Quick Reads

लव्हस्टोरी ‘त्या’ दोघांची

वॅलेंटाईन डे निमित्त अनिकेत आणि इझ्रायलची ही लव्हस्टोरी.

Credit : Aniket

ते दोघं भेटले एका डेटिंग अ‍ॅपवर. एकमेकांशी चॅट करता करता एकमेकांचे विचार, आवडी निवडी जुळू लागल्या. मग ते एकमेकांचे फेसबुक फ्रेंडही झाले. फेसबुकवर जवळपास तीन वर्ष ते संपर्कात होते. वर्चुअल जगातली त्यांची ही कनेक्टीव्हिटी त्यांच्या सहजीवनाच्या निर्णयप्रकियेतला गाभाच आहे. अनिकेत आणि इझ्रायल हे ते गोड जोडपं. समलैंगिक संबंधांवर जगभर सामाजिक, कायदेशीर, गुन्हेगारी स्वरुपाची अनेक वादळं घोंघावत असताना अनिकेत आणि इझ्रायलची या गे जोडप्याची ही लव्हस्टोरी मात्र प्रेमाच्या, लैंगिकतेच्या पारंपरिक धारणांपलीकडे पाहते आहे.

अनिकेत गुळवणी हा व्यवसायाने इंटिरिअर डिझायनर असलेला तिशीतला तरूण. मुळचा कोल्हापूरचा, पुण्यात स्थायिक झालेला. अहमदाबादमध्ये इंटिरिअर डिझायनिंगचं शिक्षण घेत असताना त्याला आपल्या लैंगिकतेबद्दल वेगळेपण जाणवू लागलं. वयाच्या बारा – चौदाव्या वर्षापासूनच त्याच्यातले बदल कुटूबियांच्या लक्षात येऊ लागले.

“एकीकडे शाळेतल्या खेळाच्या तासाला मुलं खेळत असताना त्यांच्याबद्दल आकर्षण वाटू लागलं तर दुसरीकडे मुलींसारखं वागणं, बोलणं, उठणं – बसणं  या सगळ्याबद्दल मित्र हिणवायला लागले. मित्र हिणवत असले, त्रास देत असले तरी त्यांच्याबद्दल आकर्षण वाटू लागलं कारण आपली जडणघडण अशी झालेली असते कि, नातेसंबंधांमध्ये उतरंडीत वर असलेल्या व्यक्तीनं छळ करणं हे नात्याचाच एक भाग आहे, त्यामुळे ते नैसर्गिक आहे असं वाटू लागतं.” असं अनिकेत म्हणतो.

त्याचं वागण बायकी आहे असं हिणवणारा तथाकथित समाज हळूहळू तक्रारी, आक्षेप घेत त्याच्यापासून दूर जाऊ लागला. या सगळ्याचा अनिकेतला खूप मानसिक त्रास व्हायला लागला. स्वतला अनेक प्रश्न विचारणं, आपल्या वर्तनाचा आणि त्याला प्रतिक्रिया म्हणून होणाऱ्या समाजाच्या वर्तनाचा अर्थ, आपण नेमके कोण आहोत, आपल्यासारखे लोक जगात असतात का? अशा अनेक प्रश्न, भावनांच्या गुंत्यात गुरफटत असताना तो मानसोपचारतज्ञाकडे गेला. त्यांनी समुपदेशन केल्यानंतर आपल्यात कोणतीही उणीव नाही, आपण काहीही वाईट करत नाही, कुणाला दुखावत नाही, कुणाचंही नुकसान करत नाही याचाच अर्थ आपण चांगला माणूस आहोत असं मला जाणवलं.या समुपदेशाने मला ‘कम आउट’चा आत्मविश्वास दिला असं अनिकेत सांगतो.

 

aniket israelअनिकेत आणि इझ्रायल

कम आउट म्हणजे आपल्या लैंगिकतेबद्दल जाहीरपणे सांगणं. वयाच्या अठराव्या वर्षी अनिकेतला ही स्पष्टता आली होती आणि त्याने गे असल्याचं जाहीर केलं. एकीकडे त्याचं शिक्षण सुरूच होतं. अभ्यासात हुशार असल्याने तशी करिअरच्या बाबतीत विशेष चिंता त्याला वाटत नव्हती आणि अहमदाबादच्या ज्या कॉलेजमध्ये तो शिकत होता, तिथल्या त्याच्या मित्र- मैत्रिणीनी त्याच्या लैंगिकतेचा सन्मानाने स्वीकार केला होता पण आता खरा संघर्ष होता तो कुटुंबियांशी. कुटुंबातल्या आई, बहीण आणि इतर नातेवाईकांना मात्र ‘ही गोष्ट’ रिपेअर करता येईल, औषधोपचार करता येतील असं वाटत होतं. शिक्षण संपवून त्याने त्याचा व्यवसाय सुरु केल्यानंतर अनेक नातेवाईकांकडून लग्नाबद्दल विचारणा सुरु झाली, अनेक लोक परिचित मुलींची स्थळ घेऊन येऊ लागले. लैंगिकतेबद्दल कल्पना असणारे लोक खवचटपणे बोलू लागले. या सगळ्याला तोंड देताना एके दिवशी अनिकेतच्या आईनं सगळ्या नातेवाईकाना स्पष्टपणे सांगून टाकलं कि माझ्या मुलाला मुलींमध्ये रस नाही तेव्हा त्याच्या लग्नाबद्दल तुम्ही काळजी करू नका.

