India

विशेष बालकांच्या शाळेत अल्पवयीन मुलीला मारहाण

पीडित बालिकेच्या पालकांचा आरोप

Credit : google

पुण्यातल्या देहू रस्ता परिसरातल्या वात्सल्य या शिक्षण संस्थेत शिकत असणाऱ्या १५ वर्षीय सिद्धी जाधव या विशेष मुलीला संस्थेत मारहाण झाली असण्याची शक्यता असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केलाय. सिद्धी ९० टक्के मतीमंद आहे. “११ फेब्रुवारीला ती स्कूल व्हॅनमधून घरी आली असता, तिची अवस्था अत्यंत दयनीय होती. ती झोपलेली होती, तिला व्हॅनमधून उचलून घरात आणावं लागलं होतं आणि तिचं शरीर सुजलं होतं”, अशी माहिती तिची आई मनीषा जाधव यांनी दिली.


मुलीची अवस्था पाहून मनीषा जाधव यांनी संस्थेच्या संचालक वृषाली देवतरसे यांना त्याच दिवशी त्वरित घरी बोलावून घेतले. देवतरसे यांना मुलीच्या अवस्थेबद्दल विचारलं असता, त्यांनी मुलीच्या पालकांना चौकशी करुन माहिती दिली, “काल रात्री तुमची मुलगी झोपत नव्हती, सतत हालचाल करत होती, त्यामुळे  इतरांना त्रास होत होता, म्हणून आमच्या केयर टेकरनं रात्रभर तिचे पाय बांधून ठेवले, पण आम्ही आमच्या केयर टेकरला कामावरुन काढून टाकणार आहोत” असं संचालक देवतरसे म्हणाल्याचं मनीषा जाधव यांनी सांगितलं.


“सिद्धीचे पाय सुजले होते, डोकंही सुजलं होतं, तिच्या हातावर भाजल्याची जखमही आहे. डोळे काळे - निळे झाले होते, रक्त साकळलं होतं, शिवाय ती काहीच बोलत नव्हती, त्यामुळे आम्ही आधी तिला दवाखान्यात घेऊन गेलो. तिला वाचवणं त्यावेळी महत्वाचं असल्यानं त्यावेळी पोलिसात तक्रार करण्याआधी तिच्या ट्रीटमेंटकडे लक्ष देऊ, असा आम्ही विचार केला.” जाधव इंडी जर्नलशी बोलताना म्हणाल्या. या प्रकरणाबाबत अधिक सविस्तर माहिती देताना त्या म्हणाल्या, “मुलीच्या टाळूला सूज आल्यानं आम्हाला तिचं सिटी स्कॅन वगेरे करावं लागलं, डॉक्टरांनी सांगितलं की तिला मुका मार लागला आहे. आता तिच्या तब्येतीत सुधार असून ती रिकव्हर होतेय. त्यामुळे मागच्या आठवड्यात आम्ही संस्थाचालकांकडे याबाबत बोलण्यासाठी गेलो, त्यावेळी त्यांनी आम्हाला उडवून लावलं. त्यामुळे मग, तुमच्या संस्थेत जर विशेष मुलांना सांभाळण्याची सोय - सुविधा नीट नसेल, तर आम्ही तिला इथं ठेवणार नाही, आम्ही भरलेले पैसे तुम्ही परत करा, असं मी म्हणाले, परंतू त्यावर संस्थाचालक देवतरसे असं म्हणाले, ‘काय करायचं ते करा, आम्ही पैसे परत करणार नाही, डोनेशन नॉन रिफंडेबल आहे, असा फॉर्म आम्ही तुमच्याकडून आधीच भरुन घेतलाय,  पोलिसांत गेलात तरी चालेल”.


