India

मुलाखत: स्नेहा काळे, लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या ट्रान्सवुमन

विधवा, हिजडा समूह यांच्यासाठी संघर्ष करण्याचा निर्धार

Credit : फाईल

तुम्ही लोकसभा निवडणुक लढवताय. तुमच्या आतापर्यंतच्या संघर्षाबद्दल, आयुष्याबद्दल थोडं सांगा.

मी बीकॉम पर्यंत शिक्षण घेतलंय. जेव्हा माझ्या अस्तित्वाबद्दल समाजाला कळलं तेव्हा समाजाकडून मला खूप त्रास सहन कराव्या लागला. घराबाहेर पडल्यामुळे हालअपेष्टा तर होत्याच. वेगळं रहायचं म्हणजे घराचं भाडं, खाण्या- पिण्याचा खर्च या गोष्टी स्वत:च करण्याचं आव्हान होतं. त्यात घरच्यांकडूनसुद्धा मला त्रास झाला. त्यावेळी मी एकता फाऊंडेशनमध्ये मी काम करायला सुरुवात केली. एम डॅक (मुंबई डिस्ट्रिक्ट एड्स कंट्रोल सोसायटी) या सरकारी संस्थेचं एचआयव्ही -एड्स पेशंटसाठी जे काम चालतं, त्यात आऊटरीच वर्कर म्हणून काम केलं. काही वर्षाच्या अनुभवानंतर मी त्या संस्थेत काऊंसिलर म्हणून काम करू लागले. पण फंडिगच्या अडचणी आल्या आणि पुन्हा नोकरी सुटली.पोटापाण्यासाठी मी पुन्हा मंगती करायला जाऊ लागले. (भीक मागायला लागले )

तुम्हाला निवडणूक का लढवायची आहे?

मला दुर्लक्षित झालेल्या समाजाला त्यांचे हक्क मिळवून द्यायचे आहेत. देश स्वतंत्र होऊन ७२ वर्ष झाली तरीही किन्नर समाज पारतंत्र्यात आहे असं मला वाटतं आणि त्यांना सन्मान आणि हक्क मिळवून द्यायचं माझं उद्दिष्ट आहे.

तुम्ही सध्या काय काम करत आहात?

मी सध्या दुर्बल आघाडी या संघटनेसाठी काम करत आहे. ही संघटना देवदासी, वाघ्या-मुरूळी,  आराधी-जोगती अशा समाजापासून वंचित असलेल्या लोकांसाठी काम करते. या संघटनेचे अध्यक्ष विलास रुपवते यांनी मला निवडणुकीसाठी उभं राहण्याची प्रेरणा दिली. मी चांगलं काम आणि समाजकल्याण करण्याच्या हेतुनं उभी राहिलीय.  हा समाज एक हिजडा निवडणुकीला उभा आहे म्हणून लक्ष देईल का? किंवा एक हिजडा आपल्या गरिबांसाठी, समाजापासून लांब झालेल्या लोकांसाठी निवडणूक लढवतोय म्हणून मतं देईल का ? असे प्रश्न मनात येतात, पण मी लढणार आहे.

उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात तुमच्यासमोर प्रस्थापित पक्षांतले प्रिया दत्त आणि पूनम महाजन अशी दोन मोठी आव्हानं आहेत, त्याचं दडपण नाही येत?

आता पहिलं पाऊल  मी उचललंय ते मागे घेण्यासाठी नाही. एक किन्नरानं ही हिंमत दाखवली तर इतर किन्नरांना त्यातून बळ मिळतं. ते पुढे येतात. माझ्यामते रस्ता काटेरी असला तरी आपण पण काटे बघून डगमगायचं नाही, काट्यावरून पण चालत रहायचं, एक दिवस काटेही आपल्या जिद्दीमुळे शरमतात. समोर कोणीही असलं तरीही आपण आपलं ध्येय गाठलं पाहिजे.


तुम्ही लोकसभेला निवडुन आलात तर मतदारसंघातल्या कोणत्या मुद्दयांना, प्रश्नांना प्राथमिक स्थान देणार? तुमच्या निवडणूक जाहीरनाम्यात कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत?

कमी वयात लग्न झालेल्या विधवा स्त्रियांना कठीण परिस्थितीत जगावं लागतं. त्यांच्या मुला- बाळांना सांभाळणं, शिक्षणपाणी करणं यासाठी त्यांना मदतीची गरज असते. अशा महिलांना जास्त मानधन मिळवून देण्याचा  माझा विचार आहे.

