Americas
ब्राझीलमधील काळ्या स्त्रीवादी कार्यकर्तीचा स्मृतीदिन
मॅरिएल फ्रॅंको यांची मागील वर्षी गोळ्या झाडून हत्या
१५ मार्च २०१८ ची सकाळ ब्राझीलमधल्या रिओ दे जनेरो शहरावर दु:खाची छाया घेऊन आली. हजारो तरुण - तरुणींच्या गळ्यातली ताईत असणाऱ्या मॅरिएल फ्रॅंको यांची अंत्ययात्रा या दिवशी रिओ शहरानं पाहिली.
१४ मार्च २०१८ ला मॅरिएल फ्रॅंको या अवघ्या ३८ वर्ष वयाच्या मानवाधिकार कार्यकर्तीवर रिओ दे जनेरो शहराजवळ गोळीबार करण्यात आला. एक कार्यक्रम आटपून संध्याकाळी त्या आपल्या कारमधून घरी परतत होत्या, त्यावेळी त्यांच्या कारवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्यासोबत कारमध्ये असलेला त्यांचा ड्रायव्हर अॅंडरसन पेड्रो हाही ठार झाला. फ्रॅंको यांना ९ गोळ्या लागल्या होत्या. दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवरुन येऊन त्यांना गोळ्या घातल्या होत्या. या पद्धतीनं त्यांची झालेली हत्या आपल्याकडील नरेंद्र दाभोलकर, गौरी लंकेश,गोविंद पानसरे, एम.एम. कलबुर्गी या विचारवंतांच्या हत्यांची आठवण करुन देणारी आहे.
फ्रॅंको यांच्या हत्येनंतर संपूर्ण ब्राझीलमध्ये अनेक निषेध मोर्चे, आंदोलनं झाली. ब्राझीलसोबतच पॅरिस, न्यूयॉर्कसारख्या अनेक शहरांत या हत्येविरोधात निदर्शनं झाली. जगभरातल्या मानवाधिकारासाठी काम करणाऱ्या संस्थांनी, व्यक्तींनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. फ्रॅंको काळ्या स्त्रीवादी संघर्षाचा एक महत्वाचा आवाज होत्या. त्या लैंगिक अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी काम करत होत्या. ज्यादिवशी त्यांची हत्या झाली, त्यादिवशीही त्या काळ्या स्त्रियांसाठी त्यांनीच आयोजित केलेल्या ‘यंग ब्लॅक वुमन मुव्हिंग पॉवर स्ट्रक्चर्स’ या कार्यक्रमात भाषण करुन परतत होत्या.
फ्रॅंको यांचा जन्म ब्राझीलमधल्या मारे फावेला या लहानशा गावातला. जिथं गरिबांना हक्काची घरं नाहीत आणि गरीब मिळेल त्या जागेवर अतिक्रमण करुन कसंबसं राहतात, अशा वसाहतीत फ्रॅंको यांचं बालपण गेलं. कॅथलिक युनिवर्सिटी ऑफ रिओ दे जनेरोमध्ये त्यांनी सामाजिक शास्त्राचं शिक्षण घेतलं. याच काळात त्यांना मानवाधिकारासाठी काम करावंसं वाटलं. ब्राझील फाऊंडेशन आणि मारे सेंटर फॉर सॉलिडॅरिटी अॅंड स्टडी सेंटर या दोन संस्थासांठी त्यांनी अनेक वर्ष काम केलं. विशेषत: ब्राझीलमधील पोलिसी आणि लष्करी हिंसाचाराच्या घटनेत बळी पडलेल्या व्यक्तींना, त्यांच्या कुटूंबांना मदत करण्याचं काम फ्रॅंको यांनी केलं. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी रिओ सिटी काऊन्सिलसाठी सोशॅलिझमअॅंड लिबर्टी पार्टीकडून निवडणूक लढवली.
