपोर्टर साहेबा, आज आपके कॅमेरामन नही आए?” मी खूप हसते मग. इतक्या सहजतेनं हलीमा स्वत:चा प्रवास सांगत होती, की आपण काही तरी खूप वेगळं करतोय असा भावही तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता.
या सगळ्यात अडचणी काय आल्या, असं विचारल्यावर ती हसून म्हणाली…”खर सांगू का, अडचणींची लिस्ट न संपणारी आहे, पण मी त्यातून एक सोपा मार्ग काढला की, मी जगाची पर्वा केली नाही.
सुरुवातीला आमची परिस्थिती चांगली नव्हती, तेव्हा मी बरेचदा फिल्डवर चालत जायचे, दहा – वीस किलोमीटर चालायचे अनेकदा उन्हातान्हातून. प्रवासाठीही पैसे आमच्याकडे नसायचे बरेचदा. घरी येऊन पुन्हा सगळं घरातलं काम करावं लागायचं. दोन्ही मुलं शाळेत होती. नईमजी मला मदत करायचे. तेव्हा मी आंगणवाडीचंही काम करत होते. मग मला इथल्या आरोग्य विभागाकडून एक सायकल मिळाली. बरेचदा आम्ही दोघं एका भागात काम असलं कि सायकलवर एकत्र जायचो. कधी नईम सायकल चालवायचे, तर कधी मी त्यांना डबलसीट घ्यायचे. आम्हाला खूप भारी वाटाचं पण मोहोल्यातले लोक आम्हाला टोमणे मारायचे, घालून पाडून बोलायचे. बुजुर्ग लोक म्हणायचे, नकाब नही पहनती. सायकलपर आवारा घुमती है. पती कि बराबरी करती है. आपको तो पता है कि कौम कि चीजे कैसी होती है, लेकिन मैने किसी कि कुछ सुनके अपना काम रुकने नही दिया. न मैने किसी को पलटकर जवाब दिया.”
अगदी सहजतेनं तिनं तिच्यासमोरची आव्हानं सांगितली.
“मैं धीरे धीरे अपना काम करती रही। बहुत सारी स्टोरीज बनाई. आंगणवाडी सेविकाओ कि समस्या, मोहोदा गाव के पीने के पानी की जो टंकी थी - उसकी समस्या, ऐसे कई सारे मुद्दे उठाये. कलेक्टर से लेके सारे सरकारी अफसरो तक मैं अभी आत्मविश्वास से बात करती हूँ. बडी ख़ुशी होती हैं, जब मेरी स्टोरी के बाद उस समस्या का हल निकलता है. हाल हिं में मैने हमारे मोहोदा गाव के पीने के पानी कि समस्यापर स्टोरी की थी. उसके बाद वो टंकी का काम हुआ, जो सालो से नही हो रहा था. तो अभी मेरा यह सब काम देखके और उसका नतीजा देखके लोग मेरी प्रशंसा करते हैं. अब गाव मे किसी को भी कोई समस्या हो तो, सबसे पहले मुझे कॉल करते हैं. पहले मेरे नकाब कि चिंता करनेवाले लोग अब युट्यूबपर मेरे विडीयो, स्टोरीज बडे गर्व से देखते है. अब तो मैं काम, ट्रेनिंग के लिये, अलग अलग कॉन्फरन्स के लिये बाहर भी जाती हूँ. लास्ट इयर हम ट्रेनिंग के लिये गोवा गए थे. अब खुद की अच्छी कमाई से मैने नई स्कूटी खरीदी हैं, तो मैं स्कुटी लेके घुमती हूँ.” किती निरागसपणे, मेहनतीने काही मिळवल्याचा आनंद ती शेअर करत होती!
मग पुढे काय करायचा विचार आहे? हे विचारल्यावर तिनं सांगितलं कि, मला बाहेरून बारावीची परीक्षा द्यायची आहे आणि मग इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिवर्सिटीतून बी.ए. करायचं आहे. बाकी मी अनेक आंदोलनात भाग घेते. जल, जंगल, जमीनीशी निगडीत मुद्द्यांवर इथे जे काही काम चालतं विविध संघटनांच्या माध्यमातून ते मी करत राहणार आहे. दामोदर नदीमधलं वाढणारं प्रदूषण ही आम्हा झारखंडच्या लोकांसाठी एक मोठी समस्या आहे. यासाठी इथे मागच्या दहा वर्षात मोठा संघर्ष उभा राहिला. ‘दामोदर बचाओ’ अभियानात मी नईंमजींसोबत सहभागी झाले होते. आंगणवाडीशी तर आधीपासूनच नाळ जोडलेली आहे आणि येत्या काळात आमच्या मुस्लीम समाजात ड्रॉप आऊट मुलींचं प्रमाण जास्त आहे, त्यांना शिक्षण आणि माझ्यासारख्या संधी मिळाव्यात यासाठी काम करणार आहे.
हलीमाचा निर्धार, तिचं काम आणि तिची संघर्षमय कहाणी ऐकून पत्रकारितेचा एक नवा आयाम, नवं चित्र आपल्याला पहायला मिळातं. ‘इंडिया अनहर्ड’ या तिच्या कार्यक्रमातून आजवर अनेक दबलेले, दाबलेले आवाज लोकांसमोर आले. हा आवाज अनेक आवाजांना प्रोत्साहन देईल, अनेक समस्यांना वाचा फोडेल अशी आशा आपण नक्की करू शकतो.
आज माध्यमांमधल्या महिला प्रतिनिधींच्या सहभागाचं एकंदरित चित्र पाहता महिलांची संख्या वाढलेली दिसत असली तरी त्या महिला बहुतकरुन शहरातून, काही संसाधनं उपलब्ध असण्याच्या पार्श्वभूमीतून आलेल्या आहेत. गावा – खेड्यातल्या काही करू पाहण्याची आस, जिद्द असलेल्या महिलाचं, कोणतीही संसाधनं, आर्थिक पाठबळ नसलेल्या महिलांचा माध्यमांतला नोकरदार म्हणून असलेल्या सहभाग कमी आहे, त्यातही मुस्लीम धर्मीय महिलांचं प्रमाण कमी, दलित – आदिवासी महिलांचं प्रमाण कमी. कारण प्रस्थापित माध्यमव्यवस्थेच्या सौंदर्यशास्त्राच्या, अगदी भाषेच्या चौकटीतही यातल्या अनेक जणी बसत नाहीत, म्हणूनही हलीमाचं काम महत्वाचं आहेच पण तिच्यासारख्या इतर अनेक महिलांना प्रेरणा देणारंही आहे. ज्या भूभागातल्या बीसीसीएलच्या खाणींमध्ये अनेक प्रकारच्या प्रयत्नांनी साधा प्रवेशही मिळत नाही, बलाढ्य भांडवलदार जल – जंगल- जमिनी अन्यायीपणे ताब्यात घेताहेत, जिथं नक्षलवादाचं आव्हान आहे, जिथं खाणमाफियांमुळे गुंडाराज आहे, कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न पेटता आहे, अशा भागात एका मुस्लीम महिलेने पत्रकारिता करणं हे किती आव्हानात्मक आहे, याची आपण कल्पना करु शकतो. हलिमासारखी पत्रकार ही अशी सर्व आव्हानं भेदून जे काम करते, ते या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या कुठलीही संसाधनं नसलेल्या, पण काही करण्याची जिदद् असणाऱ्या प्रत्येकाला प्रेरित करणारं आहे.