देवदासी, वाघ्या-मुरळी, आराधी-जोगती  हे समाजापासून वंचित असलेले लोक. देवाचं नाच - गाणं करुन पोट भरतात. हिजडा समाजही जोपर्यंत तरूण आहे तोपर्यंतच हे काम करु शकतो. नाचून गाऊन पैसे कमवू शकतो पण वय झाल्यावर त्याला कसलाही आधार नसतो तर त्यांच्यासाठी काही योजना बनवण्याचा माझा विचार आहे. किन्नर समाजाला कंपल्सरी शिक्षण आणि नोकरी कशी मिळेल याकडे मी लक्ष देणार आहे. याशिवाय ज्या वीरपत्नी आहेत, सैन्यात ज्यांचे पती शहीद होतात, त्यांना सरकार तात्पुरती मदत देतं पण आयुष्यभर त्यांच्या पत्नीला लागणारं पाठबळ, मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणं हे सगळे मुद्दे मला पार्लमेंटमध्ये मांडायचे आहेत.

निवडणूक म्हणलं कि प्रचार आला, त्यासाठी लागणारं मनुष्यबळ, पैसा आणि इतर यंत्रणा आलीच. तुम्ही हे सगळ कशाप्रकारे उभं करत आहात?

मी एका मध्यम वर्गीय कुटुंबातून आहे, माझ्या हातात काहीच नाही तरीपण मला वाटतं कि माझा समाज पैसे बघत नाही, माझा गरीब समाज माझ्यासोबत ऊभा आहे.माझा किन्नर समाज मला पाठिंबा देतोय. या सर्वांना घेऊन फक्त प्रचाराच्या बळावर मी माझं चारित्र्य, काम लोकांपुढे आणणार आहे.

सहा महिन्यांपुर्वी सर्वोच्च न्यायालयानं कलम आयपीसी ३७७ बाबत जो निकाल दिला, त्यामुळे एलजीबीटीक्यू समूहाला कायद्यानं दिलासा मिळाला आहे, पण अजूनही समाजाचा दृष्टीकोन पुरेसा बदलेला नाही, तेव्हा तुमच्या या राजकीय प्रवासात तुम्हाला लोकांची समर्थ साथ मिळेल?

३७७ बाबतीत सुप्रीम कोर्टानं चांगला निकाल दिला तरी समाज हे मान्य करत नाही. ट्रान्सजेंडर्सना सन्मान नाही. हक्क नाहीत. कितीतरी ट्रान्सजेंडरवर बलात्कार होतात आणि गुन्हा तर लांब पण साधी तक्रारसुद्धा पोलीस दाखल करुन घेत नाहीत. आम्हाला शरीर नाही का? आम्हाला भावना नाहीत का? आमच्यावर होणाऱ्या अत्याचारांबद्दल पोलिसांनी गुन्हे दाखल केले पाहिजेत. सर्व किन्नरांनीही एकत्र येऊन लढा दिला तर समाजही साथ देईल. मनामध्ये ध्येय पाहिजे कारण ही लढाई समाजासोबतच स्वत:सोबतही आहे.

अलीकडे राजकारण, समाजकारणात ट्रान्सजेंडर्सना थोडंसं प्रतिनिधित्व मिळण्याची किमान सुरुवात झालेली बघायला मिळते पण लेसबियन, बायसेक्शुअल्स, गे अजून या प्रतिनिधित्वापासून लांब आहेत, याबद्दल काय वाटतं?

आपण स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत. आपण आपली गे, लेस्बियन जी आयडेंटिटी आहे, ती मान्य करून बाहेर यायला हवं. मुळात आपण आपल्या आयडेंटिटीला स्वीकारुन काम करत राहिलं पाहिजे. त्यातून पुढे लोकांनी आपल्याला स्वीकारण्याची हळूहळू सुरुवात होते आणि मग प्रतिनिधित्वाचा रस्ता सुरु होतो. डाँ.आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात प्रत्येक भारतीयाला स्वतंत्र जगण्याचा, काम करण्याचा अधिकार दिलेला आहे. ते अधिकार या समूहानं वापरले पाहिजेत. आपल्या अस्तित्वासाठी संघर्षा केला पाहिजे.

सह मुलाखतकार: तेजस म्हात्रे