सिद्धीच्या तब्येतीची हेळसांड व मारहाणीचा प्रकार पाहून, संस्थाचालक काहीच स्पष्टीकरण देत नसल्यामुळे मनीषा जाधव २७ फेब्रुवारीला देहू रस्ता पोलिसांत याबाबतची तक्रार करण्यासाठी गेल्या होत्या पण तिथे पोलिसांनी तब्बल चार तास पोलिस स्टेशनमध्ये बसवून ही संस्था आमच्या हद्दीत येत नाही, चाकण पोलिसांच्या हद्दीत येते, तिथे जाऊन तक्रार करा किंवा बाल कल्याण समितीकडे तक्रार करा, असं जाधव यांना सांगितल्याची माहिती त्यांनी दिली.


अखेर आज मनीषा जाधव यांनी बालहक्क कार्यकर्ते सुशांत आशा यांच्या मदतीनं चाईल्ड हेल्पलाईनला याबाबत कळवलं. त्यानंतर बाल कल्याण समिती सदस्यांनी फोनवरुन सिद्धीच्या पालकांकडे तिच्या तब्येतीची चौकशी केली व या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सोमवारी तिच्या घरी भेट देणार असल्याचं पालकांना सांगितलं. जाधव यांनी आजच चाकण पोलीस ठाण्यात वात्सल्य संस्थेविरोधात तक्रार दिली आहे.


दरम्यान याबाबत ‘वात्सल्य’ या मंतीमंद मुला - मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या निवासी - अनिवासी शाळेच्या संचालकांचं या प्रकरणाबद्दलचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, संचालक वृषाली देवतरसे म्हणाल्या,

”सिद्धी शाळेत असेपर्यंत बरी होती, अकरा तारखेला ती व्हॅनमधून घरी गेल्यानंतर काय झालं, हे आम्हाला माहीत नाही. तिच्या पालकांनी फोन केल्यावर मी घरी गेले, तिला न्युक्लिअस हॉस्पिटलमध्ये नेलं. आमच्या संस्थेतल्या १७ मुलांपैकी कुणाकडेही आजपर्यंत दुर्लक्ष झालं नाही. या मुलीचे पालक विनाकारण आरोप करत आहेत. बाकी आम्ही  आता काही बोलणार नाही, आमच्या संस्थेची बदनामी केल्याबद्दल त्यांची पोलिसांत तक्रार करणार आहोत.”


मुलीच्या हातावर भाजलेल्या जखमा कशा काय? शाळेत असताना तिला काही लागलं होतं का? तशी कल्पना तिच्या पालकांना दिली होती का? तिचे पाय का बांधून ठेवले होते? हे प्रश्न देवतरसे यांना फोनवर विचारण्याचा प्रयत्न इंडी जर्नलनं केला पण त्यांनी यावर काहीही भाष्य न करता त्यांनी फोन कट केला. त्यानंतरही संपर्क करण्याच्या प्रयत्नाला देवतरसे यांनी प्रतिसाद दिला नाही.


वात्सल्य या मंतीमंद मुला - मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या निवासी - अनिवासी शाळा तसंच पुनर्वसन केंद्रात अशा मुलांचा सांभाळ करण्यासाठी भरपूर फी घेतली जाते. “आम्ही ३५ हजार रुपये डोनेशन भरलं आणखी दर महिन्याला ८ हजार रुपये फी, स्कूल व्हॅनची दर महिना हजार रुपये फी भरतो, पण मुलीची ही अवस्था झाल्यामुळे आम्ही पुन्हा तिथं मुलीला पाठवणार नाही. विशेष मुलांसाठी त्या प्रकारचे शिक्षक, इतर सोयी- सुविधा, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा अशा अनेक गोष्टीबद्दल आम्ही त्यांच्याकडे अनेकदा विचारणा केली होती, या सोयी सुविधा पुरवल्या जाण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं होतं, पण तसं झालं नाही. केवळ आमचे पैसे परत मिळण्याचा प्रश्न नाहीये पण अशा संस्थांमधले गैरप्रकार उघडकीस यावेत असं वाटतं. अगदी ही संस्था फी घेतानाही बिअरर चेक किंवा कॅशनेच पैसे मागायची, असं का ? हे आता माझ्या लक्षात येतंय, या सगळ्याचीच चौकशी व्हायला हवी.” जाधव म्हणाल्या.