या टप्प्यापर्यत पोहोचण सोपं नव्हत. मात्र अनिकेतशी सतत संवाद करत, या विषयावर जे मिळेल ते वाचत त्यांनी अनिकेतची लैंगिकता समजून घ्यायला सुरुवात केली. अनिकेतच्या घरी त्याच्या आईसोबत मागच्या तीन - चार वर्षांपासून ते दोघं एकत्र राहू लागले. अनिकेतच्या आईनं त्यांच्या या नात्याचा आणि सहजीवनाचा मनापासून स्वीकार केला. “इझ्रायल मुळचा मेक्सिकोचा. नोकरीसाठी तो भारतात आला. काही वर्ष त्याने मुंबईत नोकरी केली. त्याला सुरुवातीला इंग्रजीही बोलता येत नव्हतं. मग संवादासाठी खूप अडचणी यायच्या. मराठी तर त्याला अजिबात येत नाही शिवाय त्याचा देश, संस्कृती, भाषा, त्याची जडणघडण असं सगळच वेगळ होतं. त्यामुळे नाटक, सिनेमा, संगीत अशा विषयांवर त्याच्याशी मला खूप गप्पा मारता येत नाहीत आणि मी खूप बोलका आहे. त्यामुळे संवादात येणाऱ्या अंतराचं काय करायचं हा महत्वाचा प्रश्न होता म्हणून मग मी अशा काही गोष्टी शिकलो कि जिथे आम्हा दोघांना भाषेशिवाय एकमेकांचा सहवास अनुभवता येईल.” अनिकेतनं सांगितलं.

“दोघांनी एकत्र पोहायला जाणं, बागकाम करण, स्वयंपाक करण अशा गोष्टींमुळे आम्हाला भाषेशिवाय एकमेकांचा घनिष्ठ सहवास अनुभवता येतो. एकत्र करायच्या अशा अनेक नव – नवीन गोष्टी आम्ही शोधत, अनुभवत असतो, त्यामुळे आमच्या नात्यात सांसारिक शिळेपणा येत नाही.” असं अनिकेत सांगतो.

इझरायल आणि अनिकेतचं नातं जितकं हेल्दी आहे, तितकंचं अनिकेतची आई आणि इझ्रायलचंही आहे. आपल्या मुलाच्या लैंगिकतेचा, गे असण्याचा, त्याच्या जोडीदाराचा स्वीकार करणारे पालक हळूहळू समाजात पुढे येऊ लागलेत पण त्यांची संख्या अपवादात्मकच आहे. बरेच पालक मुलांना घराबाहेर काढतात, सामाजिक प्रतिष्ठेच्या तथाकथित संकल्पनामुळे मुलांशी नातेसंबंध तोडतात. अनिकेत आणि इझ्रायलची कुटूंबं मात्र याला अपवाद आहेत. दोघांच्या कुटूंबांनी एकमेकांना, त्यांच्या लैंगिकतेला, त्यांच्या प्रेमाला स्वीकारलंय.

“या नात्यामुळे मी एकूणच लैंगिकता, समाज, व्यक्तीचे मूलभूत हक्क, कायदे याकडे जास्त गांभीर्याने पाहून त्याबदद्ल अधिक वाचू - लिहू लागलो. माझ्यासारख्या काही मित्रांना- ज्यांना त्यांचं म्हणणं चारचौघात व्यक्त करण्याबद्दल विश्वास वाटत नव्हता, त्यांना माझ्याशी बोलल्यावर बरं वाटतं. त्यांचा आत्मविश्वास वाढतो.” अनिकेतनं सांगितलं.

सप्टेंबर २०१८ मध्ये, सर्वोच्च न्यायालयानं कलम ३७७ मधल्या समलैंगिक संबंधाचं गुन्हेगारीकरण यापुढे होऊ नये. असा निकाल दिला. या निकालामुळे अनिकेत - इझ्रायलसारख्या अनेकांना आता मोकळा श्वास घेता येतोय. आपलं प्रेम खुलेपणानं व्यक्त करता येतंय. त्यासाठी आता कायद्याची भीती राहिली नाही. मात्र समाज म्हणून अजूनही आपण प्रत्येक व्यक्तीच्या लैंगिकतेचा, जोडीदार निवडीचा, त्यांच्या प्रेम करण्याच्या हक्काचा समंजस स्वीकार करणं हा टप्पा अजून दूरवर दिसतो. या समंजस स्वीकाराकडे आपण पावलं टाकायला हवीत.