India

संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना १ जूनपर्यंत पोलीस कोठडी

डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण

Credit : द हिंदू

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयनं काल (शनिवारी) अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांना अटक केली. आज पुणे सत्र न्यायालयात दोघांनाही हजर करण्यात आलं होतं. यावेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एन सोनवणे यांनी १ जूनपर्यंत दोघांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. दाभोलकर हत्या प्रकरणातली ही आतापर्यंतची तिसरी मोठी अटक असून याआधी या प्रकरणात सनातनचा साधक डॉ.विरेंद्रसिंह

तावडेला २०१६ मध्ये अटक करण्यात आली होती. यानंतरचं दुसरं मोठं अटकसत्र झालं ऑगस्ट २०१८ मध्ये. यावेळी सचिन अंदुरे, शरद कळसकर या दोघांना अटक करण्यात आली. त्यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित डिगवेकर यांनाही सीबीआयनं दाभोलकर प्रकरणात अटक केली.

आतापर्यंत तावडे, कळसकर आणि अंदुरे यांच्याविरोधातली दोषारोपपत्र तसंच पुरवणी दोषारोपत्रही न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. तर याच खटल्यात सीबीआयकडून दोषारोपपत्र वेळेत सादर न केल्यानं अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित डिगवेकर यांना जामीन मिळाला मात्र गौरी लंकेश प्रकरणात हे काळेसह हे तिघे आरोपी असल्यानं ते कर्नाटकमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत.    

आज संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेला न्यायालयात हजर केलं असता, सीबीआयचे वकील प्रकाश सुर्यवंशी यांनी न्यायालयाला सांगितलं, “संजीव पुनाळेकरनं दाभोलकर हत्या प्रकरणात वापरलेली शस्त्रं आणि इतरही शस्त्रं नष्ट करण्याची सूचना शरद कळस्करला केली होती. कळसकर आणि पुनाळेकरांची भेट पुनाळेकरांच्या ऑफिसमध्ये झाली होती. त्यानुसार कळस्करनं शस्त्रं नष्ट केल्याचा जबाब दिला आहे.” तर विक्रम भावेच्या बाबतीत अ‍ॅड. सुर्यवंशी म्हणाले, ”विक्रम भावेनं दाभोलकरांच्या हत्येपुर्वी रेकी केली. हत्येनंतर पुण्यातून कोणत्या मार्गानं निसटायचं याचे तपशील मारेकऱ्यांना सांगितले. त्यामुळे याबाबतचा सखोल तपास करण्यासाठी, हत्येसाठी वापरलेली मोटरसायकल मिळवण्यासाठी माहिती घेणं आवश्यक आहे. त्यासाठी दोघांची १४ दिवसांची पोलीस कोठडी आवश्यक आहे.”

यावर संजीव पुनाळेकर यांनी स्वत:च स्वत:ची बाजू मांडत न्यायालयाला सांगितलं, “ शरद कळसकरनं दोषारोपपत्र दाखल करण्याच्या तारखेनुसार ही माहिती जर ऑक्टोबरमध्ये दिली असेल तर सीबीआयनं अटक करायला सात - साडेसात महिने का घेतले? याआधी त्यांनी तपास करायला हवा होता. सीबीआयनं याआधी गुन्ह्याचे सूत्रधार म्हणून वेगळी नावं पुढे आणली, आता मुंबई उच्च न्यायालय या खटल्याची निगराणी करतंय, उच्च न्यायालयाकडून तपासयंत्रणेवर ताशेरे ओढल्यानंतर त्या दबावाखाली येऊन सीबीआयनं ही अटक केली आहे. कळसकरची आणि माझी भेट झाली हे सत्य आहे पण ती भेट मी वकील असल्यानं काही खटल्यासंदर्भात झाली होती मात्र शस्त्रं नष्ट करण्याची सूचना मी त्याला दिली, हे स्पष्ट करणाारा पुरावा सीबीआयकडे नाही, त्यामुळे मला न्यायालयीन कोठडी द्यावी.”  

दरम्यान अ‍ॅड. विरेंद्र इचलकरंजीकर यांनी विक्रम भावे यांची बाजू मांडताना सांगितलं, “सीबीआय याआधी हत्येचे आरोपी म्हणून इतरांची नावं घेत होतं. आता विक्रम भावेंनी रेकी केली असं सांगत आहे. विक्रम भावेच्या सहभागाचा कोणताही पुरावा, कॉल डिटेल्स इ. सीबीआयकडे उपलब्ध नाहीत.”

याशिवाय आरोपींच्या वतीनं एक अर्ज न्यायालयाला सादर करण्यात आला. पोलीस कोठडीत आरोपींची चौकशी चालू असताना आरोपींच्या वकीलांना त्यादरम्यान आरोपीला भेटण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी या अर्जात केली होती, ती न्यायालयानं मान्य केली. सुनावणीदरम्यान पुनाळेकर आणि भावे यांच्या सनातन संस्थेशी संबंध असण्याचा उल्लेख केल्यावरुन बचाव पक्षाचे वकील व पुनाळेकरांनी ही माहिती अनावश्यक आणि असंबंध असल्याचं सांगितलं, विनाकारण या गोष्टीची मीडिया ट्रायल होऊ नये, असंही म्हटलं, मात्र सरकारी वकील सुर्यवंशी यांनी दाभोलकरांच्या हत्येच्या दुसऱ्या दिवसापासूनच सनातन संस्थेवर आरोप होत असल्याचं नोंदवलं.

आज सुनावणीदरम्यान हिंदू विधीज्ञ परिषदेचे अनेक वकील उपस्थित होते. संजीव पुनाळेकर हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव आहेत. २००८ मालेगाव बॉम्बस्फोटातील जामीनावर बाहेर आलेला आरोपी समीर कुलकर्णीही आज सुनावणीला उपस्थित होता.

 

सनातन तर्फे निषेध 

या अटकेबाबत, सनातन संस्थेनं निषेधाचं पत्र जाहीर केलं आहे. संस्थेच्या या पत्रात म्हटलं आहे की

'डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या प्रकरणी सीबीआयने हिंदु विधीज्ञ परिषदेचे सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि परिषदेचे माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विक्रम भावे यांना केलेली अटक निषेधार्ह आहे. केंद्रात हिंदुत्ववादी शासन सत्तारूढ असतांना अधिवक्ता पुनाळेकर आणि श्री. विक्रम भावे यांना अटक होणे, यामागे षड्यंत्र आहे. सनातन संस्थेवर दबाव आणण्याच्या पुरोगाम्यांच्या मागणीपुढे सीबीआय झुकली आहे.

मालेगाव स्फोट प्रकरणी भगवा आतंकवादाचा खोटेपणा ज्यांनी सिद्ध केला, ज्यांनी समाजाच्या हितासाठी अनेक याचिका केल्या, त्या अधिवक्ता पुनाळेकर यांना अटक करणे गंभीर आहे. समाज, राष्ट्र आणि धर्म यांची निरपेक्षपणे सेवा करणारे अधिवक्ता पुनाळेकर निर्दोष आहेत, ही आमची भावना आहे. अधिवक्ता पुनाळेकर यांना देशभरातील समाजसेवा, देशभक्त आणि हिंदुत्ववादी संघटना, तसेच अधिवक्ते यांनी पाठिंबा कळवला आहे.'