या निवडणुकीत पाचव्या क्रमांकावर सर्वाधिक मतं मिळवणाऱ्या फ्रॅंको सिटी काऊन्सिलवर निवडून आल्या. सिटी काऊन्सिलवर काम करताना एलजीबीटीक्यू समूहासाठी विशेष योजना, त्यांचे प्रश्न याला त्यांनी प्राधान्य दिलं. या समूहाच्या प्रश्नांवर विविध अहवाल तयार करणं, धोरणात्मक निर्णयांसाठी काम करणं यामध्ये त्या गढून गेलेल्या असत. यासोबतच न्यायबाह्य मृत्यू (एक्सट्रा ज्युडिशियल किलिंग्ज) फेक एन्काऊंटर्स, लष्कराकडून महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या केसेसमध्ये सतत प्रश्न विचारणं, कायदेशीर लढाईसाठी आवश्यक त्या गोष्टी करणं हे काम त्या प्राधान्यानं करत. लहान सहान वस्त्यांमध्ये जाऊन काळ्या स्त्रियांचे प्रश्न समजून घेणं, त्यांच्या सभा घेणं, त्यांच्यासाठी विविध चर्चासत्रं आयोजित करणं या कामांमध्ये त्या सतत व्यस्त असत.
सिटी काऊन्सिलर म्हणून काम करणं, शहराचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, एलजीबीटीक्यूंचे प्रश्न, मानवाधिकारांचं उल्लंघन झालेल्या केसेस अशा अनेक आघाड्यांवर काम करत असतानाच फ्रॅंको त्या मारे फावेला वस्तीतही नेहमी जात असत, जिथं त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. फ्रॅंको यांच्या हत्येनंतर मारे फावेलातल्या अनेक नागरिकांनी तिथल्या माध्यमांशी बोलताना सांगितलं, “फ्रॅंको आता - आता सिटी काऊन्सिलर म्हणून निवडून आल्यानंतर सरकारी कार वापरायला लागल्या. त्याआधी त्या इतक्या मोठ्या नेत्या होत्या तरी मारे फावेलाला बस, ट्रेननं यायच्या. वस्तीत पायी फिरायच्या, कुणाच्याही घरी सहज जायच्या. आम्ही काहीही बनवलं तरी प्रेमानं खायच्या.” मारे फावेलाच्या नागरिकांनी फ्रॅंको यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या या भावना, आठवणी त्यांचा वावर आणि काम किती लोकाभिमुख होतं, हेच सांगतात.
फ्रॅंको या ब्राझीलमधल्या डाव्या राजकारणातल्या एक उदयोन्मुख नेत्या आणि काळ्या स्त्रीवादी संघर्षाचा एक मोठा आवाज होत्या, त्यामुळे त्यांची हत्या हा तिथल्या तरुणाईसाठी मोठा धक्का होता. १५ मार्चला रिओ शहरातल्या त्यांच्या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने कॉलेजचे तरुण - तरुणी सहभागी झाले होते. फ्रॅंको यांच्या हत्येनंतर जवळपास १३ जणांना ब्राझीलमधल्या पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली होती आणि त्यातूनच उजव्या अतिरेकी हिंदुत्ववाद्यांनी ही हत्या केली, या प्राथमिक निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले. हत्येच्या वेळी घटनास्थळच्या प्रत्यक्षदर्शी सहा साक्षीदारांनी एका मारेकऱ्याला ओळखल्याचं पोलिस तपासात नमूद केलं गेलं. दोन मारेकऱ्यांपैकी एक मारेकरी हा एक पोलीस अधिकारीच होता, असंही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दिलेल्या माहितीतून पुढे आलं. मात्र या प्रकरणात एकाही संशयिताला अद्याप अटक झालेली नाही. जगभरातल्या मानवाधिकार संघटनांचं खटल्यावर लक्ष असल्यानं तपासाबाबत एक आंतरराष्ट्रीय दबाव आहेच, मात्र फ्रॅंको यांच्या हत्येनं मानवाधिकारांच्या लढाईचं, काळ्या स्त्रीवादी संघर्षाचं मोठं नुकसान केलंय. एका व्यक्तीच्या जाण्यानं कोणताही संघर्ष थांबत नसला तरी प्रश्न आहे तो जगभर फॅसिस्ट शक्ती ज्याप्रकारे प्रश्न विचारणाऱ्या, अन्यायाविरोधात ब्र काढणाऱ्या व्यक्तींना संपवत आहेत, त्याचा प्रतिरोध कसा करता येईल याचा.